Lunana: A Yak in the Classroom
९४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी नामांकन मिळालेला हा चित्रपट. चित्रपटाच्या नावामुळे हा चित्रपट बघण्याची खूप उत्सुकता होती. खरं तर भूतानच्या प्रेमात असलेल्या प्रत्येकाला खुणावणारा हा चित्रपट, पावो चोयनिंग दोरजीच्या नजरेतून पाहताना फार जवळचा वाटतो.
हि गोष्ट आहे, भूतान या आर्थिकदृष्ट्या गरीब तर आशियातील सर्वात आनंदी देशातील थिम्पू या शहरात आपल्या आजी सोबत राहणाऱ्या उग्येनची. संगीत हे त्याचं जग आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं स्वप्न उराशी बाळगून सरकारी नियमाप्रमाणे अनिवार्य असलेल्या पाच वर्षांच्या सेवेत तो अडकला आहे. कराराप्रमाणे अजून एक वर्ष नोकरी बाकी असतांना लुनाना येथील डोंगराळ व अतिशय दुर्गम भागातील एका छोट्याशा गावातील शाळेत त्याची शिक्षक म्हणून नियुक्ती होते. एकीकडे गायक बनण्याचं त्याच स्वप्न त्याला खुणावत असतं तर दुसरीकडे गायक बनण्यासाठी हातातली सरकारी नोकरी सोडून परदेशी जाऊ नकोस असं समजावणारी आजी असते. शेवटी अनिच्छेने का होईना पण ती टर्म पूर्ण करण्यासाठी, काही महिन्यांकरता तो लुनाना येथे जायचं ठरवतो.. आणि त्याच्याबरोबर आपलाही प्रवास सुरु होतो !
वाटेत गासा पर्यंत बस ने पोहोचल्यावर त्याला भेटतो मिशेन. लुनाना गावातून मुखिया नी त्याला आवर्जून पाठवलेलं असतं, नवीन टिचरला सुरक्षित पणे घेऊन येण्याकरता. मग ती रात्र ते गासा मध्येच थांबतात. मिशेन सोबत असलेला सिंगिये टिचरला लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घेऊन सकाळी पोहोचतो आणि मग ते सर्वजण पुढच्या प्रवासाला निघतात ... पायी !उग्येन, मिशेन, सिंगिये आणि सामान नेणारी तीन खेचरं.
'सहा दिवस नदीच्या सोबत चालायचं आणि मग थोडी चढण पार केली कि मग आपण पोहचू. विश्वास ठेवा, हा संपूर्ण प्रवास तुम्हाला इतका आवडेल कि तो कधी संपूच नये असं वाटेल'.. मिशेन एकीकडे त्याला प्रोत्साहन देत असतो पण दुसरीकडे ५६ लोकसंख्येचं गाव आणि तिथे जायला लागणारे तब्बल आठ दिवस आणि ते हि चालत, हे उग्येन करता एक मोठं आव्हान असतं. दिवसभर चालून, डोंगर चढून तो थकतो. हेडफोन ची बॅटरी संपते तेव्हा त्याचं लक्ष जातं आजूबाजूच्या निसर्गाकडे, वातावरणातील नाद, पक्षांचा नाजूक आवाज त्याला ऐकू येतो. लोकगीतं म्हणणाऱ्या सोबत्यांकडे पाहून त्याला पटतं संगीत हा त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. मग पुढचा प्रवास अनेक अनुभवांमधून त्याला आयुष्याची जवळून खरी ओळख करून देतो. आपला प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पहाडांची पूजा करणारे, सन्मान करणारे , पहाडांवर विश्वास ठेवणारे, ग्लोबल वॉर्मिंग सारखी गोष्ट माहित नसणारे सोबती पाहून तो अचंभित होतो. आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू पाहणाऱ्या नवीन टिचरचं स्वागत करायला दोन तास चालून आलेले गावकरी पाहून तो हरखून जातो. पण त्याचा हा आनंद, फार काळ टिकत नाही. लुनाना येथे पोहचल्यावर शाळेचं रूप पाहून, बाजूला असणारी त्याची राहण्याची खोली पाहून त्याला वाटतं, आपला निर्णय चुकला व तो परत जायचं ठरवतो. गावचा मुखिया आशा त्याला 'थोडे दिवस आराम करून मग जा, थकला असाल'.. असा सल्ला देतो. वीज नसलेल्या त्या गावात, त्या घरात, त्या रात्री, त्या काळोखात मग सोबत उरते कंदिलाचा प्रकाश आणि त्या जीवघेण्या थंडीची !
सकाळी ८.३० वाजता शाळा भरते पण ९ वाजले तरी टीचर आले नाहीत म्हणून टिचरला उठवणारी, गोड हसणारी आणि दिसणारी क्लास कॅप्टन पेम झाम, टीचरची आतुरतेने वाट पाहणारी वर्गातील मुलं, 'शिक्षकाकडे भविष्याची किल्ली असते' हा विश्वास असणारा व म्हणून मोठेपणी शिक्षक बनायचं आहे असं सांगणारा विद्यार्थी, नवीन टिचर आले म्हणून शेजारच्या गावातून आपल्या नातीला शाळेत घेऊन आलेली म्हातारी आजी, प्रेमानं तांदूळ लोणी आणि पनीर पाठवणारे गावकरी, गावासाठी पर्वतांसाठी पक्षांसाठी आणि प्राण्यांसाठी गाणं गाणारी सॅल्डन पाहून तो थक्क होतो. परत जायचा त्याचा निर्णय अलगत गळून पडतो.
थिम्पू वरून शाळेसाठी, आपल्या मुलांसाठी तो सामान मागवतो. शिकण्याची ओढ असणारी त्याच्या वर्गातील मुलं; ज्यांनी 'ब्लॅकबोर्ड' हा शब्द सुद्धा कधी ऐकलेला नसतो कारण वर्गाची भिंतच त्यांच्यासाठी फळा असते. मुलांना इंग्रजी शिकवताना त्याला C फॉर CAR नाही तर C फॉर Cow शिकवावं लागतं कारण त्यांनी कधी कार पाहिलेली नसते. पण तरीही ते सगळे आनंदी असतात, खुप समाधानी असतात. भविष्याला स्पर्श करण्यासाठी त्यांना एक हात हवा असतो, टिचरचा जो त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवेल. यावरून त्याला समजतं, सर्वांसाठी तो काय आहे , एक टिचर असण्याचं महत्व काय आहे ! मुखिया त्याला मागच्या जन्मी तू याक असशील आणि म्हणून तर इतकं पवित्र काम करायला तू इथे आला आहेस असं गौरवतो तर गावातील सॅल्डन चक्क त्याला आपला सर्वात आवडता याक नॉर्बू (इच्छा पूर्ण करणारा रत्न) भेट देते.
खरं तर तो तिथे रमलाय, तिथलं जगणं त्याने आपलंस केलंय, मुलांचा लाडका टिचर ही झालाय, तिथे मनापासून रुळलाय ... पण जवळ आलेला थंडीचा मौसम त्याला आठवण करून देतो, परत निघण्याची. गावचा मुखिया त्याला पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती करतो आणि मग त्याला कळतं, तो तर कायमचा ऑस्ट्रेलियाला जाणार आहे त्यामुळे तो कधीच परत येणार नाही. तेव्हा, जगातला सर्वात आनंदी देश असूनही तुमच्यासारखी शिकलेली, या देशाची सेवा करु शकणारी, इथे उज्वल भविष्य असणारी मुलं आनंदाच्या शोधात दुसरीकडे का जातात ? हा त्याचा प्रश्न उग्येनला भावुक करतो.
'वर्गातल्या प्रत्येकाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, तुम्ही आमचे सर्वात लाडके टीचर आहात, आमच्यासाठी नॉर्बुसाठी परत या' असं मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून त्याची पावलं अडखळतात. पवित्र याक खूप सारा आनंद घेऊन नक्की परत येईल या विश्वासानं मुखियानी गायलेल्या गाण्याचे बोल जेव्हा त्याच्या कानी पडतात तेव्हा त्या आवाजातील कशीष, त्यातील भाव त्याची वाट अडवू शकतात की नाही यासाठी हा चित्रपट नक्की पहायला हवा !
निसर्गातील सौंदर्यासोबत हा चित्रपट तरल नितळ भाव भावनांच सौंदर्य त्यातील खरेपणा आणि आनंदाची खरी व्याख्या नजाकतीने बखूबी सादर करतो !
© कविता सहस्रबुद्धे