जब वी मेट
संध्याकाळची आठ वाजताची ट्रेन एक नाही, दोन नाही, तर चक्क चक्क चार तास लेट झाली ते पण पुण्याला जाणारी. बरं हे समजलं कसं तर ट्रॅकर वर गाडीचं live location बघण्याचं सुचलं ते पण जेव्हा मेसेज मिळाला गाडी लेट आहे. बाहेरच्या उन्हाने चाळीशी ओलांडली असतांना आम्ही हॉटेलच्या थंडगार AC रूम मध्ये निवांतपणे दुपारचा चहा घेत होतो तेव्हाच हा सुखद धक्का बसला.बरं आता करायचं काय? ते पण सुचेना. 'रेल्वेचं तिकीट कॅन्सल करून बस ने जावं का' हा विचार आला मनांत पण नवीन शहरात काहीही माहित नसतांना आम्ही दोघी मैत्रिणींनी कोणताही धाडसी निर्णय न घेता क्षणभर PAUSE घेतला. मग दुसऱ्याच क्षणी मी ऑफिसचं ट्रॅव्हल बुकिंग करणाऱ्या सुरेखा मॅडमला फोन लावला. बरं फोन लावला तेव्हा वाटलं, दोन तीन तास आधी कसं काय मिळेल तिकीट कोणत्याही ट्रेनच ते सुद्धा कन्फर्म तिकीट, वेड्यात काढेल यार कोणी पण, तरी वाटलं विचारायला काय हरकत आहे. आणि नशीब कसं असतं पहा, नेमकं त्याच दिवशी सिझन स्पेशल म्हणून चक्क चक्क हमसफर ट्रेन सुरु झाली होती. हे ऐकून तर कानावर विश्वासच बसेना कि आजच एखादी ट्रेन सिझन स्पेशल म्हणून सुरु काय होते आणि आम्हाला त्याच ट्रेनच कन्फर्म तिकीट काय मिळतं. मग काय त्याच आनंदात लेट झालेल्या ट्रेनच तिकीट आम्ही कॅन्सल केलं व नवीन eतिकीट मोबाईलवर झळकताच खुशीत स्टेशन गाठलं.
संध्याकाळची वेळ, अंधार पडायला सुरवात झालेली. सुनसान स्टेशन व तुरळक माणसं हे चित्र तसं विरळच.त्या लहान स्टेशन वर चेन्नई, मुंबई, पुरीला जाणाऱ्या सर्वच गाड्यांची माहिती सांगितली जात होती, जसं कोणत्या प्लॅटफॉर्म वर, किती वाजता वगैरे वगैरे. पण आमच्या गाडीचं काही नावच नाही. मी म्हटलं सुद्धा मैत्रिणीला, 'जाऊन बघून येऊ का जरा कि आपल्या गाडीबद्दल काहीच का सांगत नाहीयेत ? किमान यांना तरी माहिती आहे ना कि आजपासून नवीन गाडी सुरु झालीये म्हणून'... मी खरंच जाईन कि काय म्हणून मैत्रिणीने जरा थांबवलं मला. तिथे बाजूलाच बसलेल्या एक जोडप्याला विचारलं 'त्यांना कुठे जायचंय' म्हणून, त्यांनी 'पुण्याला' म्हणताच आम्हा दोघींच्या जीवात जीव आला, म्हणजे पुण्याची गाडी खरंच येणार होती. इतक्यात आमच्या गाडीची दुरूनच झलक दिसली. तिच्या स्वागतावेळी झालेली ती अनाऊन्समेंट कानांत साठवत आम्ही समोर येणाऱ्या त्या गाडीला डोळे भरून पाहू लागलो. 'इस गाडी कि किमत तुम क्या जानो रमेश बाबू' असं झालं होतं. गाडी थांबताच आम्ही आत चढलो. हा क्षण येईपर्यंत धाकधूक होती की खरंच आहे ना अशी नवीन गाडी नाहीतर 'जे तिकीट होतं ते कॅन्सल केलेलं आणि नवीन गाडीचा पत्ता नाही'असं व्हायचं. फायनली आम्ही गाडीत बसलो होतो, वाह वाह .. 'सुरेखा सुरेखा अग आमची ही ट्रेन मिस झाली ग,आता अजून कुठली आहे का ग दुसरी ट्रेन' असं मी मुद्दाम हेल काढत फोनवर बोलण्याची नक्कल केली बसल्यावर, ते ऐकून मैत्रिणीने 'गप गss',असं म्हणतं दिलेली चापटी खात आम्ही पोटभर हसलो. एकदाचं हुश्श झालं होतं आणि मग लक्षांत आलं ही नवीन गाडी अगदीच रिकामी आहे. आठ जणांच्या कंपार्टमेंट मध्ये जेमतेम तीन टाळकी होती सगळीकडे त्यामुळे कुपे बुक केल्याचा फील आला.
थोड्या वेळाने हॉटेल मधल्या कूक नि दिलेली दाल खिचडी खाऊन पोट भरलं आणि जवळचं पाणी संपल्याची जाणीव झाली. मग काय पुढच्या स्टेशन वर गाडी थांबणार होती तिथे पाण्याची बाटली घ्यावी असं ठरवलं. स्टेशन आलं, गाडी थांबली, मी दारातून वाकून पाहिलं तर स्टॉल बराच पुढे होता. उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. उतरावं की नाही असा क्षणभर विचार करून उतरले एकदाची. जवळपास पळतच गेले स्टॉल वर.अजून चार माणसं उभी होती काही न काही घ्यायला त्यात मी बाजूने एन्ट्री घेतली. 'भैय्या एक पानी की बॉटल देना जल्दी'..असं म्हणत वीस रुपये ठेवले काउंटर वर. 'पंधरा रुपये मॅडम, पाच रुपये change देना'.. 'अरे भैय्या नहीं है पाच रुपये मेरे पास', असं मी म्हणताच त्याने समोर ठेवलेली बाटली परत घेतली. 'अरे भैय्या ये बीस रुपये रखो, बॉटल तो दो'.. 'नही नही, आप पाच रुपए दो छुट्टा'..'अरे भैय्या मेरी ट्रेन छुट जायेगी'.. 'नही जाएगी मॅडम'.. जब वी मेट मधला तो माझा आवडता सिन आठवला. मगाशी जिथे ट्रेन मध्ये बसलो होतो त्या सूनसान स्टेशनचा फोटो मी स्टेटस वर टाकला होता काही वेळापूर्वी आणि लिहिलं होतं, "भटिंडा व्हाया रतलाम".. तर त्या फोटोवर मैत्रिणींच्या कमेंट्स पण आल्या, 'आदित्य कश्यप काही भेटणार नाहीए त्यामुळे पाणी घ्यायला वगैरे अजिबात उतरू नका'.. मी ते आठवून, सारख्या समोर येणाऱ्या त्या शाहिद कपूरला बाजूला करत म्हणाले "अरे भैय्या पानी का बॉटल तो दो, ट्रेन निकल जायेगी मेरी".. असं म्हणताच भैय्या जागा झाला, म्हणाला "और दस रुपया दो और दो बॉटल ले लो".. अरे राम.. घे बाबा घे, अजून दहा रूपये घे पण पाणी दे.. असं मनातल्या मनात पुटपुटत मी दोन बाटल्या घेतल्या. ती 'गीत' जास्त पैसे घेतले म्हणून भांडत होती सिनेमात आणि इथे मी जास्त पैसे देत होते पण त्याला ते नको होते .. बरं हे सर्व संभाषण होत असताना मी एक सारखं मागे वळून बघत होते, गाडी सुरू तर होत नाहीये ना... कारण रिस्क कशी घेणार,आमचा राज, आमचा आदित्य कश्यप सोबत थोडीच होता, तो घरीच असल्याने ना ट्रेन चुकवून चालणार होतं ना त्या काउंटर वर पाणी पीत बडबड करताना मागून हळूच निघून गेलेली ट्रेन बघणं.. मग काय त्या बाटल्या सावरत चढले ट्रेन मध्ये ..
एकूण काय तर प्रत्येक ट्रेन journey मध्ये 'जब वी मेट' सारखी स्टोरी नसते,मी आपली माझी स्टोरी सांगितली !
© कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment