Thursday, April 28, 2022

 'आमच्या वेळचं पुणे नाही राहिलं आता' .. असं म्हणायला सत्तरी पार करण्याची काहीच गरज नाहीये, चाळीशी पार केलेले आपण पण बोलू शकतो हे वाक्य, इतका चेहरा मोहरा पार बदललाय आपल्या पुण्याचा. 'जुनं ते सोनं म्हणायचं कि नवीन ते प्लॅटिनम' हेच कळत नाही आता. शाळेत असतांना जो कर्वे रस्ता होता तो अजूनही आठवत राहतो, डोळ्यासमोरून जात नाही. कोथरूड वरून निघालं कि मृत्युंजयेश्वर मंदिर मग मारुती मंदिर मग दशभुजा गणपती मंदिर आणि नंतर यायची शाळा. शांत रस्ते,भरपूर झाडी, ना कोलाहल ना ट्रॅफिकचा कल्लोळ.. पण आता तर सारं चित्रच पालटून गेलंय.मेट्रो काय आली, तिने तर 'पुरे घर का रंग हि बदल डाला'. बरं, हि तक्रार अजिबातच नाही पण आजूबाजूचं सारं काही ज्या वेगानं बदलत आहे ना ते पाहून आठवण येते आपल्या जुन्या पुण्याची इतकंच. 


नुसतंच रस्त्याचं रूप नाही बदललं तर इथली माणसं सुद्धा बदलली आहेत. सतत कशाच्या तरी मागे धावतायेत असं वाटतं. सिग्नलच भान नाही, गाडी चालवतांना सुद्धा मोबाईल लागतो आणि कानांत हॅन्ड्स फ्री. कुठेतरी पोहचायचं एवढंच ध्येय घेऊन बाहेर पडलेली आणि त्यासाठी गाडीवरून धावणारी असंख्य मंडळी आजूबाजूला दिसत राहतात. समजा श्रीमंत पेशवे आज परत आले शनिवारवाड्यावर तर येताना त्यांना सुद्धा प्रश्न पडेल कि 'हे आपलंच पुणे आहे का' ? इतक्या झपाटयाने सारं काही बदलतंय. 

आपल्याच आजूबाजूला होणारा हा बदल बघताना मला नेहमी गंमत वाटते, ती गाडी चालवताना मान वाकडी करून कान आणि खांद्याच्या मध्ये मोबाईल ठेवून त्यावर गप्पा मारत गाडी चालवणाऱ्या दादा मंडळींची. त्यांना पाहिलं की खूप मोह होतो त्यांना थांबून विचारावं, की दादा कोणाशी बोलताय तुम्ही ? आणि काल माझं हे स्वप्न पूर्ण झालं, दादा नाही पण एक ताई भेटल्या, ज्या मला कधीच विसरणार नाहीत. त्या भेटल्या, भर चौकात ते पण अशा जिथे आठही दिशांकडून येणारी वाहनं मुक्तपणे विहरत असतात.बरं लांबून दिसेल एवढ मोठं सर्कल पण बनवलं आहे त्या चौकात, ज्यात शोभेची झाडं लावली आहेत. बरं, हे सगळं नाही दिसलं तर तिथे डॉ. आंबेडकरांचा पुतळा पण बसवला आहे, जेणेकरून त्यांना पाहून तरी सुजाण नागरिक असल्याची प्रचिती येऊन थोडं तरी चित्र बदलेलं, पण नाही.. काल काय झालं याच चौकात ऑफीसच्या बसमधून उतरल्यावर मी रस्ता क्रॉस करत होते. अलीकडे पलीकडे रस्त्यावर व्यवस्थित पांढरे पट्टे मारलेले असूनही त्याचा काही उपयोग होण्याची चिन्ह तर नव्हतीच त्यामुळे मी जमेल तसा रस्ता क्रॉस करत होते. वाटलं हातात एक बोर्ड घ्यावा, 'कृपया जरा थांबा, मला रस्ता ओलांडू द्या'.. इतक्यात एक ताई समोरच्या लेन मधून आल्या व सर्कलच्या बाजूने चुकीच्या दिशेला वळू लागल्या. त्यांचा फोन कान आणि खांद्याच्या मध्ये स्थानापन्न होता त्यामुळे साहजिकच त्यांची मान तिरकी होती व त्यात त्या तिरक्या वळत होत्या. काहीतरी गडबड झाली ज्यामुळे फोन सरकला व गाडीही. त्यांना समजेना, काय करावं आणि त्या आहेत त्या स्थितीत statue झाल्या. या अचानक आलेल्या 'झुळकीने' काही सेकंदात दोन ट्रक, एक pmt बस व अनेक दोन व चार चाकी गाड्या रस्त्यामध्येच अचानक पणे थांबल्या. 'झगामगा मला बघा' म्हणत कोण मधेच कडमडलं हे सर्वांना समजेपर्यंत मी झटपट action mode वर गेले. कधी कधी काहीतरी भन्नाट सुचतं मग काय त्या गिचमिडीतून वाट काढत त्या मुलीच्या scooty पर्यंत पोचले. अरे ही केवढीशी, हातांत scooty, कानात मोबाईल आणि एवढं ट्राफिक थांबवण्याची तिची कुवत पाहून मी अगदी भारावून गेले. पुढं सरसावून मी म्हटलं, 'ताई मी मोबाईल पकडते तुम्ही scooty सांभाळा, केवढा महत्वाचा फोन सुरू आहे नाही तुमचा, नका काळजी करू, हे थांबतील सगळे'... असं म्हणताना मी एक काळजी घेतली की अतिशय नम्रपणे तर बोलायचं पण सर्वांना ऐकू जाईल असं बोलायचं. मग काय माझं वाक्य पूर्ण होत नाही तर एकच हशा पिकला. ताई अजूनच बावरल्या. त्यांची धडपडणारी scooty एकाने पकडली तर दुसरीकडे मी फोन धरला होताच. त्यांची मान एकदम सरळ झाली. आता काय करायचं त्यांना काहीच सुधरेना, कशा बशा स्वतःला सावरत scooty वर बसल्या, 'ताई, तुमचा फोन' असं म्हणत मी फोन समोर करताच त्यावर झडप घालून समोरच्या डिकीत तो कसाबसा ठेवून त्या पसार झाल्या.. हे दृश्य नजरेत व माझी वाक्य कानांत गोळा करून आजूबाजूच्या मंडळींनी त्यावर comments ची आतषबाजी सुरू केली. आणि मी तो नजारा डोळयांत साठवून 'काय मज्जा आली' असं स्वतःशीच हसत त्या पूर्व पदावर येणाऱ्या ट्रॅफिक मधून माझा रस्ता शोधत बाहेर पडले..

© कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment