'दिया तले अंधेरा' असं कधीकधी आपल्यालाच लागू होतं.ऑफिस मध्ये मेरिट लिस्ट लागली की सर्व मुलांना कॉलेजची फी ऑनलाइन भरायची असं सांगणारी मी, मला मात्र online transactions करायची फार भीती वाटते. कसं असतं, काही गोष्टी अवघड नसल्या तरी जमेल का, चुकणार तर नाही ना या भीतीने केल्या जात नाहीत, इतकंच.
त्या दिवशी काय झालं, सकाळी सकाळी बापलेकानी मिळून ऑनलाइन व्यवहार मला जमलाच पाहिजे असा काहीतरी कट रचला असावा कारण ऑफिसला निघताना केयूर म्हणाला, 'ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून कॉलेजच्या ऍडमिशनच काम करून टाका आज, घरीच आहात ना दोघं '... 'अरे सुट्टी घेतली म्हणजे काम केलंच पाहिजे का, तू घरी आला कि कर ना संध्याकाळी please', असं मी म्हटलं खरं पण काही उपयोग झाला नाही. 'अग सोपं असतं जमेल तुला',असं गोड बोलून माझ्यावर डाव टाकून दोन गनीम एक झाले होते. मग काय सोबत कांतेय असल्यामुळे बुडत्याला ओंडक्याचा आधार वगैरे असं काहीसं वाटलं. एकदाचा मुहूर्त पण ठरला, सगळं आवरून अकरा वाजता बसलो, चला करून टाकू ऍडमिशन. एकतर बारावीची परीक्षा, मग entrance exams, interviews असे सर्व सोपस्कार करून ती मेरिट लिस्ट लागली होती आणि आता एक लाख रुपये भरून सीट कन्फर्म करायचं होतं. मग काय, कॉम्पुटर सुरु केलं आणि बसलो दोघं त्याच्या पुढ्यात.
वेबसाईट वर जाऊन सगळी दारं पार करून payment पर्यंत गेलो. बँक डिटेल्स हाताशी होतेच मग काय सर्व तपशील भरले आणि pay च बटन दाबलं आणि हुश्श केलं कि झालं रे बाबा आता सगळं, तर काय, error. अरेच्चा, आता काय झालं. सगळं काही दोन दोनदा तपासून व्यवस्थित भरलं होतं,तरी गोंधळ झालाच. कांतेय म्हणाला थांब, मी बघतो. पुन्हा सगळं काही भरून झालं तरी transaction पूर्ण होईना. आता काय, बँकेत फोन करण्यावाचून पर्याय नव्हता. बरं, ऑफिस मुळे बँकेत दोन चार जण छान ओळखीचे होते त्यामुळे दडपण नव्हतं. फोन केला तर त्यांनी सांगितलं कि अजून एक option आहे, बँकेचं मोबाइल ऍप. ते डाउनलोड करा म्हणजे त्याच्यावरून करता येईल. म्हटलं ठीक आहे, करते. मग काय ते ऍप डाउनलोड केलं, त्यांनी सांगितलं होतं त्या प्रमाणे सर्व काही केलं पण पैसे काही जायला तयारच नव्हते. आता आली का पंचाईत. कांतेय म्हणाला, 'आई पैसे आहेत ना या अकाउंट मध्ये '.. 'गप रे , पैसे आहेत काय ? आहेत पैसे. आणि माझा नाही, हा बँकेचा प्रॉब्लेम आहे'.. परत फोन करावा म्हणून मी फोन घेतला तर म्हणतो, 'अग जाऊ दे , बाबाला सांगतो, तो करेल'. आता मात्र इज्जत का सवाल होता. 'थांब रे जरा तू '... असं म्हणून मी बँकेत फोन लावला. तो ऑफिसर पण जरा चक्रावला, अकाउंटला बॅलन्स तर आहे पण मग का होत नाहीये transaction पूर्ण ? 'बघतो main branch ला जाऊन' असं म्हणून त्याने फोन ठेवला. इकडे मी मात्र तो सेनापती बापट रस्त्यावरून कर्वे रोड ब्रांच ला कधी पोचेल, काय प्रॉब्लेम आहे तो शोधून कधी फोन करेल याची वाट पाहत बसले. तेवढयात सगळे पैसे एकदम जात नाहीयेत तर पन्नास च्या दोन instalments मध्ये तरी जातायेत का हे पण बघून झालं पण काही फायदा झाला नाही. कांतेय पण बघत होता मी काय काय करते आहे म्हणजे कसं आई सर्व प्रयत्न करते आहे हे त्याला दिसत होतं.
शेवटी एकदाचा फोन आला त्या ऑफिसरचा. मी म्हटलं, 'अहो काय झालं ? काय प्रॉब्लेम आहे ?' तर म्हणाला ' मॅडम तुम्ही पंचवीस हजाराचं ब्रॅकेट घातलं आहे त्यामुळे त्या पेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करता नाही येणार तुम्हाला तुमच्या खात्यावरून'.. पंचवीस हजार म्हणताच माझी ट्यूब पेटली. आठवलं,ओह.. मग काय सोपं तर आहे, मी म्हटलं, 'अहो मग काढून टाका ना ते ब्रॅकेट'.. यावर त्याला बहुदा घाम फुटला असावा कारण तो म्हणाला,'अहो मॅडम आम्हाला असं काढून नाही टाकता येणार,तुम्हाला इथे यावं लागेल , एक फॉर्म भरावा लागेल मग ती प्रोसेस पूर्ण झाली कि तुम्ही मोठं transaction करू शकाल'... 'अरे बापरे, इतकं सगळं करायचं ? बरं . पण मी आता आले तर होईल का आजच्या आज '? असं मी विचारताच तो चक्क नाही म्हणाला, 'लगेच नाही होणार'? .. ' अरे, मग काय उपयोग ? मला आता पैसे भरायचे आहेत आणि माझ्या अकाउंटला पैसे असून मी भरू शकत नाही, हे बरोबर आहे का'? त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर काही नव्हतं मग काय 'ठीक आहे, बघते मी ', असं म्हणून इतक्या उन्हातान्हात तुम्हाला मेन ब्रांच या यावं लागलं म्हणून त्याचे आभार मानून मी फोन ठेवला. असं होतं , या ऑनलाईन मध्ये. आता घरांत बसून मला घाम फुटला.
एकंदरीत काय कितीही इच्छा असूनसुद्धा मला आज हे काम करता येणार नव्हतं. यावर सुद्धा कांतेयचा प्रश्न होताच ' पण तू पंचवीस हजाराच ब्रॅकेट का घातलं आहेस ?' बरोबर अगदी पॉईंट शोधून काढला. मी म्हटलं, 'अरे समजा कोणी काही fraud केला आणि माझे पैसे काढून घेतले तर म्हणून'.. 'अग आई असं कोण करतं का'...'हो, करतं कि, सिनेमात नाही का दाखवत ?आणि आज नाही काही, वीस वर्षांपूर्वी टाकलं होतं ते ब्रॅकेट, तेव्हा खूप होते पंचवीस हजार, तुला नाही कळणार'...
एकंदरीत काय तर सलग चार दिवस पंचवीस पंचवीस हजार भरून फी भरण काही शक्य नव्हतं, दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी घेऊन बँकेत जाण्याचा उत्साह तर अजिबातच नव्हता मग काय संध्याकाळी सगळा वृत्तांत सविस्तर सांगितला कि झालं, फी आपोआप भरली जाणार होती. आता आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे जून महिना जवळ येतोय, परत फी भरायची आहे आणि अजूनही अकाउंटच braket पंचवीस हजाराचंच आहे
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment