Saturday, August 5, 2017


पूर्व पुण्याई

माझ्या भावाला, केदारला चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली होती. कालच माझ्या मुलानी, कांतेयनी त्याच्या मामाला दोन्ही परीक्षांच्या गुण पत्रिका दाखवायला लावल्या कारण मामा पेक्षा आपल्याला मार्क जास्त मिळाले कि कमी हे त्याला पाहायचं होत. १९८८ आणि १९९१ सालातील त्या गुणपत्रिका पाहून खरंच खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

केदारचे कोणते मित्र परीक्षेला बसले होते, कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळाली यावर गप्पा झाल्या. शाळा सुटल्यावर शाळेत होणारा स्कॉलरशिपचा तास, सौ. देशपांडे आणि सौ.वैद्य बाईंनी घेतलेली मेहनत, क्लास सुटेपर्यंत बाहेर सर्व आयांची जमलेली मैफिल आणि याच मैफिलीने आईला दिलेली तीची जिवलग मैत्रीण, सारं काही आठवलं.

जून महिन्यात शाळा सुरु झाली कि स्कॉलरशिपचा निकाल यायचा. शाळेतील मुख्य प्रवेश द्वाराजवळील काळ्या फळ्यावर अतिशय सुरेख अक्षरांत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं जायचं, ' स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  हार्दिक  अभिनंदन !!' आणि त्याखाली लिहिलेली असायची यशस्वी मुलांची नावं. त्यामधे केदारच नाव वाचायला खूप मजा यायची, भारी वाटायचं.

आजही शाळेत त्या वेळी स्कॉलरशिप मिळालेल्या मुलांची नावं त्या काळच्या पद्धतीप्रमाणे लाकडी नोटीस बोर्डवर अजूनही रंगवलेली आहेत. आजही मी जेंव्हा जेंव्हा शाळेत जाते तेव्हा आवर्जून तो बोर्ड आणि त्यावरील नावं नक्की पहाते.

स्कॉलरशिपच्या दोन्ही परीक्षेला मी बसले नव्हते. पण कांतेयमुळे मला चौथी आणि आठवी दोन्ही वर्षी हा अनुभव खूप जवळून घेता आला. तो चौथीत गेल्यावर माझी आई नेहमी त्याला सांगायची स्कॉलरशिपला बस , खूप उपयोग होतो त्या परीक्षेचा, नाही मिळाली स्कॉलरशिप तरी चालेल पण परीक्षा दे .. माझ्यापेक्षा आजीचं प्रोत्साहन तसूभर जास्त होतं त्याला.

परीक्षा द्यायची ठरलं तेव्हा क्लास कोणता लावायचा हा प्रश्न होता. मी शाळेत असतांना ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने शिकायला मिळालं त्या सौ. देव बाई व सौ. कानडे बाई यांची बरेचदा आठवण यायची. त्याच वेळी माझी ओळख सौ दामले बाईंशी झाली. अतिशय प्रभावी, शिस्तप्रिय, कडक आणि आदरयुक्त भीती वाटेल असं व्यक्तिमत्व. त्या घरीच स्कॉलरशिप चे क्लास घेतं असत. 'हॉलमध्ये पंचवीस मुलं बसतात, शेवटचा बसला कि प्रवेश संपला', इतकी सोपी क्लास मधे प्रवेश घेण्याची त्यांची व्याख्या होती. स्कॉलरशिप च्या अभ्यासाची गोडी खऱ्या अर्थाने त्यांनीच लावली त्यामुळे सातवीत असतांना स्कॉलरशिप परीक्षा रद्द होऊनही वर्षभर कांतेय त्यांच्याकडे क्लासला जात होता.

पुढे स्कॉलरशिपची परीक्षा सातवीत न घेता आठवीत घेतली जाईल हा बदल झाला. तेव्हा दामले बाईंची तब्येत ठीक नसल्याने परत क्लासची शोधा शोध ..  माझी मैत्रीण कल्पनाने सौ. दांडेकर बाईंचा नंबर दिला. ती म्हणाली, "तू एकदा भेटून ये मग बोलू". मी खरं तर माझ्या देव बाई आणि कानडे बाई शोधायचे प्रत्येक शिक्षकामध्ये आणि दामले बाईंना भेटून मला माझ्याच बाई परत मिळाल्याचा आनंद झाला.

आई म्हणून आपण आपल्या मुलाला खूप छान ओळखतो, त्याची कुवत जाणतो. तो कुठे कमी पडतो हे सुद्धा आपल्याला ठाऊक असतं. ते मोकळेपणाने बाईंना सांगता यायला हवं. आई म्हणून वाटणारी काळजी, आपण आपल्या मुलाच्या अभ्यासात त्याला काय मदत करू शकतो याबद्दल उघडपणे बोलता यायला हवं."हि मुलं अशीच वागतात का हो ?", हा प्रश्न सुद्धा सहजपणे विचारता यायला हवा, असं मला नेहमी वाटायचं. हाच मोकळा  संवाद आमच्यात अतिशय छान जुळून आला.

क्लास सुटल्यावर कांतेयला आणायला गेलं कि इमारतीखाली क्लास मधील सर्व मुलांबरोबर गप्पा  मारणाऱ्या  दामले बाई दिसायच्या. सर्व मुलं जाईपर्यंत त्या स्वतः खाली थांबायच्या. एकटी जाणारी मुलं समोरचा रस्ता नीट ओलांडतायेत कि नाही यावर त्यांच लक्ष असायचं. कधी आई किंवा बाबाला यायला उशीर झाला तर त्या मुलाला एकट थांबायला लागू नये म्हणून त्याच्या सोबत त्याही थांबायच्या. मग अधून मधून त्यांच्याशी बोलणं व्हायचं. अभ्यासात कोठे कमी पडतोय, कशाची प्रॅक्टिस अजून करायला हवी अशी चर्चा व्हायची.आईच्या भूमिकेत असतांना मुलांची निरागसता एन्जॉय करता आली पाहिजे याबतीत त्या खूप आग्रही असायच्या. "अगं त्याचा धांदरटपणा , त्याच्या चेहऱ्यावरचे मिस्कील हसू एन्जॉय कर', असं हक्कानं फक्त त्यांनींच मला सांगितल आणि शिकवलं. मुलांच्या कलान घेतं, जिथे गरज आहे तिथे कान ओढून, समजावून, कौतुक करून, त्यांनी मुलांमध्ये अभ्यासाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी रुजवल्या.

परीक्षेच्या आधी एक/ दोन आठवडे पेपर सोडवण्यावर भर द्यायचा कारण जितका सराव करू तितक चांगलं हा कानमंत्र त्यांनी मुलांना दिला. पण अडलेल्या प्रश्नांचं काय ? यावर मुलं आणि दामले बाईंनी एक युक्ती काढली. जाण्या येण्याचा वेळ वाचावा आणि प्रश्नांचं समाधान सुद्धा व्हावं म्हणून व्हाट्सअँप चा एक ग्रुप काढला. रोज संध्याकाळी अडलेले प्रश्न ग्रुप वर टाकायचे , बाकी मुलांनी ते सोडवायचा प्रयत्न करायचा आणि जमलं नाही तर बाईंनी सांगायचं इतकं सोपं होतं सारं. रोज संध्याकाळी काही ठराविक वेळ अभ्यासाचा क्लास हा असा भरायचा. आई बाबा ऑफिस मधून घरी आले कि त्यांच्या मोबाईलचा मुलांनी केलेला हा वापर अतिशय सुखावह होता !

दामले बाईंनी मुलांना फक्त अभ्यासच शिकवला नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन चांगले संस्कार सुद्धा केले.  संध्याकाळच्या दोन तासाच्या क्लासच्या वेळांत पाच मिनिटांची सुटी असतांना तिन्हीसांजेला घरी म्हणतो तशी  शुभंकरोती म्हणणारी मुलं, मी फक्त याच क्लास मध्ये पाहिली. शिकवतांना शिक्षक म्हणून, संस्कार करतांना कधी आजी तर कधी आईच रूप घेऊन दामले बाईंनी मुलांना घडवलं म्हणण्यापेक्षा तयार केलं. मोबाईल हे माध्यम कशाप्रकारे वापरता येऊ शकतं हे अनुभवातून दाखवलं.

आजकाल दुर्मिळ होत चाललेले सौ दामले बाईंसारखे शिक्षक गवसले कि पूर्वपुण्याई वरचा विश्वास अजूनच ठाम होत जातो, हे मात्र नक्की !


- कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment