इंजिनियर डे !!
शनिवारची सकाळ ... अगदी निवांत. शाळा नाही, ऑफिस नाही, डब्याची घाई नाही. आज याचं ऑफिस होत खरं पण डबा नव्हता त्यामुळे एकदम आरामात सर्व काही चालू होतं. सकाळी सकाळी नवऱ्याने चहा तयार म्हणून उठवाव, यापेक्षा छान दिवसाची सुरवात अजून काय असावी. चहा पिऊन, आवरुन तो ऑफिस ला निघाला तरी मी मात्र पेपर पसरुन वाचत होते. चहा झाला, पेपर वाचला, पुरवणी सुद्धा सगळी वाचून झाली. आता मात्र घड्याळाचे काटे मला पुढच्या कामाची सूचना देऊ लागले. शेवटी एकदाची उठले. कप विसळले, वॉशिंग मशीन सुरु केल, कांतेयला उठवल, नाश्ता तयार केला...परत एक कप चहा केला. कांतेय ला कॉफी करून दोघांनी गप्पा मारत नाश्ता केला. मग थोडा वेळ Whats App वर सगळे ग्रुप उठले आहेत कीं नाही ते चेक केलं. आता काय कराव हा विचार करत होते तर दारावरची बेल वाजली.
कांतेयनी दार उघड़ताच दोन वीस बावीस वर्षाची मुलं दारात उभी. त्यांच्या हातात ड्रिल मशीन आणि काही सामान होत. कांतेय नी काही विचारेपर्यंत ते घरात आले. गॅस पाईप च काम सोसायटी मधे सूरु असल्याने तेच काम करायला हे आले असणार असा विचार करेपर्यंत त्यांनीच आपणहुन सांगितल की ' गॅस पाईप का काम करने आये हैं।'
'अच्छा हुआ आप आए। अभी मैं वॉचमन को बताने हि वाली थी की आप को ढूंढकर भेज दे'। रोज ऑफिस मुळे हे काम राहतच होतं. आज घरी आहे तर हे काम करून घ्याव का नको; हा विचार करतच होते मी. इतक्यात घरकाम करणाऱ्या सविताची सुद्धा तेव्हाच एंट्री झाली. ती म्हणाली, 'ताई ते येवून गेले होते परवा, तुम्ही घरी नाही म्हणून मी काम करू दिल नाही. बर झाल असत तुम्हाला अदुगर विचारल असतं तर, मीच करुन घेतल असत. खुप कचरा होतो हे काम करतांना, माहित असतं तर मी तेव्हाच सर्व करुन घेतल असतं, तुम्ही येई पर्यंत साफ़ बी करुन ठेवल असत. आता बर झाल, माझ्या कामाच्या आधी आले हे. जल्दी जल्दी करो भैया।' मी काहिहि बोलायच्या आधी त्यांनीच सर्व काही ठरवल.मग आमची वरात स्वयंपाक घराकडे वळली.
'कहाँ लगाओगे पाईप ? ड्रील कहाँ पे करोगे ? पाईप कहाँ से आयेगा ?' या माझ्या प्रश्नांवर त्यांनी मला सर्व काही नीट समजावल. ओट्याच्या मागील भिंतीवर असणाऱ्या टाईल्स पूर्ण भिंती वर नसून वरच्या अंदाजे 2 फुट जागेवर नाहीत. गॅस साठी पाईप येण्याकरता त्यांनी सांगितलेली ड्रिल ची जागा टाईल्सवर असल्याने तिथे ड्रिल न करता एक फुट वरती भिंतीवर ड्रिल कराव, अस मी त्यांना समजावत होते.त्यावर 'नहीं नहीं, इधर ही ड्रिल करेंगे। उधर बीम हें।सब के यहाँ इधर ही ड्रिल किया हूँ।' अस उत्तर आल. 'अरे, बीम इस तरफ हे, मैं आपलो यहाँ बोल रही हूँ करने के लिए, आप बोल रहे हो ना उसके सिर्फ एक फिट ऊपर'..
'नहीं नहीं, पानी का पाईप टूट जायेगा उधर।' मला काही समजेना पाण्याचा पाईप तर तिथे नाहीए. 'अरे, भैया आप बोल रहे हों ना बस उसके थोडा ऊपर तो हें, वहाँ कहाँ हैं पानी का पाईप ?' 'अरे दिदी, नीचे के घर पर जाके देखो. सबके घर यहीं पे बिठाया हें '.. असं म्हणून त्याने मला, मी त्याच ऐकाव असं सांगितल. " रुको फिर, मैं आती हूँ देखकर," म्हणून खालच्या फ्लॅट मधे पाहुन आले.
मी परत आले. ' देखा न दिदी, झूठ थोड़े न बोले हें '... मी पण कबुल केल, 'हां भैया, ठीक हें आप कि बात. फिर भी ड्रिल करते समय टाईल् टूट गया तो?' त्यावर तो म्हणाला, ' उनका तोडा क्या, आपका कैसा तोड़ेंगे'.. तरीही माझी शंका होतीच, 'उनका नहीं टुटा मतलब हमारा भी नहीं टूटेगा क्या ? टुटा तो वो भी आप को लगाना पड़ेगा फिर'.मी सर्व जबाबदारी त्यांच्यावरच सोपवून दिली. ' अरे दिदी, रुको। हमारे इंजिनियर को बुलाएँगे अभी । आप जहाँ बोले हो वहा ड्रिल करना या नहीं उसका फैसला वह करेंगे, वो बोलेंगे तो सुनेंगे। आपका नहीं सुनेंगे। हम इधर ही ड्रिल करेंगे।' अस म्हणून त्यानी त्याच्या इंजिनियर ला फ़ोन लावला.
आता काय करायच, याचा फोन लागत नव्हता आणि लागला तरी त्याची महत्वाची मिटिंग होती त्यामुळे फोन घेईल कि नाही हि शंका होतीच. शेवटी ,बाजूच्या मैत्रिणीच्या घरी गेले, बेल वाजवली. तिचा नवराहि घरी नव्हता पण अजिंक्य , तिचा मुलगा होता. हुश्य , निदान तो तरी सापडला. नुकताच मेकेनिकल इंजिनियर ची पदवी फर्स्ट क्लास ने उत्तीर्ण झालेला. त्याला सांगितल, 'अरे चल जरा काम आहे, तो गॅस पाईप बसवायला आलाय, जरा बोल ना तू त्याच्याशी', त्यावर तो लगेच आला.
'लो भैया, ये भी इंजिनियर हें, इसको बताओ, मुझे जो कुछ नहीं समझता वो इसको समझेगा '. तो हसला, 'अरे दिदी'.. हि दिदी साक्षात् तिच्या इंजिनियरला आपल्या समोर उभ करेल असं वाटल नसाव त्यांना. मग दोघांच्या इंजीनियरिंग नॉलेज ची प्रचिती त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आली. शेवटी ' अग, मावशी तिथेच कराव लागेल ड्रिल जिथे तो म्हणतोय', असं अजिंक्यनी सांगताच मी शरणागती पत्करली. तरीही 'ड्रिल करते समय टाइल टुटा तो ', या शंकेवर मी कायम होते. 'दिदी, इंजिनियर नहीं भरेगा टाइल का पैसा, हमको देना पड़ेगा।' त्यावर 'चलो जाने दो,ध्यान से करो काम,नहीं टूटेगा टाइल' अस त्यांना धीर देत मी मलाच समजावल. कदाचित त्याला हुश् झाल असाव. अजिंक्य तिथेच होता आणि पाहतं होता जे काही ते करतायेत ते बरोबर आहे ना , कारण मावशीने ज्या पद्धतींनी बोलावलं होतं त्या प्रमाणे त्या वेळी फक्त त्याच्यावरच विश्वास होतां तिचा.
त्यानी सांगितलेली ड्रिलची जागा कशी योग्य आहे, हे जेव्हा पहिल्यांदा त्याने सांगितलं तेंव्हा मी त्याच ऐकल नाही याची सल अजूनही त्याला टोचत असावी बहुदा. शेवटी आपल मन मोकळ करुन तो म्हणालाच, 'दिदी, देखो, हम इंजिनियर नहीं हे पर उसका सब काम कर सकते हें। पढ़े नहीं ना, डिग्री नहीं हे हमारे पास , बस, इसलिए'... मी एकदम गप्प झाले, काय बोलू त्यावर.अगदी खर बोलत होता तो. मी म्हटल 'अरे भैया मैं पढ़कर भी कहाँ जान पायी आप क्या बोल रहे हों, इसीलिए मुझे आपली बात समझने के लिए इंजिनियर को बुलाना पड़ा , इसका मतलब आप भी इंजिनियर हो',अस म्हणताच तो हसला...
खऱ्या अर्थाने ' इंजिनियर डे ' च्या शुभेच्छा मी माझ्या समोर उभ्या असलेल्या दोन्ही इंजिनियर्स ना एक दिवस उशीरा का होईना पण मनापासून दिल्या होत्या..फरक फक्त डिग्रीचा होता !!!
- कविता
No comments:
Post a Comment