Friday, July 28, 2023

 शुक्रवारी किंवा शनिवारी डिनर डेट वर गेलं कीच रोमँटिक couple's दिसतात असं नाही तर रविवारी भाजी मंडईत सुद्धा गोड जोड्यांची व्हरायटी बघायला मिळते. अर्थात इथला गोडवा वेगळा असतो. रविवारी आम्ही दोघं भाजी आणायला गेलो होतो, नेहमीपेक्षा थोडं लवकर. फारशी गर्दी नव्हती. बरं जोडीनं गेलो म्हणजे भाजीच्या पिशव्या पकडायला किंवा 'बरेच दिवसांत ही भाजी नाही बनवलीस ही घे' असं म्हणायला किंवा 'तू भाजी घेई पर्यंत मी फळं घेतो' असं म्हणायला हा सोबत नसतोच. माझी आठवडाभर लागणारी भाजी, फळं, अंडी, तर कधीतरी पॅटिस घेऊन होईपर्यंत तो आपला 'फोटोग्राफी' मध्ये रमलेला असतो. बरं, इथे subject ची तशीही काही कमी नसते, मस्त variety असते .. टोपलीभर छान रचून ठेवलेले लाल बुंद टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, कोबी, पावटा, गवार, श्रावण घेवडा, पालक, मेथी, पुदिना, माठ, नवलकोल, चवळई अशा वेगवेगळ्या भाज्यांनी ओसंडून वाहणारे भाजीचे ठेले चहुबाजूनी खुणावत असतात. हिरवी लाल पिवळी ढोबळी मिरची, लेट्युस, ब्रोकोली, कॉर्न च्या सोबतीला सध्यातर कर्टुली सारख्या रानभाज्या पण आहेत. मग काय, कॅमेऱ्यातील मोड बदलून, लॉन्ग शॉर्ट, close up असे बहुढंगी बहुरंगी फोटो काढण्यात आमचे 'अहो' हरवून जातात. बरं एकाच ठेल्या वरच्या वेगवेगळ्या भाज्यांचा फोटो काढला तर बाकीच्यांवर अन्याय नाही का होणार मग काय इकडचे टोमॅटो, बाजूची वेगवेगळ्या कडधान्यांची मोडावलेली रूपं, तिकडच्या भुईमुगाच्या शेंगा, समोरच्या जर्द जांभळाच्या टोपल्या, काश्मीर वरून आलेली लाल चुटुक सफरचंद पटापट कॅमेऱ्यात कैद होत असतात. जिथे फोटो घेताना थोडं जास्त घुटमळायला होतं तिथे ते दुकान सांभाळणाऱ्या चार टाळक्यातला एक जण काम सोडून फोटो बघायला येतो आणि 'माझी भाजी किती छान दिसते आहे ना फोटोत', या आविर्भावात कमालीचा सुखावतो. बरं इतकंच नाही तर 'सर, मी काढतो ना फोटो तो असा नाही येत', असं कोणी म्हटलं कि त्याला solution पण मिळतं. त्यामुळे मी तिथे 'एक सामान्य ग्राहक' असते आणि त्याचा तर भावच वेगळा असतो. आज काल तर सोमवार ते शुक्रवार भाजीचे फोटो WA वर येतात .. आमचा भाजीवाला पाठवतो, का तर म्हणे रोज काय काय available आहे ते समजायला आणि यातलं काही हवं आहे का ते विचारायला. बरं रविवारी इतकी भाजी घेतलीये मग कशाला लागतंय काही अधे मध्ये पण नाही. असं वाटतं त्याला WA वर सांगावं, 'अरे साहेबांचा नंबर देते, त्यांना पाठव फोटो, ते सांगतील काय हवं ते'..


तर मी काय सांगत होते हां, मंडईत रविवारी सकाळी दिसणाऱ्या गोड जोड्यांबद्दल.. तर झालं काय, रविवारी मी ठरलेल्या दुकानांत गेले भाजी घ्यायला तर तिथे एक आजी आजोबा भाजी घेत होते.आजी एकदम टिपिकल, कॉटनची छान काठा पदराची साडी, मानेवर छोटासा आंबाडा, त्यावर चाफ्याची दोन फुलं, एका हातात काठी .. तर आजोबा पांढरा स्वच्छ कुर्ता पायजमा, सोनेरी काड्यांचा चष्मा अशा पेहेरावात होते. त्यांच्या एका हातात भाजी घ्यायला पसरट बास्केट होती आणि त्यात ते निवडून निवडून काकडी टाकत होते. मी एक क्षण बघितलं, मनांत म्हटलं 'वाह यार, किती गोड, या वयात सुद्धा किती उत्साहाने भाजी घेतायेत दोघं'….. मग दुसऱ्या क्षणी दिसलं आजोबा एक एक काकडी निवडून ती बास्केट मध्ये ठेवत होते आणि आजी, आजोबांनी निवडलेली ती काकडी कशी बरोबर नाही हे सांगत ती काकडी परत टोपलीत टाकत होत्या. तीच गत पुढे टोमॅटोची .. 'अहो, हा पहा, हा कसा आहे टोमॅटो तसे घ्यायचे. हा नको'... ओह गॉड, म्हणजे पंचवीस वर्षात जे आमच्याकडे जमलं नाहीये ते इथे पन्नास वर्षांनंतर सुद्धा जमलं नव्हतं तर.. एकूण काय हे नातं कितीही गोड असलं, मुरलेलं असलं तरी काही front वरती मात्र हा गोडवा सारखाच असतो हे मात्र खरं !

© कविता सहस्रबुद्धे

No comments:

Post a Comment