Wednesday, August 29, 2018

"मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ "...

अनुभव चित्रपटातील गुलजार साहेबांचे हे शब्द, गीता दत्त यांचा आवाज आणि कनू रॉय यांच संगीत . हे गाणं ऐकलं कि पुढचे कित्येक दिवस फक्त हेच गाणं गुणगुणावंस , ऐकावंस आणि पाहावसं वाटतं, इतकी जादू आहे या गाण्यांत. काल हे गाणं ऐकतांना मला जावेदजींच्या काही ओळी आठवल्या. एका कार्यक्रमांत जावेद अख्तर म्हणाले होते कि कोणत्याही गाण्यांत त्या गाण्याची धून म्हणजे त्या गाण्याचं शरीर , त्या गाण्यातील आवाज म्हणजे त्या शरीराचा आत्मा आणि त्यातील शब्द म्हणजे त्याच चरित्र असतं  !!!

गीतकाराने शब्दांत बांधलेल्या भावना गायकाला आपल्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात.   "घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा ", या विराणीतील शब्दांत वर्णन केलेला 'बासरी सारखा वाजणारा वारा' लतादींच्या आवाजात खरंच ऐकू येतो. तो आभास ज्ञानेश्वरांचे शब्द निर्माण करतातच आणि त्या चित्रापर्यंत दीदी आपल्याला घेऊन जातात. "रुणु झुणु रुणु झुणु रे भ्रमरा सांडी तू अवगुणु रे भ्रमरा, सुमनसुगंधू रे भ्रमरा परिमळु विद्रदु रे भ्रमरा", या ओळींमधला चंचल मनाला केलेला उपदेश व लपलेला खोल अर्थ लताबाईंच्या आवाजातून अलवार उलगडतो.ज्ञानेश्वरांनी जितके गोड शब्द वापरलेत तितक्याच गोड आवाजात ते गाणं ऐकू येतं आणि खूप जवळचं वाटतं. "मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं , जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते गं ".. या कवितेत भट साहेबांनी सासरी गेलेल्या मुलीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईच्या मनाची व्यथा जितक्या हळुवार पणे मांडली आहे  ती तितक्याच ताकतीने लताजींनी आपल्या पर्यंत पोहोचवली आहे आणि म्हणूनच हे गाणं ऐकतांना प्रत्येक आई आणि मुलीचे डोळे भरून येतातं.

या शब्द आणि आवाजाच्या जादूवर आपण सगळेच प्रेम करतो. पण या शब्द आणि आवाजाच्या जादूला जेव्हा पडद्यावर त्याच ताकतीचा चेहेरा मिळतो तेव्हा त्याला आपण Visual Treat म्हणतो.

"मेरी जाँ , मुझे जाँ न कहो मेरी जाँ , मेरी जाँ ".. हे गाणं खऱ्या अर्थाने आपल्यासाठी Treat आहे. गुलजारजींच्या शब्दांना गीता दत्त यांच्या आवाजात ऐकायचं आणि संजीवकुमार व तनुजा यांना ते साकारतांना पाहायचं , क्या बात हें !!!

रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो.. आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते. त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव व क्षणांत पसरलेले ते निखळ हसू .. या फ्रेम मधेच आपण त्याच्या प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं.

बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला भिजवणारा पाऊस...

तनुजा यांच्या वर चित्रित झालेलं माझं सर्वांत आवडतं गाणं..संजीवकुमार तर आपल्याला त्यांच्या प्रेमातच पाडतात या गाण्यांत. रोमँटिक गाण्यांच्या यादीत या गाण्याला विशेष जागा मिळावी इतकं खास आहे हे गाणं. जबरदस्त फ्रेम्स, कॅमेऱ्यात पकडलेले उत्कृष्ट close ups, बॅक लाईटची जादू त्या क्लासिक माहोल मध्ये आपल्यालाही घेवून जाते.... आणि मग ओठांवर तेच शब्द येतात," मेरी जाँ, मुझे जाँ ना कहो मेरी जाँ.."

- कविता

Saturday, August 18, 2018

श्रावण ...

तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर ....दिव्याची आवस म्हणून जाड कणिक व केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप... म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल !!
डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागत...ासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर !!
जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा आघाडा फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन !!
श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध !!
श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, मुलांना भरभरून मिळावं म्हणून आईने केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनी बहिणीकडे झालेलं सौवाष्ण जेवण आणि मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर... प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण !!
श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण !!
श्रावण म्हणजे हिरवा ऋतु .. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण.. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण !!
श्रावण म्हणजे आठवणींची सर.. श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल... श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण.. श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी.. श्रावण म्हणजे देव्हाऱ्यासमोर समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप.. श्रावण म्हणजे आई तुझ्या आठवणींचा पाऊस !!!

- कविता
बॉर्डर ...मागच्या रविवारी बऱ्याच दिवसांनी हा सिनेमा पाहिला आणि जाणवलं कोणताही सिनेमा आपण जेव्हा परत पाहतो तेव्हा त्यातील काही गोष्टी नव्याने उलगडतात, नव्याने समजतात... काल जेव्हा या सिनेमातील जावेद अख्तर यांनी लिहिलेलं "संदेशे आते हे, हमें तडपाते हें, कि चिठ्ठी आती हें, वो पुछे जाती हें, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना हें ".. हे गाणं ऐकलं, पाहिलं तेव्हा अंगावर काटा आला.  खरं तर खूप वेळा हे गाणं ऐकलंय, पाहिलंय पण काल नव्याने अनुभवलं... अलीकडे सैनिकांवरची काही पुस्तकं तसेच काही अभ्यासपूर्ण लेख प्रामुख्याने वाचल्यामुळे मी relate करू शकले आणि मग या गाण्यांत लपलेला  खोल अर्थ कुठेतरी स्पर्शून गेला, असं वाटलं ....

आपलं मन कसं स्वार्थी असतं ना .. हे गाणं ऐकलं तेव्हा असाच एक स्वार्थी विचार मनांत आला. एक मन म्हणालं खरंच मी नशीबवान, असं पत्र मला नाही लिहावं लागलं कधी आणि अशा पत्रांतून राखी सुद्धा पाठवावी लागली नाही .. पण दुसऱ्याच क्षणी विचार आला,  ज्यांना असं पत्र लिहावं लागत त्यांच काय ?

पत्र ...खरंच, किती महत्व आहे याच काही जणांच्या आयुष्यात आणि काही जणांच्या आयुष्यातून तर पत्रच हरवून गेलंय. जिथून परत यायची शाश्वती नाही अशा लढाईवर निघतांना त्या सीमेवरती, आपल्या आई वडिलांसाठी, भावासाठी, बायकोसाठी पत्र लिहिणारा सैनिक आपल्या सगळ्या भावना जातांना त्या कागदावर उतरवून जातो आणि नंतर त्या शब्दांमधून पुन्हा पुन्हा भेटत राहतो. कारगिल युद्धांवर जातांना कॅप्टन विक्रम बात्रा ने आपल्या जुळ्या  भावाला लिहिलेल पत्र वाचून खरोखर निःशब्द व्हायला होतं ...

पत्र हि किती खास गोष्ट आहे नाही .. ज्यानी लिहिलंय आणि ज्याच्यासाठी लिहिलंय त्या प्रत्येकासाठी. पत्रात  लिहिलेल्या अक्षरांत जेवढ्या भावना मावतात ना तेवढ्या ओठांवर येऊच शकत नाहीत असं वाटतं कधी कधी...

"चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है .. चिट्ठी आई हें वतन से चिट्ठी आई हें
बडे दिनों के बाद हम बे -वतनों को याद.. वतन कि मिट्टी आई हें "
आपण प्रत्येकाने ऐकलेलं हे गाणं... या गाण्यांत आनंद बक्षींनी किती सुंदर शब्द वापरलेत..वतन से चिट्ठी आई  म्हणून खुश होणारा तो आणि 'आजा , उम्र बहोत हें छोटी' या ओळींतून त्याला परत बोलवणारं कोणी ..

प्रत्येक पत्राची गोष्ट वेगळी, भाव वेगळा..लिहिणारा वेगळा , वाचणारा वेगळा.. पत्र , भावनांच प्रतिबिंब भासाव असा उत्कट संवाद साधणारं माध्यम . बहुदा म्हणूनच अनेक गीतकारांना याच पत्रांतून व्यक्त व्हावसं वाटलं..

नीरज यांच्या शब्दांत हेच पत्र किती सुरेख आभास निर्माण करतं ...
'लिखे जो खत तुझे, वो तेरी याद में , हजारो रंग के नजारे बन गये
सवेरा जब हुआ तो फुल बन गये , जो रात आई तो सितारे बन गये '...

हसरत जयपुरी अशाच एका पत्रातून पत्राच्या सुरवातीलाच होणारा गोंधळ उलगडून दाखवतात.
'मेहेरबां लिखूं हसीना लिखूं या दिलरुबा लिखूं
हैरान हूँ कि आपको इस खत में क्या लिखूं ?'
कशी सुरवात करू तुला पत्र लिहितांना ...

मग कधी अनपेक्षित पणे आलेलं पत्र पाहून चित्र काहीसं असंच होतं ...
"पत्र तुझे ते येता अवचित , लाली गाली खुलते नकळत
 साधे सोपे पत्र सुनेरी, नकळे क्षणभर ठेवू कुठे मी" ....

पत्रातून प्रेमाची कबुली देणं किती सोपं आहे ना .. समोर जे बोलता येत नाही ते पत्रांतून सांगायच ..
'फुल तुम्हे भेजा हें खत में , फुल नही मेरा दिल हें
प्रियतम मेरे मुझको लिखना, क्या ये तुम्हारे काबील हें
प्यार छुपा हें खत में इतना जितने सागर में मोती .. "
किती निखळ, निरागस प्रेम.. पत्रातून व्यक्त होणारं ...

इजाजत मध्ये गुलजार साहेबांनी लिहिलेल्या पत्रामधील या ओळी ऐकून तर वेड लागतं ...

मेरा कुछ सामान , तुम्हारे पास पडा हैं
सावन के कूछ भीगे भीगे दिन रखे हैं
और मेरे एक खत में लिपटी रात पडी हैं
वो रात बुझा दो मेरा वो सामान लौटा दो ...

किती रंग उलगडून दाखवलेत या पत्रात त्यांनी .. दूर जाण सुद्धा इतकं रोमँटिक असू शकत.. पत्रांतून इतक्या सहजपणे ते सार काही परत मागता येतं ?

किती वेगवेगळ्या भाव भावनांचा रंग उलगडतो या पत्रांमधून.. असाच एक रंग सापडतो इंदिरा संत यांच्या कवितेमधून..

पत्र लिही पण नको पाठवू शाईमधूनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधूनी नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवईमधली नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून
नको पाठवू अक्षरांतूनी शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून
नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पण
पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळी मध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायचे राहून जाते ....

काय बोलावं या शब्दांवर .. हे शब्द सौंदर्य परत परत वाचून फक्त अनुभवत राहावं असं वाटतं...

कवी,गीतकारांच्या लेखणीतून लिहिली गेलेली हि पत्र ऐकतांना , वाचतांना मग एक वेगळंच पत्र हाती लागलं.

सगळे मार्ग बंद झाले म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडणारा शेतकरी आपल्याला वर्तमानपत्रांत , बातम्यांमध्ये अधून मधून भेटत असतो. पण हाच शेतकरी जेव्हा एखाद्या पत्रा मधून भेटतो तेव्हा त्याची गोष्ट खूप अस्वस्थ करून जाते .. 
"पत्रास कारण कि बोलायची हिम्मत नाही, पावसाची वाट बघण्या आता काही गंमत न्हाई
माफ कर पारू मला, न्हाई केल्या पाटल्या, मोत्यावानी पिकाला ग, न्हाई कवड्या भेटल्या
चार बुकं शिक असं, कसं सांगू पोरा, गहाण ठेवत्यात बापाला का विचार कोणा सावकारा "...
अरविंद जगतापांच्या या कवितेत पत्राचा एक वेगळाच गहिरा रंग दिसतो. या पत्रातून व्यक्त होणाऱ्या वेदना कुठेतरी आतवर पोचतात ..

या पत्रांचा विषय निघाला आणि 'कुसुमानिल' पुस्तकाची आठवण आली नाही, असं कसं होईल. कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती यांच्यातील पत्रांचा एक मौल्यवान दस्तऐवज म्हणजे 'कुसुमानिल' ..९५ वर्षांपूर्वीचा पत्रव्यवहार. "आत्मचरित्रांमध्ये जो भेटत नाही तो पत्रांमधून भेटतो."असं गीतकार कौशल इनामदार यांनी याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी म्हटलं होतं कारण पत्र जास्त प्रामाणिक असतं...

लहानपणी 'माझ्या आईचं पत्र हरवलं.. ते मला सापडलं' हा खेळ आपण खेळायचो. पण सध्याच्या जगांत आपल्या सर्वांच्या आयुष्यातून मात्र हे पत्र आता हळूहळू  हरवतंय ...




Thursday, July 26, 2018

सलाम मृत्युन्जयांना ... कॅप्टन सौरभ कालिया , कॅप्टन विक्रम बात्रा , कॅप्टन मनोजकुमार पांडे , ग्रेनेडीयर योगेंद्रसिंग यादव , रायफलमन संजयकुमार , मेजर आचार्य, कॅप्टन अनुजकुमार नय्यर, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरुसे , मेजर सोनम वांगचुक , कॅप्टन विजयंत थापर , कॅप्टन सचिन  निंबाळकर,मेजर गौतम खोत, कॅप्टन राजेश अढाऊ आणि कारगिल युद्धातील सर्व वीर योद्धे !!!!

१९९९... कारगिल युद्ध ..... ऑपरेशन विजय ... कारगिल विजय दिवस ...

या शब्दांच्या पलीकडे जावून काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न आपण कधी केलाय ?

काही वर्षांपूर्वी अनुराधा प्रभुदेसाई यांना ' सैनिक ' या विषयावर बोलताना ऐकलं, पाहिलं तेंव्हा हा सैनिक, खरंच आपल्याला कळलाय का ? हा प्रश्न सतावू लागला. खूप अस्वस्थ व्हायला झालं .

पुस्तकाच्या नावांतच माझ्या प्रश्नाच्या उत्तराची झलक मिळाली म्हणून 'सैनिक.. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा ' आणि 'सलाम मृतुन्जयांना ' हि अनुमावशीने लिहिलेली पुस्तकं वाचली..... ती वाचून काय वाटलं ते शब्दांत व्यक्त करण्याच्या खूप पलीकडचं होतं... 

कारगिल युद्धांत  पॉईंट  ४८७५ ताब्यात घेऊन शेवटचा श्वास घेणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांना मरणोत्तर 'परमवीरचक्र' हा शौर्याचा सर्वोच्च सन्मान वयाच्या २५व्या वर्षी देण्यात आला तसेच पॉईंट ४८७५ चे नाव 'कॅप्टन बात्रा टॉप' अस करण्यात आल. कॅप्टन मनोज पांडे यांचा वयाच्या २४ व्या वर्षी मरणोत्तर परमवीरचक्र, कॅप्टन विजयंत थापर यांना वयाच्या २३ व्या वर्षी मरणोत्तर वीरचक्र, कॅप्टन निकेझाकुओ केंगुरसे यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर महावीर चक्र तर कॅप्टन अनुजकुमार नायर यांना वयाच्या २५ व्या वर्षी मरणोत्तर  महावीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं ... वयाच्या २३ / २४ व्या वर्षी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीरांच्या ऋणांत आपण कायम राहू !!!

मेजर गौतम खोत यांना ऑपरेशन विजय मध्ये दाखवलेल्या शौर्याबद्दल वीरचक्र मिळालं. निसर्ग आणि शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या या योध्याने, शत्रूच्या तोफगोळ्यांचा सामना करत , प्रचंड आत्मविश्वास आणि अलौकिक इच्छाशक्ती च्या बळावर संपूर्ण युद्ध काळात १७ हजार फुटांवरील पहाडांवर तब्बल ७०तास उड्डाण केले .शत्रास्त्र दारुगोळा अशी सामग्री जवानांपर्यंत पोहोचवायची आणि परत येतांना जखमी जवानांना घेऊन यायचं .. जणू हेलिकॉप्टर हेच त्यांच शस्त्र होतं !!

वर्धा जिल्यातील तळेगाव येथे राहणारा मुलगा गावातील पहिला डॉक्टर होणार म्हणून गावकऱयांनी त्याची पहिल्या फीची रक्कम  भरली . हे स्मरणात ठेवून गावकऱ्यांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणारा तो देशाच्या सेवेत रुजू झाला. वयाच्या २६ व्या वर्षी कारगिल युद्धभूमीवर एकशेआठ सैनिकांना वाचवून अनेकांच्या आशीर्वादाचा मानकरी ठरला. या शौर्याबद्दल सेनामेडल देऊन त्यांना गौरविण्यात आलं ते कॅप्टन डॉक्टर राजेश अढाऊ....

वीरचक्र विजेते कॅप्टन सचिन निंबाळकर .. स्वतः पहाडीवरच्या उतारावर लटकत असतांना त्याच टायगर हिल टॉप वर बोफोर्स गन्सचा मारा करण्याचा धडाडीचा निर्णय घेऊन अतुलनीय साहस दाखवणारे व आत्यंतिक महत्वाचे हे शिखर सर करून त्यावर ग्रेनेडीयर्सच्या यशाची मोहोर उमटवणारे ..

कॅप्टन विजयंत थापर ... कुपवाडा येथे पोस्टिंग असतांना रुकसाना या पाच वर्षाच्या मुलीशी यांची भेट झाली. तिच्या डोळ्यांदेखत तिच्या वडिलांची हत्या एका दहशतवादी हल्ल्यात झाली होती त्यामुळे हि मुलगी तिथे एका अनाथाश्रमात राहात होती. हा ऑफिसर आपल्या पगारातुन दरमहा ठराविक रक्कम तिच्या शिक्षणाकरता देत होता. कारगिल युद्धांत शेवटच्या ऑपरेशन वर जातांना सुद्धा याची जाणीव ठेवून त्यांनी आपल्या आई वडिलांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रात तिची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. त्यांच्या लष्करी वर्दीतील या ओलावा खूप काही सांगून गेला, शिकवून गेला....

"I only regret that I have but one life to lay down for my country "... या ओळी वाचताना कायमच  निःशब्द व्हायला होतं. 'कारगिल' या शब्दांत बांधल्या गेलेल्या अशा अनेक शौर्य कथा आहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी पण ध्येय मात्र एक .. आपल्या तिरंग्यासाठी लढण्याचं !!!

एकीकडे सामान्य नागरिक म्हणून जगतांना आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी पाहून चीड येते ,मन व्याकुळ होतं, हतबल होतं. तर दुसरीकडे आपली जात, धर्म, पंथ विसरून देशाच्या सीमेवर फक्त भारतीय म्हणून उभ्या असलेल्या या प्रत्येक वीराकडे पाहून उर अभिमानानं भरून येतं, प्रेरणा मिळते, त्यांच्या बलिदानाची जाणीव होते ...

२६ जुलै ... आजच्या दिवशी या वीर योध्यांची आठवण येणार नाही असं कसं होईल. त्यांच्या अत्युच्य बलिदानाचा, उच्च मनोबलाचा आणि दैदिप्यमान त्यागाचा इतिहास आपण नक्कीच विसरता कामा नये .. या खऱ्या हिरोंची गोष्ट आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच न्यायला हवी ...


प्रत्येक भारतीय सैनिकाला आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या याच्या कुटुंबाला त्रिवार सलाम !!!


 

Friday, July 20, 2018


" और हम खडे खडे बहार देखते रहें, कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें .... "

कवी नीरज यांच्या याच ओळी आठवल्या, ते गेल्याची बातमी वाचतांना.

'वयाच्या १४ व्या वर्षी कविसंमेलनात आपली पहिली कविता सादर करून टाळ्यांच्या कडकडाटात मिळालेलं पाच रुपयांचं बक्षीस आणि त्यातील आनंद नंतर मिळालेल्या दोन्ही पद्म पुरस्कारांत नव्हता', असं एकदा तेच  म्हणाले होते.

लहानपणी बिडी सिगारेट विकल्या , रिक्षा ओढली , औषधाच्या जाहिरातीचं काम मिळालं म्हणून भिंतीही रंगवल्या, यमुना नदीत उडी घेऊन नाणी वेचली.. अशा आयुष्याने भरभरून अनुभव दिले आणि परीक्षेत एका मार्काने नापास झाल्यावर जिद्द हि दिली... पुढे टायपिस्ट , इन्फॉरमेशन ऑफिसर ते हिंदी चे प्राध्यापक हा प्रवास होत गेला आणि सोबत एक कवी बहरत गेला...

आर. चंद्रानी एका काव्य संमेलनात त्यांच्या कविता ऐकल्या आणि आपल्या 'नई उमर कि नई फसल' या पुढच्या चित्रपटांत त्यांच्या एक , दोन नाही तर तब्बल आठ कविता घेतल्या. "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहें" .... हि त्यातीलच एक कविता.

पुढे प्रेम पुजारी चित्रपट बनवतांना देव आनंद यांनी नीरज यांची ओळख एस. डी. बर्मन यांच्याशी करून दिली. तेव्हा बर्मनदांनी त्यांना 'रंगीला' शब्दापासून सुरु होणारं गाणं हव आहे  असं सांगितलं. तेव्हा नीरज यांनी लिहिलेलं " रंगीला रे... तेरे रंग में यूं रंगा हें मेरा मन "या गाण्याने बर्मनदा थक्क झाले आणि म्हणाले,' I had given a difficult tune to fail you but you faile me with this gem of a number'.... या जोडीने नंतर शर्मिली, गॅम्बलर, तेरे मेरे सपने अशा एक से बढकर एक सिनेमांमधून आपल्याला अनेक हिट गाणी दिली .

एका मुलाखतीत नीरजजींनी एक आठवण सांगितली होती , बर्मनदांची ...  एकदा बर्मनदांनी सुचवलं होतं कि शमा , परवाना , शराब, तमन्ना , इष्क हे शब्द गाण्यांत परत परत येतांत त्याऐवजी दुसरे वापर . म्ह्णून नीरज साहेबांनी बगिया , मधुर, माला , धागा , गीतांजली असे शब्द वापरले. हे वाचल्यावर मला "सासों कि सरगम , धडकन कि वीणा , सपनोंकी गीतांजली तू '.. तसंच "जीवन कि बगिया मेहेकेगी , लेहेकेगी  ... खुषीयोन्की कलियां झुमेंगी फुलेंगी ".. या ओळी आठवल्या. 
आजही देवानंदला रोमँटिक गाण्यांत पाहतांना नीरज साहेबांची आठवण आली नाही असं होतच नाही. ' चुडी नहीं ये मेरा दिल हें , फुलोंके रंग से दिलकी कलम से, मेरा मन तेरा प्यासा.. मेरा मन तेरा , हां मैने कसम ली हां तुने कसम ली नहि होंगे जुदा , दिल आज शायर हें गम आज नगमा हें '..या प्रत्येक गाण्यांत जीव ओतलाय त्यांनी.

"शोखियों में घोला जाए फुलोंका शबाब, उस में  फिर मिलाई जाए थोडीसी शराब, होगा यूं नशा जो तैयार वो प्यार हें "... हे ऐकतांना तर या शब्दांच्याच प्रेमात पडतो.

"जैसे राधा ने माला जपी शाम कि मैने ओढी चुनरिया तेरे नाम कि ".. ऐकतांना आपणही नकळत हे गाणं गुणगुणू लागतो.

"मेघा छाये आधी रात बैरन बॅन गई निंदिया , बता ए मैं क्या करुं '... ऐकताना तो विरह डोळ्यांतून अलवार बरसू लागतो.

लिखे जो खत तुझे वो तेरे प्यार में हजारों रंग के नजारे बन गए असो अथवा खिलते हें गुल यहां खिलके बिखरने को .. आपल्या गाण्यातून त्यांनी अनेक रंगांच्या छटा उलगडल्या .

आपलं कवितेवरच प्रेम व्यक्त करताना एकदा त्यांनी म्हटलं होतं ,' I love composing poems so much that it has kept me intoxicated throughout my life'...
मला नेहमी वाटतं, आपण खरंच नशीबवान आहोत कि आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या गीतकारांची गाणी मनसोक्त ऐकायला मिळाली , गुणगुणता आली आणि आयुष्यातील अनेक प्रसंगात याच गाण्यांनी आपल्याला सोबतही केली ...

( आजवर गीतकार नीरज यांच्याबद्दल जे काही वाचलं ते संदर्भ वापरून लिहायचा प्रयत्न केला आहे )

 

Monday, July 2, 2018


इवले इवले रूप गोजिरे
कुशीत बिलगून हसायचे
गळ्यांत टाकता हात चिमुकले
सर मोत्यांचे सजायचे

फुटले आतां पंख कोवळे
घरट्यामधूनी उडायचे
सावली अपुली असतांनाही
दूरूनी तूला ते पाहायचे

निसटून गेले क्षण स्पर्शाचे
चिऊकाऊच्या घासाचे
पुन्हा वाटते फिरुनी यावे
क्षण इवल्या त्या नात्याचे ....

Wednesday, June 27, 2018

हरवले रंग सारे थेंबात आसवांच्या
स्वप्ने विरून गेली डोहांत आसवांच्या

तूला शोधतांना मी हरवले मलाही
ना गवसले तूला मी डोळ्यांत आसवांच्या

ती खूण ओळखीची अन् घाव सोबतीला
काजळास मिटवून गेला थेंब आसवांचा .....
 

Thursday, June 7, 2018


९८ सालातील जानेवारी महिना ...  आजही मला खूप छान आठवतोय. नोकरी लागून सहा महिने झाले होते आणि लग्नाचा विषय निघाला. लग्न ठरवण्यासाठी पत्रिका आणि फोटो पाठवायचा व पत्रिका जुळली, फोटो आवडला तर मुलगी पाहायची .. याच sequence  नी लग्न ठरायचं तेंव्हा. माझ्याही बाबतीत तसंच झालं.

खरं तर हा दाखवायचा कार्यक्रम वगैरे मला फारच ऑड वाटत होतं पण काही इलाज नव्हता. प्रत्यक्षात मात्र हा कार्यक्रम फारच हलक्या फुलक्या वातावरणांत पार पडला. केयूर एकटाच आला होता त्यामुळे मी आई बाबा केदार काका काकू आणि माझे चुलत बहीण भाऊ असे मराठ्यांकडचेच ८ जण आणि सहस्रबुद्धे यांच्या कडचा १ या ratio मुळे जवळपास मुलगा पाहण्याचाच कार्यक्रम झाला खरं म्हणजे..

माझ्या लहानपणी आम्ही राहायचो त्या वाड्यातील गोखले काका नेहमी चिडवायचे मला आणि म्हणायचे कि तुझ्यासाठी विदर्भातील मुलगा करू आणि झालं सुद्धा तसंच ... विदर्भाच स्थळ नक्की झालं आणि लग्नहि झालं.

Arranged marriage मध्ये एक दुसऱ्याला समजावून घेण्याकरता पुरेसा वेळ द्यावा लागतो. एकमेकांच्या सवयी , आवडी निवडी माहिती करून घ्याव्या लागतात. हळूहळू माझ्या लक्षात आलं कि आमचे स्वभाव वेगळे, विचार करण्याची पद्धत वेगळी, तो जास्त हिंदी बोलायचा आणि मी मराठी.

आपण ज्या वातावरणांत वाढतो त्याचा आपल्यावर, आपल्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम वेग वेगळा.  तेंव्हा तो खूप बोलायचा आणि आणि मी त्यामानाने कमी.. मला संगीत चित्रपट याची खूप आवड पण त्याला तितकीशी नाही. तो बाहेरच्या देशात फिरून आलेला आणि मी पुण्याबाहेर कधीही न राहिलेली, त्याला चित्रकला आणि फोटोग्राफीची अतिशय आवड आणि मी कधीही ब्रश किंवा कॅमेरा हातांत न घेतलेली .. Management शिकल्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी 'ते' वापरणारी पण तो त्याच्या बिलकुल विरुद्ध...

सुशिक्षित सुसंस्कृत घरात वाढले होते पण त्याच्या इतकं व्यापक exposure मला तेंव्हा मिळालं नव्हतं. स्वामी, राऊ , पानिपत, संभाजी वाचणारी मी शांता शेळके , कुसुमाग्रज, ग्रेस , विंदा करंदीकर , पाडगावकर यांच्यात रमायचे.. लग्नानंतर काहीच दिवसांत "कोण शांता शेळके ?" हा निरागस चेहऱ्यावरचा त्याचा प्रश्न साक्षात शांता शेळके समोर असतांना ऐकून खरं तर खूप घाबरले होते मी. याला शांता शेळके सुद्धा माहिती नाहीत, कसं काय ? खूप खूप जड गेलं पचवणं. आमच्यात काहीच समान धागा नव्हता आवडी निवडी किंवा अनुभवांचा सुद्धा ..

मग काय .. एकमेकांचे अनुभव share करून एकमेकांना ओळखायला सुरवात केली. माझ्यापेक्षा त्याच्याकडे अनुभवांची खूप Variety होती. त्याची भोपाळ ते नागपूर व्हाया पंचमढी अशी सायकल ट्रिप, NCC कॅडेट चा अनुभव, राजीव बरोबर केलेले असंख्य प्रयोग, श्वेताबरोबर केलेला आणि फसलेला कणकेचा शिरा,अकोल्याच्या नाली च्या आठवणी, नायजेरिया मधील आठवणी, लंडनची ट्रिप, भोपाळचे एम.ए.सी.टी मधे राहात असतानाचे किस्से, रुडकीच्या आठवणी, नागपूरची दिवाळी, जावर माईन्सची ट्रिप, डोंबिवलीची दिवाळी आणि कायम सोबत असलेल्या 'हमारा भोपाल' च्या आठवणी...

हळूहळू एकमेकांच्या आवडत्या विषयांमध्ये दोघंही इंटरेस्ट घ्यायला लागलो. मला सिनेमा पाहायला खुप आवडतं म्हणून तो हि सिनेमा पाहायला लागला. गाण्याच्या कार्यक्रमाची तिकीट काढून त्याने एकदा मला  सुखद धक्का दिला ..  प्रत्यक्षात कार्यक्रमाला गेल्यावर तो भक्तिसंगीताचा कार्यक्रम होता हे लक्षांत आलं. त्यानंतर 'भावगीत, गझल ' आणि  'भक्तिसंगीत' यातील फरक त्याला समजावून सांगितला, इतकंच. पण आज जेव्हा कांतेयला मी कुसुमाग्रज, शांता शेळके यांच्या कविता शिकवते तेव्हा हातातील काम बाजूला ठेवून तो सुद्धा ऐकत असतो...

माझ्या बाबांना मी नेलपेंट, लिपस्टिक लावलेल आवडायचं नाही.. म्हणून लग्न झाल्यावर माझ्या bucket लिस्ट मधली पहिली गोष्ट मी पूर्ण केली , ती म्हणजे वेगवेगळ्या रंगांची नेलपेंटस आणि एक दोन लिपस्टिक घेतल्या. केयूरने  खूप आवडीने मला ते सारं घेऊन दिलं. मला तेव्हा टपरीवर चहा पिण्याचं खूप अप्रूप होतं. कारण लग्न होईपर्यंत मी कधीच टपरीवर चहा प्यायले नव्हते. म्हणून त्यानंतर कित्येक महिने सकाळचा पहिला चहा आम्ही टपरीवर प्यायचो. ऑफिसच्या बस करता तो मला गंधर्व जवळ सोडायला यायचा आणि बस येईपर्यंत आम्ही दोघ सकाळी ६. ४० वाजता तिथल्या टपरीवर एका कपातून चहा प्यायचो.

मी कधीच ट्रेकिंग, kayaking केलं नव्हतं. भोपाळला पहिल्यांदा गेले तेव्हा समजलं कि त्याने तिथे बोटींग क्लब सुरू केला आहे जो अजूनही मस्त सुरु आहे. धूपगड ,चौराहागड चढतांना त्याची ट्रेकिंगची आवड समजली.  मृणाल देव बरोबर गिरनार चहाच्या जाहिरातीत त्याने काम केलं हे सुद्धा माझ्यासाठी खूप भारी होतं आणि खूप फिल्मी style चेतन ने मला ते सांगितलं होत. हळूहळू एकमेकांच्या आवडी निवडी जपायला लागलो. आता इतकी वर्ष झाली तेंव्हा कुठं 'मला गजरा आवडतो, म्हणजे फक्त मोगऱ्याचा फुलांचा गजरा दुसरा कोणत्याही फुलांचा नाही' हे त्याला आतां समजायला लागलंय ...

आयुष्यातील अनेक प्रसंगात खूपदा जाणवल कि आपला choice किती perfect आहे. त्याच्यासारखं वागता यायला हवं, अगदी निरपेक्ष. कोणाकडून कशाचीच अपेक्षा न करता. "नेकी कर दरिया में डाल" हे त्याच आयुष्यातील ब्रीदवाक्य आचरणात आणायला मला तरी आजवर जमलेलं नाही. त्याने आयुष्यात कधीच जमाखर्च मांडला नाही, कोण आजवर आपल्याशी कसं वागलं त्याप्रमाणे आपलं वागणं त्याने कधीच बदललं नाही. कोणत्याहि परिस्थितीत शांत राहून निर्णय घेणं त्याला जमतं. कोणताही निर्णय घेताना त्याच्या पेक्षा जास्त भावनिक मी असते. माझ्या आईच्या आजारपणात जे काही आईसाठी त्याने केलंय ते पाहून समजलं आई त्याला आपला मोठा मुलगा का म्हणायची ते.. कधी बरं नसेल तरी उठून त्याला खायला करून द्यायची आणि म्हणायची 'अगं मला बरं वाटतं '.. इतकं प्रेम , इतकं निरपेक्ष नातं होतं दोघांचं. आई गेल्यावर बाबांसाठी अधून मधून तो त्यांच्याकडे राहायला जायचा. एकदा तर 'कट्यार काळजात घुसली', हा सिनेमा बाबांना आवडेल म्हणून त्यांच्या इंजेक्शनची , जेवणाची वेळ सांभाळून तो त्यांना दाखवायला घेऊन गेला. बाबांबरोबरचा थिएटरमधला सेल्फी पाठवून त्याने मला आंणि केदारला surprise दिलं. आजही बाबांच्या आणि त्याच्या रंगणाऱ्या गप्पा ऐकून खूप छान वाटतं. १९५८ मध्ये बाबा NDA मध्ये होते. त्या गोष्टीला ५८ वर्ष झाली याची आठवण म्हणून त्याने बाबांना NDA ला नेलं. त्यावेळी बाबांना मिळालेला आनंद त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसला.. पण हे मला कधीच सुचलं नव्हतं, नसतं...  पण केयूर ला सुचलं याचं खूप खूप कौतुक वाटलं.

एकदा केदारला, म्हणजे माझ्या भावाला काय गिफ्ट द्यायचं हा विचार करत असतांना मी सहज बोलले कि त्याच्यासाठी गाण्याचं एक पुस्तक करू यांत ? त्याला आवडणारी सर्व गाणी , एक मस्त COLLECTION ...
मी एवढं बोलले आणि त्याने एक खूप सुंदर डायरी स्वत: बाइंडिंग करून घरी तयार केली. सिलेक्ट केलेली गाणी त्यावर लिहून तयार होताच मी त्याला दाखवली. मग त्याने त्या प्रत्येक गाण्याच्या बाजूच्या पानावर त्या गाण्याला समर्पक असं  Skeching केलं आणि त्या डायरीला / पुस्तकाला एक अनोखा personal touch दिला. मी विचार केला होता  त्याच्या कितीतरी पट सुंदर झालं ते Gift ... एकदम precious !!!

त्याचं आत्या,मामा, काकू  व काकांशी असलेलं नातं सुद्धा एकदम वेगळं आहे. नलूआत्याला वाकून नमस्कार करताना तिच्या पायाला चिमटे घेणारा, रिटायरमेंट नंतर प्रदीप काकाला M.A. INDOLOGY करायला उत्स्फुर्तपणे  motivate करणारा,  वाकुन नमस्कार करताना ' पायलागू ' असं न म्हणता 'पायाला गू' म्हणून आत्याना चिडवणारा, मामाच्या हातचा चहा न चुकता प्यायला जाणारा , 'शेअर मार्केट'  या मामांच्या आवडत्या विषयवार त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारणारा, शमाकाकूने आवडीने केलेला व आग्रहाने वाढलेला  हापूसचा  साखरांबा पपईचा समजून खाणारा आणि वर 'क्या बढिया हुआ हें पपीते का मुरंबा ', असं तिचं कौतुक करणारा, गिरीपेठला गेलं कि काकीजीला फिल्टर कॉफीची फर्माईश करणारा, अनुपमाँ काकू दोन तव्यांवर गुळाच्या पोळ्या करते याचं कौतुक असलेला, पद्मा काकूच्या signature डिशेसला मनापासून दाद देणारा ....

सोनाली, प्रदीप दादा , संदीप यांच्याबरोबर असलेल त्याच नातं एकदम  वेगळं... खूप जवळचं . तसं पाहिलं तर हे तिघेही स्वभावाने एकदम वेगवेगळे परंतू प्रत्येकासोबत असलेला मायेचा ओलावा तोच पण ते व्यक्त करण्याची रीत वेगळी. अजूनही वाढदिवसाला दाराला कुलूप असतांना बाजूला कॅडबरी लावलेली दिसली तर ती मिळाल्याचा फोन काहीही न विचार करता फक्त संदीपलाच जातो ...

आजवर कांतेयला दंगा करतो म्हणून शाळेतून कित्ती Remark मिळाले पण प्रत्येक वेळी  "अरे वाह ", अशी त्याची प्रतिक्रिया आजही कायम असते. "अगं आता नाही तर कधी दंगा करणार ," असं म्हणून तो कधीच कांतेयला रागवत नाही. आज सुद्धा कांतेयचा अभ्यास हाच आमच्या वादाचा विषय असतो. "शिकेल तो , काय घाई आहे ... सगळं आत्ताच आलं पाहिजे का ?' हा त्याचा सूर आजही कायम असतो ... एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यामध्ये तो famous आहेच आणि  घरी सुद्धा कांतेयचा आवडता गुरु, idol  आहे.

