वेलकम होम
काही चित्रपट स्वतःशी संवाद साधायला लावतात, हा त्याच पठडीतला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या जोडीची एक खास कलाकृती. चित्रपटाची कथा, संवाद सुमित्रा भावे यांचे. ज्याने त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे अर्थ काढावा, बोध घ्यावा असा हा चित्रपट. लग्न, कुटुंबसंस्था, नातेसंबंध आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं स्वतःच घर या संकल्पनेबद्दल केलेलं भाष्य आहे यांत. इवल्याशा कॅनव्हास वर केवढं तरी मोठ्ठं लोभस चित्र रेखाटणारा हा चित्रपट, नात्यांमधली उब हळुवार उलगडून दाखवत शेवटी नात्यांबद्दल आश्वस्त करतो.
विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉक्टर सौदामिनीची गोष्ट आहे यात. नवऱ्याकडून 'स्पष्ट संवाद' आणि 'पारदर्शी विश्वास' इतकीच अपेक्षा असणारी ती. दिवस इथे संपला आणि रात्र इथे सुरु झाली तो क्षण जसा सापडत नाही तसंच ते नातं कुठवर होतं आणि कुठून पुढे ते अस्पष्ट व्हायला लागलं हे तिलाही समजत नाही. शेवटी तुटत तुटत आलेला तो घागा ती एका क्षणी कापून टाकते, त्याला तसं हवं होतं म्हणून .. मग आयुष्याच्या याच वळणावर तिला प्रश्न पडतो आपलं नेमकं घर कोणतं? लग्नानंतर माहेर आपलं घर असतं की नवऱ्याचं घर हेच आपले घर? की यापैकी कोणतंच घर आपलं नाही .. मग अशा परिस्थितीत जिद्दीने स्वतःचा शोध घेऊ पाहणारं तिचं मन, सोबत येणारी आव्हानं व ती पेलू शकू हा हळूहळू निर्माण होणारा विश्वास व तिचा तिच्या घराचा शोध.. या सर्व प्रवासाची गोष्ट म्हणजे वेलकम होम !
यात 'घर' एक सारखं भेटत राहतं, कधी 'अतिक्रमणाची माणसं आलीत घर पाडायला म्हणून आई नाही येणार कामाला', या कामवाल्या मावशींच्या मुलीच्या निरोपात, तर कधी रेडिओवरच्या 'मै तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे'.. या ओळींमधून. सौदामिनीच्या आईला एका प्रसंगी तिच्या आईचे शब्द आठवतात,'सणासुदीला माहेरी येणं वेगळं आणि भांडून माघारी येणं वेगळं' इथेही तिला तिच्या घराची ओळख करून दिली जाते. सौदामिनीच्या आजीचा तिच्या स्वतःच्या खोलीसाठीचा संघर्ष व तिच्या नावावर कधीच कुठलं घर नसल्याची खंत मधूनच डोकावते. वडिलोपार्जित घराचे तुकडे विकण्याच्या तयारीत असलेली मावशी दिसते.चाळीशी आली पण अजून सगळा गोंधळच आहे हे मान्य करणारी एकटेपणा, कंटाळा, भांडण यांत अडकलेली, तो कमावतो मी माझं आयुष्य जगते, त्याला सोडून जाऊ कुठे म्हणून न पटूनही त्याच घरात राहणारी अमेरिकेतली तिची मैत्रीण सुद्धा आयुष्यातील घराचं महत्व ठळकपणे अधोरेखित करते. 'एकटं अदृश्य होऊन गप्प बसावसं वाटतंय एखाद्या तळ्याशी जिथे शांतताच स्वतः निवारा शोधत आलेली असेल' .. यासारखे संवाद सुद्धा घर या संकल्पनेपाशीच येऊन थांबतात. प्रत्येकाचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःला हव्या असणाऱ्या जागेचा शोध अखंड सुरू आहे असं वाटत.
काही सामान आणायला परत घरी गेल्यावर नवऱ्याने कुलूप बदललं म्हणून तुटणारी सौदामिनी, नवीन किल्ली करून घर उघडल्यावर पसरलेलं घर नीट आवरणारी, सर्व गोष्टी जिथल्या तिथे लाऊन परत निघतांना उंबऱ्यात अडखळून मागे वळून स्वतःच्या हातानी सजवलेल्या आपल्या घराला डोळ्यात साठवणारी सौदामिनी अस्वस्थ करते. आपल्या वडिलांना, 'आप्पा मला माझं स्वतःच असं घरच नाही का',असा प्रश्न विचारते तेव्हा 'हे घर आपलं वाटल्याशिवाय तू आलीस का इथं' हा प्रतिप्रश्न विचारून आप्पा तिला आश्वस्त करतात. कुकी (मुलगी) आणि माई (सासूबाई) या दोघीना आपल्यशिवाय आयुष्य पेलण्याची ताकत नाही हे जाणून ती त्यांची जबाबदारी घेते. कारण 'ज्याला जबाबदारीची जाणीव असते, त्याला ती सांगावी लागत नाही, ती तो आपसूक घेतच असतो' हे ती जाणते. 'स्वतःच्या लाचारीची, शरीराची, मनाची, बुद्धीची किळस येते, सगळ्याला स्वच्छ आंघोळ घालावीशी वाटते'.. सारखे संवाद तिची हतबलता दाखवतात.
'पोरं आपली मग त्यांचे भार आपले' हे जाणून 'ज्याची माणुसकी जागी आहे तो संन्यासी अडकलेलाच राहणार' हे ओळखणारे आप्पा, 'उगीच कशाला वाढवायचं, पटलं नाही तर घर लगेच मोडून थोडंच टाकायचं असतं', ही समजूत घालणारी आई, नातं हि गोष्ट जबाबदारीनं निभावण्याची आहे हे भान असणारा भाऊ, प्रत्येकाची सुख दुःख वेगवेगळी असतात पण सारखीही असतात हे जो जाणेल तो आपला हा विश्वास असणारी मावशी तर तुझ्या आईचं घर तुझं नाही मग माझ्या आईच घर माझं कसं' हा प्रश्न विचारणारी मुलगी आणि आपल्या पद्धतीने साथ देणारी बहीण अशी सौदामीनीच्या आयुष्यातील तिची माणसं आपल्यालाही भेटतात.
या सर्वात लक्षांत राहतो, तिचा मित्र सुरेश.त्या दोघांमधील संवाद व न बोलता झालेलं संभाषण सहज सुंदर ! नेमकं त्याच वेळी 'राधे राधे गोविंद बोले रे' हे गीत ती फ्रेम अजूनच गडद करतं..'किर्रर्र रान, पाचोळ्यावर पडते पाऊल, स्वतःला स्वतःची लागे चाहूल'..सारख्या गीतातून तिला चाहूल लागते, स्वतःची स्वतःशी नव्यानं ओळख होते.जसं रामाच्या देवळातल्या बकुळीच्या झाडाचं एखादं हलकं बकुळीचं फुल अचानक गरगरत आपल्या पुढ्यात यावं तसं तिला तिचं घर गवसतं..
©कविता सहस्रबुद्धे
No comments:
Post a Comment