फिर वही रात है..
किशोरदांचा आवाज, पंचमदांचं संगीत व गुलझारसाहेबांचे शब्द .. या त्रिकुटाने कितीतरी सुरेख चिरतरुण गाणी दिली आहेत आपल्याला आणि हे त्यातलंच एक कमाल गाणं. ज्या situation वर चित्रपटांत ते येतं तेव्हाचे भाव, अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतात या गाण्यातून. घर या चित्रपटातील हे गीत पडद्यावर साकारलंय विनोद मेहेरा व रेखा यांनी. हे गाणं ऐकतांना पाणवणारे डोळे, पडद्यावर ते बघतांना कधी झरझर वाहू लागतात कळतंच नाही.
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्याच विश्वात हरवलेले, रमलेले विकास आणि आरती. एक दिवस रात्री चित्रपट पाहून परत येत असतांना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्या आघाताने आरती मुळापासून कोसळते. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा तिचं जगणं अवघड करतात. आरतीची भूमिका प्रचंड ताकतीने साकारणारी रेखा आपल्याला ही अस्वस्थ करते. मनोमन उध्वस्त झालेलं, खचलेलं तिचं रूप विकास पाहू शकत नाही आणि मग सुरू होते त्याची केविलवाणी धडपड, तिला परत आपल्या जगात आणण्याची. जिच्यावर प्रेम केलं ती आरती त्याला परत हवी आहे. आपण तिला वाचवू शकलो नाही हि अपराधीपणाची भावना त्यालाही पोखरते आहे पण आरतीला सावरणं जास्त महत्वाचं आहे. विकासची भूमिका समर्थपणे साकारली आहे विनोद मेहरा यांनी. आजवर पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सर्व गाण्यांमधलं हे सर्वोत्तम गाणं आहे माझ्यामते.
हजारो छटा घेऊन येतात गाण्यातील हे शब्द. आरतीला समजावत, थोपटून झोपवणारा, तिला पांघरूण घालणारा 'तो' अजूनच देखणा वाटतो. त्याच्या डोळ्यांत, त्याच्या स्पर्शात ती काळजी दिसते. अजूनही मी तुझ्या सोबतच आहे असं आश्वस्त करणारा भाव आणि शब्द .. गुलजार आणि ख्वाब एक कमाल chemistry दिसते गाण्यात. इथे प्रसंगानुरूप स्वप्नांना त्यांनी 'काच के ख्वाब' म्हटलं आहे. गुलझारचं हेच वैशिष्ठ्य आहे, कमी शब्दांत प्रचंड काही तरी सांगून जातात. किशोरदांचा आवाज कमालीचा उत्कट होतो.. एका विलक्षण प्रेमाची हळुवार गोष्ट आहे या गाण्यात...
फिर वही रात है .. फिर वही रात है, ख्वाब की ..
रातभर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे, फिर वही रात है
No comments:
Post a Comment