Thursday, August 24, 2023


शब्द सुद्धा पेलू शकत नाहीत मनातलं कधीकधी, 
तेव्हा डोळ्यातून मूकपणे वाहून जातं सारं, निःशब्दपणे.. 

कौतुक करायला हक्काचे मायबाप नसले ना 
की सलत राहतं गर्दीत मागे उरलेलं पोरकेपण, बाभळीसारखं ..

कितीही आव आणून उसनं हसू गोळा केलं तरी 
मुखवट्यामागचा चेहरा समोर येतो, आरशातल्या प्रतिबिंबासारखा..  

कितीही उन्हाळे पावसाळे बघितले तरी आजही 
उन्हाचा चटका बसतोच, वैशाखातील वणव्यासारखा...  


नवीन वर्ष, नवीन संकल्प, नवी सुरवात ..  
पण मी मात्र एक Pause घेऊन blank होते, दरवर्षी अशीच..
झगमगत्या दिव्यांमधे काही अंधारे कोपरे नव्याने सलू लागतात..
माझ्या कवितांमधून, माझ्या डायरीमधून डोकावणारी 'ती' अगदी आतून मग आठवत राहते..
याच दिवशी तर माझा हात सोडला होता तिने.. 
तिला वाटलं, जमतंय सगळं मला; 
अडणार नाही काही, तिच्यावाचून आता.. 
पण त्या दिवसापासून अस्वस्थतेशी लढा सुरूच आहे माझा..
आजही वाटतं म्हणावं देवाला,पाठव ना काही वेळा करता तरी तिला..
घरातल्या साडीतलं तिचं देखणं रूप डोळ्यात साठवू दे, 
देव्हाऱ्यातल्या दिव्याच्या उजेडात तिला डोळेभरून पाहू दे, 
आमची दृष्ट काढताना तिला पाहून मन जरा आश्वस्थ होऊ दे,
तिच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ निजताना मायेचा स्पर्श होऊ दे..
फार काही मागत नाही देवा पण 
तिच्या हातचा मऊ आमटी भात परत एकदा चाखू दे, 
रव्याचा नारळ घालून तिने केलेला खमंग लाडू डोळे मिटून खाऊ दे..
इवले इवले आनंदाचे हे क्षण 
दूरवर कधीच हरवलेत.. 
'जगायास तेव्हा खरा अर्थ होता
मनाला किती शुभ्र वाटायचे'.. 
अगदी सौमित्रच्या कवितेसारखं झालंय..
'निरार्थास ही अर्थ भेटायचे' !


वही बलखाती चाल 
वही हाथों में कंगन 
बालो का जूडा 
यूं लेहेराती हुई साडी 
चेहरे पर गुरुर और आंखों में नमी 
कुछ ऐसे ही सोचा था मैंने 
मेरे सोच कि, मेरे दिल कि तसवीर 
कुछ यूही सवारी थी मैने 
आज फिर उसी याद से 
मुलाकात हो गई 
वही पुरानी बात
आज फिर याद आ गयी 
आज भी संभालकर रखे है मैने
कुछ अधूरे पल 
पल भर कि कुछ यादें 
मोगरे कि खुशबू में लिपटी 
उस नीली खामोश शाम को  
जब बिना बोले आँखों से 
जो कुछ कहा था तुमने 
आज भी याद करता हूँ 
लगता है आज भी उस पल को 
कई बार जीता हूँ 
आज भी उस पल को 
कई बार जीता हूँ 

 रॉकी और रानी आणि पैज 


सध्या अधिक महिन्यामुळे सगळेच सासू सासरे आणि जावई कौतुक करण्यात आणि कौतुक करून घेण्यात busy आहेत. अर्थात जोडीनं नवऱ्याच्या सासरी जाऊन लाड करून घेण्यात भलती मजा येते. रविवारी याच कारणाने जमलं नाही म्हणून आमचं friendship day celebration आम्ही एक दिवस उशिरा ठरवलं. आमचा उत्साह इतका दांडगा की सोमवारी ऑफिस नंतर 'movie आणि dinner' असा बेत केला. कोथरूडच्या जवळपास राहण्याचा एक फायदा आहे की करिष्मा चौकाच्या एका किलोमीटर परिघात हे सगळं सहज शक्य होतं. केजो चा 'रॉकी और रानी कि लव्ह स्टोरी' हा सिनेमा आणि आमचं celebration हे परफेक्ट combination होतं. 'Oppenheimer' आणि 'बाई पण देगा देवा' हे दोन वेगवेगळ्या ध्रुवांवरचे कमाल चित्रपट आधीच  बघून झाले होते. मग काय ऑफिस करून सातच्या शोला पावणेसातच्या ठोक्याला पोहोचले. सध्या सिटी pride चं  रुपडं इतकं बदललंय कि तिथे PVR वगैरेला गेल्याचा फील येतो. सगळ्या जणी वेळेत पोहोचलो. 'ऑफिस मधून डायरेक्ट आल्यावर भूक लागते ग', असं म्हणत सामोसा, पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक अशी जय्यत तयारी करून उभ्या असलेल्या मैत्रिणींना पाहून ' इस दोस्ती पे नाज आ गया' ..  अगदी असं झालं.. 
इतक्यात लक्षांत आलं, एक महत्वाचा फोन करायचा होता तो लावला. "कांतेय अरे मी सिनेमाला आले आहे, घरी गेले की फोन करते"... "आई sss , मग आत्ता कशाला फोन केलास" .. "अरे, तुला सांगायला, म्हणजे रोजच्या वेळेला न बोलता, रात्री बोलू"....... " बरं .. कोणता सिनेमा आहे?"... " रॉकी और रानी की लव्ह स्टोरी".. हे नाव ऐकताच 'आई अगं रॉकी अँड रानी ? बिघडलीस तू.. तुझा दर्जा घसरत चाललाय'..  अशी टिप्पणी पण मिळाली. असो ... आता पुढे सगळं लक्ष सिनेमात असणार होतं. 
थोडा सामोसा पोटात गेल्यावर, तोंडाची जरा वाफ दवडल्यावर काही वेळाने आजूबाजूला लक्ष गेलं तर समोर साक्षांत जब्बार पटेल सर उभे होते, कॉफी घेत शांतपणे. एक क्षण विश्वासच बसला नाही पण ते तेच होते. त्यांना पाहून ग्रुप मध्ये कुजबुज सुरु झाली. माझ्या एका मैत्रिणीला खात्री नव्हती कि ते तेच आहेत. प्रत्यक्ष बघणं आणि फोटो किंवा TV वर बघणं यात फरक असतो हे मान्य पण तिला काही केल्या ते जब्बार पटेल सर आहेत असं वाटत नव्हतं. बरं ते आपल्यासारखं 'रॉकी और रानी कि लव्ह स्टोरी' ला कसे काय येतील हे तिचं म्हणणं पण पटत होतं. तरी ते दिसत तर तसेच होते ना..शेवटी मी म्हटलं तिला,'चल पैज लावू', तर तिने चक्क शंभर रूपयांची पैज लावली. आता ते तेच आहेत हे सिद्ध करायचं होतं. पण असं जाऊन कसं विचारणार.. आता काय करावं असा विचार करेपर्यंत सिनेमाची वेळ झाली.. ते स्क्रीन वन कडे जायला लागले, मागून आम्ही. डोअरकीपरशी काही बोलून ते आत गेले.  
विशीतला, बारीक चण, कपाळावर बुक्क्याचं  बोट, असा तो चुणचुणीत डोअरकीपर पाहून मला सुचलं काय करायचं ते. मी त्यालाच विचारलं,"हे जब्बार पटेल सर आहेत ना?".. "हो, मला पण वाटतंय तसं"..  "वाटतंय ? कसं काय ? तुला तर माहित हवं ?"... "नक्की नाही सांगता येत".. "दादा, मी पैज लावलीये शंभर रुपयांची, हवं तर पन्नास देते तुला, जरा विचार ना कोणाला तरी".. मी असं म्हणताच त्याने एक pause घेत माझ्याकडे पाहिलं. तोवर आम्ही दोघं उभं असलेल्या जागेवरून पुढे, दुसऱ्या ओळीत सर बसत होते याकडे आमचं दोघांचही लक्ष गेलं. त्या क्षणी तो पठ्या समोर गेला आणि त्यांच्याशी काहीतरी बोलून क्षणार्धात परत आला आणि म्हणाला "हो, ते तेच आहेत" ... मी थक्क झाले, डायरेक्ट त्यांनाच जाऊन विचारलं .. आणि आता मी काय बोलणार याची तो खूप कुतूहलाने वाट बघू लागला.. माझी तर बोलती बंद झाली. जागेकडे जातां जाता कसं बसं म्हटलं मी त्याला " देणार, मला शंभर मिळाले कि तुला पन्नास नक्की देणार".. आणि मी गपचूप आपल्या जागेवर जाऊन बसले. आमचे ते संभाषण मैत्रिणींना सांगताच जोरदार हशा पिकला.. आता पुढच्या वेळी सिनेमाला जाताना पन्नास ची नोट नक्की घेऊन जाणार. 


Friday, July 28, 2023

 फिर वही रात है..


किशोरदांचा आवाज, पंचमदांचं संगीत व गुलझारसाहेबांचे शब्द .. या त्रिकुटाने दिलेल्या अनेक चिरतरुण गाण्यांपैकी एक. हे गाणं ज्या situation वर चित्रपटांत येतं तेव्हाचे भाव, अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतात या गाण्यातून. 'घर' या चित्रपटातील हे गीत पडद्यावर साकारलंय विनोद मेहेरा व रेखा यांनी. हे गाणं ऐकतांना पाणवणारे डोळे, पडद्यावर ते बघतांना कधी झरझर वाहू लागतात कळतंच नाही. 

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्याच विश्वात हरवलेले, रमलेले विकास आणि आरती. एक दिवस रात्री चित्रपट पाहून परत येत असतांना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्या आघाताने आरती मुळापासून कोसळते. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा तिचं जगणं अवघड करतात. आरतीची भूमिका प्रचंड ताकतीने साकारणारी रेखा आपल्याला ही अस्वस्थ करते. मनोमन उध्वस्त झालेलं, खचलेलं तिचं रूप विकास पाहू शकत नाही आणि मग सुरू होते त्याची केविलवाणी धडपड, तिला परत आपल्या जगात आणण्याची. जिच्यावर प्रेम केलं ती आरती त्याला परत हवी आहे. आपण तिला वाचवू शकलो नाही हि अपराधीपणाची भावना त्यालाही पोखरते आहे पण आरतीला सावरणं जास्त महत्वाचं आहे. विकासची हि भूमिका समर्थपणे साकारली आहे विनोद मेहरा यांनी. पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सर्व गाण्यांमधलं हे सर्वोत्तम गाणं असावं. 

हजारो छटा घेऊन येतात गाण्यातील हे शब्द. आरतीला समजावत, थोपटून झोपवणारा, तिला पांघरूण घालणारा 'तो' अजूनच देखणा वाटतो. त्याच्या डोळ्यांत, त्याच्या स्पर्शात ती काळजी दिसते. अजूनही मी तुझ्या सोबतच आहे असं आश्वस्त करणारा भाव आणि शब्द .. गुलजार आणि ख्वाब हि कमाल chemistry दिसते या गाण्यात. इथे प्रसंगानुरूप स्वप्नांना त्यांनी 'काच के ख्वाब' म्हटलं आहे. गुलजा साहेबांचं हेच वैशिष्ठ्य आहे, कमी शब्दांत प्रचंड काही तरी सांगून जातात. किशोरदांचा आवाज कमालीचा उत्कट होतो.. एका विलक्षण प्रेमाची हळुवार गोष्ट आहे या गाण्यात... "फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब कि .. रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे , फिर वही, रात है "... 

 The Land of high passes – लडाख


कारगिल युद्धाच्या वेळी पहिल्यांदा कारगिल, द्रास या भागाविषयी ऐकलं होतं. तेव्हा भौगोलिक दृष्ट्या हा भाग कसा महत्वाचा आहे ते समजलं. मग कितीतरी वेळा अनेकांच्या शब्दांतून, गोष्टींमधून, डोळ्यातून कारगिल चं रूप नजरेसमोर उभं राहात गेलं. प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात 'कारगिल विजय दिवस' साजरा करतांना तिथे प्रत्यक्ष जाण्याची इच्छा दृढ होत गेली. अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास ज्या भूमीवर लिहिला गेला त्या वीर भूमीवर, नतमस्तक होताना जाणवलं, "जिंदगी ना मिलेगी दोबारा" चा खरा अर्थ फक्त या वीरांनाच समजला होता म्हणून तर "I only regret that I have but one life to lay down for my country" असं ते म्हणू शकले. 

'Travel changes you. As you move through this life and this world, you change things slightly, you leave marks behind, however small. And in return life and travel leaves marks on you'.. its so true .. 
इथे फिरताना आम्हाला भेटलेले ड्रायव्हर, हॉटेल मध्ये काम करणारी मंडळी, लोकल मार्केट मधले दुकानदार यांच्याशी बोलतांना समजलं या सामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यातील अडचणी खूप वेगळ्या आहेत तरी सुद्धा त्यांचं जगण्यातलं समाधान, आनंद, कष्टाची तयारी, माणुसकी आणि कामाबद्दल असणारा प्रचंड आदर खरंच कौतुकास्पद आहे. Border Road Organisation ची इतक्या प्रतिकूल हवामानात अविरत काम करणारी माणसं व स्त्रिया पाहून थक्क व्हायला होतं. जोजिला टनेल या ११५७५ ft उंचीवरील, साधारण १४ किलोमीटर लांबीच्या, U  आकारातील, काश्मीर मधील गंदरबाल ते कारगिल जवळील द्रास ला जोडणाऱ्या दुहेरी रस्त्याचे सुरू असलेले काम पाहून खरंच अभिमान वाटतो (थंडीत बर्फ वृष्टीमुळे सध्याचे रस्ते पाच/ सहा महिने बंद असतात) 

Three idiots चित्रपटात आपण लेह लडाखचं नितळ, पारदर्शी, देखणं, लोभस रूप पाहिलं ज्याने कितीतरी जणांना इथं येण्यासाठी प्रवृत्त केलं, हळूहळू पर्यटनाला चालना मिळाली. येथील निसर्गाची किमया पाहून अक्षरशः वेड लागतं, किती आणि काय काय नजरेत साठवावं असं होतं.. सोबत, इथली माणसं कळत नकळत आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत कसं जगायचं याचा धडा देतात. 

लेह शहराच्या पश्चिमेला सूर्यास्ताच्या वेळी खुणावणारा; उंच डोंगरावरील शांती स्तूप, पूर्वेकडील माती आणि दगडापासून उभा असलेला ५०० वर्षांपूर्वीचा भव्य नऊ मजली राजवाडा, चहू बाजूला चमकणाऱ्या बर्फाच्छादित पर्वत रांगा, रंगबिरंगी वस्तुंनी, आकर्षक रंगामध्ये सजलेलं शहरातील मार्केट, hot spring, रँचो school ही येथील खास आकर्षणं. हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, सर्वकडे सोबत करणारे नद्यांचे खळाळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवाई, तलावांचे पारदर्शी निळे पाणी, खोल दर्‍या, रोमांचकारी अनुभव देणारे वळणावळणांचे रस्ते, वेगवेगळ्या रंगांमधले उंचच उंच पहाड, आणि सभोवतालचा बर्फ बघतांना आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. एक विलक्षण शांतीचा अनुभव मिळतो इथे. बौध्द धर्माच्या पगड्यामुळे या प्रदेशाला अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. इथल्या monestry पाहणं हा अजून एक खास अनुभव. सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम, पँगोंग लेक, नुब्रा vally, Changla pass, Khardungla pass, Zoji la pass या ठिकाणी कमालीच्या बोचऱ्या थंडीची झलक मिळते. 'पुणेकर थंडीने गारठले'अशी आठ /दहा डिग्रीत बातमी वाचणारे आपण इथल्या थंडीचे आकडे वाचून थक्क होतो. इथलं आजवरचं सर्वात कमी temp -६० होतं, १९९५ मध्ये !

आपल्या सीमेवरील तुरतुक तसेच हुंदरमान गावातील भेटीचा अनुभव एकदम वेगळा होता. १९७१ च्या युद्धानंतर पलीकडे गेलेल्या लोकांचं रिकामं गाव.. आजही त्यांची ओस घरं, तेथील सामान तसंच आहे. पन्नास वर्षे होऊन गेली तरी तिथल्या खुणा, आजही गोष्ट सांगतात एका रात्रीत बदललेल्या कित्येक आयुष्यांची !
 
निसर्गाची अनमोल देणगी असलेला हा प्रदेश भौगोलिक, राजकीय, ऐतिहासिक दृष्ट्या कितीतरी महत्वाचा आहे. इथली श्रीमंती अनुभवणं आणि डोळ्यांत साठवणं याकरता इथे एकदा तरी नक्की यायलाच पाहिजे. पण आल्यावर वाटतं, एका भेटीत मन भरलंच नाही !

©कविता सहस्रबुद्धे

 शुक्रवारी किंवा शनिवारी डिनर डेट वर गेलं कीच रोमँटिक couple's दिसतात असं नाही तर रविवारी भाजी मंडईत सुद्धा गोड जोड्यांची व्हरायटी बघायला मिळते. अर्थात इथला गोडवा वेगळा असतो. रविवारी आम्ही दोघं भाजी आणायला गेलो होतो, नेहमीपेक्षा थोडं लवकर. फारशी गर्दी नव्हती. बरं जोडीनं गेलो म्हणजे भाजीच्या पिशव्या पकडायला किंवा 'बरेच दिवसांत ही भाजी नाही बनवलीस ही घे' असं म्हणायला किंवा 'तू भाजी घेई पर्यंत मी फळं घेतो' असं म्हणायला हा सोबत नसतोच. माझी आठवडाभर लागणारी भाजी, फळं, अंडी, तर कधीतरी पॅटिस घेऊन होईपर्यंत तो आपला 'फोटोग्राफी' मध्ये रमलेला असतो. बरं, इथे subject ची तशीही काही कमी नसते, मस्त variety असते .. टोपलीभर छान रचून ठेवलेले लाल बुंद टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, कोबी, पावटा, गवार, श्रावण घेवडा, पालक, मेथी, पुदिना, माठ, नवलकोल, चवळई अशा वेगवेगळ्या भाज्यांनी ओसंडून वाहणारे भाजीचे ठेले चहुबाजूनी खुणावत असतात. हिरवी लाल पिवळी ढोबळी मिरची, लेट्युस, ब्रोकोली, कॉर्न च्या सोबतीला सध्यातर कर्टुली सारख्या रानभाज्या पण आहेत. मग काय, कॅमेऱ्यातील मोड बदलून, लॉन्ग शॉर्ट, close up असे बहुढंगी बहुरंगी फोटो काढण्यात आमचे 'अहो' हरवून जातात. बरं एकाच ठेल्या वरच्या वेगवेगळ्या भाज्यांचा फोटो काढला तर बाकीच्यांवर अन्याय नाही का होणार मग काय इकडचे टोमॅटो, बाजूची वेगवेगळ्या कडधान्यांची मोडावलेली रूपं, तिकडच्या भुईमुगाच्या शेंगा, समोरच्या जर्द जांभळाच्या टोपल्या, काश्मीर वरून आलेली लाल चुटुक सफरचंद पटापट कॅमेऱ्यात कैद होत असतात. जिथे फोटो घेताना थोडं जास्त घुटमळायला होतं तिथे ते दुकान सांभाळणाऱ्या चार टाळक्यातला एक जण काम सोडून फोटो बघायला येतो आणि 'माझी भाजी किती छान दिसते आहे ना फोटोत', या आविर्भावात कमालीचा सुखावतो. बरं इतकंच नाही तर 'सर, मी काढतो ना फोटो तो असा नाही येत', असं कोणी म्हटलं कि त्याला solution पण मिळतं. त्यामुळे मी तिथे 'एक सामान्य ग्राहक' असते आणि त्याचा तर भावच वेगळा असतो. आज काल तर सोमवार ते शुक्रवार भाजीचे फोटो WA वर येतात .. आमचा भाजीवाला पाठवतो, का तर म्हणे रोज काय काय available आहे ते समजायला आणि यातलं काही हवं आहे का ते विचारायला. बरं रविवारी इतकी भाजी घेतलीये मग कशाला लागतंय काही अधे मध्ये पण नाही. असं वाटतं त्याला WA वर सांगावं, 'अरे साहेबांचा नंबर देते, त्यांना पाठव फोटो, ते सांगतील काय हवं ते'..


तर मी काय सांगत होते हां, मंडईत रविवारी सकाळी दिसणाऱ्या गोड जोड्यांबद्दल.. तर झालं काय, रविवारी मी ठरलेल्या दुकानांत गेले भाजी घ्यायला तर तिथे एक आजी आजोबा भाजी घेत होते.आजी एकदम टिपिकल, कॉटनची छान काठा पदराची साडी, मानेवर छोटासा आंबाडा, त्यावर चाफ्याची दोन फुलं, एका हातात काठी .. तर आजोबा पांढरा स्वच्छ कुर्ता पायजमा, सोनेरी काड्यांचा चष्मा अशा पेहेरावात होते. त्यांच्या एका हातात भाजी घ्यायला पसरट बास्केट होती आणि त्यात ते निवडून निवडून काकडी टाकत होते. मी एक क्षण बघितलं, मनांत म्हटलं 'वाह यार, किती गोड, या वयात सुद्धा किती उत्साहाने भाजी घेतायेत दोघं'….. मग दुसऱ्या क्षणी दिसलं आजोबा एक एक काकडी निवडून ती बास्केट मध्ये ठेवत होते आणि आजी, आजोबांनी निवडलेली ती काकडी कशी बरोबर नाही हे सांगत ती काकडी परत टोपलीत टाकत होत्या. तीच गत पुढे टोमॅटोची .. 'अहो, हा पहा, हा कसा आहे टोमॅटो तसे घ्यायचे. हा नको'... ओह गॉड, म्हणजे पंचवीस वर्षात जे आमच्याकडे जमलं नाहीये ते इथे पन्नास वर्षांनंतर सुद्धा जमलं नव्हतं तर.. एकूण काय हे नातं कितीही गोड असलं, मुरलेलं असलं तरी काही front वरती मात्र हा गोडवा सारखाच असतो हे मात्र खरं !

© कविता सहस्रबुद्धे

 कारगिल विजय दिवस


अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतों का,
श्रेष्ठत्व के विवाद पर
साथ छोडा एक दूसरे का..
'इन पाँचो से भी शक्तिशाली 
है कोई इस दुनिया में?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें,
"हे भगवन्, इन पाँचो के सामने 
हमारा एकमात्र हि काफी है;
वह आगसे भी प्रखर है,
तुफ़ानोंसे भी तेज है,
पानीसे गतिमान, धरती से सहिष्णु 
और व्योम से भी उंचा है...
वह हमारी आन है , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !"
सर्वश्रेष्ठ होकर भी 
वह किसी विवाद में नहीं उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए 
वह हमारा 'आज' है गवाँता,
गर्व है तुम पर, नाज है तुम पर, 
तुम पर है अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित 
हमारा कोटी कोटी प्रणाम !!
- अनुराधा प्रभुदेसाई

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणारा, ५० डिग्री ते -६० (कारगिल जवळ द्रास येथे १९९५ मध्ये नोंद आहे) डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा आपला सैनिक..केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना है,  बाकी आसान है " इतक्या सोप्या करून लढणारा सैनिक... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक..
कोणत्याही गोष्टीसाठी 'रिटेक' ची अनुमती नसलेला सैनिक....

आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम, हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे, पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. 

"एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे; तर, "आई, आत्ताच मी ट्रेनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद आहे सारं. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही.. प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं उणे ३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल... कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया ..."जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा खरा अर्थ बहुदा यांनाच समजला असावा.

आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी  ऐकल्यावर काही ओळी आठवल्या, जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या .. 
" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम, 
नजर में ख़्वाबोंकि बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम "...

मिशन वर जायच्या आधी हा सैनिक पत्र लिहून आपल्या पेटीमध्ये ठेवतो. जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो..  असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कॉफिन खूप जड असतं, ते का याचा अर्थ कारगिलच्या वीरभूमीवर उभं असताना उलगडत होता.  

कर्नल धर्मदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर, दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करताना डोळयांदेखत बुटासकट उडालेला स्वतःचा डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून,पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं. प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर तो पाय कापावा लागला.. अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारत होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे अजून', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे त्यांचं वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास,पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून जातो.

मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर, १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टरमधे ठेवायला हवामान व उंचीवरील जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद..... "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय, वजन उचलायला त्रास होतोय अशा ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना शेवटचा सॅल्यूट ठोकला ...'व्हेन गोइंग गेट्स टफ, द टफ गेट्स गोइंग'...

सैनिकाची खरी ओळख करून देणाऱ्या या गोष्टी.. आपल्यासारखाच तो सुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा, बाबा असतो पण सर्वात आधी तो एक सैनिक असतो. 

"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकाच्या अत्युच्य बलिदानाला, उच्च मनोबलाला, दैदिप्यमान त्यागाला त्रिवार सलाम !

© कविता सहस्रबुद्धे

Wednesday, June 28, 2023

 मुसळधार पावसांत छत्री सांभाळत ऑफीसच्या बाहेर पडले. डोंगरावर ऑफिस असल्याने इथल्या पावसाची बॅटिंग कायमच धुवांधार असते. हलक्या सरी, रिपरिप सारखे शब्द या पावसाला बिलकुल माहितीच नाहीत. तर झालं काय, एकीकडे छत्री, दुसरीकडे ऑफिसची बॅग, वाऱ्याने उडणारी ओढणी हे सगळं सांभाळत ऑफिसच्या बस स्टॉप वर पोहोचले कशीबशी तर माझा collegue म्हणतो, "या मॅडम पुण्याच्या आहेत पण 'पुणेरी' नाहीत पण यांची छत्री बघा, केवढी पुणेरी आहे"? .. हे ऐकून मी एकदा त्याच्याकडे आणि एकदा माझ्या छत्रीकडे पाहिलं. बरं तो इतक्या मोठ्यांदा बोलला कि सगळे बघायला लागले. मी तरी म्हटलं त्याला, "अरे माणसं पुणेरी असतात छत्री कधीपासून पुणेरी झाली?'.. त्यावर मोठ्यांदा हसून म्हणतो,"अग छत्री बघ जरा तुझी, केवडिश्शी आहे.. समजा कोणी छत्री विसरलं आणायला तर या छत्रीकडे पाहून हिम्मत पण करणार नाही तुला विचारायची,येऊ का छत्रीत म्हणून ".. आता त्याला काय सांगणार जपानवरून आणली आहे ही छत्री एका मित्राने म्हणून.. पुणेरी नाही जपानी आहे ! आता कोणता मित्र चेरापुंजीला जातोय ते बघायला हवं ...

Thursday, May 25, 2023

 कुछ कहानियाँ कुछ कवितायें आपके अकेलेपन में साथ होती है 

उस वक्त़ जब आप भीड़ से परे अपने साथ होते है ...

किसीके दूर जाने से पता चलता है पास होने का सही अर्थ,

तब तब वो कविता कहानियाँ उस पुरे खालीपन को भर देती है…. 

मेरे लिए वो कविता, कहानी, वो नज़्म और गझ़ल कुछ खास है 

क्यो की उसमें छिपी मासुमियत किसी के होने का सबूत है...

लोग केहेते है गझल में दिल की बात छिपी होती है, 

मेरी छोटी सी ये नज़्म जिंदगी की खुबसुरती बयाँ करती है !!


- कविता सहस्रबुद्धे

 पोस्टकार्ड 

दहावी बारावीच्या परीक्षा​ सुरु आहेत. एकूणच बारावीचं ते टेन्शन पाहून आपण आणि आपली मुलं यातून सुटल्याचा आनंद ​​फार म्हणजे फारच अवर्णनीय असल्याचा फील येतोय सध्या.आता घरातली चिमणी पाखरं मोठी झाली आणि घरट्यातून उडून गेली आपलं जग शोधायला .. सतत आपल्या आजूबाजूला लुडबुड करणारी, मध्ये मध्ये घुटमळणारी त्यांची आपल्याला झालेली सवय आता आठवत राहते. तरी आठवण आली की फोन मुळे ही अंतरं काही प्रमाणात का होईना लहान होतात. 'जेवलास का? काय जेवलास आज ? लवकर झोपावं रे रात्री, वेळेवर पोचतोस ना कॉलेजला', अशा सूचना, चौकशांनी सुरू झालेला फोन मग रंगत जातो. 'you need to work on this mom, किती टोकत असतेस', असं appraisal चं फील देणारं वाक्य सुद्धा ऐकावं लागतं कधी कधी. त्यावर माझं ठरलेलं वाक्य, 'अरे आईच आहे जिला हा जन्मसिद्ध अधिकार आहे टोकण्याचा'.. 

आता कालचीच मजा, चक्क चक्क एक पोस्ट कार्ड आलंफोटो पोस्ट कार्ड आणि ते सुद्धा कोची वरून. पाहिलं कोणाचं आहे आणि कोणासाठी लिहिलंय तर दोन्हीही मिसिंग होतं. एवढंच नाही, पत्यावर तर नाव कोणाचंच नाही अन फक्त प्लॅट नंबर होता सोबत सोसायटीचं नाव. आमच्या पोस्टमन काकांचंच कौतुक कि आडनाव नसूनही फक्त फ्लॅट नंबर वरून त्यांनी ते आणून दिलं आम्हाला. आई बाबा आहोत ना त्यामुळे अक्षरावरून ओळखलं कोणी पाठवलं आहे .. आणि ते सुद्धा कोची वरून, study tour वर असतांना  .. क्या बात है ! भारी वाटलं .. 

हावरटासारखं वाचायला सुरुवात केली तर, 'हे बघा एक फोटो पोस्ट कार्ड. मागच्या चित्रात एक fishing net आहे, त्या मागे जहाज आहे. कोचीवरून हॅलो म्हणायचं होतं आणि काहीतरी पाठवायचं होतं मग काय, पत्र पाठवलं. बाय बाय' आणि शेवटी 'मराठी मध्ये चुका अस्तील माफ करा',असं लिहिलं होतं तेही मुद्दाम चूक लिहून.मग काय पत्र मिळताच त्याची पोच देण्यासाठी तात्काळ फोन केला 'काय भारी वाटलं तुझं पत्र पाहून, पण अरे असं पत्र कोण लिहितं ? पण  मज्जा आली वाचून, तुला तिकडे कोचीत आमची आठवण आली ..' पुढचं माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, 'अग उशिराच मिळालं पत्र तुम्हाला. शिवजयंती तर होऊन गेली, त्या दिवशी मिळायला हवं होतं'.. कारण काय तर कोचीमध्ये दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला मिळाला होता जो त्या पत्रावर होता. हे ऐकून तर मी निःशब्द झाले..

योगायोग म्हणजे दुसऱ्या दिवशी फिनलँड मधल्या मैत्रिणीचा मेसेज, 'अग इतक्या वर्षांनी मला कोणीतरी पत्र पाठवलंय, माझ्या नावानं आलेलं इथलं पहिलं पत्र, माझ्या भाच्याने पाठवलेले, काय सांगू कित्ती छान वाटलं ते .. आजकाल  कोणीच लिहीत नाही ग पत्र'..आणि असाच मेसेज इथे पुण्यात राहणाऱ्या दुसऱ्या मैत्रिणीचा पण आला कारण तिला सुद्धा कोची वरून एक पत्र आलं होतं. वाटलं , व्हॉटस ऍप आणि ई-मेल च्या जमान्यात पत्र कुठेतरी हरवून गेलंय नाही, लहानपणी आपण खेळायचो ना, 'माझ्या आईचं पत्र हरवलं' अगदी तसं. एक काळ होता जेव्हा पोस्टकार्ड लिहायचं कि अंतर्देशीय पत्र हे मजकूर काय लिहायचा आहे त्यावर ठरायचं. आई बाबांचा पत्र व्यवहार पाहून मग आपणही मावशी,मामा,काका,आत्या,आजोबा,आजी यांना आवर्जून लिहायचो. ​ आज तर मला आठवेचना कि मी शेवटचं पत्र कोणाला लिहिलं होतं ..

आजकाल शिक्षणासाठी बरीच मुलं घरापासून दूर राहतांत, स्वतः अनुभव घेऊन शिकतात. त्यांची धडपड, त्यांचा संघर्ष वेगळा आहे. नवी नाती जोडतांना जुन्या नात्याला जपण्याची जाण आहे त्यांना. सोबत मजा, मस्ती, खोडसाळपणा सुद्धा आहे, स्वतः मधलं निरागस लहान मूल ते बखुबी जपतात. आपल्याला सुद्धा आपल्यातील हरवत चाललेलं ते लहान मूल जपता आलं पाहिजे .. हे शिकायला पाहिजे या मुलांकडून !

 ऑडिट 


मार्च महिना संपला कि ऑडिटचे वारे वाहू लागतात. फायनान्स डिपार्टमेंट सगळं सांभाळत म्हणून बरं आहे. माझ्यासाठी हे सगळं फार बोअर काम आहे म्हणून मी फारशी पडत नाही त्यात. 'अरे किती कापता तो इनकम टॅक्स' यावरून सुरु झालेले आणि रंगलेले हेड ऑफिस सोबतचे माझे संवाद आणि असा प्रश्न विचारला म्हणून तिथल्या सरांनी दिलेली झाप..  एवढंच काय ते मला माझ्या स्वतःच्या टॅक्स बद्दल कळवळा वाटणारे व त्यांतून फुललेले संवाद असतात माझे फायनान्स डिपार्टमेंट सोबत. झालं काय, गेले काही दिवस आमच्या ऑफिस मध्ये ऑडिट सुरु होतं. गरज लागेल तशी माझी involvement होती. आज संपलं एकदाचं ते ऑडिट म्हणून हुश्श केलं. जुनिअर ऑडिटरची तीन जणांची टीम त्यांचं ऑडिट observation घेऊन अकाउंटंट सॊबत माझ्याकडे आली. ते पाहून पोटात गोळा आला. बहुदा ऑडिटरचे चेहरे पाहून तो येतोच. त्यांनी काय खोदून काढलं असेल याचं टेन्शन इतकं नसतं कारण काम केलं आहे तर काहीतरी तर चुका होणार ना पण त्या खरंच इतक्या गंभीर स्वरूपाच्या असतील का हा प्रश्न टु बी ऑर नॉट टू बी सारखा असतो. तसाच प्रश्न घेऊन ते आज समोर आले. 
Taxation च्या काही शंका दूर केल्यावर ADMISTRATION पॉईंट नी एकच QUERY होती. PAINTING केलेला PROPOSED एरिया आणि ACTUAL एरिया यातला फरक. हो का, फरक आहे का ? .. का बरं असेल हा फरक ? मनातल्या मनात विचार केला आणि उत्तर सापडलं. 'वो क्या हुआ, एक हात मारा, देखा तो अच्छा नाही लग राहा था फिर और एक बार मारा, फिर ऐसे देखा तो लगा फिर भी ठीक न्हाई हुआ है क्यो कि LEAKAGE का बहुत बडा प्रॉब्लेम था पेहेले, तो और एक हात मारा तो ठीक हुआ. तो इस तरच एक सौ Sq feet का कितना हुआ तीन सौ sq ft बरोबर ना, इसी तरह बढ़ गया सब एरिया'..  त्या ऑडिटर नि एकमेकांकडे पाहिलं आणि समोर कागद ठेवला माझ्या, 'इस पर भी लिख दिजीए मॅडम' ..  मग काय कविता मॅडम नि दिलं लिहून. आता ते वाचून हेडऑफिस मधून मेल येते, का फोन येतो कि भेटायला बोलावणं त्याची वाट बघते आहे :)

#ऑडिटर जोमात बाकीचे कोमात #
११६ चाँद कि राते...  

'एक सौ सोला चाँद कि राते'.. गुलज़ार साहेबांच्या एक से एक कमाल गाण्यांनी आपल्याला बांधून ठेवणारा हा कार्यक्रम .. या सहा शब्दांमध्येच कार्यक्रमाला आकर्षित करायचं जबरदस्त सामर्थ्य आहे, 'बस नाम हि काफी है'.. आज दोन दिवस झाले तरी या कार्यक्रमाची रंगत मनात अजूनही ताजी आहे, मोगऱ्याच्या नुकत्याच उमललेल्या नाजूक कळ्यांसारखी. मला आठवतंय शाळेत असतांना मराठी विषय शिकवायला आम्हाला कानडे बाई होत्या. मराठी भाषेतलं सौन्दर्य,तिची नजाकत, तिची ताकत बाईंनी दाखवली. त्यांचं भाषेवरचे प्रभुत्व इतकं मोहित करणारं होतं कि त्या शिकवत असतांना फक्त ऐकत राहावं, त्यांचे शब्द कानात साठवून ठेवावेत असं वाटायचं. शाळेनंतर असा अनुभव फार कमी वेळा आला. परवा या कार्यक्रमाने नेमका तोच अनुभव दिला !

कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजार साहेबांशी ! कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून तसूभर जास्त प्रेम करतो आपण त्यांच्यावर. आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब कायम त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तर कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो ! 

संवेदनशीलता,तरल भाव, आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे खास वैशिष्ट्य. 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्श करतो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले', सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे की जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामों से कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', या गाण्यांमध्ये मनाची नेमकी अवस्था गुलजार साहेबांनी सहज टिपून शब्दांमध्ये बांधली आहे. 

एखादी देखणी कलाकृती बाह्यांगाने पाहून तिचं मोठेपण लक्षात येतं पण त्या कलाकृतीच्या मुळाशी जाण्याकरता, तिचा अभ्यास करण्याकरिता, त्यामागचा इतिहास उमजून घेण्याकरता, तिचं आंतरिक सौन्दर्य, गाभा समजून घेण्याकरता सोबत गाढा अभ्यासक लागतो. तसंच गुलजार साहेबांच्या शब्दांच्या जादूई दुनियेची अनोखी सफर घडवून आणायला, आपलं बोट धरून सोबत घेऊन जाणारा आश्वस्थ हात हवा. मला वाटतं ते काम वैभव जोशी बखुबी करतात. 

तुम्हारे होंठ बहुत ख़ुश्क ख़ुश्क रहते हैं
इन्हीं लबों पे कभी ताज़ा शे’र मिलते थे
ये तुमने होंठों पे अफ़साने रख लिए कब से?

या त्रिवेणी मधलं सौन्दर्य असो किंवा,

दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन.. बैठे रहें, तसव्वुर-ए-जाना किये हुए..
दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन..
या ओळींमधील 'तसव्वुर-इ-जाना' चा अर्थ असो तो ऐकावा खास वैभव जोशींकडून !

प्रत्येक वळणावर स्वतःलाच नवं वळण देत जाणारा किमयागार गुलज़ार यांचं वेगळेपण समजायला 'मै मुडा तो साथ साथ राह मूड गई', हि एक ओळच कशी पुरेशी आहे हे वैभव जोशी अलवारपणे उलगडून सांगतात.  अनेकांसारखं लिहिलं तर गुलज़ार कसे हे सांगताना अंगूर मधल्या गाण्याचा दाखला ते देतात.   
'बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी' आणि त्यानंतर येणारी सरगम .. 'प म प म ग म ग रे ग नि रे न नि म ग रे प्'... हि जागा पंचमदांनी अचूक हेरली आणि आशा ताईंना तिथे सरगम दिली .. म्हणजेच तो मौसम बिता हुआ आहे तर आठवायला वेळ तर लागणार ना.. ती वेळ म्हणजे हि सरगम ..  एखादं गाणं प्राणांत ऐकू येणं, गात्रात वाजत असूनही चटकन ओठांवर न येणं हि खूण अधोरेखित करणारी हि गोष्ट, एक दास्ता ...'दर्द पुराना कोई याद पुरानी होगी, बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी'.. 

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ ..मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस.. श्रुती चितळे यांनी व्हायोलिन वर सादर केलेल्या या चिरतरुण गाण्याने हीच अनुभूती मिळाली. 

'आप कि आँखों में कुछ मेहके हुए से राज है' ... हे अजून एक अजरामर गीत. 'आपकी खामोशियाँ भी आप कि आवाज है' .. या गाण्यातील गंमत, ती शरारत, तो खट्याळ अंदाज, ते मेहेके राज, प्रदीप्तो सेनगुप्तां यांच्या मेंडोलिन वर आणि त्यांना साथ देणाऱ्या श्रुती चितळे यांच्या व्हायोलिन मुळे अजून साजिरे वाटतात. 'आप की आँखों में कुछ मेहेके हुए से राज़ हैं ', या ओळीतील 'मेहेके' या शब्दावर श्रुती यांची व्हायोलिन वरची हरकत सिलसिला मधल्या 'ये कहांँ आ गये हम' या गाण्यातील दीदींच्या 'मुलायम' शब्दाच्या जवळ घेऊन जाते.  'तुम आ गये हो नूर आ गया है' ..  हे अजून एक विलक्षण गीत. 'तू येताना स्वतःची अशी एक आभा घेऊन आलीस कि मला त्या उजेडात माझं अंधारलेले अस्थित्व, त्याच रूप स्पष्ट दिसू लागतं' हा छुपा अर्थ उलगडून सांगताना वैभव जोशींनी सांगितलेल्या 'नूर' शब्दाची छटा खरंच कमाल होती.  

चांदनी चौक मध्ये घडणारं गीत म्हणून 'ऐसी नज़र से देखा उस जालिम ने चौक पर, हमनें कलेजा रख दिया चाकू की नौक पर', या ओळी लिहिणारे गुलजार साहेब या गाण्यात एक वेगळीच छटा दाखवून..'हो तेरी बातों में किमाम की खुशबू हैं, हो तेरा आना भी गर्मियों की लू हैं'.. म्हणत 'आँखें भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती है'...असं लिहून जातात आणि या गाण्यातील हे सगळे रंग हार्मोनियम आणि हार्मोनिकाच्या सुरांमधून सादर करतात निनाद सोलापूरकर ..आणि तिथेच वन्स मोअर ची दाद मिळते !  प्रत्येक माणसात आयुष्यभर निरागस राहण्याची इच्छा असते. म्हणूनच 'दिल तो बच्चा है जी', लिहिणाऱ्या गुलजार साहेबांमधले एक नितळ पारदर्शक लहान मूल गाण्याच्या या एका ओळीतच दिसतं. 

'घेता किती घेशील दो कराने' अशी काहीशी अवस्था होऊन जाते जेव्हा कार्यक्रम शेवटाकडे जातो. मग मात्र उत्सुकता असते '११६ चाँद कि राते' या ओळींची... 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है'.. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरणार नाही असे शब्द, ती कशिश, ते प्रेम, तो विरह... प्रत्येक वेळी ऐकताना तितकंच आतवर पोहोचतं हे गाणं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं.. कमाल आहे ! 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभव जोशींच्या नजरेतून गुलजार साहेबांना बघता आलं, शिकता आलं .. तीन तासांच्या या जादुई अनुभवानंतर  'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...

© कविता सहस्रबुद्धे
हॅरी पॉटर

कधी कधी काही चित्रपटांची जादू इतकी कमाल असते कि त्याच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात सदैव जाग्या असतात. 'हरी पुत्तर कितनी बारा देखेगा तू ये फिल्म', असं कितीतरी वेळा कित्येक आयांनी म्हटलं असेल आपल्या मुलांना आणि नंतर 'काय आहे एवढं या सिनेमात' म्हणून मग स्वतः पाहिला असेल हा चित्रपट. आणि मग मात्र मुलांच्या सोबतीने या चित्रपटाच्या series ची कितीतरी पारायणं घडली असावीत. मी याच कॅटेगरीतली म्हणून तर छान आठवणी आहेत या चित्रपटाच्या सोबत. 

तर झालं काय आज ऑफिस मध्ये गेल्यावर सकाळच्या प्रहरी मस्टर सही करून रोजच्या सारखी आमची मेहेफील जमली होती. दुसरीकडे हाऊस कीपिंग स्टाफ साफ सफाई करत होते. त्यांच काम संपेपर्यंत मिळणारा पाच दहा मिनिटांचा वेळ म्हणजे आमचा बुस्टर डोस असतो दिवसाची सुरवात करायला. तिथेच बाजूला साफसफाई करणाऱ्या मंडळींचं सामान होतं. त्यात कोपऱ्यात उभा असलेला तो ब्रूम पाहून मला हॅरी पॉटर ची आठवण झाली आणि मी म्हटलं 'मला हा ब्रूम पाहिला ना कि हॅरी पॉटर आठवतो'.  यावर वालावलकर सर म्हणाले, 'मॅडम, ब्रूम पाहून हॅरी पॉटर आठवला तरी ऑफिसच्या बसला विसरू नका'. ' काय'? माझी reaction ऐकून सरांनी परत तेच वाक्य ऐकवलं.  'अहो सर, आपलं काय हॉग्वर्ट्स स्कूल आहे का आपण ब्रूम वरून कॉलेज ला यायला', आणि हो कसं दिसेल ते, मी, कुलकर्णी सर, अय्यर मॅडम, नेहा मॅडम असं ब्रूम वरून येतोय ते'.. माझं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत सरांनी चक्क नक्कल करून दाखवली ब्रूम वरून अगदी उजवीकडचं आणि डावीकडचं वळणं कसं घ्यावं लागेल याच्या सकट. मी म्हटलं, 'अहो नेहा मॅडम झोपतात बस मध्ये त्यांना नाही जमणार हे. तुम्हाला माहित नाही मॅडम किती गाढ झोपतात. परवा बसच्या ड्राइव्हर ने PMT बस ला कट मारला तर त्या ड्राइवर ने ओव्हरटेक करून बस आडवी घातली आणि तो खाली उतरला. ते पाहून आमचा ड्राइवर पण उतरला आणि दोघांची चांगलीच जुंपली. ते भांडण सोडवायला अहो भिडे सर उतरले खाली, भिडे सर ...  तरी मॅडम ना पत्ता नाही'..  त्यावर मॅडम म्हणाल्या, 'हो हो , मी इतकी गाढ झोपले होते. म्हणजे भिडे सर उतरले तरी पत्ता नाही म्हणजे पहा; म्हणून सांगते मला नाही जमणार ब्रूम, मी पडून जाईन मध्येच येता येता'.. कुलकर्णी सर, अय्यर मॅडम, राव सर सगळे हसत होते. बहुदा समोर चित्र उभं राहिलं असावं त्यांच्या. यावर वालावलकर सरांनी मॅडमला त्याला 'पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन' म्हणतात असं सांगितलं. तरी ब्रूम काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. मग त्यांनी एक उपाय शोधला. ते म्हणाले, 'कविता मॅडम आणि तुम्ही डबल सीट या म्हणजे तुम्ही पडणार नाही. मॅडम मागे बसतील आणि तुम्ही पुढे बसा म्हणजे झालं'.. कांतेय लहान असतांना आम्ही स्कुटीवरून जेव्हा जायचो ना तेव्हा तो पुढे उभा राहायचा व मी त्याला ओढणीने माझ्या पोटाला बांधायचे, अचानक तो सिन डोळ्यासमोर आला. मी त्याचा दाखला देत म्हटलं, 'कांतेय नंतर तुम्हीच मॅडम' .. यावर जोरदार हशा पिकला. इतक्यात या सर्वाशी आपला काहीही संबंध नाही असं दाखवत गोखले मॅडम मस्टर वर सही करून चष्मा सावरत म्हणाल्या, 'you all are talking like school going kids'.. पुढचं वाक्य मनातल्या मनात पुटपुटलं असावं बहुदा त्यांनी. तरी मी म्हटलं त्यांना,' Yes madam we are coming to school, its a B-school that's it'..  पण यावर सुद्धा हसल्या नाहीत बिचाऱ्या..असं थोडंस वय विसरून वागण्यात, time travel करून क्षणभर लहान होण्यात काय मजा असते ते बहुधा माहीत नसावं त्यांना. त्यामुळे लवकरच आमच्या 'बी स्कूल' मध्ये त्यांना ऍडमिशन देऊन थोडं बिघडवायचं आम्ही ठरवलं आहे :)

©कविता सहस्रबुद्धे
लव स्टोरी

आई आणि मुलाचं नातं भारी भन्नाट असतं. आपल्या लग्नानंतर आपण आईच्या रोल मध्ये शिरेपर्यंत सासरच्या घरात असलेलं हेच नातं 'याची देही याची डोळा' तीच भन्नाट अनुभूती देत असतं. मग आपण जेव्हा आईच्या रोल मध्ये जातो ना तेव्हा तीच 'भन्नाट अनुभूती' आपण दुसऱ्यांना देतो इतकंच.आईच्या भूमिकेत शिरलं कि प्रत्येक वर्षी आपले प्रॉब्लेम बदलत जातात, त्यांची लांबी रुंदी खोली बदलत राहते. लहान असतांना रात्री झोपत नाही, किती रडतो, उशीरा बोलणार बहुतेक, चालणं पण उशिराच दिसतंय, किती बोबडं बोलतो इथपासून सुरुवात होते. एकदा का शाळेची ऍडमिशन झाली कि मग अभ्यास, दंगा मस्ती, भांडणं, शाळेतून येणारे रिमार्क, टीनएज प्रॉब्लेम अशा वळणा वळणांवरून आपली गाडी इतरांसारखीच हळूहळू पुढे जायला लागते. बायकोपेक्षा 'आई' या नात्यामधलं आपलं गुंतणं फार वेगळं असतं. हळूहळू ते दिवस भुर्रकन उडून जातात आणि बघता बघता इवलीशी पिल्लं कधी मोठी होऊन शिकायला घरट्याबाहेर उडून जातात ते कळतंच नाही. 'empty nest' चा खरा अर्थ मग समजतो तेव्हा. 
इतर वेळी ठाई ठाई मुलांची मदत घेणारी आई, मग बाबा पेक्षा जास्त techno savy बनून WA , iNSTA ,Video call याचा पुरेपूर वापर करत सगळी अंतरं पार करायची धडपड करते. आणि ज्यांच्याकडे डबल धमाका असतो त्यांच्याकडे तर बघायलाच नको. आमच्या ऑफिस मध्ये थोड्या फार फरकाने बऱ्याच जणांची हिच गोष्ट आहे त्यामुळे बहुतांश वेळा आमचे बोलायचे विषय, टेन्शनची कारणं कमी अधिक प्रमाणात सारखीच असतात. अगदी लोणी काळभोर पासून बंगलोर, दिल्ली, आसाम, ऑस्ट्रेलिया, लंडन ते अमेरिका इथल्या खबरा रोज आम्हाला जेवतांना मिळत असतात. मुलं बाहेर गेली मग आता कशात जीव गुंतवायचा हा प्रश्न 'बाबा' पेक्षा 'आई' कॅटेगरीला जास्त असतो. 
नेमकं हेच ओळखून ऑफिसमधल्या माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलांनी शिकायला बाहेर जायच्या आधी एक भूभू आणलं. थोडे दिवस त्यांनी पण मजा केली त्याच्याबरोबर आणि महिना दोन महिन्यात शिकायला ते बाहेर गेले, मुलगी पूर्वेच्या देशात आणि मुलगा पार पश्चिमेच्या देशात. ऑफिसचं काम सांभाळून तिकडच्या वेळेप्रमाणे मुलांना फोन करण्याची कसरत माझी मैत्रीण करत असते.शिवाय ऑफिस नंतर तिचा भूभू 'रॉबर्ट' तिला बिझी ठेवतो. तिचा नवरा sports मध्ये एकदम active असल्याने तो खेळायला पुण्याबाहेर गेला की भुभू ला दोन चार दिवस पाळणाघरात ठेवायचं व तिथून परत घेऊन यायचं हे अजून एक काम वाढतं तिचं. आमच्या कॅम्पस मध्ये इतके प्राणी आहेत की घरचे प्राणी ऑफिस मध्ये आणायची अजूनतरी परवानगी नाहीये  नाहीतर अजून सोपं होतं तिला. 
तर झालं काय, सध्या ऑफिसमध्ये आमचा गप्पांचा विषय 'रॉबर्ट' भोवती घुटमळतोय कारण काय तर तो सध्या पाळणाघरात गेलाय काही दिवसांकरता. बरं रॉबर्ट पाळणाघरात काय काय करतो हि उत्सुकता आम्हाला पण असते, खरं तर 'भोचकपणा' हा योग्य शब्द आहे. मग साहजिकच आमच्या चौकशा सुरु होतात. बरं पाळणाघरातील ती care taker इतकी छान आहे कि ती माझ्या मैत्रिणीला दिवसभरात अधून मधून रोबर्टचे व्हिडिओ पाठवत असते, अगदी सहज, तो ठीक आहे, छान खेळतोय हे कळवण्यासाठी. ते व्हिडीओ पाहून आम्हाला नुकतंच समजलंय कि रॉबर्टला पाळणाघरात एक मैत्रीण मिळाली आहे 'लूसी' नावाची. त्यामुळे व्हिडिओ रॉबर्टचा येत असला तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्याच्या सोबत लूसीला पाहून या discussion मधला आमचा 'इंटरेस्ट' सध्या फारच वाढलाय आणि दुसरीकडे रॉबर्ट च्या 'आईचं' टेन्शन ! 'लुसीचा possessive ness पाहून तिच्या समोर रॉबर्ट किती शांत आहे नाही', 'अगदी स्त्री दाक्षिण्य दाखवणारा आहे', असं बोलून आम्ही तो माहोल अजून रंगीन करतो. 'आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते xx' या उक्तीप्रमाणे रॉबर्टच्या 'आईला' तो जास्त handsome वाटतोय लुसी पेक्षा त्यामुळे अजूनच गंमत आहे या स्टोरीत. 'पहा बरं लुसी यायची सून म्हणून' असं चिडवताना, लूसीच्या आई बाबांची चौकशी कर,ते कुठे राहतात वगैरे म्हणजे तुला date वर पाठवता येईल रॉबर्टला असंही सुचवतोय तिला. एकूण काय आमच्या मुलांच्या GF आणि BF च्या चर्चांमध्ये आता अचानक रॉबर्टच्या GF ची एन्ट्री झालीये त्यामुळे येणारे काही दिवस 'रॉबर्ट लूसी कि लव्ह स्टोरी' मय होणार हे नक्की ! 

©कविता सहस्रबुद्धे 

 वर्ल्ड कप


उन्हाळा आला कि कैरीची डाळ, पन्हं याची चाहूल लागते. चैत्रागौरीचं हळदी कुंकू होतं आणि वेध लागतात अक्षय तृतीयेचे,आंब्याचा सिझन झोकात सुरु होतो. रविवारी दुपारी आमरस पुरीचं मनसोक्त जेवण करून गाढ झोपण्यातलं सुख सांगताच येत नाही, ते अनुभवावं लागतं. मग काय, बाकी आठवडा दुपारचा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी ऑफिस मध्ये लिंबू सरबत, कोकम सरबत असतंच. आता जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत आमचं कॉलेज कॅम्पस काहीसं भकास वाटत राहतं,मग काय अधून मधून वातावरण आल्हाददायक ठेवायची जबाबदारी आमच्यावरच असते.  

जून महिन्यापासून सुरु होणारं नवं शैक्षणिक वर्ष नंतर एप्रिल महिन्यात होणाऱ्या परीक्षांपर्यंत अगदी पॅक असतं, डोकं वर काढायला सुद्धा फुरसत नसते. याच काळांत आम्ही पुढच्या वर्षाचं नियोजन करायला सुरुवात करतो. कोणता event कधी, परीक्षा कधी, study tour कधी, स्टडी leave कधी, सुट्ट्या कधी ते ठरवून त्याप्रमाणे वर्षाचं वेळापत्रक तयार केलं जातं. काल आम्ही हेच काम करत होतो. 'स्पोर्ट्स वीक' कधी ठेवायचा यावर चर्चा सुरु होती. मार्च ऐवजी डिसेंबर मध्ये घेऊ यांत वगैरे वगैरे.. इतक्यात स्पोर्ट्स incharge शर्मा सर म्हणाले, 'मॅडम इस बार ट्रॉफी  हम जितेंगे और आपको वो ट्रॉफी हमे देनी पडेगी, लिख लिजिए'.. यावर्षी स्टाफ क्रिकेट स्पर्धेतला त्यांच्या टीमचा पराभव फारच मनावर घेतला होता त्यांनी हे स्पष्ट दिसत होतं. 'क्यों सर, आप को क्यो दे, इस साल भी हम ही जीतेंगे और ट्रॉफी हमारे पास ही रहेगी'.. मी पण हार मानायला काही तयार नव्हते.'लो, ये क्या बात हुई, एक बार हारे मतलब हम बार बार हारेंगे क्या'.. पराभव पचनी न पडल्याने त्यांची चिडचिड शब्दा शब्दातून बाहेर पडत होती. 'वो नहि पता सर लेकीन ट्रॉफी तो हमारे पास ही रहेगी, वादा है आपसे'.. 'बिलकुल नहीं जी, ट्रॉफी तो हम लेके जायेंगे'... आज काही खरं नव्हतं. मैदानावर मॅचच्या दिवशी झालेली भांडणं आता परत सुरू होण्याच्या मार्गावर होती. 

बरं हे डिस्कशन सुरु असतांना समोर टेबलवर ठेवलेली ट्रॉफी जणू गालातल्या गालात हसते आहे असा भास माझ्याबरोबर शर्मा सरांना पण झाला बहुदा. मी जरा वळून बघितलं, आमच्या आमच्या इन्स्टिटयूट मधल्या स्पर्धेत जिंकलेली ती ट्रॉफी 'वर्ल्ड कप' सारखी तर दिसत नाहीये ना अशी शंका आली आणि हो शर्मा सर, ते किरण मोरे वर चीड चीड करणाऱ्या जावेद मियाँदादसारखे .. नाही नाही, तरी रंगत तीच होती.  

मराठी बरोबर इंग्रजी हिंदी भाषा इथे आनंदाने जरी नांदत असली तरी काही प्रसंगी उत्फुर्तपणे बाहेर पडणारे शब्द मातृभाषेतलेच असतात. 'ट्रॉफी हम हि लेंगे, लेकर हि रहेंगे', ऐकून ऐकून शेवटी मी बोलले, 'सर देखो हम 'भांडीवाले' के पास जाकर हमरा नाम लिखवाएंगे ट्रॉफी पर'.. माझी हि spontaneous reaction ऐकून तर ते पार गडबडले.. बरं ज्यांना समजलं ते खो खो हसायला लागले. शर्मा सर बिचारे 'क्या बोला मॅडमने, किस के पास जाके क्या लिखवाएंगे, बताओ तो सही', म्हणतं बाऊन्सर गेलेला तो शब्द शोधू लागले.अजूनतरी तो शब्द त्यांना सापडला नाहीये, आणि जेव्हा केव्हा सापडेल तेव्हा 'भांडीवाल्याकडे खरंच ट्रॉफी वर नाव लिहून घेण्यासाठी गेलेल्या मला' visualize करतांना त्यांना होणारी चिडचिड कमाल असणार आहे यांत शंका नाही !

©कविता सहस्रबुद्धे

 जब वी मेट


संध्याकाळची आठ वाजताची ट्रेन एक नाही, दोन नाही, तर चक्क चक्क चार तास लेट झाली ते पण पुण्याला जाणारी. बरं हे समजलं कसं तर ट्रॅकर वर गाडीचं live location बघण्याचं सुचलं ते पण जेव्हा मेसेज मिळाला गाडी लेट आहे. बाहेरच्या उन्हाने चाळीशी ओलांडली असतांना आम्ही हॉटेलच्या थंडगार AC रूम मध्ये निवांतपणे दुपारचा चहा घेत होतो तेव्हाच हा सुखद धक्का बसला.बरं आता करायचं काय? ते पण सुचेना. 'रेल्वेचं तिकीट कॅन्सल करून बस ने जावं का' हा विचार आला मनांत पण नवीन शहरात काहीही माहित नसतांना आम्ही दोघी मैत्रिणींनी कोणताही धाडसी निर्णय न घेता क्षणभर PAUSE घेतला. मग दुसऱ्याच क्षणी मी ऑफिसचं ट्रॅव्हल बुकिंग करणाऱ्या सुरेखा मॅडमला फोन लावला. बरं फोन लावला तेव्हा वाटलं, दोन तीन तास आधी कसं काय मिळेल तिकीट कोणत्याही ट्रेनच ते सुद्धा कन्फर्म तिकीट, वेड्यात काढेल यार कोणी पण, तरी वाटलं विचारायला काय हरकत आहे. आणि नशीब कसं असतं पहा, नेमकं त्याच दिवशी सिझन स्पेशल म्हणून चक्क चक्क हमसफर ट्रेन सुरु झाली होती. हे ऐकून तर कानावर विश्वासच बसेना कि आजच एखादी ट्रेन सिझन स्पेशल म्हणून सुरु काय होते आणि आम्हाला त्याच ट्रेनच कन्फर्म तिकीट काय मिळतं. मग काय त्याच आनंदात लेट झालेल्या ट्रेनच तिकीट आम्ही कॅन्सल केलं व नवीन eतिकीट मोबाईलवर झळकताच खुशीत स्टेशन गाठलं.  

संध्याकाळची वेळ, अंधार पडायला सुरवात झालेली. सुनसान स्टेशन व तुरळक माणसं हे चित्र तसं विरळच.त्या लहान स्टेशन वर चेन्नई, मुंबई, पुरीला जाणाऱ्या सर्वच गाड्यांची माहिती सांगितली जात होती, जसं कोणत्या प्लॅटफॉर्म वर, किती वाजता वगैरे वगैरे. पण आमच्या गाडीचं काही नावच नाही. मी म्हटलं सुद्धा मैत्रिणीला, 'जाऊन बघून येऊ का जरा कि आपल्या गाडीबद्दल काहीच का सांगत नाहीयेत ? किमान यांना तरी माहिती आहे ना कि आजपासून नवीन गाडी सुरु झालीये म्हणून'... मी खरंच जाईन कि काय म्हणून मैत्रिणीने जरा थांबवलं मला. तिथे बाजूलाच बसलेल्या एक जोडप्याला विचारलं 'त्यांना कुठे जायचंय' म्हणून, त्यांनी 'पुण्याला' म्हणताच आम्हा दोघींच्या जीवात जीव आला, म्हणजे पुण्याची गाडी खरंच येणार होती. इतक्यात आमच्या गाडीची दुरूनच झलक दिसली. तिच्या स्वागतावेळी झालेली ती अनाऊन्समेंट कानांत साठवत आम्ही समोर येणाऱ्या त्या गाडीला डोळे भरून पाहू लागलो. 'इस गाडी कि किमत तुम क्या जानो रमेश बाबू' असं झालं होतं. गाडी थांबताच आम्ही आत चढलो. हा क्षण येईपर्यंत धाकधूक होती की खरंच आहे ना अशी नवीन गाडी नाहीतर 'जे तिकीट होतं ते कॅन्सल केलेलं आणि नवीन गाडीचा पत्ता नाही'असं व्हायचं. फायनली आम्ही गाडीत बसलो होतो,  वाह वाह .. 'सुरेखा सुरेखा अग आमची ही ट्रेन मिस झाली ग,आता अजून कुठली आहे का ग दुसरी ट्रेन' असं मी मुद्दाम हेल काढत फोनवर बोलण्याची नक्कल केली बसल्यावर, ते ऐकून मैत्रिणीने 'गप गss',असं म्हणतं दिलेली चापटी खात आम्ही पोटभर हसलो. एकदाचं हुश्श झालं होतं आणि मग लक्षांत आलं ही नवीन गाडी अगदीच रिकामी आहे. आठ जणांच्या कंपार्टमेंट मध्ये जेमतेम तीन टाळकी होती सगळीकडे त्यामुळे कुपे बुक केल्याचा फील आला. 

थोड्या वेळाने हॉटेल मधल्या कूक नि दिलेली दाल खिचडी खाऊन पोट भरलं आणि जवळचं पाणी संपल्याची जाणीव झाली. मग काय पुढच्या स्टेशन वर गाडी थांबणार होती तिथे पाण्याची बाटली घ्यावी असं ठरवलं. स्टेशन आलं, गाडी थांबली, मी दारातून वाकून पाहिलं तर स्टॉल बराच पुढे होता. उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. उतरावं की नाही असा क्षणभर विचार करून उतरले एकदाची. जवळपास पळतच गेले स्टॉल वर.अजून चार माणसं उभी होती काही न काही घ्यायला त्यात मी बाजूने एन्ट्री घेतली. 'भैय्या एक पानी की बॉटल देना जल्दी'..असं म्हणत वीस रुपये ठेवले काउंटर वर. 'पंधरा रुपये मॅडम, पाच रुपये change देना'.. 'अरे भैय्या नहीं है पाच रुपये मेरे पास', असं मी म्हणताच त्याने समोर ठेवलेली बाटली परत घेतली. 'अरे भैय्या ये बीस रुपये रखो, बॉटल तो दो'.. 'नही नही, आप पाच रुपए दो छुट्टा'..'अरे भैय्या मेरी ट्रेन छुट जायेगी'.. 'नही जाएगी मॅडम'.. जब वी मेट मधला तो माझा आवडता सिन आठवला. मगाशी जिथे ट्रेन मध्ये बसलो होतो त्या सूनसान स्टेशनचा फोटो मी स्टेटस वर टाकला होता काही वेळापूर्वी आणि लिहिलं होतं, "भटिंडा व्हाया रतलाम".. तर त्या फोटोवर मैत्रिणींच्या कमेंट्स पण आल्या, 'आदित्य कश्यप काही भेटणार नाहीए त्यामुळे पाणी घ्यायला वगैरे अजिबात उतरू नका'.. मी ते आठवून, सारख्या समोर येणाऱ्या त्या शाहिद कपूरला बाजूला करत म्हणाले "अरे भैय्या पानी का बॉटल तो दो, ट्रेन निकल जायेगी मेरी"..  असं म्हणताच भैय्या जागा झाला, म्हणाला "और दस रुपया दो और दो बॉटल ले लो".. अरे राम.. घे बाबा घे, अजून दहा रूपये घे पण पाणी दे.. असं मनातल्या मनात पुटपुटत मी दोन बाटल्या घेतल्या. ती 'गीत' जास्त पैसे घेतले म्हणून भांडत होती सिनेमात आणि इथे मी जास्त पैसे देत होते पण त्याला ते नको होते .. बरं हे सर्व संभाषण होत असताना मी एक सारखं  मागे वळून बघत होते, गाडी सुरू तर होत नाहीये ना... कारण रिस्क कशी घेणार,आमचा राज, आमचा आदित्य कश्यप सोबत थोडीच होता, तो घरीच असल्याने ना ट्रेन चुकवून चालणार होतं ना त्या काउंटर वर पाणी पीत बडबड करताना मागून हळूच निघून गेलेली ट्रेन बघणं.. मग काय त्या बाटल्या सावरत चढले ट्रेन मध्ये .. 

एकूण काय तर प्रत्येक ट्रेन journey मध्ये 'जब वी मेट' सारखी स्टोरी नसते,मी आपली माझी स्टोरी सांगितली !

© कविता सहस्रबुद्धे

Sunday, April 16, 2023

 वेलकम होम 


काही चित्रपट स्वतःशी संवाद साधायला लावतात, हा त्याच पठडीतला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या जोडीची एक खास कलाकृती. चित्रपटाची कथा, संवाद सुमित्रा भावे यांचे. ज्याने त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे अर्थ काढावा, बोध घ्यावा असा हा चित्रपट. लग्न, कुटुंबसंस्था, नातेसंबंध आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं स्वतःच घर या संकल्पनेबद्दल केलेलं भाष्य आहे यांत. इवल्याशा कॅनव्हास वर केवढं तरी मोठ्ठं लोभस चित्र रेखाटणारा हा चित्रपट, नात्यांमधली उब हळुवार उलगडून दाखवत शेवटी नात्यांबद्दल आश्वस्त करतो. 

विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉक्टर सौदामिनीची गोष्ट आहे यात. नवऱ्याकडून 'स्पष्ट संवाद' आणि 'पारदर्शी विश्वास' इतकीच अपेक्षा असणारी ती. दिवस इथे संपला आणि रात्र इथे सुरु झाली तो क्षण जसा सापडत नाही तसंच ते नातं कुठवर होतं आणि कुठून पुढे ते अस्पष्ट व्हायला लागलं हे तिलाही समजत नाही. शेवटी तुटत तुटत आलेला तो घागा ती एका क्षणी कापून टाकते, त्याला तसं हवं होतं म्हणून .. मग आयुष्याच्या याच वळणावर तिला प्रश्न पडतो आपलं नेमकं घर कोणतं? लग्नानंतर माहेर आपलं घर असतं की नवऱ्याचं घर हेच आपले घर? की यापैकी कोणतंच घर आपलं नाही .. मग अशा परिस्थितीत जिद्दीने स्वतःचा शोध घेऊ पाहणारं तिचं मन, सोबत येणारी आव्हानं व ती पेलू शकू हा हळूहळू निर्माण होणारा विश्वास व तिचा तिच्या घराचा शोध.. या सर्व प्रवासाची गोष्ट म्हणजे वेलकम होम !

यात 'घर' एक सारखं भेटत राहतं, कधी 'अतिक्रमणाची माणसं आलीत घर पाडायला म्हणून आई नाही येणार कामाला', या कामवाल्या मावशींच्या मुलीच्या निरोपात, तर कधी रेडिओवरच्या 'मै तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे'.. या ओळींमधून. सौदामिनीच्या आईला एका प्रसंगी तिच्या आईचे शब्द आठवतात,'सणासुदीला माहेरी येणं वेगळं आणि भांडून माघारी येणं वेगळं' इथेही तिला तिच्या घराची ओळख करून दिली जाते. सौदामिनीच्या आजीचा तिच्या स्वतःच्या खोलीसाठीचा संघर्ष व तिच्या नावावर कधीच कुठलं घर नसल्याची खंत मधूनच डोकावते. वडिलोपार्जित घराचे तुकडे विकण्याच्या तयारीत असलेली मावशी दिसते.चाळीशी आली पण अजून सगळा गोंधळच आहे हे मान्य करणारी एकटेपणा, कंटाळा, भांडण यांत अडकलेली, तो कमावतो मी माझं आयुष्य जगते, त्याला सोडून जाऊ कुठे म्हणून न पटूनही त्याच घरात राहणारी अमेरिकेतली तिची मैत्रीण सुद्धा आयुष्यातील घराचं महत्व ठळकपणे अधोरेखित करते. 'एकटं अदृश्य होऊन गप्प बसावसं वाटतंय एखाद्या तळ्याशी जिथे शांतताच स्वतः निवारा शोधत आलेली असेल' .. यासारखे संवाद सुद्धा घर या संकल्पनेपाशीच येऊन थांबतात. प्रत्येकाचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःला हव्या असणाऱ्या जागेचा शोध अखंड सुरू आहे असं वाटत. 

काही सामान आणायला परत घरी गेल्यावर नवऱ्याने कुलूप बदललं म्हणून तुटणारी सौदामिनी, नवीन किल्ली करून घर उघडल्यावर पसरलेलं घर नीट आवरणारी, सर्व गोष्टी जिथल्या तिथे लाऊन परत निघतांना उंबऱ्यात अडखळून मागे वळून स्वतःच्या हातानी सजवलेल्या आपल्या घराला डोळ्यात साठवणारी सौदामिनी अस्वस्थ करते. आपल्या वडिलांना, 'आप्पा मला माझं स्वतःच असं घरच नाही का',असा प्रश्न विचारते तेव्हा 'हे घर आपलं वाटल्याशिवाय तू आलीस का इथं' हा प्रतिप्रश्न विचारून आप्पा तिला आश्वस्त करतात. कुकी (मुलगी) आणि माई (सासूबाई) या दोघीना आपल्यशिवाय आयुष्य पेलण्याची ताकत नाही हे जाणून ती त्यांची जबाबदारी घेते. कारण 'ज्याला जबाबदारीची जाणीव असते, त्याला ती सांगावी लागत नाही, ती तो आपसूक घेतच असतो' हे ती जाणते. 'स्वतःच्या लाचारीची, शरीराची, मनाची, बुद्धीची किळस येते, सगळ्याला स्वच्छ आंघोळ घालावीशी वाटते'.. सारखे संवाद तिची हतबलता दाखवतात. 

'पोरं आपली मग त्यांचे भार आपले' हे जाणून 'ज्याची माणुसकी जागी आहे तो संन्यासी अडकलेलाच राहणार' हे ओळखणारे आप्पा, 'उगीच कशाला वाढवायचं, पटलं नाही तर घर लगेच मोडून थोडंच टाकायचं असतं', ही समजूत घालणारी आई, नातं हि गोष्ट जबाबदारीनं निभावण्याची आहे हे भान असणारा भाऊ, प्रत्येकाची सुख दुःख वेगवेगळी असतात पण सारखीही असतात हे जो जाणेल तो आपला हा विश्वास असणारी मावशी तर तुझ्या आईचं घर तुझं नाही मग माझ्या आईच घर माझं कसं' हा प्रश्न विचारणारी मुलगी आणि आपल्या पद्धतीने साथ देणारी बहीण अशी सौदामीनीच्या आयुष्यातील तिची माणसं आपल्यालाही भेटतात.

या सर्वात लक्षांत राहतो, तिचा मित्र सुरेश.त्या दोघांमधील संवाद व न बोलता झालेलं संभाषण सहज सुंदर ! नेमकं त्याच वेळी 'राधे राधे गोविंद बोले रे' हे गीत ती फ्रेम अजूनच गडद करतं..'किर्रर्र रान, पाचोळ्यावर पडते पाऊल, स्वतःला स्वतःची लागे चाहूल'..सारख्या गीतातून तिला चाहूल लागते, स्वतःची स्वतःशी नव्यानं ओळख होते.जसं रामाच्या देवळातल्या बकुळीच्या झाडाचं एखादं हलकं बकुळीचं फुल अचानक गरगरत आपल्या पुढ्यात यावं तसं तिला तिचं घर गवसतं..


©कविता सहस्रबुद्धे

Saturday, April 15, 2023

 फिर वही रात है..


किशोरदांचा आवाज, पंचमदांचं संगीत व गुलझारसाहेबांचे शब्द .. या त्रिकुटाने कितीतरी सुरेख चिरतरुण गाणी दिली आहेत आपल्याला आणि हे त्यातलंच एक कमाल गाणं. ज्या situation वर चित्रपटांत ते येतं तेव्हाचे भाव, अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतात या गाण्यातून. घर या चित्रपटातील हे गीत पडद्यावर साकारलंय विनोद मेहेरा व रेखा यांनी. हे गाणं ऐकतांना पाणवणारे डोळे, पडद्यावर ते बघतांना कधी झरझर वाहू लागतात कळतंच नाही. 

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्याच विश्वात हरवलेले, रमलेले विकास आणि आरती. एक दिवस रात्री चित्रपट पाहून परत येत असतांना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्या आघाताने आरती मुळापासून कोसळते. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा तिचं जगणं अवघड करतात. आरतीची भूमिका प्रचंड ताकतीने साकारणारी रेखा आपल्याला ही अस्वस्थ करते. मनोमन उध्वस्त झालेलं, खचलेलं तिचं रूप विकास पाहू शकत नाही आणि मग सुरू होते त्याची केविलवाणी धडपड, तिला परत आपल्या जगात आणण्याची. जिच्यावर प्रेम केलं ती आरती त्याला परत हवी आहे. आपण तिला वाचवू शकलो नाही हि अपराधीपणाची भावना त्यालाही पोखरते आहे पण आरतीला सावरणं जास्त महत्वाचं आहे. विकासची भूमिका समर्थपणे साकारली आहे विनोद मेहरा यांनी. आजवर पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सर्व गाण्यांमधलं हे सर्वोत्तम गाणं आहे माझ्यामते. 

हजारो छटा घेऊन येतात गाण्यातील हे शब्द. आरतीला समजावत, थोपटून झोपवणारा, तिला पांघरूण घालणारा 'तो' अजूनच देखणा वाटतो. त्याच्या डोळ्यांत, त्याच्या स्पर्शात ती काळजी दिसते. अजूनही मी तुझ्या सोबतच आहे असं आश्वस्त करणारा भाव आणि शब्द .. गुलजार आणि ख्वाब एक कमाल chemistry दिसते गाण्यात. इथे प्रसंगानुरूप स्वप्नांना त्यांनी 'काच के ख्वाब' म्हटलं आहे. गुलझारचं हेच वैशिष्ठ्य आहे, कमी शब्दांत प्रचंड काही तरी सांगून जातात. किशोरदांचा आवाज कमालीचा उत्कट होतो.. एका विलक्षण प्रेमाची हळुवार गोष्ट आहे या गाण्यात... 

फिर वही रात है .. फिर वही रात है​, ख्वाब की ..
रातभर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे, फिर वही रात है  ​

Wednesday, April 5, 2023

देवबाभळी

उत्कृष्ट कलाकृती बघण्याचं नशिबात असावं लागतं आणि तो योग यावा लागतो हेच खरं.मागच्या आठवड्यात'देवबाभळी' नाटक बघितल्यावर विश्वास बसला. नाटकाच्या परतवारीच्या प्रवासात उशिरा का होईना हा योग आला. २०१७ साली रंगमंचावर आलेलं, साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित, अनेक पुरस्कारांचं मानकरी असलेलं, इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठानं बी ए अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं हे नाटक तसं बराच काळ खुणावत होतं. तुकोबांची पत्नी आवली आणि लखुबाई म्हणजेच रखुमाई हि या नाटकांतील दोन पात्र. या शिवाय दोघींच्या संवादातून भेटणारे तुकोबा आणि पांडुरंग... या चार जणांभोवती गुंफलेल्या कथेचा आपण सुद्धा मग एक भाग होऊन जातो, नकळत .. कसं ते उमजत नाही. 
 
तुकोबांसाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर न्याहारी घेऊन गेलेल्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो व तिची शुद्ध हरपते. तेव्हा साक्षात पांडुरंग येऊन तिच्या पायातील काटा काढतात व बेशुद्ध अवस्थेतील तिला घरी पोहोचवतात. इतकंच नाही तर गरोदर आवलीच्या मदतीकरता खुद्द रखुमाईला आवलीच्या घरी धाडतात. संसार वाऱ्यावर सोडून, घराकडे लक्ष न देता आपला नवरा विठ्ठलाच्या नादी लागलाय हि खंत असणारी व त्यामुळे विठ्ठलावर चिडलेली त्याला सतत बोल लावणारी आवली एकीकडे तर पांडुरंगावर रुसून अठ्ठावीस युगं त्याच्यापासून दूर असलेली रखुमाई दुसरीकडे.सुरवातीचे त्यांच्यातील खुसखुशीत संवाद पुढे खोल होत जातात, व्याकुळ करतात. दोघींच्या विलक्षण अभिनयातून स्त्री मनाचे कंगोरे, स्त्री मनाच्या वेदनेचे पदर अलगत उलगडत जातात. आवलीची ओढाताण,सतत कानोसा घेत तुकोबांना शोधतांना होणारी तिची घुसमट व त्यामुळे विठ्ठलाप्रती असलेला तिचा राग..तर कायम देहरूपाने सोबत असूनही आपल्या भक्तांमध्ये हरवलेल्या पांडुरंगावर रुसलेली, रागावलेली रखुमाई ... बहुदा या दोघींचं दुःख आपल्याला कधी दिसलंच नाही. दोन उत्तुंग मूर्तींच्या सावलीत मागे काय काय आहे ते कधी आपण पाहिलंच नाही. जे इथे समर्पक संवाद व तितक्याच सशक्त अभिनयातून आतवर पोहोचतं, भिडतं, सुन्न करतं.  

रंगमंचावर दिसणारं आवलीचं छोटंस झोपडी वजा घर, कोपऱ्यातील चूल,भांडी कुंडी, अंगण व जवळचा इंद्रायणीचा विस्तीर्ण काठ ... हेच तिचं जग. नवऱ्यावर तिचा राग आहे तरी, 'ह्यांनी लिवलेलं घरीदारी तर होतंच पण आता बाजारात पन पिच्छा सोडंना झालंय. म्हंजे आमचं येडं काही तरी शहानंच लिवत आसंल ना'.. असं कौतुक सुद्धा आहे. संसार करायला, घर चालवायला नवऱ्याने घरात फक्त शब्दांचं धन ठेवलंय याचा दोष ती त्याला देतंच नाही, देते त्याच्या देवाला. विठूच्या नावाने खडे फोडते. नवऱ्याची आपल्या शिवाय कोण काळजी घेणार म्हणून रोज न चुकता न्याहारी घेऊन त्याला डोंगर दरीत शोधत फिरते.. आज ना उद्या तुकोबा परत येतील अशी भाबडी आशा आहे तिला, जी तिच्या ओवीमधून झिरपत राहते ..  

अंधाराला अंधाराला दिशा नाही मेली,
ठेचकळ्या आभाळाला दवापट्टी केली, 
हात रंगल्याले शेणाच्या रंगात,
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात
दारावर लोक येई, "कसे माखले ग हात?" 
सांगते मी "शेन न्हाई, नवी मेंदीची ही जात"... 

दुसरीकडे आहे रखुमाई, अठ्ठावीस युगांचं एकटेपण सहन करणारी. देवत्व असूनही तिचं दुःख हुरहूर लावणारं आहे. तिचं रुसणं रास्त आहे ती म्हणते, 'कितीतरी वेळा जिवाचा पोहरा सोडलाय पांडुरंगाच्या डोहात, पण तो पांडुरंग मात्र राधेच्या, जनीच्या, गोरोबाच्या नाहीतर तुकोबांच्या मधे रमलाय'..

अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’ या कवितासंग्रहात एक अप्रतिम कविता आहे, ‘वामांगी’.. देवळात गेल्यावर एकट्या रखुमाईला पाहून तो विचारतो 'विठू कुठ गेला, दिसत नाही बाजूला', त्यावर रखुमाई म्हणते, 

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितल नाही ?

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं 
अठ्ठावीस युगांचं एकटेपण.. 

वाटलं, या कवितेतील 'ती' रखुमाई आज दिसली, साक्षांत समोर..

या रुसलेल्या रखुमाईला आवली म्हणते, 'असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये ? घरावर रुसून निघून गेले आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर ? मानूस विसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई..पाऊस येवो न येवो; आपण आपल्या वाट्याची नांगरट करत रहावी'.. रखुमाईच्या मनावरीच्या जखमेची खपली निघते. त्यावर आवलीच फुंकर घालते. एकमेकींच्या सहवासात वावरताना दोघींना एकमेकींची आणि सोबत स्वतःचीही नव्यानं ओळख होते. 

नाटक पाहताना एकेक प्रसंग, एकेक फ्रेम मनात घर करत राहते. तुकोबांनी लिहिलेली अभंगाची पाने वाऱ्याने उडतात आणि ती उडालेली पाने रखुमाई एक एक करत वेचते .. आवलीचा जखमी झालेला पाय आपल्या मांडीवर घेऊन रखुमाई त्यावर लेप लावते तेव्हा आपल्याही डोळयांत इंद्रायणी दाटते .. नदीचा तो विस्तीर्ण काठ, पाण्याचा आवाज, पाण्यावरचे तरंग, त्या दगडी पायऱ्या आपल्यालाही नदी काठी घेऊन जातात. 

रखुमाईने मायेनं केलेल्या औषधपाण्याने अखेरीस आवलीची जखम बरी होते, भरून येते. शांत झोपलेल्या आवलीला सोडून निघताना रखुमाई अडखळते. विठ्ठलाची मूर्ती न घेता आवलीने जखमेला बांधलेलं पांडुरंगाचं वस्त्र तेवढं सोबत घेऊन ती बाहेर पडते, मूर्ती तिथंच ठेवून. चेहऱ्यावर विलक्षण समाधान असलेली शांत पहुडलेली आवली व मागे उजळून जाणारी विठ्ठलाची सावळी मूर्ती व आसमंत भरून टाकणारा विठू नामाचा गजर ... इथे तुकोबा ऐकू येतात दिसत नाहीत, पांडुरंग दिसतो पण ऐकू येत नाही .. यातल्या प्रत्येकाचं समर्पण वेगळं. देवत्व लाभलेल्या रखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान तर संसारी आवलीच्या साध्या सोप्या सरळ प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी.. दोघींचा हा प्रवास अत्यंत तरल व बांधून ठेवणारा आहे .. 

या नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांच्या शब्दांत सांगायचं तर, 

दोन सख्या होत्या माझ्या 
रोज यायच्या नदीला
एक दुडूकी पोटुशी 
एक ठेंगणी उंचीला
दोघी रमायच्या काठी
तेव्हा रेंगाळत वेळ 
धुणी धुतल्या आठोनी
जसं खांद्यावर पीळ
दोघी कोण काय होत्या
कधी कळले ना नाते
भासायाच्या वैरिणी त्या
कधी माय लेकी वाटे
पोटूशीच्या कपाळाला
होतं चिरी गोल कुकू
ठेंगणीच्या नाकी तोरा
जरा धारधार रुसू
मिठीभर नांदायाच्या
काही कळायचे नाही
हसता का रडताहे
काही कळायचे नाही
थबकायच्या मधेच
हसतांना का उगीच
काही येत होते काठी
आत लोटायच्या आधीच
एक पाण्याला पाहून
अशी मोडायची बोटं
एक आभाळाला पाही
अन कटीवर हात 
पाणी नदीचं, धुण्याचं,
डोळ्यातलं खरं खार
काठी बसायाचो मी नि
टिपायचो सारं सारं
स्थळ काळ तो तो येई
त्या त्या पल्याड नदीला
मी हि ठरलेल्या वेळी
येई अल्याड नदीला
भेटी जाऊ जाऊ झालं
थेट जाणं नाही झालं
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं 
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं ... 
@प्राजक्त देशमुख

नाटक संपतं.. पण आपण मात्र दोघींच्या मनाच्या सावळ्या गाभाऱ्यात हरवून जातो..

@कविता सहस्रबुद्धे