Friday, March 17, 2017



'खुद कि खोज में निकल,  तू किसलीए हताश हें
तू चल तेरे 'वजुद' कि, समय को भी तलाश  हें, समय को भी तलाश  हें '...

'पिंक' या सिनेमातील या ओळी.. तन्वीर गाझी चे शब्द आणि अमितजींचा आवाज ... एक स्त्री आणि तिचं अस्तित्व यावर लिहिलेल्या अतिशय समर्पक ओळी.

' वजुद ' म्हणजेच अस्तित्व.  एक स्त्री म्हणून समाजात तिने बनवलेली तिची प्रतिमा, कष्टाने निर्माण केलेली ओळख व याचबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक मुलगी, बहीण , प्रेयसी , बायको आणि आई म्हणून जगताना तिने भरलेले अनेक रंगच मग तिची ओळख बनतात.

'ती' येते तेच आनंद घेवून. ' मेरे घर आई एक नन्हीं परी , चांदनी के हसीन रथ पे सवार ' म्हणत तिचं स्वागत होत. नऊ महिन्यांचं अलवार नातं मग रूप घेतं. प्रेम, लळा , वात्सल्य , स्पर्श आणि आवाजाच्या कोंदणात ते रुजत, बहरतं. आईकडून येणारे संस्कार तिच्यावर कोरले जातात. आईचीच सावली होते तिची लेक. हि लेक, आईची जेवढी लाडकी तितकीच बाबांचीही, कदाचित तसूभर जास्तच. तिचं चिमुकल् रूप पाहून तो भारावून जातो,  "हाती घेता प्रथम तिला मी भारावून गेलो, क्षणांत ध्यानी माझ्या आले तात आता मी झालो", आयुष्यात त्याला मिळालेला हा आनंद, त्याच्या  शब्दातून आणि डोळ्यातून मग ओसंडून वाहू लागतो.

ऑफिसच्या कामात अडकलेला बाबा घरी उशीरा येवू लागतो, अगदी रात्री तिच्या झोपेच्या वेळी. मग तिच्यासाठी 'सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी ' म्हणत तिला जोजावतो , झोपवतो. आई मऊ मऊ दूध भात भरवत असली, चिऊ काऊच्या गोष्टी सांगत असली, आईचा दिवसभर सहवास मिळत असला, तरी उशिरा येणाऱ्या बाबाची, ती आतुरतेने वाट पाहत असते. त्यालाही तिच्याबरोबर चिमुकले खेळ मांडायचे असतात , काही खोडकर आठवणींचे ठसे त्या क्षणांवर मागे ठेवायचे असतात. लुटुपुटु उभं रहात तिनें टाकलेल पहिल पाऊल, डोळ्यात भरून ठेवायचं असतं, सार काही विसरून तिच्यासोबत फक्त हसायच असतं...

मुलगी म्हणून आई बाबांच्या आयुष्यात रंग भरता भरता,ती अजून एक नातं हळुवार जपत असते. म्हणूनच तो तिच्यासाठी, 'फुलोंका तारोंका सबका केहेना हें , एक हजारो में मेरी बेहेना हें, सारी उमर हमे संग रेहना हें ', असं  म्हणत असतो... कितीतरी लहान मोठ्या प्रसंगात त्या नात्याची वीण अगदी घट्ट होत जाते..  'जीवन के दुखों से यूं डरते नही हें, ऐसे बच के सच से गुजरते नहीं हें ' म्हणत तो तिला या जगाची हळूहळू ओळख करून देतो.  

असेच दिवस जातात आणि काही वर्षांनी, 'हातात बाळपोथी , ओठांत बाळभाषा , रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा ' म्हणणाऱ्या बाबाला मग एक दिवस, तिचं निसटलेल बालपणं दिसतं आणि प्रश्न पडतो , ' सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ' ? कुठेतरी तिच्या जगातून आपण हरवणार तर नाही हि भीती त्याला सतावू लागते......

सनईच्या सुरांत नवीन आयुष्याची सुरवात करताना ती, आपल घर, तिथल्या आठवणी, ते बालपण, ती भातुकली , ते गोळा केलेले रंगीत शिंपले, ते अंगण, आपले आई बाबा बहिण भाऊ, ते सवंगडी, सार काही सोडून जाते ... आई बाबांच्या डोळ्यांत आणि ओठात तिच्यासाठी तेंव्हा ,एकच 'आशिष' असतो, "जा आपल्या घरी तू , जा लाडके सुखाने "....

नवं घर, नवी सुरवात, नवीन माणसं यात जुळवून घेता घेता, ती नवीन आयुष्य सुरु करते. तिथे नव्याने रुजते . मग हळूच कुठेतरी " बडे अच्छे लगते हैं , ये धरती, ये नदिया, ये रैना और तुम " असं गुणगुणु लागते. 
सात पावल चालून ' तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा, मेरा साया ... ' म्हणत सावली सारखी त्याच्या सोबत राहते. तिच्याशिवाय त्याची अवस्था " ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं , हम क्या करे '...अशी होते .
'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं '...  या त्याच्या गोड हट्टाला ती लाजते ... त्याच्या विरहात
' नाsss , जिया लागे ना , तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना ', अशी आर्त साद घालते...  'अब तो हे तुमसे हर ख़ुशी अपनी, तुमपे मरना हैं , जिंदगी अपनी,' म्हणत स्वतःला विसरुन जाते.

मुलगी, बहीण, प्रेयसी, पत्नी असा प्रवास मग आई या नात्याशी पोहोचतो. त्या इवल्या नटखट कन्हैया करता मग ती यशोदा होते. ' ढुंढेरी अखिया, उसे चहू ओर, जाने कहाँ छुप गया,  नंदकिशॊर,' म्हणत ती परत एकदा आपलं बालपण जगते.

तिची जिद्द, कष्टाची तयारी, कणखरपणा , स्वावलंबन, प्रामाणिकपणा या गुणांमुळे ते  नातं, ती अगदी सहजपणे निभावून नेते. तिने पाहिलेली स्वप्नं सत्यात उतरवते , जणू  'किस माँ का ऐसा दुलारा हें तू, ' असा प्रश्न कोणालाही पडावा...

अशाप्रकारे प्रत्येक नात्याला तिने दिलेला अर्थ तिचं आयुष्य परिपूर्ण करतो. प्रत्येक नात्याला एक खास जागा असते तिच्या आयुष्यात.. नात्यांच्या या अनेक रंगात ती रंगते, सजते आणि मनापासून रमून जाते.

आयुष्याच्या संध्याकाळी मग तिला एकच गीत ऐकू येतं,

'रहे ना रहें हम, मेहेका करेंगे... बनके कली बनके सबा बाग़ ए वफ़ा में.....'


- कविता 

No comments:

Post a Comment