देवबाभळी
उत्कृष्ट कलाकृती बघण्याचं नशिबात असावं लागतं आणि तो योग यावा लागतो हेच खरं.मागच्या आठवड्यात'देवबाभळी' नाटक बघितल्यावर विश्वास बसला. नाटकाच्या परतवारीच्या प्रवासात उशिरा का होईना हा योग आला. २०१७ साली रंगमंचावर आलेलं, साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित, अनेक पुरस्कारांचं मानकरी असलेलं, इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठानं बी ए अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं हे नाटक तसं बराच काळ खुणावत होतं. तुकोबांची पत्नी आवली आणि लखुबाई म्हणजेच रखुमाई हि या नाटकांतील दोन पात्र. या शिवाय दोघींच्या संवादातून भेटणारे तुकोबा आणि पांडुरंग... या चार जणांभोवती गुंफलेल्या कथेचा आपण सुद्धा मग एक भाग होऊन जातो, नकळत .. कसं ते उमजत नाही.
तुकोबांसाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर न्याहारी घेऊन गेलेल्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो व तिची शुद्ध हरपते. तेव्हा साक्षात पांडुरंग येऊन तिच्या पायातील काटा काढतात व बेशुद्ध अवस्थेतील तिला घरी पोहोचवतात. इतकंच नाही तर गरोदर आवलीच्या मदतीकरता खुद्द रखुमाईला आवलीच्या घरी धाडतात. संसार वाऱ्यावर सोडून, घराकडे लक्ष न देता आपला नवरा विठ्ठलाच्या नादी लागलाय हि खंत असणारी व त्यामुळे विठ्ठलावर चिडलेली त्याला सतत बोल लावणारी आवली एकीकडे तर पांडुरंगावर रुसून अठ्ठावीस युगं त्याच्यापासून दूर असलेली रखुमाई दुसरीकडे.सुरवातीचे त्यांच्यातील खुसखुशीत संवाद पुढे खोल होत जातात, व्याकुळ करतात. दोघींच्या विलक्षण अभिनयातून स्त्री मनाचे कंगोरे, स्त्री मनाच्या वेदनेचे पदर अलगत उलगडत जातात. आवलीची ओढाताण,सतत कानोसा घेत तुकोबांना शोधतांना होणारी तिची घुसमट व त्यामुळे विठ्ठलाप्रती असलेला तिचा राग..तर कायम देहरूपाने सोबत असूनही आपल्या भक्तांमध्ये हरवलेल्या पांडुरंगावर रुसलेली, रागावलेली रखुमाई ... बहुदा या दोघींचं दुःख आपल्याला कधी दिसलंच नाही. दोन उत्तुंग मूर्तींच्या सावलीत मागे काय काय आहे ते कधी आपण पाहिलंच नाही. जे इथे समर्पक संवाद व तितक्याच सशक्त अभिनयातून आतवर पोहोचतं, भिडतं, सुन्न करतं.
रंगमंचावर दिसणारं आवलीचं छोटंस झोपडी वजा घर, कोपऱ्यातील चूल,भांडी कुंडी, अंगण व जवळचा इंद्रायणीचा विस्तीर्ण काठ ... हेच तिचं जग. नवऱ्यावर तिचा राग आहे तरी, 'ह्यांनी लिवलेलं घरीदारी तर होतंच पण आता बाजारात पन पिच्छा सोडंना झालंय. म्हंजे आमचं येडं काही तरी शहानंच लिवत आसंल ना'.. असं कौतुक सुद्धा आहे. संसार करायला, घर चालवायला नवऱ्याने घरात फक्त शब्दांचं धन ठेवलंय याचा दोष ती त्याला देतंच नाही, देते त्याच्या देवाला. विठूच्या नावाने खडे फोडते. नवऱ्याची आपल्या शिवाय कोण काळजी घेणार म्हणून रोज न चुकता न्याहारी घेऊन त्याला डोंगर दरीत शोधत फिरते.. आज ना उद्या तुकोबा परत येतील अशी भाबडी आशा आहे तिला, जी तिच्या ओवीमधून झिरपत राहते ..
अंधाराला अंधाराला दिशा नाही मेली,
ठेचकळ्या आभाळाला दवापट्टी केली,
हात रंगल्याले शेणाच्या रंगात,
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात
दारावर लोक येई, "कसे माखले ग हात?"
सांगते मी "शेन न्हाई, नवी मेंदीची ही जात"...
दुसरीकडे आहे रखुमाई, अठ्ठावीस युगांचं एकटेपण सहन करणारी. देवत्व असूनही तिचं दुःख हुरहूर लावणारं आहे. तिचं रुसणं रास्त आहे ती म्हणते, 'कितीतरी वेळा जिवाचा पोहरा सोडलाय पांडुरंगाच्या डोहात, पण तो पांडुरंग मात्र राधेच्या, जनीच्या, गोरोबाच्या नाहीतर तुकोबांच्या मधे रमलाय'..
अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’ या कवितासंग्रहात एक अप्रतिम कविता आहे, ‘वामांगी’.. देवळात गेल्यावर एकट्या रखुमाईला पाहून तो विचारतो 'विठू कुठ गेला, दिसत नाही बाजूला', त्यावर रखुमाई म्हणते,
कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितल नाही ?
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगांचं एकटेपण..
वाटलं, या कवितेतील 'ती' रखुमाई आज दिसली, साक्षांत समोर..
या रुसलेल्या रखुमाईला आवली म्हणते, 'असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये ? घरावर रुसून निघून गेले आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर ? मानूस विसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई..पाऊस येवो न येवो; आपण आपल्या वाट्याची नांगरट करत रहावी'.. रखुमाईच्या मनावरीच्या जखमेची खपली निघते. त्यावर आवलीच फुंकर घालते. एकमेकींच्या सहवासात वावरताना दोघींना एकमेकींची आणि सोबत स्वतःचीही नव्यानं ओळख होते.
नाटक पाहताना एकेक प्रसंग, एकेक फ्रेम मनात घर करत राहते. तुकोबांनी लिहिलेली अभंगाची पाने वाऱ्याने उडतात आणि ती उडालेली पाने रखुमाई एक एक करत वेचते .. आवलीचा जखमी झालेला पाय आपल्या मांडीवर घेऊन रखुमाई त्यावर लेप लावते तेव्हा आपल्याही डोळयांत इंद्रायणी दाटते .. नदीचा तो विस्तीर्ण काठ, पाण्याचा आवाज, पाण्यावरचे तरंग, त्या दगडी पायऱ्या आपल्यालाही नदी काठी घेऊन जातात.
रखुमाईने मायेनं केलेल्या औषधपाण्याने अखेरीस आवलीची जखम बरी होते, भरून येते. शांत झोपलेल्या आवलीला सोडून निघताना रखुमाई अडखळते. विठ्ठलाची मूर्ती न घेता आवलीने जखमेला बांधलेलं पांडुरंगाचं वस्त्र तेवढं सोबत घेऊन ती बाहेर पडते, मूर्ती तिथंच ठेवून. चेहऱ्यावर विलक्षण समाधान असलेली शांत पहुडलेली आवली व मागे उजळून जाणारी विठ्ठलाची सावळी मूर्ती व आसमंत भरून टाकणारा विठू नामाचा गजर ... इथे तुकोबा ऐकू येतात दिसत नाहीत, पांडुरंग दिसतो पण ऐकू येत नाही .. यातल्या प्रत्येकाचं समर्पण वेगळं. देवत्व लाभलेल्या रखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान तर संसारी आवलीच्या साध्या सोप्या सरळ प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी.. दोघींचा हा प्रवास अत्यंत तरल व बांधून ठेवणारा आहे ..
या नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांच्या शब्दांत सांगायचं तर,
दोन सख्या होत्या माझ्या
रोज यायच्या नदीला
एक दुडूकी पोटुशी
एक ठेंगणी उंचीला
दोघी रमायच्या काठी
तेव्हा रेंगाळत वेळ
धुणी धुतल्या आठोनी
जसं खांद्यावर पीळ
दोघी कोण काय होत्या
कधी कळले ना नाते
भासायाच्या वैरिणी त्या
कधी माय लेकी वाटे
पोटूशीच्या कपाळाला
होतं चिरी गोल कुकू
ठेंगणीच्या नाकी तोरा
जरा धारधार रुसू
मिठीभर नांदायाच्या
काही कळायचे नाही
हसता का रडताहे
काही कळायचे नाही
थबकायच्या मधेच
हसतांना का उगीच
काही येत होते काठी
आत लोटायच्या आधीच
एक पाण्याला पाहून
अशी मोडायची बोटं
एक आभाळाला पाही
अन कटीवर हात
पाणी नदीचं, धुण्याचं,
डोळ्यातलं खरं खार
काठी बसायाचो मी नि
टिपायचो सारं सारं
स्थळ काळ तो तो येई
त्या त्या पल्याड नदीला
मी हि ठरलेल्या वेळी
येई अल्याड नदीला
भेटी जाऊ जाऊ झालं
थेट जाणं नाही झालं
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं ...
@प्राजक्त देशमुख
नाटक संपतं.. पण आपण मात्र दोघींच्या मनाच्या सावळ्या गाभाऱ्यात हरवून जातो..
@कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment