Thursday, April 28, 2022

जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या 'वसंतोत्सव' या कार्यक्रमांत सादर झालेल्या 'मी वसंतराव' या चित्रपटांतील काही गाण्यांमुळे तसंच त्या गाण्यांमागच्या गोष्टींमुळे खरं तर या चित्रपटाची उत्सुकता,उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पण कोरोनाच्या लाटेत चित्रपट प्रदर्शित व्हायचा मुहूर्त लांबला आणि एका ​दीर्घ प्रतिक्षेनंतर या महिन्यात तो प्रदर्शित झाला. चित्रपट यायच्या आधीनंतरही या चित्रपटाबद्दल खूप ऐकलं, वाचलं होतं. कौतुक करणारे जसे होते तसेच चित्रपट कुठे कसा कमी पडला यावर भाष्य करणारी मंडळी सुद्धा होती.पण वाटलं,संघर्षातून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या एका दिग्गज गायकाच्या आयुष्यातील हळवी गोष्ट सांगणारी हि कलाकृती म्हणून पाहावं याकडे, जसं एका संघर्षाचा सांगीतिक प्रवास !


पंडित वसंतराव देशपांडे... हे नाव घेताच ऐकू येतो,लहान असतांना वाड्यातल्या घरात रेडिओवर, टेपरेकॉर्डरवर ऐकलेला तो जबरदस्त आवाज; घेई छंद मकरंद, तेजोनिधी लोह गोल, सुरत पिया कि, या भवनातील गीत पुराणे, शतजन्म शोधिताना, मृगनयना रसिक मोहिनी, मधु मिलनात या , बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, राहिले ओठातल्या ओठांत वेडे शब्द माझे...खरं तर गाण्यातलं तेव्हा काहीही समजत नसताना कानावर पडत असलेली ती गाणी. आज विचार केला तर वाटतं, जणू त्याच गाण्यांच्या संस्कारांमधून कान तयार झाले. तेव्हा परिस्थिती साधारण असली तरी या बाबतीतली श्रीमंती मोठी होती कारण जे सर्वोत्कृष्ट होतं तेच कानी पडत होतं, फक्त बाबांमुळे ! पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आवाजाशी झालेली ती पहिली ओळख.पण त्या आवाजात काय तपश्चर्या सामावलेली आहे हे तेव्हाही कळलं नाही, ना त्यानंतर कधी. पण हि संधी दिली 'मी वसंतराव' या चित्रपटाने ज्यामुळे त्यांच्या नाविन्यपूर्ण आक्रमक गायकी मागे लपलेल्या संघर्षाचे पैलू समजून घेता आले.काही गोष्टी सारं काही विसरून दूर त्या क्षितिजापल्याड घेऊन जातात.. हेच काम हा चित्रपट करतो!

एका कलाकाराच्या आयुष्यात त्याला साथ देणारी माणसं किती महत्वाची असतात हे चित्रपट पाहतांना राहून राहून जाणवत राहतं.या बाबतीत पंडितजी खरंच नशीबवान. एकीकडे आईची भक्कम साथ तर दुसरीकडे शंकरराव सप्रे, मास्टर दिनानाथ मंगेशकर, खाँ साहेबांसारखे गुरु. नागपूर पुणे लाहोर प्रवास करावा लागूनही आपलं गाणं त्यांना जपता आलं. वसंतरावांना मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गाणं तर शिकवलंच पण सोबत जीवनातील कटू वास्तव पण दाखवलं. आर्थिक दारिद्रय सोसत असताना ओळख करून दिली जगातील सर्वात मोठया दारिद्र्याशी, ते म्हणजे 'आपल्याला गायचं असणं पण, समोरच्याला ते ऐकायचं नसणं'.. ज्याची अनुभूती काळाच्या ओघात वसंतरावांना आली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या शब्दांनी त्यांना दुःख पचवण्याची ताकत दिली.तेच दुःख,ती आर्तता त्यांच्या आवाजात आरपार उतरली. 

हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे अनेक नात्यांची .. आई मुलगा, गुरु शिष्य आणि निखळ निःस्वार्थ मैत्रीच्या धाग्याची ! या नात्यांची श्रीमंती कायम त्यांच्या सोबत होती शिवाय साथ होती बायकोची म्हणून तर हातातून निसटू पाहणारं आपलं स्वप्न ते पूर्ण करू शकले.पण या सर्व प्रवासांत हरवलेले एक नातं होतं,वडिलांचं तो मान त्यांनी दिला, संगीताला. यावरून संगीताचं त्यांच्या आयुष्यात असलेलं स्थान खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं. 

चित्रपटांत वसंतराव व मास्टर दीनानाथ यांचे माळरानावरील संभाषण, खाँ साहेबांनी शिकवलेला ‘मारवा’ आणि  बेगम अख्तर यांच्या घरातील प्रसंग मनावर गेहेरी छाप पाडतात. सांसारिक जबाबदाऱ्या निभावताना निर्माण होणारे वसंतरावांचे आंतरिक द्वंद्व आपल्याला सुद्धा कासावीस करतं. वसंतराव व त्यांच्या आईच टांग्यातील संभाषण, देव न मानणाऱ्या आईनं सोळा सोमवारचे व्रत करणं हे प्रसंग अस्वस्थ करतात.नोकरी सोडल्यावर त्यांना करावा लागणारा संघर्ष त्यांच्याबरोबर आपल्यालाही हळवं करतो.

चित्रपटातील बावीस गाणी हे या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य ! प्रत्येक गाण्याची वेगळी खासियत. 'ललना' सारखं खट्याळ गाणं एकीकडे हसवतं तर  'ऐसे निकली हैं आह दिल से नई,जैसे मेहफिल से उठ के जाँ जाए'... सारखं गाणं ऐकताना डोळे पाणावतात. गाण्याबद्दल बोलताना आवर्जून उल्लेख करायला हवा तो सर्वांत देखण्या गाण्याचा,' पुनव रातीचा लखलखता'... आक्काची भेट व त्यानंतर येणार हे गाणं, सर्व बाजूनी प्रभावी असणारं आणि दिसणारं. आक्कांचं घर, तिथलं वातावरण, कंदीलाचा तो प्रकाश, गाण्याचे बोल व त्यावर आक्का आणि वसंतरावांचा अभिनय ! या गाण्यातील प्रकाश योजनेचा उत्कृष्ट वापर फार प्रभावीपणे त्यांची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहचवतो. त्यांच्या गाण्यातील ताकत किती जबरदस्त होती याची प्रचिती येते. उपेक्षित असूनही जराही खंत नसणारी आक्का एका अनपेक्षित वळणावर भेटते. आक्काची ती भेट, तो प्रसंग खुप काही देऊन जातो .. वसंतरावांना आणि आपल्यालाही या संपूर्ण प्रसंगातील राहुल देशपांडे यांचा अभिनय केवळ निःशब्द करून जातोआजोबांवर जीवापाड प्रेम करणारे राहुल देशपांडे आजोबांची भूमिका साकारताना त्यांच्या व्यक्तिरेखेतील हरेक पैलू नजाकतीने उलगडतात, त्यांच्या भावना बखुबी आपल्यापर्यंत पोहोचवतात जणू आजोबांसोबत तो हर एक क्षण ते सुद्धा जगलेत की काय असं वाटावं ..

पडद्यावर आपली भूमिका समर्थपणे साकारणारे कलाकार, नेमका भाव खोलवर उमटवणारे गाण्यातील शब्द, त्या शब्दांना स्वरसाज चढवणारा आवाज, त्या काळात घेऊन जाणारं मधुर संगीत, प्रकाशाचा उत्तम वापर करून नेमकं परिणाम साधणारं छायाचित्रण, निपुण धर्माधिकारी यांचं दिग्दर्शन व राहुल देशपांडे यांनी साकारलेले पंडित वसंतराव पाहतांना वाटतं ही मैफिल कधी संपूच नये आणि त्याच वेळी कानांवर शब्द पडतात,'कंठात आर्त ओळी, डोळ्यांत प्राण आले..आता समेवरी हे, कैवल्यगान आले'.. गाणं संपतं आणि प्रेक्षागृहातील निःशब्द शांतता पाहून वाटतं मास्टर दीनानाथ मंगेशकरांना अपेक्षित असलेली भान हरपून स्वतःला विसरून पसरलेली शांतता हीच कलाकाराला मिळालेली खरी दाद आहे.... 

© कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment