Thursday, April 20, 2017

प्रसंग - १
"अरे थांब, झालाच आहे डबा, भरू तर दे", असं म्हणत मी घाई घाई ने पोळी भाजीचा डबा भरून बाहेर आले तर तो आधीच खाली गेला होता. तशीच धावत जीना उतरु लागले तोवर गाडी सुरू केल्याचा आवाज आला आणि मी पळत पार्किंग मधे पोहोचेपर्यन्त त्याची गाडी गेट मधून बाहेर पड़ताना दिसली.
डब्यापेक्षा महत्वाच होत, हॉस्पिटल मधे पोहोचण कारण इमरजन्सी केस होती.

प्रसंग - २

"हॅलो, कुठे आहेस ? मी आले आहे, इथेच तुझ्या हॉस्पिटलच्या पोर्च मधे आहे, तूला आज येता येणार नाही म्हणून मीच आले ".. ससुन हॉस्पिटलच्या
आवारातून मी फ़ोन केला. कांतेयला घेवून आले आहे हे समजताच म्हणाला "थांब, आलोच".. कांतेय तेव्हा जेमतेम एक वर्षाचा होता. काही वेळातच तो आला आणि त्याच्या हॉस्टेल वर घेवून गेला. बी. जे. मेडिकलच्या त्या हॉस्टेल मधल्या त्याच्या रुमवर मी पहिल्यांदा गेले होते आणि तेहि त्याला राखी बांधायला..

प्रसंग - 3

" हॅलो, डॉक्टर आहेत का ?"  रात्रीचे 1.30 वाजले होते. वहिनीला फ़ोन दिला. आम्ही जागेच होतो. कालच संध्याकाळी आई गेली होती ... त्यामुळे त्या नंतर चे सर्व विधी करुन आवरायला एक वाजला होता. झोप कोणालाच येत नव्हती म्हणून बाहेर हॉल मधे बसलो होतो. मोबाइल ची बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणून लैंडलाइन वर फोन होता. फोन वर बोलून " हो, आलेच," अस म्हणून वहिनीने फ़ोन ठेवला. तिचे डोळे भरून आले, ती आत गेली. कपडे बदलून, आवरून, आपल्या
आयुष्यातील दुखः बाजूला ठेवून हॉस्पिटल मधे गेली तिच्या पेशंट करता.

हे तीनही प्रसंग माझ्याच आयुष्यातील. डॉक्टर घरात असतांना काय चित्र असतं, याची हि एक झलक. ज्या ज्या घरात डॉक्टर आहे तिथे थोड्या फार फरकाने चित्र हेच असत.

एकीकडे सरकारी आणि खाजगी कार्यालयात सहा महिन्यांची मैटर्निटी लिव्ह असतांना डिलीवरी नंतर सातव्या दिवशी आपल्या पेशंट करता हॉस्पिटल मधे जाणारी डॉक्टर,  मी माझ्या घरी पाहिली आहे.

कधीही फ़ोन उचलून बोलावस वाटल किंवा फक्त आठवण आली म्हणून फोन केला तर " सर आता ऑपरेशन थिएटर मधे आहेत , काही निरोप " असा मोबाइल वर रिप्लाई येतो, तेव्हा डोळ्यांत पाणी येत. कोणत्याही नात्याच्या आधी तो एक डॉक्टर असतो आणि हाच डॉक्टर जेव्हां सर्व प्रयत्न करूनही आपल्या आईला वाचवू शकत नाही तेव्हा आपल्या सारखाच एक माणूस असतो, त्या वरच्या पुढे नमणारा...

मागचा आठवडा गाजला तो 'डॉक्टरांचा संप ' या विषयाने. social networking site वर ज्या पद्धतीने messages share केले जात होते ते पाहून अनेक लोकांची किव करावीशी वाटली. विचार न करता ' फॉरवर्ड ' करणारी ' हि मानसिकता कोणत्या थराला जाते आहे हि विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

मागील एका लेखात मी लिहिल होत, 'मी हॉस्पिटलच्या आवारातील देऊळ मी खिड़कीतून रोज पाहायचे, तरीही देव मला इथे भेटायचा , वेगवेगळ्या डॉक्टरांच्या रूपांत'...

पण आज मात्र स्वतःच्या संरक्षणाकरता जेव्हां या डॉक्टरांना आवाज उठवावा लागतो त्या वेळी वाईट वाटून घेण्यापलीकडे काहीच उरत नाही....

- कविता

No comments:

Post a Comment