Saturday, August 19, 2017

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं, वोह शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब हें , बोले रे पपीहरा, मैने तेरे लिये हि सात रंग के सपने चुने, आपकी आँखो में कुछ मेहेके हुए से राज हें , छोटीसी कहानी से बारिशों के पानी से , ए जिंदगी गले लगा ले , दिल ढुंढता हे फिर वही फुरसत के रात दिन .... एका मागून एक आवडती गाणी लागत होती . 'थांब , हे  गाणं संपल्यावर जावू झोपायला' , 'अरे हे पण मस्त आहे' , 'आहा .. माझ फेवरेट गाण आहे हे' .. असं म्हणत प्रत्येक गाणं ऐकत गेले आणि रात्रीचे १० ते १२ असे दोन तास कसे गेले ते काही समजलं नाही. निमित्त होतं गुलजार यांच्या वाढदिवसाचं. काल ऑफिसला जाताना गाडीत रेडिओ वर, ऑफिस मध्ये काम करतांना कॉम्पुटरवर, घरी आल्यावर मोबाइल वर तर रात्री टी. व्ही.वर त्यांचीच गाणी सोबत होती; तरी अजून समाधान मात्र झालं नव्हतं.

गाणी ऐकायची माझी आवड तशी जुनीच. कॉलेज मध्ये असतांना हि आवड वेडेपणात परिवर्तित झाली होती. किशोरजी,लताजी, आशाजी, रफी साहेब , हेमंतकुमार , भूपेंद्र अशा गायकांच खूप छान collection होतं माझ्याकडे. तसंच आरडींच्या गाण्याची खुप ओढ असायची, अजूनही आहे. का ते माहित नाही पण संगीतकार म्हणून त्यांची गाणी मुद्दाम जेवढी ऐकली तेवढी कदाचित दुसऱ्या कोणत्याही संगीतकाराची आवर्जून जमा करून नाही ऐकली. पण जेंव्हा खऱ्या अर्थाने शब्द समजायला लागले, अर्थ आतवर पोचू लागले, बोचू लागले तेव्हा मात्र 'कोणी लिहिलंय हे गाणं' असे प्रश्न हि पडू लागले. 

मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचं कि कसं काय बरं त्या नायक आणि नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं  गीतकारांना शब्दांत मांडता येतं ? नायिकेचे भाव शब्दात उतरवणं किती अवघड ? अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीच मन , भावना समजून  त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ? आपण तर या बाबतीत किती श्रीमंत आणि नशीबवान आहोत कि साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, इंदिवर, आनंद बक्षी , हसरत जयपुरी, अंजान , शैलेंद्र , शकील बदायुनी, जावेद अख्तर आणि गुलजार असे कितीतरी गीतकार आपल्या सिनेसृष्टीला लाभले.

मध्यंतरी कौशल इनामदार यांनी 'कलागुज' हि कार्यशाळा घेतली होती पुण्यात, 'गाणं कसं ऐकायचं' यावर ..  श्रोते ते रसिक श्रोते हा एक प्रवास घडवला त्यांनी. सलग आठ तास कौशलजींना ऐकतांना त्यांनी शिकवलेल्या अनेक बारकाव्यांमुळे गाणी ऐकण्याची एक नवी दृष्टी / कान मिळाले. अमरप्रेम पासून अलीकडच्या बालगंधर्व पर्यंतचा तो सांगीतिक प्रवास खरंच संपूच नये असा होता.

त्या नंतर परत एकदा आवडणारी हि सर्व गाणी ऐकतांना खूप मजा आली, त्याच जुन्या गाण्यांशी नव्याने ओळख झाली जणू...

कोणता गीतकार आवडतो , असं जर कोणी विचारलं तर एक नाव सांगणं किती अवघड आहे पण तरीही ज्याच्या शब्दांची जादू नेहमीच भावली ते गीतकार म्हणजे गुलजारजी.

आपण नेहमी जी गाणी ऐकतो ती आपल्या favourite playlist मध्ये नेहमी तयार असतात. आर डी आणि गुलजार हे संपूर्ण कॉम्बिनेशनच माझ्या या लिस्ट मध्ये आहे . इजाजत, घर, मासूम, आंधी, खुशबू, गोलमाल, परिचय, किनारा यातील गाणी कितीही वेळा ऐकली तरी परत परत ऐकावीशी वाटतात, हृदयाला स्पर्शून जातात यांतच त्याची जादू आहे.

प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले , मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तर कधी  'बाहो में चले आओ ', म्हणत त्याची वाट अडवते. प्रेमात पडल्यावर "तुम आ गए हो , नूर आ गया हें" म्हणते तर कधी त्याची वाट पाहतांना ' ना, जिया लागे ना , तेरे बिना मेरा कहीं जिया sss लागेना ' म्हणते. तो समोर असला कि "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", म्हणत त्याच्या डोळ्यातील भाव वाचते. " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो.. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें..  बेहेने दो".. म्हणते तेंव्हा ते शब्द अगदी आरपार जातात. ११६ चांद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हें "म्हणते तेव्हा ती पतझड , ते 'मेरा वो सामान लौटा दो' असं आर्जव खूप लागतं , खोलवर.  त्याच्या विरहात ,' दो नैनो में आसूं भरे हेंsss  निंदिया कैसे समाए," असं म्हणून "जिंदगी तो काटी ये रात कट जाए " या शब्दांत तिची तगमग व्यक्त करते. प्रत्येक वेळी एका वेगळ्या रूपात ती भेटतच राहते.

त्यांच्या या सर्वच गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. त्यांचे भाव जणू कागदावर उतरावेत अशा ओळी गुलजार साहेबांनी लिहिल्या आहेत. मी एकदा वाचलं होतं ,गुलजार जी म्हणायचे कि "चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागत, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते , जगावी लागते."

त्यांनी गाणी लिहिली, कविता लिहिल्या, चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिले पण तरीही या सर्वांत एक गीतकार म्हणून ते जास्त भावले हे नक्की. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा गुलजारजी !!

No comments:

Post a Comment