पॉकेटमनी
'स्कुटी मध्ये पेट्रोल भरायला हवं, एकदम खडखडाट होईल आता', असं मनाशीच बोलले. जाऊ दे उद्या परवा सुट्टी आहे सोमवारी भरू असा विचार करून ऑफिस मधून येतांना कंटाळा केला. मग काय सोमवारी नाईलाज होता, पेट्रोल भरावंच लागणार होतं. ऑफिसच्या बसमधून निघाले खरं पण मनात पुढच्या कामांचा विचार होता. 'अरे आज २८ तारीख, एक तारखेला भरायचं होतं पेट्रोल, पण हे आधीच कसं संपलं, आता गाडी काही चालणार नाही एक तारखेपर्यंत', अशी उगाच मनांत जरा चीड चीड पण झाली. मग विचार केला, या एक तारखेचं काय खूळ डोक्यात आहे कि एक तारखेला पेट्रोल भरायचं म्हणून ? बरं पॉकेटमनी संपलाय, पैसे नाहीत असं पण नाही; आणि आता कोणी देत पण नाही पॉकेट मनी. कॉलेज मध्ये असतांना आई तेवढी द्यायची. पुढे बारावी नंतर नोकरी करायला लागल्यावर पॉकेटमनी हि संकल्पनाच संपली, आयुष्यातली. तेव्हा आई म्हणायची 'हवे असतील तेवढे पैसे ठेव स्वतःजवळ आणि बाकीचे बँकेत भर',असं म्हणून तिने पैसे वाचवायची सवय लावली. पार्ट टाइम नोकरी करून मिळणाऱ्या तीनशे रुपयांचं सुद्धा केवढं तरी अप्रूप वाटायचं त्या वेळी. कोथरूडच्या विद्या सहकारी बँकेत उघडलेले पहिलं बँक खातं, अजूनही आठवतंय. आता तर काय, मलाच पॉकेटमनी द्यावा लागतो, मग मला आता कोण देणार ?
केदार माझ्याहून लहान , लहान भाऊ म्हटल्यावर त्याला कसं मागणार, तो जर मोठा असता ना माझ्यापेक्षा तर हक्कानं मागितलाच असता. आणि नवरा तो तर म्हणतो 'तुझा आख्खा पगार आहे ना तुझा पॉकेटमनी मग अजून मी कशाला देऊ. तो सगळा संपेपर्यंत शॉपिंग केलंस तर देईन'.. आणि तेवढी तर हिम्मत नाहीच आहे माझी हे त्याला पण माहितीये. एक तर त्याला ना कळतंच नाही मला काय म्हणायचं आहे ते, पैसे म्हणजे कॅश, नोटा हातात ठेवण्यात काय मजा येते.. घेणाऱ्याला ! बहुतेक boys या कॅटेगरीला समजतच नाही पॉकेटमनी देतांना काय भारी वाटतं ते.. एकदा काय झालं, शाळेतला एक मित्र आहे आमचा, नुकताच ग्लोबल डायरेक्टर झाला. आता एवढी मोठी पोस्ट मग पगार तर किती असणार ना , मग काय त्याच्या तोंडावरच खूप अंदाज बांधले त्याच्या पगाराचे आणि म्हटलं त्याला 'अरे तुझा पगार खूप वाढला आहे आता, तर तू आम्हाला म्हणजे मी,वैशाली आणि अर्चनाला जरा पॉकेटमनी देत जा प्रत्येक महिन्याला, जास्त नको पण निदान महिन्याची कॉफीची बिलं तरी त्यात भागतील एवढा दे' .. इतका वेडेपणा पॉकेटमनी साठी करून झालाय तरी सुद्धा पॉकेटमनी मात्र कोणी देत नाही याचं दुःख आहे.
तर काय सांगत होते, हां .. पेट्रोल भरायचं होतं मग काय ऑफिसच्या बसमधुन उतरले, कोपऱ्यावर लावलेली स्कुटी घेतली आणि गेले पेट्रोल पंपावर. पेट्रोल खरंच महाग झालं आहे बहुतेक, कारण फारशी गर्दी नव्हती पंपावर, नेहमीपेक्षा कमी होती. माझा नंबर येईपर्यंत गाडीची डिकी उघडली. पर्समधून पाचशे रुपये काढून ठेवले. तेव्हाच ललितनी WA वर पाठवलेला एक जोक आठवला, पेट्रोल ची टाकी फुल करणाऱ्यांच्या मागे इडी लागणार असा काहीतरी.. तो आठवून हसले पण हळूच. मास्क असल्याने एक बरं असतं , कुठे काहीही आठवून हसायला आलं तरी समोरच्याला काहीही समजत नाही. एकदाचा माझा नंबर आला, 'टाकी फुल करा' असं म्हणून त्यालाच टाकीच झाकण घट्ट आहे तर तुम्हीच उघडा असं सांगून मी आरामात इकडे तिकडे बघत होते. त्याने शांतपणे गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं आणि मला म्हणाला, 'कुठे भरू पेट्रोल' ?.. मी म्हटलं 'कुठे काय' ? गाडीत भरा'.. तर परत तेच, 'अहो कुठे भरू पेट्रोल, टाकी फुल्ल आहे मॅडम'.. मी जरा गोंधळले, असं काय म्हणतोय हा. 'काय ? फुल्ल आहे , कसं काय'? असं म्हणत बघते तर काय काठोकाठ पेट्रोलने भरलेली ती टाकी गालातल्या गालात माझ्याकडे पाहून हसत होती. आजूबाजूची मंडळी उत्सुकतेने आता मी काय प्रतिक्रिया देते याची प्रतीक्षा करत होती.. साहजिकच आहे म्हणा इतक्या मोठ्यांदा तो पेट्रोल पंप वाला बोलला होता कि सर्वांनी ऐकलं होतं. मग काय, 'अरेच्चा, हो कि .. खरंच, पण असं कसं झालं' असं काहीतरी मी बडबडले आणि चेहऱ्यावरचे भाव सांभाळत गाडी पुढे घेतली. 'अरे यार काय हे, मला कसं कळलं नाही गाडीत पेट्रोल आहे ते '? अशी चिडचिड झाली. मग काय इकडे तिकडे न बघता गाडी स्टार्ट केली आणि निघाले घरी. मला समजेना, गाडीतून पेट्रोल चोरी होतं पण रिकाम्या गाडीत पेट्रोल कोणी भरून ठेवलं असेल... विचार करत करत घरी आले.
घरी पोहचले तोवर केयूर पण आला होता. मी म्हटलं 'अरे आत्ता काय झालं माहितीये, मी पेट्रोल भरायला गेले होते तर' .. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच तो म्हणाला, ' अग मी कालच भरलं, सकाळी कोपऱ्यापर्यंतच जायचं होतं तर स्कुटीनी गेलो, तेव्हाच पाहिलं खूप कमी होतं पेट्रोल मग भरून आलो'.. 'अरे एक तर तू माझी स्कुटी कधी वापरत नाहीस मग मला कसं समजेल आणि सांगितलं का नाहीस, पेट्रोल भरलं ते, किती घोळ घातला मी यार '? .. 'अग पण समोर काटा असतो ना गाडी वर जो दाखवतो पेट्रोल फुल्ल आहे ते , तो नाही का पाहिलास'? .. आता काय बोलणार.. गप्प बसले.. मग टराटरा गाडी फिरवून पेट्रोल संपवून रिकामी गाडी उभी करून ठेवणारे नवरे आणि मुलं यावर नॉनस्टॉप बोलणाऱ्या मैत्रिणी आल्या डोळ्यासमोर.... मग वाटलं, हुश्श पेट्रोल संपलं की न सांगता पेट्रोल भरून मिळतंय हे काय कमी आहे, असा पॉकेटमनी पण चालेल की ...
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment