Friday, December 8, 2017

आठवण


आठवण

खूप वर्षांनी वही चाळताना
पानं निसटावी , तशी
मनांतून एकेक आठवण
हलकेच डोळ्यांत येऊन थांबली
अन् तू हरवला त्या वाटेवरती
तीच पावलं मला परत दिसली ..

चुकण्याआधी कळलंच नाही
सारे कधी धूसर झाले
रंग मोहाचे,अधीर स्पर्शाचे
कसे सारे विरून गेले ..
तरी चांदण्यांमधले विरघळलेले
क्षण एकेक जमवत गेली,
रातराणी तुझी माझी
पुन्हा पुन्हा बहरत गेली ....

'आपली भेट हिच कोजागिरी '
असं तूच म्हणायचास
आणि म्हणूनच अमावस्येचाही चंद्र
तेंव्हा मला खूप आवडायचा
आजही चांदण्यात तुझी आठवण
कागदावरती बोलत असते
प्रत्येक कवितेत अजूनही माझ्या
गोष्ट फक्त तुझीच असते ...

Wednesday, November 8, 2017

रिसेपशन काउंटर

बारावी झाली तशी नोकरी करत शिकावं असा विचार मनात डोकावू लागला. वाणिज्य शाखा असल्यामुळे सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी पार्टटाइम नोकरी अशी सांगड जमण्यासारखी होती, सगळं काही जुळून आलं आणि  डॉक्टर देवधरांच्या क्लिनिक मध्ये मी जॉईन पण झाले.

पेशंटना फोनवर अपॉइंटमेंट देणे, तपासणीनंतर पैसे घेऊन पावती देणे आणि ओपीडी झाली कि त्या दिवसाचे पैसे डॉक्टरांकडे जमा करणे असं साधं सोपं काम होतं. सर लहान मुलांचे आणि मॅडम डोळ्याच्या डॉक्टर असल्यामुळे येणाऱ्या पेशंट्स मध्ये अगदी लहान तान्ही बाळं पण असायची आणि आजी आजोबा सुद्धा. आयुष्याच्या दोन टोकांची खरी ओळख हळूहळू इथेच होऊ लागली. .

डॉक्टर या प्रोफेशन बद्दल त्यावेळी मला कमालीचं आकर्षण, आदर होता, अजूनही आहे आणि इथे तर प्रत्यक्ष दोन दोन डॉक्टरांसोबत काम करायला मिळत होतं. रोज संध्याकाळी ५ च्या सुमारास डॉक्टरांची गाडी यायची. गाडी आली कि वॉचमन काका गेट उघडायचे. मला ते क्लिनिकच्या मी बसायचे त्या जागेवरून स्पष्ट दिसायचे. गाडीतून आधी मॅडम उतरायच्या. प्रिंटेड प्युअर सिल्कची साडी,गळ्यांत मोत्याचा नाजूक सर,कानात कुड्या तर कधी  डायमंडच मंगळसूत्र आणि त्याला मॅचिंग डायमंडच कानातल, हातात लेदर ची ब्रँडेड पर्स.सर गाडी पार्क करायचे आणि मग दोघे बरोबर क्लिनिकचा जीना चढायचे. त्या दोघांच्या चेहऱयावर नेहमीच एक समाधान असायचं, तेज असायचं.  'डॉक्टरांकडे पाहून निम्मा आजार जायला हवा ', असं  माझे बाबा नेहमी म्हणायचे .  बाबांच्या या चौकटीत हे दोघहि किती फिट बसतात , असं मला नेहमी वाटायचं.

हळूहळू लहान मुलांची औषध , इंजेकशन, महिन्याचे डोस याबद्दल माहिती होऊ लागली आणि दुसरीकडे मोतीबिंदू झाला म्हणून येणाऱ्या पेशंटशी ओळख वाढू लागली. मला खूप कुतूहल होतं तेव्हा कि मोतीबिंदूच ऑपरेशन म्हणजे काय ? काय करतात नक्की. एक दिवस मी हे कुतूहल डॉक्टरांकडे व्यक्त केलं. त्यांनी मला मला समजेल अशा शब्दात सांगितलं आणि ' ये उदया सकाळी, जोशी आजींच ऑपरेशन आहेच, पहा मग,' अशी परवानगी पण दिली आणि सकाळी येताना काहीतरी खाऊन ये अशी काळजीपोटी सूचना सुद्धा.

दुसऱ्या दिवशी मी वेळेवर पोहोचले. अनुसूया सिस्टरनी ऑपरेशन थिएटर मध्ये सर्व तयारी केली होती. डॉक्टर आले. आजींना तिथं आणल गेलं. त्यांचं एका डोळ्याचं ऑपरेशन आधी झाल असल्यामुळे त्यांची त्या वातावरणाशी थोडीफार ओळख होती.लोकल ऍनस्थेशियाच दिला असल्यामुळे आजी गप्पा मारत होत्या.  डॉक्टर सांगतील तसं सहकार्य करत होत्या.  मी मात्र खूप टेन्स होऊन एकूण सारं काही पाहात होते  कारण ते सर्व काही माझ्यासाठी वेगळं होतं , नवीन होत.

ऑपरेशन सुरु झालं. काही वेळानंतर मॅडम मला म्हणाल्या 'ये इकडे, आणि पहा या दुर्बिणीतुन'. ज्या गोष्टीची मी इतक्या वेळ वाट पहात होते त्यासाठी त्यांनी बोलावताच मी लगेच पुढे झाले. दुर्बिणीतून पाहिलं खरं पण एका क्षणांत माझ्या लक्षात आलं कि मला काहीतरी होतंय .. चक्कर येतीये का ? हो चक्करच ..  असा विचार आला मनांत आणि मी लगेच मागे झाले. दार उघडून बाहेर जावं असा विचार केला आणि दाराकडे गेले हि पण पुढे काय झालं ते समजलच नाही. 

मला जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलच्याच एका रूम मध्ये एका गादीवर झोपले होते. अनुसूया सिस्टर चेहऱ्यावर पाणी शिंपडत होती. बाजूला सर उभे होते. मला 'पाणी पी जरा,' अस सांगून त्यांनी अनुसूयाला चहा आणि बिस्कीट आणायला पाठवलं. मी मात्र खूप ओशाळले. बापरे , आपल्यामुळे चांगलाच सीन क्रीएट झाला  तर.'सॉरी डॉक्टर. मला खरंच समजलं नाही काय झालं ते,' असं म्हणताच ते म्हणाले , ' इट्स ओके ... होतं असं. अगं तू पडलीस आणि त्या आवाजानी आजी घाबरल्या , मग काय त्यांना शांत राहा सांगितलं आणि तुला बाहेर आणलं'. असं हसून सांगत त्यांनी मला जरा हसवलं. इतक्यात अनुसूया चहा बिस्कीट घेवुन आली. सर आणि मी चहा घेतला. इतक्यात ऑपरेशन संपवून मॅडम सुद्धा आल्या .' काय गं , काय झालं ?' असं म्हणत बाजूला बसल्या आणि खूप काही अवघडून घेऊ नकोस अशी समजूत काढून 'जा , आजींना भेट , आल्यात त्या रूम मध्ये आणि बोलावतायेत तुला ,' असं सांगून गेल्याही.

खरं तर मला सांगायचं होतं मॅडम ना ,' दुर्बिणीतुन दिसलेला डोळ्यातला रक्ताचा थेंब पाहून मी घाबरले आणि बाहेर यावं म्हणून दाराजवळ गेले सुधा पण चक्कर येऊन तिथेच पडले. मला समजलच नाही, एका क्षणांत झालं सगळं' .. पण मॅडम तर गेल्या. मी माझे शब्द तसेच गिळले आणि आजींकडे गेले ....

पदवी मिळेपर्यंत मी कधी डोळ्यांच्या, कधी दाताच्या तर कधी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे काम करत गेले . कधी प्रेमाने बोलणारी माणसं भेटली तर कधी कमी लेखणाऱ्या नजरा. कधी शिकता शिकता नोकरी करते म्हणून कौतुकाची थाप मिळाली तर कधी परीक्षेत सुट्टी देऊन सांभाळून घेणारे डॉक्टर सुद्धा भेटले. नवनवीन अनुभव मिळत गेले. त्या काउंटर बसून पावत्या फाडतांना , पैसे घेताना , अपॉइंटमेंट देताना अनेक चित्र विचित्र अनुभव येत गेले पण प्रत्येक ठेच नव्यानं काहीतरी देऊन गेली हे मात्र नक्की.

माझा लहान भाऊ डॉक्टर होण्याची जितकी वाट मी त्या काउंटर बसून पाहिली आहे ना तितकी वाट त्यानी सुद्धा पाहिली नसावी, कदाचित. अजूनसुद्धा जेव्हा जेव्हा मी कोणत्याही डॉक्टरांकडे जाते तेव्हा तेथील रिसेपशन काउंटर पाहून मला मात्र ते जुने दिवस खूप आठवतात, डॉक्टर या शब्दाशी माझी पहिली ओळख तिथेच तर झाली होती.

- कविता


 

Thursday, October 12, 2017



बिग बी ...

डॉक्टर भास्कर बॅनर्जी , इन्स्पेक्टर विजय खन्ना, शेखर, सुबीरकुमार, अमित, जय, राज मल्होत्रा, विकी कपूर, इकबाल , विजय दीनानाथ चौहान, प्रोफेसर सुकुमार सिन्हा, विजय वर्मा , सिकंदर , अँथोनी , बादशहा खान , देबराज सहाय , बुद्धदेव गुप्ता, ऑरो , शेहेनशाह , डॉन ... अशा कितीतरी भूमिकेत तो आपल्याला भेटत राहिला आणि आपण त्याच्यावर प्रेम करत राहिलो !

नीला आसमाँ सो गया" असो  किंवा "मै और मेरी तनहाई,अक्सर ये बाते करते हैं ".. त्याच्या आवाजात डोळे बंद करून कितीही वेळा ऐकलं तरी मन कधीच भरत नाही.

"हादसा बनके कोई ख्वाब बिखर जाए तो क्या हो. वक्त जझबात को तब्दील नहीं कर सकता. दूर हो जाने से एहसास नही मरतां, ये मोहोब्बत हें दिलोंका रिश्ता .. ऐसा रिश्ता जों सरहदों में कभी तक्सिम नहीं हो सकता.. तू किसी और कि रातों का हसीं चाँद सही , मेरे हर रंग में शामिल तू हें .. तुझसे रोशन हें मेरे ख्वाब मेरी उम्मीदे.. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंझिल तू हें ".... त्याच्या आवाजातील माझी एक आवडती कविता !

छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन , दो लफ्जोंकी हें दिल कि कहानी या है मोहोब्बत या हें जवानी , दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे हि तड़पाओगे, कसमें वादे निभायेंगे हम, मित ना मिला रे मन का, तेरे मेरे मिलन कि ये रैना , मैं प्यासा तुम सावन, आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन, कभी कभी मेरे दिल में खयाल आतां हें अशी रोमँटिक गाणी जणू त्याच्या साठीच लिहिली गेली आहेत.

गोविंदा बरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये तर कधी अभिषेक बरोबर 'कजरारे कजरारे' करताना त्याने आपल्याला सुद्धा ठेका धरायला लावला. डॉन २ पाहतांना त्याची सर याला नाही म्हणत प्रत्येक फ्रेम मध्ये तो अजूनच आठवत गेला. पिंक, पिकू , वजीर अशा प्रत्येक नवीन भूमिकेत एक वेगळीच छाप पाडून गेला.

" ये तुम्हारे बाप का घर नहीं पोलीस स्टेशन हें, सिधी तरहा खडे रहो', म्हणणारा जंजीर मधील इन्स्पेक्टर विजय खन्ना , "जाओ पेहेले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे बाप को चोर कहां था", म्हणणारा विजय वर्मा , "मुछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो ", म्हणणारा विकी कपूर. " जिस तरह गोबी का फुल फुल होकार भी फुल नहीं होता वैसे गेंदे का फुल फुल होकर भी फुल नहीं होतां", म्हणणारा प्रोफेसर सुकुमार .. प्रत्येक रोल मध्ये तो आवडतं गेला.

"पीटर तुम लोग मुझे वहां ढुंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा था".. दिवार मधला हा डायलॉग जितका लक्षांत राहिला तेवढाच तो म्हणतांना खुर्चीवर पाय पसरून बसलेला अन् तोंडात बिडी असलेला निळ्या शर्ट मधला विजय वर्मा सुद्धा .." मैं जानता हूँ के तू गैर हैं मगर यूं हि ", म्हणणारा कभी कभी मध्ये त्या पांढऱ्या  कोट मधे जितका आवडला तेवढाच "तेरी रब ने बना दि जोडी तेरी रब ने ", म्हणतं भांगडा करतांना. कधी तो  हैदराबादी जाफ्रानी पुलाव करणारा बुद्धदेव म्हणून आवडला तर कधी "माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस" म्हणणारा  .. याराना मध्ये "तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना", म्हणतं त्याने आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं. मुकद्दर का सिकंदर , सुहाग, सिलसिला, त्रिशूल , शराबी, दिवार , शोले याची किती पारायणं केली ते कधी मोजलच नाही. एक मात्र खरं, त्याच्या सारखा फक्त तोच आहे आणि कायम राहील !

आपल्या या लाडक्या सुपरस्टार ला आभाळभर शुभेच्छा !!!

 

Wednesday, October 11, 2017

घरोंदा

'जब तारे जमीन पर जलते हें , आकाश जमीन हो जाता हें
उस रात नहीं फिर घर आता , वॊ चाँद यहीं सो जाता हें
पलभर के लिए इन आँखो में .... पलभर के लिए ... हम एक जमाना ढुंढते हें' ....

झोपाळ्यावर पाय पसरून निवांत बसावं , समोर आकाशात दिसणाऱ्या त्याला एकटक पाहत असतांना कानावर हे गाण्याचे शब्द पडावेत ... घरातील सर्व दिवे मालवून, कोजागिरीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात सजलेला हा शुभ्र माहोल मग थोडा अजूनच रोमँटिक व्हावा ...

हे गाणं ऐकताना नेहमी मला जुने दिवस आठवतात. जेव्हा ' इन भूलभुलैया गलियों में अपना भी कोई घर होगा, अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा ' इतक गोड स्वप्नं आपल्याही डोळ्यांत होतं....

गुलजारजींनी त्यांच्या शब्दांत मांडलेलं, रूना लैला अन भूपिंदर सिंगच्या आवाजात सजलेलं आणि झरीना वहाब अमोल पालेकर यांनी जगलेलं घरोंदा मधील हे स्वप्न..
प्रत्येकानी एकदा तरी नक्कीच पाहिलं असेल !!

 'पलभर के लिए इन आँखो में हम एक जमाना ढुंढते हें '...




 

Wednesday, September 27, 2017

नौदल ....
आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते राहायला. या मस्त हवेत, टेरेस मध्ये येणार कोवळ ऊन अंगावर घेत ; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदे पोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा...सुट्टीच्या दिवसाची अशी एकदम परफेक्ट सुरवात होती. 
 
बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव,पुण्यात NDA मध्ये असतानाच्या आठवणी, ६२ आणि ६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण,सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच INS राजपूत , INS ब्रह्मपुत्रा , INS जमुना आणि INS विक्रांत या  वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि INS विक्रांत वर असलेल त्यांच विशेष प्रेम ... सार काही थक्क करणार होतं. आज कांतेय साठी आठवणींचा खजिना परत उलगडत होता. 
 
१९६१ साली माल्टाला ( फ्रान्स / ब्रिटन ) भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. विक्रांत जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमीशन झाले म्हणजॆ आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. INS विक्रांत वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला विक्रांतवरचा पहिला अविस्मरणीय प्रवास.......आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या होत्या ज्याची झलक आजची त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. 

तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होत, कुळकायद्यात शेत जमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने  कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवड सुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला 'तो' नौदलात दाखलहि झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्म बरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड .... ते पाहून 'त्याच्या' डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायानी इथवर येऊन , जणू सर्व प्रश्नाची उत्तर 'त्याला' इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची , अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्न होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खुप लांबचा पल्ला गाठला पण सुरवात कोठून केली हे 'तो' कधीच नाही विसरला.
 
योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरु होता. NDA मध्ये बाबा १९५८ साली होते म्हणजेच ५८ वर्ष झाली होती NDA सोडून. काय हा योगायोग ...  हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अर्ध्या तासाचे अंतर होते आणि त्या अर्ध्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न वर्ष मागे जावून पोहचले होते.तेव्हाच चित्र आणि आजच चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते.
 
इतका जुना ऑफिसर आलाय हे समजल्यावर त्यांना भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले. बाबांच्या काळातील गोष्टी विचारण्यात ते ऑफिसर आणि त्या सांगण्यात बाबा अगदी रमून गेले. शरीराने थकलेला जीव पण अजूनही तीच ऊर्जा , तोच अभिमान आणि तोच गर्व. जणू आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या 'फील्ड' वरती होते. त्या सर्वांचे हावभाव, बोलण्यातील जोश , चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वांच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. त्या काही वेळात बाबा जणू 'ते' आयुष्य परत जगले.
 
अखेर निघायची वेळ झाली. सर्वांशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. आम्हाला सोडायला गाडीपर्यंत एक ऑफिसर आवर्जून आले. गाडीत बसतांना एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले,'कभी जरुरत पडे तो बुला लेना,आ जायेंगे,' तेव्हा मात्र तो ऑफिसर एकदम भारावून गेला. एक कडक सॅल्यूट मारून पुढे आला आणि बाबांना त्यांनी नमस्कार केला . नि:शब्द होवून आम्ही फक्त पाहत राहिलो. खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता तो. आजच्या दिवसानं बाबांसारखच मला पण खूप काही दिल. नक्की काय, हे शब्दांत मांडता येण्याच्या खरंच पलीकडचं होत.... 
 
 

मैत्रीचं  गणित

आम्ही डझनभर  मैत्रिणींनी एक खास बेत आखला होता, मैत्री दिनाचा. खरं तर 'आमची मुलं' हा एक धागा होता आम्हाला एकत्र आणणारा. आजवरच्या  आयुष्यात मैत्रीची समजलेली व्याख्या , मैत्रीची गरज, मैत्रीच महत्व, मैत्रीतील अनुभव प्रत्येकीच्याच बरोबर होते. आमच्या मुरलेल्या या मैत्रीत आमच्या मुलांची मैत्री मात्र एकदम ताज्या लोणच्याप्रमाणे करकरीत होती, आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींनी परिपूर्ण. त्यांच्या निरागस, अवखळ, धांदरट वागण्यात अजूनही लहान असल्याची झाक होती. मोठं होणं त्यांना जमलंच नव्हतं जणू. अजूनही आपल्याच विश्वात रमलेली, आयष्यातील वेगवेगळ्या स्तरावरील  स्पर्धेपासून कोसो दुर होती ती. बाहेरील जगात काय चालू आहे याचा पुसटसाही स्पर्श अजून त्यांना शिवला नव्हता. त्यांच्या याच निरागसपणाला आम्ही आमची ' थीम ' बनवली. त्यांच्या मनातील सप्तरंग आम्ही आमच्या कपड्यांवर उतरवले आणि त्यांच्या बालपणातील अनेक अविस्मरणीय आठवणी आम्ही नव्याने त्यांच्यासमोर उलगडल्या.

शाळेत पहिल्यांदा ओळख झाल्यापासून आजवर त्यांनी अनुभवलेल्या अनेक क्षणांना एका खास 'फोटो फिल्म' मध्ये बांधण हा एक अनोखा अनुभव होता, जो त्यांना खूपच भावला. "येsss  दोस्तीssss  हम नही छोडेंगे, तेरे जैसा यार कहाँ , पासून ते आजच्या दिल दोस्ती दुनियादारीssss या गाण्यांनी बॅकग्राऊंडला एकदम झक्कास माहोल निर्माण केला. त्यांना त्या आठवणी एन्जॉय करताना पाहून आमच्या मात्र डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.

आपण लहान मुलांना अनेकदा त्यांना समजेल अशा सोप्या शब्दांत अर्थ सांगत असतो. पण अशा गोष्टी लक्षात ठेवून ते ह्या गोष्टी कोठे वापरतील याचा नेम नसतो. त्यांच्या लहानपणीची आठवण त्यांनाच सांगून 'ओळखा पाहू कोण हा ', हा खेळ खेळताना याची प्रचिती आली.

एका मुलाने लिहिलेल्या गणेशोत्सवाच्या निबंधातील काही ओळी मी वाचून दाखवल्या ... "आम्ही कोकणस्थ म्हणून आमचा गणपती दिड दिवसाचा असतो. गणपती येतात त्या दिवशी आई उकडीचे मोदक करते. भरपूर तूप घालून मोदक खायचे आणि तंगड्या पसरून झोपायच, असा बेत असतो. दुसऱ्या दिवशी विसर्जनाला गेलं कि खूप घारी गोरी माणसं भेटतात. गणपती विसर्जन करून आल्यावर मला अजिबात वाईट वाटत नाही कारण मग दुसऱ्यांच्या घरी खिरापतीला जाता येतं आणि देखावेही पाहता येतात."

इतक्या निरागसतेने असा खरा खरा निबंध आपण तरी लिहू का ? हि वाक्य ऐकून प्रत्येक जण खळखळून हसत होता आणि जेव्हा मी विचारलं,' ओळखा पाहू , या निबंधाचा लेखक कोण ?' तेंव्हा  'हा मानसच' असा जल्लोष  झाला कारण वर्गात बाईंनी हा निबंध आवर्जून वाचून दाखवला होता सर्वांना.

पुढची आठवण अजून थोडी वेगळी. खरं तर कोणालाच हि गोष्ट माहित नव्हती. पाचव्या वर्षी आईशी खेळतांना, बाजूला बाबा लॅपटॉप वर काम करत असतांना " आई, बाबा देवाघरी गेले कि त्यांचा फोटो कुठे लावायचा ?" हा प्रश्न आईला विचारणारा तो कोण ; हे मात्र मुलांना ओळखता आलच नाही. जेव्हा हा प्रश्न पडणारा तो सौमिल आहे असं सांगितलं तेव्हा मात्र, "अरे सौमिल तुला तेव्हा पण असेच प्रश्न पडायचे का ?" असा एकच ओरडा मुलांनी केला.

दुसरीत असतांना वर्गात मोर हा निबंध शिकवला होता. परीक्षेत मात्र  बैल या विषयावर निबंध आला. तरीही अजिबात न डगमगता , " बैलाला पाऊस आवडतो. पिसारा नसला म्हणून काय झालं , पाऊस आला कि बैल शेपटी वर करून थुई थुई नाचतो ," हे लिहिणारा कांतेय आता स्वतःही पोट धरून हसत होता.

सोसायटीत 'ती' एकच मुलगी होती म्हणून रामायणांत नेहमी तीच सीता व्हायची. एकदा ती बाहेर जात असतांना 'सीता शॉपिंग ला चालली म्हणून आज रामायण होणार नाही' असं पळत पळत सर्वांना ओरडून सांगणारा हनुमान तसा दुर्मिळच. हि आठवण सांगितल्यावर अनुष्का मात्र एकदम सीता म्हणून फेमस झाली.

'माणसाला घर बांधायला आर्किटेक्ट , मजूर आणि बिल्डर लागतो पण पक्षी हात नाहीत तरी फक्त आपल्या चोचीने आपल्यासाठी घरट बांधतो', इतकी मोठी गोष्ट सहजपणे हिच मुलं लिहूनही जातात.

आज मुलं जशी त्यांच्या बालपणात रमली तशी प्रत्येक आई बाबांची जोडी सुद्धा परत भूतकाळात गेली, आठवणींच्या जगात थोडं फिरून आली.निरागसता या शब्दाचा अर्थ हे अनुभवताना जणू नव्यानं उलगडत होता. आज अगदी मनापासून वाटलं , मुलांनी मोठं होऊच नये. त्यांच्या निरागस आयुष्यात त्यांनी आणि आपण असंच रमाव.

मैत्रीदिन हे एक निमित्त होतं, एकत्र येण्याचं. आज गुरुवार होता, उद्या शाळा होती, ऑफिस होत तरी प्रत्येक जण आपलं काम ऍड्जस्ट करून वेळेत हजर होतां कदाचित मैत्रीचा हवा असलेला कोपरा प्रत्येकालाच गवसला होता. अभ्यासात माहीत नाही पण इथे मात्र मैत्रीचं हे गणित खूपच पक्कं झाल होतं... 

Monday, September 18, 2017


इंजिनियर डे !!



शनिवारची सकाळ ... अगदी निवांत. शाळा नाही, ऑफिस नाही, डब्याची घाई नाही. आज याचं ऑफिस होत खरं पण डबा नव्हता त्यामुळे एकदम आरामात सर्व काही चालू होतं. सकाळी सकाळी नवऱ्याने चहा तयार म्हणून उठवाव, यापेक्षा छान दिवसाची सुरवात अजून काय असावी. चहा पिऊन, आवरुन तो ऑफिस ला निघाला तरी मी मात्र पेपर पसरुन वाचत होते. चहा झाला, पेपर वाचला, पुरवणी सुद्धा सगळी वाचून झाली. आता मात्र घड्याळाचे काटे मला पुढच्या कामाची सूचना देऊ लागले. शेवटी एकदाची उठले. कप विसळले, वॉशिंग मशीन सुरु केल, कांतेयला उठवल, नाश्ता तयार केला...परत एक कप चहा केला. कांतेय ला कॉफी करून दोघांनी गप्पा मारत नाश्ता केला. मग थोडा वेळ Whats App वर सगळे ग्रुप उठले आहेत कीं नाही ते चेक केलं. आता काय कराव हा विचार करत होते तर दारावरची बेल वाजली. 

कांतेयनी दार उघड़ताच दोन वीस बावीस वर्षाची मुलं दारात उभी. त्यांच्या हातात ड्रिल मशीन आणि काही सामान होत. कांतेय नी काही विचारेपर्यंत ते घरात आले. गॅस पाईप च काम सोसायटी मधे सूरु असल्याने तेच काम करायला हे आले असणार असा विचार करेपर्यंत त्यांनीच आपणहुन सांगितल की ' गॅस पाईप का काम करने आये हैं।'


'अच्छा हुआ आप आए। अभी मैं वॉचमन को बताने हि वाली थी की आप को ढूंढकर भेज दे'। रोज ऑफिस मुळे हे काम राहतच होतं. आज घरी आहे तर हे काम करून घ्याव का नको; हा विचार करतच होते मी. इतक्यात  घरकाम करणाऱ्या सविताची सुद्धा तेव्हाच एंट्री झाली. ती म्हणाली, 'ताई ते येवून गेले होते परवा, तुम्ही घरी नाही म्हणून मी काम करू दिल नाही. बर झाल असत तुम्हाला अदुगर विचारल असतं तर, मीच करुन घेतल असत. खुप कचरा होतो हे काम करतांना, माहित असतं तर मी तेव्हाच सर्व करुन घेतल असतं, तुम्ही येई पर्यंत साफ़ बी करुन ठेवल असत. आता बर झाल, माझ्या कामाच्या आधी आले हे. जल्दी जल्दी करो भैया।' मी काहिहि बोलायच्या आधी त्यांनीच सर्व काही ठरवल.मग आमची वरात स्वयंपाक घराकडे वळली. 

 'कहाँ लगाओगे पाईप ? ड्रील कहाँ पे करोगे ? पाईप कहाँ से आयेगा ?' या माझ्या प्रश्नांवर त्यांनी मला सर्व काही नीट समजावल. ओट्याच्या मागील भिंतीवर असणाऱ्या टाईल्स पूर्ण भिंती वर नसून वरच्या अंदाजे 2 फुट जागेवर नाहीत. गॅस साठी पाईप येण्याकरता त्यांनी सांगितलेली ड्रिल ची जागा टाईल्सवर असल्याने तिथे ड्रिल न करता एक फुट वरती भिंतीवर ड्रिल कराव, अस मी त्यांना समजावत होते.त्यावर 'नहीं नहीं, इधर ही ड्रिल करेंगे। उधर बीम हें।सब के यहाँ इधर ही ड्रिल किया हूँ।' अस उत्तर आल. 'अरे, बीम इस तरफ हे, मैं आपलो यहाँ बोल रही हूँ करने के लिए, आप बोल रहे हो ना उसके सिर्फ एक फिट ऊपर'..

'नहीं नहीं, पानी का पाईप टूट जायेगा उधर।' मला काही समजेना पाण्याचा पाईप तर तिथे नाहीए. 'अरे, भैया आप बोल रहे हों ना बस उसके थोडा ऊपर तो हें, वहाँ कहाँ हैं पानी का पाईप ?' 'अरे दिदी, नीचे के घर पर जाके देखो. सबके घर यहीं पे बिठाया हें '.. असं म्हणून त्याने मला, मी त्याच ऐकाव असं सांगितल. " रुको फिर, मैं आती हूँ देखकर," म्हणून खालच्या फ्लॅट मधे पाहुन आले.

मी परत आले. ' देखा न दिदी, झूठ थोड़े न बोले हें '... मी पण कबुल केल, 'हां भैया, ठीक हें आप कि बात. फिर भी ड्रिल करते समय टाईल् टूट गया तो?' त्यावर तो म्हणाला, ' उनका तोडा क्या, आपका कैसा तोड़ेंगे'.. तरीही माझी शंका होतीच, 'उनका नहीं टुटा मतलब हमारा भी नहीं टूटेगा क्या ? टुटा तो वो भी आप को लगाना पड़ेगा फिर'.मी सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवून दिली. ' अरे दिदी, रुको। हमारे इंजिनियर को बुलाएँगे अभी । आप जहाँ बोले हो वहा ड्रिल करना या नहीं उसका फैसला वह करेंगे, वो बोलेंगे तो सुनेंगे। आपका नहीं सुनेंगे। हम इधर ही ड्रिल करेंगे।' अस म्हणून त्यानी त्याच्या इंजिनियर ला फ़ोन लावला.

आता काय करायच, याचा फोन लागत नव्हता आणि लागला तरी त्याची महत्वाची मिटिंग होती त्यामुळे फोन घेईल कि नाही हि शंका होतीच. शेवटी ,बाजूच्या मैत्रिणीच्या घरी गेले, बेल वाजवली. तिचा नवराहि घरी नव्हता पण अजिंक्य , तिचा मुलगा होता. हुश्य , निदान तो तरी सापडला. नुकताच मेकेनिकल इंजिनियर ची पदवी फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण झालेला. त्याला सांगितल, 'अरे चल जरा काम आहे, तो गॅस पाईप बसवायला आलाय, जरा बोल ना तू त्याच्याशी', त्यावर तो लगेच आला. 

'लो भैया, ये भी इंजिनियर हें, इसको बताओ, मुझे जो कुछ नहीं समझता वो इसको समझेगा '. तो हसला, 'अरे दिदी'..  हि दिदी साक्षात् तिच्या इंजिनियरला आपल्या समोर उभ करेल असं वाटल नसाव त्यांना. मग दोघांच्या इंजीनियरिंग नॉलेज ची प्रचिती त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आली. शेवटी ' अग, मावशी तिथेच कराव लागेल ड्रिल जिथे तो म्हणतोय', असं अजिंक्यनी सांगताच मी शरणागती पत्करली. तरीही 'ड्रिल करते समय टाइल टुटा तो ', या शंकेवर मी कायम होते. 'दिदी, इंजिनियर नहीं भरेगा टाइल का पैसा, हमको देना पड़ेगा।' त्यावर 'चलो जाने दो,ध्यान से करो काम,नहीं टूटेगा टाइल' अस त्यांना धीर देत मी मलाच समजावल. कदाचित त्याला हुश् झाल असाव. अजिंक्य तिथेच होता आणि पाहतं होता जे काही ते करतायेत ते बरोबर आहे ना , कारण मावशीने ज्या पद्धतींनी बोलावलं होतं त्या प्रमाणे त्या वेळी फक्त त्याच्यावरच विश्वास होतां तिचा.  

त्यानी सांगितलेली ड्रिलची जागा कशी योग्य आहे, हे जेव्हा पहिल्यांदा त्याने सांगितलं तेंव्हा मी त्याच ऐकल नाही याची सल अजूनही त्याला टोचत असावी बहुदा. शेवटी आपल मन मोकळ करुन तो म्हणालाच, 'दिदी, देखो, हम इंजिनियर नहीं हे पर उसका सब काम कर सकते हें। पढ़े नहीं ना, डिग्री नहीं हे हमारे पास , बस, इसलिए'... मी एकदम गप्प झाले, काय बोलू त्यावर.अगदी खर बोलत होता तो. मी म्हटल 'अरे भैया मैं पढ़कर भी कहाँ जान पायी आप क्या बोल रहे हों, इसीलिए मुझे आपली बात समझने के लिए इंजिनियर को बुलाना पड़ा , इसका मतलब आप भी इंजिनियर हो',अस म्हणताच तो हसला... 
खऱ्या अर्थाने ' इंजिनियर डे ' च्या शुभेच्छा मी माझ्या समोर उभ्या असलेल्या दोन्ही इंजिनियर्स ना एक दिवस उशीरा का होईना पण मनापासून दिल्या होत्या..फरक फक्त डिग्रीचा होता !!!


- कविता

Thursday, September 7, 2017

आठवणींच्या पावसांत या
भिजली माझी गाणी ग
ओघळला तो शब्द नि शब्द
कागद कोरा उरला ग
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

तृणपात्यांवर कोसळला तो
मनांत बरसून गेला ग
क्षितिजावरती रंग सावळा
ठेवून मागे गेला ग ,
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग

रंग मनाचा अन् क्षितिजाचा
अवघा एकचि झाला ग
इथे सावळा तिथे सावळा
हरवून मजला गेला गं
काय करू .... सांग सखी गं
तो अवचित बरसून गेला ग....




 

Thursday, August 31, 2017

सैनिक


अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतोंका ,
श्रेष्ठत्व के विवादपर साथ छोडा एक दुसरोंका !!
' इन पांचोसेभी शक्तीशाली है कोई इस दुनियामे ?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें !
'हे भगवन् , इन पांचो के सामने हमारा एकमात्र हि काफी हें
वह आगसे भी प्रखर है , तुफ़ानोंसे  भी तेज से
पानीसे गतिमान , धरती से सहिष्णु और व्योम से भी उंचा है  !
वह हमारी आन हें , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !'
सर्वश्रेष्ठ होकर भी वह किसी विवाद में नही उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए वह हमारा 'आज' हें गवाता
गर्व हें तुमपर , नाज हें तुमपर, तुमपर  हें अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित हमारा कोटी कोटी प्रणाम !!

- अनुराधा प्रभुदेसाई

शहरी, चौकटीबद्ध, सुरक्षित आयुष्य जगत असतांना आपल्याला आपल्या देशसीमेवर चालणाऱ्या गोष्टींची खरंच खोलवर जाणीव असते ? आपल्याला स्वातंत्र्य मिळून  ७० वर्ष झाली पण 'स्वातंत्र्याचा' आणि एक भारतीय असल्याचा, 'भारतीयत्वाचा' खरा अर्थ आपल्याला समजलाय ? स्वैराचार आणि स्वातंत्र्य यातील फरक आपण ओळखलाय ?  लक्ष्य फौंडेशन च्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी जेव्हा हे प्रश्न विचारले तेव्हा ऑडिटोरियम मध्ये फक्त शांतता होती. प्रत्येक जण स्वतःला हाच प्रश्न विचारत होता, त्याची उत्तरं शोधत होतां.

'सैनिक..  तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा'. त्यांच्या बोलण्यातून हा सैनिक हळूहळू उलगडत होता. स्वान्त: सुखाय आयुष्य जगणाऱ्या सर्वांना थोडा वेगळा विचार करायला लावणारे त्यांचे शब्द .आपल्याला माहीत नसलेल्या त्याच्या आयुष्यातील दररोजच्या युद्धाशी ओळख करून देणारे शब्द ... ८ तासाच्या चौकटीत ऑफिसमधे काम करून दमणाऱ्या आपल्याला ३६/ ४० तास बॉर्डर वर एकाजागी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या  सैनिकाची गोष्ट सांगणारे शब्द .. ५६ ते -५६ डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा सैनिक.. केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना हें, बाकी आसान हें " इतक्या सोप्या सरळ अर्थाने समजून त्या करणारा सैनिक ... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक ...कोणत्याच गोष्टीसाठी रिटेक ची अनुमती नसलेला सैनिक....

खरंच हा सैनिक आपल्याला माहित आहे ?

आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम , हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे , पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा  सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. "एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे तर, "आई , आताच मी ट्रैनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद ट्रैनिंग आहे. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही..  प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं -३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल....  कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया .... "जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा अर्थ बहुदा यांनाच समजला होता.

आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई.या प्रत्येकाची गोष्ट उलगडून सांगत होत्या.

जावेद अख्तर यांनी लिहिलंय,

" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबो कि बिजलीया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम "...


मिशन वर जायच्या आधी हाच सैनिक पत्र लिहून आपल्या पेटिमध्ये ठेवतो, जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो. खरंच, किती अवघड आहे हे पचवणं. असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कफेन खूप जड असतं... हळू हळू याचा अर्थ समजत होता....

कर्नल धरमदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर,  दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करून डोळयांदेखत बुटासकट उडालेला डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने  पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून , पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं आणि प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर कापावा लागलेला पाय..  अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारात होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास , पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून गेला.

मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर , १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून  त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टर मध्ये ठेवायला हवामान आणि जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद.. "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड असत , श्वास घ्यायला त्रास होतो, वजन उचलायला त्रास होतो  त्या ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना सॅल्यूट ठोकला ... " व्हेन गोइंग गेट्स टफ , द टफ गेट्स गोइंग "....

सैनिकाची ओळख करून देणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांच्या " तुमच्या उद्या साठी आपला आज देणारा सैनिक ", या पुस्तकात आपल्यासाठी लिहिल्या आहेत. आपल्यासारखाच तो हि कोणाचा तरी मुलगा, भाऊ , नवरा , बाबा असतो पण त्याआधी तो एक सैनिक असतो. आपल्यातील प्रत्येक जण सैनिक होऊ शकत नाही पण किमान एका शहीद वीराच्या आईवर " जिस देश पर मैने अपना बच्चा कुर्बान किया हें , ऊस देश से थोडा तो प्यार  करो ," म्हणण्याची वेळ आपण आणू नये .

"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकांचं आपण काही देणं लागतो कि नाही ? याच उत्तर आपल्यालाच शोधायला हवं.






 

Saturday, August 19, 2017

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं, वोह शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब हें , बोले रे पपीहरा, मैने तेरे लिये हि सात रंग के सपने चुने, आपकी आँखो में कुछ मेहेके हुए से राज हें , छोटीसी कहानी से बारिशों के पानी से , ए जिंदगी गले लगा ले , दिल ढुंढता हे फिर वही फुरसत के रात दिन .... एका मागून एक आवडती गाणी लागत होती . 'थांब , हे  गाणं संपल्यावर जावू झोपायला' , 'अरे हे पण मस्त आहे' , 'आहा .. माझ फेवरेट गाण आहे हे' .. असं म्हणत प्रत्येक गाणं ऐकत गेले आणि रात्रीचे १० ते १२ असे दोन तास कसे गेले ते काही समजलं नाही. निमित्त होतं गुलजार यांच्या वाढदिवसाचं. काल ऑफिसला जाताना गाडीत रेडिओ वर, ऑफिस मध्ये काम करतांना कॉम्पुटरवर, घरी आल्यावर मोबाइल वर तर रात्री टी. व्ही.वर त्यांचीच गाणी सोबत होती; तरी अजून समाधान मात्र झालं नव्हतं.

गाणी ऐकायची माझी आवड तशी जुनीच. कॉलेज मध्ये असतांना हि आवड वेडेपणात परिवर्तित झाली होती. किशोरजी,लताजी, आशाजी, रफी साहेब , हेमंतकुमार , भूपेंद्र अशा गायकांच खूप छान collection होतं माझ्याकडे. तसंच आरडींच्या गाण्याची खुप ओढ असायची, अजूनही आहे. का ते माहित नाही पण संगीतकार म्हणून त्यांची गाणी मुद्दाम जेवढी ऐकली तेवढी कदाचित दुसऱ्या कोणत्याही संगीतकाराची आवर्जून जमा करून नाही ऐकली. पण जेंव्हा खऱ्या अर्थाने शब्द समजायला लागले, अर्थ आतवर पोचू लागले, बोचू लागले तेव्हा मात्र 'कोणी लिहिलंय हे गाणं' असे प्रश्न हि पडू लागले. 

मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचं कि कसं काय बरं त्या नायक आणि नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं  गीतकारांना शब्दांत मांडता येतं ? नायिकेचे भाव शब्दात उतरवणं किती अवघड ? अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीच मन , भावना समजून  त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ? आपण तर या बाबतीत किती श्रीमंत आणि नशीबवान आहोत कि साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, इंदिवर, आनंद बक्षी , हसरत जयपुरी, अंजान , शैलेंद्र , शकील बदायुनी, जावेद अख्तर आणि गुलजार असे कितीतरी गीतकार आपल्या सिनेसृष्टीला लाभले.

मध्यंतरी कौशल इनामदार यांनी 'कलागुज' हि कार्यशाळा घेतली होती पुण्यात, 'गाणं कसं ऐकायचं' यावर ..  श्रोते ते रसिक श्रोते हा एक प्रवास घडवला त्यांनी. सलग आठ तास कौशलजींना ऐकतांना त्यांनी शिकवलेल्या अनेक बारकाव्यांमुळे गाणी ऐकण्याची एक नवी दृष्टी / कान मिळाले. अमरप्रेम पासून अलीकडच्या बालगंधर्व पर्यंतचा तो सांगीतिक प्रवास खरंच संपूच नये असा होता.

त्या नंतर परत एकदा आवडणारी हि सर्व गाणी ऐकतांना खूप मजा आली, त्याच जुन्या गाण्यांशी नव्याने ओळख झाली जणू...

कोणता गीतकार आवडतो , असं जर कोणी विचारलं तर एक नाव सांगणं किती अवघड आहे पण तरीही ज्याच्या शब्दांची जादू नेहमीच भावली ते गीतकार म्हणजे गुलजारजी.

आपण नेहमी जी गाणी ऐकतो ती आपल्या favourite playlist मध्ये नेहमी तयार असतात. आर डी आणि गुलजार हे संपूर्ण कॉम्बिनेशनच माझ्या या लिस्ट मध्ये आहे . इजाजत, घर, मासूम, आंधी, खुशबू, गोलमाल, परिचय, किनारा यातील गाणी कितीही वेळा ऐकली तरी परत परत ऐकावीशी वाटतात, हृदयाला स्पर्शून जातात यांतच त्याची जादू आहे.

प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले , मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तर कधी  'बाहो में चले आओ ', म्हणत त्याची वाट अडवते. प्रेमात पडल्यावर "तुम आ गए हो , नूर आ गया हें" म्हणते तर कधी त्याची वाट पाहतांना ' ना, जिया लागे ना , तेरे बिना मेरा कहीं जिया sss लागेना ' म्हणते. तो समोर असला कि "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", म्हणत त्याच्या डोळ्यातील भाव वाचते. " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो.. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें..  बेहेने दो".. म्हणते तेंव्हा ते शब्द अगदी आरपार जातात. ११६ चांद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हें "म्हणते तेव्हा ती पतझड , ते 'मेरा वो सामान लौटा दो' असं आर्जव खूप लागतं , खोलवर.  त्याच्या विरहात ,' दो नैनो में आसूं भरे हेंsss  निंदिया कैसे समाए," असं म्हणून "जिंदगी तो काटी ये रात कट जाए " या शब्दांत तिची तगमग व्यक्त करते. प्रत्येक वेळी एका वेगळ्या रूपात ती भेटतच राहते.

त्यांच्या या सर्वच गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. त्यांचे भाव जणू कागदावर उतरावेत अशा ओळी गुलजार साहेबांनी लिहिल्या आहेत. मी एकदा वाचलं होतं ,गुलजार जी म्हणायचे कि "चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागत, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते , जगावी लागते."

त्यांनी गाणी लिहिली, कविता लिहिल्या, चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिले पण तरीही या सर्वांत एक गीतकार म्हणून ते जास्त भावले हे नक्की. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा गुलजारजी !!

Saturday, August 5, 2017


शाळेत असताना गणित विषय
फारसा कधीच आवडला नाही
भीतीच होती ती बहुदा
पण काही केल्या झेपला नाही
तरीसुद्धा, आयुष्यातील अवघड गणितं
क्लिष्ट असूनही सोडवता येतात
गुणाकार भागाकार वजाबाकी करता करता
माणसं हळूहळू जोडता येतांत

मैत्रीला चॉईस असतो पण नातलगांचं काय ?
लग्नाआधी आणि लग्नानंतर
नशिब असेल तसे मिळतात
कधी किचकट गणितासारखे
आपल्यालाच दमवतात
प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळतच असं नाही
अनुत्तरित म्ह्णून काही
तसेच सोडावे लागतात

मैत्रीच गणित बाकी सगळ्यात सोपं असतं
मानपानाचं नाटकss उगा इथे नसतं
हवं तेव्हा चिडावं हवं तस रागवावं
परत फिरून थोडं कट्टी बट्टीत रमावं
जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं
हक्क गाजवत वागावं
जीभेला हाड नसतच, वाटेल ते बोलावं
चाळीशी आली म्हणून काय झालं 
तरी वेडयासारखं वागावं
'ए .. तुला उशीर का झाला ' म्हणत
उगीच तिला पिडावं आणि
लाजताना पाहून तिला फिदीफिदी हसावं

मैत्रीच्या या गणितात कौतुक असतं मनापासून
दाद असते अगदी दिलखुलास
जे काही आहे ते फक्त ओठांवर असतं
आत एक बाहेर एक, असं काहीच नसतं
वजाबाकी आयुष्यातील इथेच share होते 
मनांतल बोलायला जागा तशी हि एकच असते
कधी आईचे लाडू आठवले कि हळूच एक डबा येतो
"अग कालच केले म्हणून पाठवले"
असा गोड निरोप येतो... 
आवाजातून मनातलं आणि चेहऱ्यावरून हृदयातल
ओळखायचं  calculation
इथे स्ट्रॉंग असतं
गणित कितीही कच्च असू द्या ,
इथे मात्र पक्क असतं , इथे मात्र पक्क असतं .....



 

पूर्व पुण्याई

माझ्या भावाला, केदारला चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली होती. कालच माझ्या मुलानी, कांतेयनी त्याच्या मामाला दोन्ही परीक्षांच्या गुण पत्रिका दाखवायला लावल्या कारण मामा पेक्षा आपल्याला मार्क जास्त मिळाले कि कमी हे त्याला पाहायचं होत. १९८८ आणि १९९१ सालातील त्या गुणपत्रिका पाहून खरंच खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

केदारचे कोणते मित्र परीक्षेला बसले होते, कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळाली यावर गप्पा झाल्या. शाळा सुटल्यावर शाळेत होणारा स्कॉलरशिपचा तास, सौ. देशपांडे आणि सौ.वैद्य बाईंनी घेतलेली मेहनत, क्लास सुटेपर्यंत बाहेर सर्व आयांची जमलेली मैफिल आणि याच मैफिलीने आईला दिलेली तीची जिवलग मैत्रीण, सारं काही आठवलं.

जून महिन्यात शाळा सुरु झाली कि स्कॉलरशिपचा निकाल यायचा. शाळेतील मुख्य प्रवेश द्वाराजवळील काळ्या फळ्यावर अतिशय सुरेख अक्षरांत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं जायचं, ' स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  हार्दिक  अभिनंदन !!' आणि त्याखाली लिहिलेली असायची यशस्वी मुलांची नावं. त्यामधे केदारच नाव वाचायला खूप मजा यायची, भारी वाटायचं.

आजही शाळेत त्या वेळी स्कॉलरशिप मिळालेल्या मुलांची नावं त्या काळच्या पद्धतीप्रमाणे लाकडी नोटीस बोर्डवर अजूनही रंगवलेली आहेत. आजही मी जेंव्हा जेंव्हा शाळेत जाते तेव्हा आवर्जून तो बोर्ड आणि त्यावरील नावं नक्की पहाते.

स्कॉलरशिपच्या दोन्ही परीक्षेला मी बसले नव्हते. पण कांतेयमुळे मला चौथी आणि आठवी दोन्ही वर्षी हा अनुभव खूप जवळून घेता आला. तो चौथीत गेल्यावर माझी आई नेहमी त्याला सांगायची स्कॉलरशिपला बस , खूप उपयोग होतो त्या परीक्षेचा, नाही मिळाली स्कॉलरशिप तरी चालेल पण परीक्षा दे .. माझ्यापेक्षा आजीचं प्रोत्साहन तसूभर जास्त होतं त्याला.

परीक्षा द्यायची ठरलं तेव्हा क्लास कोणता लावायचा हा प्रश्न होता. मी शाळेत असतांना ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने शिकायला मिळालं त्या सौ. देव बाई व सौ. कानडे बाई यांची बरेचदा आठवण यायची. त्याच वेळी माझी ओळख सौ दामले बाईंशी झाली. अतिशय प्रभावी, शिस्तप्रिय, कडक आणि आदरयुक्त भीती वाटेल असं व्यक्तिमत्व. त्या घरीच स्कॉलरशिप चे क्लास घेतं असत. 'हॉलमध्ये पंचवीस मुलं बसतात, शेवटचा बसला कि प्रवेश संपला', इतकी सोपी क्लास मधे प्रवेश घेण्याची त्यांची व्याख्या होती. स्कॉलरशिप च्या अभ्यासाची गोडी खऱ्या अर्थाने त्यांनीच लावली त्यामुळे सातवीत असतांना स्कॉलरशिप परीक्षा रद्द होऊनही वर्षभर कांतेय त्यांच्याकडे क्लासला जात होता.

पुढे स्कॉलरशिपची परीक्षा सातवीत न घेता आठवीत घेतली जाईल हा बदल झाला. तेव्हा दामले बाईंची तब्येत ठीक नसल्याने परत क्लासची शोधा शोध ..  माझी मैत्रीण कल्पनाने सौ. दांडेकर बाईंचा नंबर दिला. ती म्हणाली, "तू एकदा भेटून ये मग बोलू". मी खरं तर माझ्या देव बाई आणि कानडे बाई शोधायचे प्रत्येक शिक्षकामध्ये आणि दामले बाईंना भेटून मला माझ्याच बाई परत मिळाल्याचा आनंद झाला.

आई म्हणून आपण आपल्या मुलाला खूप छान ओळखतो, त्याची कुवत जाणतो. तो कुठे कमी पडतो हे सुद्धा आपल्याला ठाऊक असतं. ते मोकळेपणाने बाईंना सांगता यायला हवं. आई म्हणून वाटणारी काळजी, आपण आपल्या मुलाच्या अभ्यासात त्याला काय मदत करू शकतो याबद्दल उघडपणे बोलता यायला हवं."हि मुलं अशीच वागतात का हो ?", हा प्रश्न सुद्धा सहजपणे विचारता यायला हवा, असं मला नेहमी वाटायचं. हाच मोकळा  संवाद आमच्यात अतिशय छान जुळून आला.

क्लास सुटल्यावर कांतेयला आणायला गेलं कि इमारतीखाली क्लास मधील सर्व मुलांबरोबर गप्पा  मारणाऱ्या  दामले बाई दिसायच्या. सर्व मुलं जाईपर्यंत त्या स्वतः खाली थांबायच्या. एकटी जाणारी मुलं समोरचा रस्ता नीट ओलांडतायेत कि नाही यावर त्यांच लक्ष असायचं. कधी आई किंवा बाबाला यायला उशीर झाला तर त्या मुलाला एकट थांबायला लागू नये म्हणून त्याच्या सोबत त्याही थांबायच्या. मग अधून मधून त्यांच्याशी बोलणं व्हायचं. अभ्यासात कोठे कमी पडतोय, कशाची प्रॅक्टिस अजून करायला हवी अशी चर्चा व्हायची.आईच्या भूमिकेत असतांना मुलांची निरागसता एन्जॉय करता आली पाहिजे याबतीत त्या खूप आग्रही असायच्या. "अगं त्याचा धांदरटपणा , त्याच्या चेहऱ्यावरचे मिस्कील हसू एन्जॉय कर', असं हक्कानं फक्त त्यांनींच मला सांगितल आणि शिकवलं. मुलांच्या कलान घेतं, जिथे गरज आहे तिथे कान ओढून, समजावून, कौतुक करून, त्यांनी मुलांमध्ये अभ्यासाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी रुजवल्या.

परीक्षेच्या आधी एक/ दोन आठवडे पेपर सोडवण्यावर भर द्यायचा कारण जितका सराव करू तितक चांगलं हा कानमंत्र त्यांनी मुलांना दिला. पण अडलेल्या प्रश्नांचं काय ? यावर मुलं आणि दामले बाईंनी एक युक्ती काढली. जाण्या येण्याचा वेळ वाचावा आणि प्रश्नांचं समाधान सुद्धा व्हावं म्हणून व्हाट्सअँप चा एक ग्रुप काढला. रोज संध्याकाळी अडलेले प्रश्न ग्रुप वर टाकायचे , बाकी मुलांनी ते सोडवायचा प्रयत्न करायचा आणि जमलं नाही तर बाईंनी सांगायचं इतकं सोपं होतं सारं. रोज संध्याकाळी काही ठराविक वेळ अभ्यासाचा क्लास हा असा भरायचा. आई बाबा ऑफिस मधून घरी आले कि त्यांच्या मोबाईलचा मुलांनी केलेला हा वापर अतिशय सुखावह होता !

दामले बाईंनी मुलांना फक्त अभ्यासच शिकवला नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन चांगले संस्कार सुद्धा केले.  संध्याकाळच्या दोन तासाच्या क्लासच्या वेळांत पाच मिनिटांची सुटी असतांना तिन्हीसांजेला घरी म्हणतो तशी  शुभंकरोती म्हणणारी मुलं, मी फक्त याच क्लास मध्ये पाहिली. शिकवतांना शिक्षक म्हणून, संस्कार करतांना कधी आजी तर कधी आईच रूप घेऊन दामले बाईंनी मुलांना घडवलं म्हणण्यापेक्षा तयार केलं. मोबाईल हे माध्यम कशाप्रकारे वापरता येऊ शकतं हे अनुभवातून दाखवलं.

आजकाल दुर्मिळ होत चाललेले सौ दामले बाईंसारखे शिक्षक गवसले कि पूर्वपुण्याई वरचा विश्वास अजूनच ठाम होत जातो, हे मात्र नक्की !


- कविता सहस्रबुद्धे
श्रावण महिना पावसाचा .. श्रावण म्हणजे सणवार , व्रत वैकल्य.. या महिन्यात येणाऱ्या सोमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवार अशा प्रत्येक दिवसाच आपल अस एक खास वैशिष्ट्य आहेत. श्रावणात ऊन पावसाचा जसा खेळ चालतो तास काही आठवणींचा खेळ मनांत रंगतो.

लहानपणापासून प्रत्येक श्रावणात आईला काही ठरविक गोष्टी करतांना वर्षानुवर्षं पाहिलं होतं. श्रावण महिना सुरु झाला कि हिरव्या बांगड्या भरायच्या, घरी आलेल्या सुवासिनीची ओटी भरायची, रोज देवळांत जायचं, दुर्वा आघाडा यांचा हार जिवतीच्या फोटोला घालायचा, असे काही नेम तिने स्वतःसाठी बनवले होते.

श्रावणातील एका सोमवारी कुलाचार म्हणून होणारा नैवेद्याचा खास स्वयंपाक हे आमच्यासाठी नेहमी एक आकर्षण असायचं. तसं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आई आवर्जून काही पदार्थ नक्कीच करायची. कधी गव्हाची खीर तरी कधी बिरड्याची उसळ. चुरम्याचे लाडू, घारगे असं प्रत्येक सोमवारी काही न काही  ठरलेलं असायचं. बेल , आघाडा , तुळस, फुलं, दुर्वा  यांनी देवघर भरून जायचं. कित्येक वर्ष श्रावणी सोमवारी मंदिरात जाणं आणि संध्याकाळी उपवास सोडताना काहीतरी गोड पदार्थ करणं हा नियम तिने कधी मोडला नाही. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी पुरण केलं जायचं, मग नैवैद्य, आरती आणि शुक्रवारच औक्षण.

आईच्या मैत्रिणींचा एक बेत असायचा. प्रत्येक शुक्रवारी एकीकडे बाकी सगळ्या मैत्रिणींनी जेवायला जायचं. सौवाष्ण जेवण,हळदीकुंकू या निमित्ताने त्यांच छानस गेट टूगेदर व्हायच. आम्ही अगदी शाळेत असल्यापासून हा नेम कधीच चुकला नाही. श्रावण महिन्यात न चुकता कित्येक वर्ष अगदी असच घडत होत ....... जणू त्या महिन्याचं time table अगदी फिक्स होत.

पण आता हा श्रावण महिना तितकासा जवळचा वाटत नाही. मला माहीत असलेला, मी पाहिलेला  श्रावण कुठेतरी हरवलाय.

आई गेली आणि श्रावण महिन्यातील सारी मजाच संपली. तो जिवतीचा फोटो नाही, ते फुटाणे आणि दुधाचा नैवैद्य नाही, तिच्या हातची पुरणाची पोळी नाही, श्रावण महिन्यात आवर्जून ती भरायची ती ओटीही नाही, आणि शुक्रवारच ते औक्षण सुद्धा नाही... काय गमावलय याची जाणीव हा श्रावण मात्र दररोज करून देत राहतो.. 
मोहम्मद रफी

माझी पहिली ओळख या व्यक्तीमत्वाशी झाली जेव्हा मला ते कोण हे हि माहित नव्हतं इतकी लहान होते मी. माझ्या आत्याच्या घरी एका भिंतीवर त्यांचा एक खूप छान फोटो होता. तो फोटो पाहून ते कुणीतरी खूप मोठे आहेत एवढच काय ते समजल होत त्या वेळी. पण ते नक्की किती मोठे आहेत हे कळायला खूप वेळ जावा लागला, ते वय यावं लागलं. आधी गाण समजणं, त्यातला दर्द काळजाला भिडणं आणि आवाजातील आर्तता हृदयापर्यंत पोहोचण्याची समज एका वयानंतरच आली.

देवानंद आवडायचा त्यामुळे गाईड, हम दोनो या सिनेमांची पारायण केली होती अक्षरशः आणि या सिनेमातील गाण्यांनी तर वेड लावलं होत. वहिदाजी आणि देव साहेबांवरच 'तेरे मेरे सपने अब एक रंग हें , हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हें'.. हे ऐकुन तर प्रेमात पडल्यावर भावना इतक्याच बोलक्या होतात असं वाटायचं.

'लाख मनाले दुनिया साथ न अब छुटेगा आके मेरे हातों में , अब साथ ना ये छुटेगा'..  हे ऐकून तर त्या आवाजाच्या प्रेमात पडावं इतका आश्वासक आणि रोमँटिक भाव त्या सीन मधेच नाही तर त्या आवाजातही होता.

"दिन ढल जाए हाए रात ना जाए, तू तो न आए तेरी याद सताये " या गाण्यात शैलेंद्रचे शब्द जणू जीव ओतून गायलेत रफी साहेब. कित्येक वेळा हे गाणं आजवर ऐकलंय आणि प्रत्येक वेळी डोळ्यांचे काठ मनसोक्त वाहीलेत...आंत कुठेतरी खोलवर पोहोचलेला तो दर्द आणि ती आर्तता.

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं लक्षात राहीलं ते त्यातील लायटरची धून व रफी साहेबांकरताच.
'अभी ना जावो छोडकर के दिलsss  अभी भरा नहीं ' हे ऐकतांना तर आपल्यासाठी कोणीतरी असंच गाणं म्हणावं असं वाटायचं. 'बागों में बहार हें, कलियों पे निखारे हें ', ' गुन गुना रहे हें भवरे खिल रहीं हें कली कली'  अशी गाणी ऐकतांना, आपणही प्रेमात पडाव एवढाच काय तो विचार यायचा.

"चौदहवी का चाँद हो या आफताब हो , जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो ", असो किंवा ' मैने पुछा चाँद से के देखा हें कही, मेरे यार सा हसीन ?चाँद ने कहां , चांदनी कि कसम, नही..नही.. नही '... तसंच, 'तेरी बिंदिया
रे, आए हाए' किंवा 'झिलमिल सितारों का आंगन होगा ', " सौ साल पेहेले मुझे तुमसे प्यार था " .. या इतक्या गोड गाण्यांना आवाजाच्या जादूने सजवलय ते फक्त रफींनी.

"ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हें "या प्यासा मधील साहिरच्या शब्दांना रफीजींनी आपल्या अफाट जादूई आवाजाने चार चाँद लावलेत.

'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार ' म्हणताना दिलीपकुमार काय आवडलाय. 'अगर तुम भूला न दोगे सपने ये सच हि होंगे, हम तुम ...' हे गाणं असो किंवा 'तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हें ', असो, एकदा ऐकून समाधान होतच नाही या गाण्यांचं. परत परत ऐकत राहावं ...

मध्यंतरी माझ्या वाचनात आल कि एकदा ओ. पी . नय्यर म्हणाले होते ,' मोहम्मद रफी ना होता तो ओ. पी. नय्यर ना होता.. काय भारी ना !! दोघांच्या दोस्तीला सलाम !!!

आयुष्यातील कित्येक क्षणांत, कितीतरी प्रसंगात या आवाजाची सोबत होती.. कित्येकदा डोळे मिटून बसले असतांना मागे त्याचा आवाज रेडिओवर होता....

हि गाणी सोबत असतांना प्रेमात पडलेल्या त्या जुन्या पिढीबरोबर आपल्याला सुद्धा हि गाणी ऐकायला मिळाली , enjoy करता आली म्हणून खरं तर आपणही नशिबवान आहोत.

रफी साहेबांची हि आवाजाची जादू अशीच सोबत राहो ....


 

Wednesday, June 21, 2017

का अस वाटतंय कि,
काहीतरी माग राहिलंय
मनामधे जपलेल
दोघांकरता वसलेलं
ते गाव मात्र हरवलंय ,
खरच, काहीतरी माग राहिलंय...

स्वप्नांची पानगळ होऊन
आता रानामध्येच पसरलीए
चाहूल आपल्या दोघांची
पिवळ्या रानफुलांत हरवलीए
तरी डोंगरदर्यांत अजूनही
आपलं गूज असेल का ?
रेंगाळलेल्या वाटेवरती
सांग, अंतर हळूच मिटेल का
साहिरच ते गाणं परत
मैफिलीत या सजेल का
ओंजळभर बकुळीचा
गंध तसाच दरवळेल का
मळभ दाटून आल्यावर
तीच हुरहूर वाटेल का
हरवलेलं प्रेम आपलं
पुन्हा कधी गवसेल का .....









Saturday, June 17, 2017

माहेर

'माझे माहेर पंढरी.. आहे भिवरेच्या तीरी '.. लहानपणी ऐकलेल हे गाणं. तेव्हा याच गाण्याने भीमसेनजींच्या आवाजाची ओळख करून दिली आणि दुसरी ओळख झाली 'माहेर' या शब्दाशी. तेव्हा त्या शब्दाचा अर्थही समजत नव्हता आणि "करी माहेरची आठवण ssss  " मधील आर्तता सुद्धा ... 
 
" घाल घाल पिंगा वाऱ्या , माझ्या परसात 
माहेरी जा सुवासाची , कर बरसात ".... 
आज हे गाणं ऐकताना डोळे भरून आले. सुमन कल्याणपुरकरांचा आवाज ...  जितके वेळा ऐकलं तेव्हा प्रत्येक वेळी मन मात्र 'माहेर' या शब्दावरच अडखळल. 
 
आजकाल WA, facebook, skype , VIDEO CALL च्या जमान्यात आई फक्त एक कॉल , एक मेसेज दूर असते. हवी तेव्हा भेटते , हवं तेव्हा तिच्याशी बोलता येतं , तिला पाहता येतं.  पण आपल्या आईसाठी, आजीसाठी  हे इतक सोपं नव्हतं आणि म्हणूनच कदाचित त्या वेळी ते गाण्यातून व्यक्त केलं गेलं. 
 
आईला भेटण्यासाठी आतुरलेल्या मनाला वाऱ्याबरोबर निरोप द्यावा लागे.. 
'' सुखी आहे पोर सांग आईच्या कानांत... माहेरीच्या सुखाला ग मन आसवलं "... 

तर कधी पाखराला सांगावे लागे,
"माझिया माहेर जा , रे पाखरा माझिया माहेरा जा
देते तुझ्या सोबतीला आतुरले माझे मन
वाट दाखवाया नीट
माझी वेडी आठवण,
तुझी ग साळुंकी आहे बाई सुखी,
सांगा पाखरांनो तिचिये कानी एवढा निरोप माझा ".. 

माहेरची ओढ इतक्या सुंदर शब्दांत व्यक्त झालेली अजून कुठे सापडणार नाही.

हि गाणी ऐकल्यावर आठवत आईचं माहेरपण.  उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबा आणि मामाकडे तर दिवाळीच्या सुट्टीत बाबांच्या गावाला आजीकडे जाण्याचा कित्येक वर्षांचा नेम होता. 
 
दर महिन्याला आजोबांचं येणार पत्र , त्यावर आईच उत्तर म्हणून अजून एक पत्र,  दर सुट्टीत गेल्यावर आजोबांनी आईसाठी घेतलेली साडी, भाऊबीजेला न चुकता येणारी मामाची भाऊबीजेची मनिऑर्डर आणि प्रत्येक वेळी निघताना भरून येणारे आई आणि आजोबांचे डोळे ... हे कधी चुकल नाही, नेहमी असच घडत गेलं.

कदाचित त्या काळी एवढी मोकळीक नव्हती. चालीरीती, परंपरा आणि प्रत्येक नात्याची एक ठरलेली सीमा .. कर्तव्याची जाणीव, प्रेम होतच आणि त्याच बरोबरीने आदरयुक्त भीती सुद्धा. त्यामुळे सासर आणि माँहेर या दोन व्याख्या अगदी स्पष्ट होत्या आणि त्या तशाच जपल्या हि गेल्या.

' माझिया माहेरा जा , पाखरा ... माझिया माहेरा जा ' हे जोत्स्ना भोळेंच्या आवाजातील गाणं ऐकताना 'माहेर' या शब्दातील गोडवा जरा अजूनच वाढला.

आपण कितीही मोठ्या झालो तरी ती ओढ मात्र अजूनही आपले डोळे ओले करतेच कारण ' भातुकली ते पाठवणी ' पर्यंतचा आपला तो प्रवास त्या एकाच शब्दांत सामावला आहे ........ 

Thursday, June 15, 2017

खर तर आज ग्रुप वरचा गप्पांचा विषय होता ' प्रेम ' .. सर्वांच्या प्रेमाबद्दलच्या कल्पना, विचार आणि वास्तव यांची सांगड पाहून मी पण कुठेतरी प्रेमाचा विचार करू लागले.

'ऐसा पेहेली बार हुआ हें , सतरा अठरा सालों में ; अनदेखा अनजाना कोई आने लगा हें खयालों  में ...'
हा डायलॉग ऐकला तेव्हा विचार आला,  हो असच काहीस आपल्याला पण वाटलं होतच कि पण तो अनदेखा अनजाना चेहरा काही समोर आलाच नाही. मनातल्या मनात खूप रंगवली स्वप्न पण ,' दिल के दरवाजे पर दस्तक देनेवाला सामने आया हि नहीं'... ते प्रेम, तेव्हा त्या वयात गवसलंच  नाही .

ती स्वप्न आणि खरी वस्तूस्थिती यांचा विचार करता लक्षात आल, सार काही सोडून प्रेमात पडाव यापेक्षा खूप काहीतरी वेगळं होत तेव्हा आयुष्य.

दहावी होता होताच जबाबदारीची जाणीव आणि परिस्थितीचा रंग इतका गडद होत गेला कि प्रेमाचा रंग तसा दूरच राहिला. परिस्थिती बदलायची एवढीच एक आस होती . पाच तास कॉलेज आणि पाच तास पार्ट टाइम नोकरी यात पाच वर्षे गेली. अगदी काही तशीच निघून नाही गेली , खूप काही देऊनहि गेली.

कधी डोळ्याच्या , कधी दातांच्या तर कधी लहान मुलांच्या डॉक्टरांकडे काम करताना खूप जवळून आयुष्य अनुभवता आलं. अतिशय प्रेमानं बोलणारी माणसं तर कधी त्या कमी लेखणाऱ्या नजरा, कधी शिकता शिकता नोकरी करते म्हणून मिळणारी कौतुकाची थाप तर कधी परीक्षेच्या वेळी सांभाळून घेणारे डॉक्टर असे  नवनवीन अनुभव मिळत गेले. आपापल्या क्षेत्रात नाव असणारे उत्तम डॉक्टर समोर होते आणि त्यांच्या कडे पाहूनच आयुष्यात खूप पुढे जाण्याची जिद्दही होती ... तेव्हा प्रेम होत , आयुष्यावरच !!

काउंटर वर बसून डॉक्टरांची अपॉइंटमेंट देताना, पैसे घेताना , पावत्या फाडताना अनेक चित्र विचित्र अनुभव येत, पण प्रत्येक ठेच नव्याने काहीतरी देऊन जाई. केदार डॉक्टर होण्याची जितकी वाट मी त्या काउंटर बसून पाहिली आहे ना, तितकी वाट त्यानी पण स्वतःला डॉक्टर म्हणवून घेताना पाहिली नसावी...

आणि एक दिवस पावती फाडणं संपल. MBA ची ऍडमिशन झाली. फुल टाइम कॉलेज बरोबर अजूनही पार्ट टाइम नोकरी सुरु होतीच. तेव्हा वाटायचं , आता फक्त दोन वर्ष वाट पाहायची.. मनासारखी , काहीतरी स्टेटस असलेली नोकरी मिळवण्याकरता... आणि शेवटी डिस्टींगशन सोबत छान नोकरी पण मिळाली .

आता पुढे काय ? तेव्हा लक्षात आलं, इथवर पोचता पोचता बावीसावं लागलय व बाबा रिटायरमेंटला पण येऊन पोचले आहेत. प्रेमात पडायला एकदम परफेक्ट टाईमिंग आणि सिच्युएशन होती आणि तेव्हाच् स्वप्नातला तो अनजाना अनदेखा चेहरा एकदम सामने आया........




 

सांगायाचे अजून तुजला,
बरेच आहे काही,
कागद तरीही कोरा,
का,अबोल होई शाई
 
हलकेच परतूनी येती,
मग शब्द नव्याने दारी
डोळ्यांत आर्जवांची,
या, हळूच होई दाटी..
 
नि:शब्द मनाच्या दारी,
काजळ रेघ ही ओली
मग अंतर दोघांमधले,
मोगऱ्यात हरवून जाई...
 
हे अंतर दोघांमधले, मोगऱ्यात हरवून जाई !!!

Thursday, April 20, 2017

प्रसंग - १
"अरे थांब, झालाच आहे डबा, भरू तर दे", असं म्हणत मी घाई घाई ने पोळी भाजीचा डबा भरून बाहेर आले तर तो आधीच खाली गेला होता. तशीच धावत जीना उतरु लागले तोवर गाडी सुरू केल्याचा आवाज आला आणि मी पळत पार्किंग मधे पोहोचेपर्यन्त त्याची गाडी गेट मधून बाहेर पड़ताना दिसली.
डब्यापेक्षा महत्वाच होत, हॉस्पिटल मधे पोहोचण कारण इमरजन्सी केस होती.

प्रसंग - २

"हॅलो, कुठे आहेस ? मी आले आहे, इथेच तुझ्या हॉस्पिटलच्या पोर्च मधे आहे, तूला आज येता येणार नाही म्हणून मीच आले ".. ससुन हॉस्पिटलच्या
आवारातून मी फ़ोन केला. कांतेयला घेवून आले आहे हे समजताच म्हणाला "थांब, आलोच".. कांतेय तेव्हा जेमतेम एक वर्षाचा होता. काही वेळातच तो आला आणि त्याच्या हॉस्टेल वर घेवून गेला. बी. जे. मेडिकलच्या त्या हॉस्टेल मधल्या त्याच्या रुमवर मी पहिल्यांदा गेले होते आणि तेहि त्याला राखी बांधायला..

प्रसंग - 3

" हॅलो, डॉक्टर आहेत का ?"  रात्रीचे 1.30 वाजले होते. वहिनीला फ़ोन दिला. आम्ही जागेच होतो. कालच संध्याकाळी आई गेली होती ... त्यामुळे त्या नंतर चे सर्व विधी करुन आवरायला एक वाजला होता. झोप कोणालाच येत नव्हती म्हणून बाहेर हॉल मधे बसलो होतो. मोबाइल ची बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून लैंडलाइन वर फोन होता. फोन वर बोलून " हो, आलेच," अस म्हणून वहिनीने फ़ोन ठेवला. तिचे डोळे भरून आले, ती आत गेली. कपडे बदलून, आवरून, आपल्या
आयुष्यातील दुखः बाजूला ठेवून हॉस्पिटल मधे गेली तिच्या पेशंट करता.

हे तीनही प्रसंग माझ्याच आयुष्यातील. डॉक्टर घरात असतांना काय चित्र असतं, याची हि एक झलक. ज्या ज्या घरात डॉक्टर आहे तिथे थोड्या फार फरकाने चित्र हेच असत.

एकीकडे सरकारी आणि खाजगी कार्यालयात सहा महिन्यांची मैटर्निटी लिव्ह असतांना डिलीवरी नंतर सातव्या दिवशी आपल्या पेशंट करता हॉस्पिटल मधे जाणारी डॉक्टर,  मी माझ्या घरी पाहिली आहे.

कधीही फ़ोन उचलून बोलावस वाटल किंवा फक्त आठवण आली म्हणून फोन केला तर " सर आता ऑपरेशन थिएटर मधे आहेत , काही निरोप " असा मोबाइल वर रिप्लाई येतो, तेव्हा डोळ्यांत पाणी येत. कोणत्याही नात्याच्या आधी तो एक डॉक्टर असतो आणि हाच डॉक्टर जेव्हां सर्व प्रयत्न करूनही आपल्या आईला वाचवू शकत नाही तेव्हा आपल्या सारखाच एक माणूस असतो, त्या वरच्या पुढे नमणारा...

मागचा आठवडा गाजला तो 'डॉक्टरांचा संप ' या विषयाने. social networking site वर ज्या पद्धतीने messages share केले जात होते ते पाहून अनेक लोकांची किव करावीशी वाटली. विचार न करता ' फॉरवर्ड ' करणारी ' हि मानसिकता कोणत्या थराला जाते आहे हि विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

मागील एका लेखात मी लिहिल होत, 'मी हॉस्पिटलच्या आवारातील देऊळ मी खिड़कीतून रोज पाहायचे, तरीही देव मला इथे भेटायचा , वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रूपांत'...

पण आज मात्र स्वतःच्या संरक्षणाकरता जेव्हां या डॉक्टरांना आवाज उठवावा लागतो त्या वेळी वाईट वाटून घेण्यापलीकडे काहीच उरत नाही....

- कविता

Friday, March 17, 2017



'खुद कि खोज में निकल,  तू किसलीए हताश हें
तू चल तेरे 'वजुद' कि, समय को भी तलाश  हें, समय को भी तलाश  हें '...

'पिंक' या सिनेमातील या ओळी.. तन्वीर गाझी चे शब्द आणि अमितजींचा आवाज ... एक स्त्री आणि तिचं अस्तित्व यावर लिहिलेल्या अतिशय समर्पक ओळी.

' वजुद ' म्हणजेच अस्तित्व.  एक स्त्री म्हणून समाजात तिने बनवलेली तिची प्रतिमा, कष्टाने निर्माण केलेली ओळख व याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक मुलगी, बहीण , प्रेयसी , बायको आणि आई म्हणून जगताना तिने भरलेले अनेक रंगच मग तिची ओळख बनतात.

'ती' येते तेच आनंद घेवून. ' मेरे घर आई एक नन्हीं परी , चांदनी के हसीन रथ पे सवार ' म्हणत तिचं स्वागत होत. नऊ महिन्यांचं अलवार नातं मग रूप घेतं. प्रेम, लळा , वात्सल्य , स्पर्श आणि आवाजाच्या कोंदणात ते रुजत, बहरतं. आईकडून येणारे संस्कार तिच्यावर कोरले जातात. आईचीच सावली होते तिची लेक. हि लेक, आईची जेवढी लाडकी तितकीच बाबांचीही, कदाचित तसूभर जास्तच. तिचं चिमुकल् रूप पाहून तो भारावून जातो,  "हाती घेता प्रथम तिला मी भारावून गेलो, क्षणांत ध्यानी माझ्या आले तात आता मी झालो", आयुष्यात त्याला मिळालेला हा आनंद, त्याच्या  शब्दातून आणि डोळ्यातून मग ओसंडून वाहू लागतो.

ऑफिसच्या कामात अडकलेला बाबा घरी उशीरा येवू लागतो, अगदी रात्री तिच्या झोपेच्या वेळी. मग तिच्यासाठी 'सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी ' म्हणत तिला जोजावतो , झोपवतो. आई मऊ मऊ दूध भात भरवत असली, चिऊ काऊच्या गोष्टी सांगत असली, आईचा दिवसभर सहवास मिळत असला, तरी उशिरा येणाऱ्या बाबाची, ती आतुरतेने वाट पाहत असते. त्यालाही तिच्याबरोबर चिमुकले खेळ मांडायचे असतात , काही खोडकर आठवणींचे ठसे त्या क्षणांवर मागे ठेवायचे असतात. लुटुपुटु उभं रहात तिनें टाकलेल पहिल पाऊल, डोळ्यात भरून ठेवायचं असतं, सार काही विसरून तिच्यासोबत फक्त हसायच असतं...

मुलगी म्हणून आई बाबांच्या आयुष्यात रंग भरता भरता,ती अजून एक नातं हळुवार जपत असते. म्हणूनच तो तिच्यासाठी, 'फुलोंका तारोंका सबका केहेना हें , एक हजारो में मेरी बेहेना हें, सारी उमर हमे संग रेहना हें ', असं  म्हणत असतो... कितीतरी लहान मोठ्या प्रसंगात त्या नात्याची वीण अगदी घट्ट होत जाते..  'जीवन के दुखों से यूं डरते नही हें, ऐसे बच के सच से गुजरते नहीं हें ' म्हणत तो तिला या जगाची हळूहळू ओळख करून देतो.  

असेच दिवस जातात आणि काही वर्षांनी, 'हातात बाळपोथी , ओठांत बाळभाषा , रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा ' म्हणणाऱ्या बाबाला मग एक दिवस, तिचं निसटलेल बालपणं दिसतं आणि प्रश्न पडतो , ' सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ' ? कुठेतरी तिच्या जगातून आपण हरवणार तर नाही हि भीती त्याला सतावू लागते......

सनईच्या सुरांत नवीन आयुष्याची सुरवात करताना ती, आपल घर, तिथल्या आठवणी, ते बालपण, ती भातुकली , ते गोळा केलेले रंगीत शिंपले, ते अंगण, आपले आई बाबा बहिण भाऊ, ते सवंगडी, सार काही सोडून जाते ... आई बाबांच्या डोळ्यांत आणि ओठात तिच्यासाठी तेंव्हा ,एकच 'आशिष' असतो, "जा आपल्या घरी तू , जा लाडके सुखाने "....

नवं घर, नवी सुरवात, नवीन माणसं यात जुळवून घेता घेता, ती नवीन आयुष्य सुरु करते. तिथे नव्याने रुजते . मग हळूच कुठेतरी " बडे अच्छे लगते हैं , ये धरती, ये नदिया, ये रैना और तुम " असं गुणगुणु लागते. 
सात पावल चालून ' तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा, मेरा साया ... ' म्हणत सावली सारखी त्याच्या सोबत राहते. तिच्याशिवाय त्याची अवस्था " ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं , हम क्या करे '...अशी होते .
'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं '...  या त्याच्या गोड हट्टाला ती लाजते ... त्याच्या विरहात
' नाsss , जिया लागे ना , तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना ', अशी आर्त साद घालते...  'अब तो हे तुमसे हर ख़ुशी अपनी, तुमपे मरना हैं , जिंदगी अपनी,' म्हणत स्वतःला विसरुन जाते.

मुलगी, बहीण, प्रेयसी, पत्नी असा प्रवास मग आई या नात्याशी पोहोचतो. त्या इवल्या नटखट कन्हैया करता मग ती यशोदा होते. ' ढुंढेरी अखिया, उसे चहू ओर, जाने कहाँ छुप गया,  नंदकिशॊर,' म्हणत ती परत एकदा आपलं बालपण जगते.

तिची जिद्द, कष्टाची तयारी, कणखरपणा , स्वावलंबन, प्रामाणिकपणा या गुणांमुळे ते  नातं, ती अगदी सहजपणे निभावून नेते. तिने पाहिलेली स्वप्नं सत्यात उतरवते , जणू  'किस माँ का ऐसा दुलारा हें तू, ' असा प्रश्न कोणालाही पडावा...

अशाप्रकारे प्रत्येक नात्याला तिने दिलेला अर्थ तिचं आयुष्य परिपूर्ण करतो. प्रत्येक नात्याला एक खास जागा असते तिच्या आयुष्यात.. नात्यांच्या या अनेक रंगात ती रंगते, सजते आणि मनापासून रमून जाते.

आयुष्याच्या संध्याकाळी मग तिला एकच गीत ऐकू येतं,

'रहे ना रहें हम, मेहेका करेंगे... बनके कली बनके सबा बाग़ ए वफ़ा में.....'


- कविता 
'माहोल'


परवाच 'दिवेलागण' या कविता संग्रहातील आरती प्रभूंची कविता ऐकली सलील कुलकर्णीच्या आवाजातील," कधी माझी कधी त्याची हि साउली , रेंगाळे माझिया चोरट्या पाउली".

यातीलच एक कडवं आहे,
" कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा , कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा,
 चारी डोळ्यातून दोघेही जगतो, दारी तोही कधी पणती लावतो , कधी माझी कधी त्याची हि साउली "....
 
तो चालला आणि माझ्या पायाचा ठसा उमटला, त्याची सावली पण माझ्यात अडकली ..  इतकं मिसळून जाणं म्हणजे प्रेम. अवलंबून असणं म्हणजे प्रेम, एकमेकांच्यात समरसून पुढे जाणं म्हणजे प्रेम ... या ओळी फक्त प्रियकर प्रेयसी बद्दल नाहीत तर प्रत्येकाने ऐकताना, आपला अर्थ आपण शोधायचाय... कोणाला 'आपला मुलगा आणि आपण' हे नातं सुद्धा सापडेल कदाचित या ओळीत...

"कविता ऐकताना प्रत्येकालाच आपला अर्थ सापडतो, शोधावा लागतो"... अजूनही हाच संदर्भ कुठंतरी डोक्यात रुतला होता ..

जसा 'माहोल' आहे तशी गाणी ऐकावी, असं मला नेहमी वाटतं. कधी तो माहोल मनाचा तर कधी आजूबाजूच्या वातावरणाचा, हाच काय तो फरक. आज एकंदरीत दोन्हीही माहोल जमून आले होते ... रात्रीची वेळ, कोपऱ्यात  तेवणाऱ्या  मेणबत्त्यांचा मंद उजेड, ती हवीहवीशी वाटणारी शांतता, बाहेर सुटलेला गार वारा, मोगऱ्याचा दरवळणारा सुवास .. आणि झोपाळ्यात बसून, आरामात डोळे मिटून, आवडीच्या गाण्यांच्या मैफिलीत रमलेली मी.... फक्त मी आणि माझी गाणी.

'फिर वही शाम वही गम वही तनहाई हें , दिल को समझाने तेरी याद चाली आई हें , फिर वही शाम' .... तलत मेहमूद यांचा आवाज आणि मदन मोहनजींचे शब्द. ' जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के न हो , जो अधुरी रही वो बात कभी हो के न हो ' ....  आयुष्यात निसटून गेलेल्या त्या क्षणांत, ती  'अधुरी' गोष्ट आज परत नव्याने दिसू लागली. आता परत कधीच भेट होणार नाही आणि मनातलं तुझ्याशी बोलताही येणार नाही.....

' आए तुम याद मुझे , गाने लगी हर धडकन '... साहिरजींचे शब्द आणि किशोरजींचा आवाज...
आठवणी ...  नेहमीच हुरहूर लावणाऱ्या. दिवसा पुसट होऊन संध्याकाळी गहिऱ्या होणाऱ्या. 'जब में रातोमें तारे गिनता हूँ , और तेरे कदमों कि आहट सुनता हूँ , लगे मुझे हर तारा, तेरा हि दर्पण '...... आजही तुझाच भास होतोय , त्या प्रत्येक ताऱ्यात मला फक्त तूच दिसते आहेस ....

'किसका रस्ता देखे , ए दिल ए सौदाई , मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई'... त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहून नकळत बाहेर पडणारा हळवेपणा ... तू परत फिरून येणार नाही तरीही पाहिलेली तुझी वाट . कित्येक दिवस सूर्यास्ताच्या वेळी , क्षितिजाकडे पाहून तुला घातलेली साद ... मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई...

'बिती ना बिताई रैना , बिऱहा कि जाई रैना , भिगी हुई अखियोंने लाख बुझाई रैना '.. गुलजारजींचे  शब्द आणि लताजींचा आवाज. ' भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए ' हि आर्तता खरंच आठवण करून देते 'तुझी' .. आजही त्या नावाने , त्या आवाजाने कोणीतरी हाक मारावी असं वाटतं. 'चाँद कि बिंदीवाली बिंदीवाली रतिया '... पाहून फक्त तू आठवतेस ....

'कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ कि दुल्हन बदन चुराए , चुपके से आए ... मेरे खयालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाये'... दिवसांना सुख दुःखाचे सोयर सुतक नसते. आपल्या आयुष्यातुन जाणाऱ्या कोणासाठीच ते थांबत नाहीत. विस्मरणात गेलेल्या आठवणी मग कित्येकदा डोळ्यातून बाहेर पडतात... " भर आई बैठे बैठे जब युं ही आँखे"... आपल्या मनातील ती सल फक्त आपल्यालाच ठाऊक असते ... "दिल जाने मेरे सारे भेद ये गेहेरे' ... हे सार काही आत कुठंतरी लपवून ठेवावंसं वाटतं...

'आपकी याद आती रही, रातभर ... चश्म-ए-नम , मुस्कुराती रही रातभर'.... किती आठवू आणि किती विसरू तुला.. प्रत्येक आठवणीत तू नव्याने भेटत राहतेस ....

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच आहे वास्तव, जे स्वीकाराव लागत. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने  होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....

आणि तरी सुद्धा, कितीही उदास वाटलं तरी मनांत एक आशा नक्कीच असते "जब भी ये दिल उदास होता हें , जाने कौन आसपास होता हें '.....  ती नाही तरीही ती आहे .. तिचा भास आहे .. ती इथेच आहे.

' दिवेलागण ' मधील कवितेचा संदर्भ डोक्यात होताच, प्रत्येकाला कवितेत आपापला अर्थ शोधायचा असतो..  मलाही आज , या माझ्या मैफिलीत तो सापडला ... वेगळा तरीही माझा ..

आज, या प्रत्येक गाण्यात मला आई दिसली .... आणि अजून एकदा, मी तिला खूप miss केलं ....

 

Friday, February 3, 2017

चॉकलेट हिरो

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर काही गोष्टी नकळत घडतात तर काही कराव्याशा वाटतात. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडाव आणि कोणी आपल्या, असं प्रत्येकालाच वाटतं .प्रत्यक्ष आयुष्यात खूप काही वेगळं घडतं आणि काही आठवणी नंतर मात्र फक्त 'एक आठवण' बनून, कुठेतरी मागे पडतात.

'ये बेकरारी क्यो हो रही हें, ये जानता हि नहीं , दिल हें के मानता नहीं ... ' आज हे ऐकताना त्या साऱ्या आठवणी परत एकदा समोर आल्या अन् एक क्षण हसू आलं..  तेव्हा किती समज होती माहित नाही पण आज विचार केल्यावर वाटतं, किती वेडे होतो आपण...  पण तस वेड होत ना म्हणूनच कदाचित या आठवणी पण आहेत .. वेड... चॉकलेट हिरोबरोबर गाण्यांमध्ये रमण्याच....

आपल्यासाठी कोणी तरी, ' मुझे निंद ना आये , मुझे चैन ना आए', म्हणावं.. आपली तारीफ ,' अदाऍ भी हें , मोहब्बत भी हें , नजाकत भी हें, मेरे मेहेबूब में ' अशा शब्दांत करावी. त्याच्या आठवणीत डोळे मिटून बसल कि त्याचेच शब्द कानी पडावे ,' ए मेरे हमसफर, एक जरा इंतजार , सून सदाऍ दे रही हें मंजिल प्यार कि ' ..

नवीन नवीन प्रेमात पडल्यावर, ' पेहेला नशा , पेहेला खुमार, नया प्यार हें नया इंतजार ' म्हणत त्याने आपली वाट पाहावी आणि आपण आल्यावर आपला हात हातांत घेऊन ' मेरे हात में तेरा हात हो , सारी जन्नते मेरे साथ हो '... म्हणत आपल्या डोळ्यात, पहात राहाव. अशाच एका रोमँटिक संध्याकाळी ' शरमो  हया के परदे गिरा के , करनी हें हमको खता ' म्हणत आपल्याला जवळ ओढावं .

त्याने न बोलताच त्याचे शब्द कानी पडावे, ' होशवालों को खबर क्या जिंदगी क्या चीझ हें, इष्क किजीए और समझिए जिंदगी क्या चीझ हें '..... तर कधी , 'हम लबॊ से केहे ना पायें उनसे हाले दिल कभी ,' अस म्हणत एकमेकांच्या मनातलं न सांगताच ओळखावं ....

आणि एकदा का आपण ' हमने घर छोडा हें , रसमों को तोडा हें ,' म्हणत त्याच्या बरोबर ' नयी दुनिया बसाएंगे' हे स्वप्न पाहिलं कि त्याने म्हणावं ,

'अधुरी साँस थी धडकन अधुरी थी अधुरे हम ,
 मगर अब चाँद पुरा हें फलक पे और पुरे हें हम'....