कॉलेज मध्ये मुलांना बक्षीस म्हणून आपला डबा देणारा, कायप्पा (whatsapp ) वर regular  नसूनही सगळ्या भावंडांशी कनेक्ट असणारा, आतेभावांशी म्हणजेच आदित्य, कौस्तुभ आणि समीरशी एक special bonding जपणारा ,आठवण आली कि फोन उचलून साता समुद्रापार आपल्या भावांशी फोन वर TP करणारा, हमारा भोपालचा ब्रँड अम्बॅसॅडर, गावाला जाताना फक्त कॅमेरा बॅग निगुतीने भरणारा, दोन्ही केदारचं प्रचंड कौतुक असलेला, उषाला opd मध्ये जाताना "साडी नेसून जा म्हणजे तुला डॉक्टर समजतील ",  असं चिडवणारा व तिच्यावर लहान बहिणीसारखं प्रेम करणारा , ऋषितच्या जन्मापासून त्याच्या प्रत्येक नवीन गोष्टीला कॅमेऱ्यात टिपणारा, आईच्या मैत्रिणींशी सुद्धा आपुलकीने वागणारा, कांतेयच्या मित्रांमध्ये cool dad म्ह्णून famous असणारा  आणि माझ्या मैत्रिणींनी सुद्धा कौतुक करावं असं वागणारा .....

आई दादांबद्दल त्याला खूप कौतुक आणि अभिमान वाटतो. त्यांच्याबद्दल बोलताना तो नेहमी खूप भरभरून बोलतो. आईच्या कणकेच्या शिऱ्यासारखा माझा शिरा होतं नाही हि गोड तक्रार करतो... श्वेताची जवळ पास रोजच आठवण काढतो.ती पुण्यात असतांना ऑफिस मधून येता जाता तिला भेटणं , तिच्या हातची कॉफी पिणं खूपदा मिस करतो ... राजीव सीमा बरोबर शनिवार पेठ मध्ये राहात असतांना जमवलेल्या अनेक आठवणींची सतत उजळणी करतो ... सनय प्रखर शी लट्टू बे blade बद्दल किती तरी वेळ गप्पा मारतो ...
सतत भेट होत नाही तरीही आठवणींमध्ये प्रत्येकाला रोजच भेटतो .....

आज तुझा ५० वा वाढदिवस. वाटलं मनातल्या गोष्टी बरेचदा आपण व्यक्तच करत नाही. कोणत्याहि नात्यात व्यक्त होण गरजेचं. मनापासून कौतुक करता यायला हवं आणि हक्कानं काही आवडलं नाही हे सांगता सुद्धा. बहुतेकदा दुसरी बाजू नेहमीच प्रामाणिकपणे मांडली जाते आणि पहिली सांगायची राहून जाते ... म्हणूनच आज ठरवलं थोडं मनातलं बोलावं :)

केयूर, तू जसा आहेस तसाच राहा.. मनाने इतकं निरागस राहतां येणं खूप अवघड आहे, आजकालच्या जगांत. मलासुद्धा इतकी वर्ष तुझ्याबरोबर राहून हे जमलं नाही. तुझा लाघवी स्वभाव, पटकन मिसळून जाण्याची वृत्ती, समोरच्याशी त्याच्या वयाप्रमाणे वागण्याची कला आणि माणसं जोडण्याची तुझी सवय तुला नेहमीच उत्साह देत राहते. माणसाने नेहमी शिकत राहावं हे तू खूप मनापासून आचरणांत आणलं आहेस त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकण्याची तुझी नेहमीच तयारी असते. तुझ्यातील या विद्यार्थ्याला तू असंच जप...

या वर्षी वाढदिवसाला तुला खूप काहीतरी वेगळं द्यावं असं मनांत होतं आणि अनुमावशीमुळे ते शक्य झालं.. कारगिलला १०दिवस जावून कारगिल विजय दिवस साजरा करण्याचा योग जुळून आला.तुला भेटून अनुमावशी ला लक्ष्य फौंडेशन करता एक ऍक्टिव्ह मेंबर मिळाल्याचा आनंद झाला जो तिने फोन करून माझ्याबरोबर share केला. तुझ्यावर मोठी जबाबदारी सुद्धा सोपवली ..

ऑफीस आणि अभ्यास यांत तू व्यस्त असतांना मावशीबरोबर केलेलं सर्व planning मी खूप enjoy केलं. तुझ्या वतीने निरोपाची देवाण घेवाण करतांना मला मजा पण आली आणि finally कारगिल ची तिकीट तुझ्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तुला देतांना खूप भारी वाटलं.

तुझ्या जुलै मधील या आगळ्या वेगळ्या प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा !!!


तुझं कॅमेऱ्यावरचं, अभ्यासावरचं आणि आमच्यावरच प्रेम असंच राहू दे :)  या special वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !!!


- ३१ मे २०१८ 

Thursday, May 24, 2018


या अंधाऱ्या पडछाया, हुरहूर मनी हा भास
क्षितिजावर अलगत उतरे, ती नक्षत्रांची माळ

दारात चांदणे फुलले, मारव्यात भिजले रान
पाचोळ्यास गंध अजूनी, गतजन्मीचा आभास

तो दूरून ऐकू येई , पावरीचा मंद आवाज
निःशब्दांमधूनी बरसे, डोळ्यांत जुने काहूर

हे युगायुगांचे नाते, हि युगायुगांची साथ
हलकेच आठवणींची, उलगडली रेशीम वीण

नात्यास न अपुल्या जरीहि, कोणतेच नाहि नाव
हि राधा तुझीच आहे अन माझा तू घनश्याम !!!
 

Wednesday, May 23, 2018

हि सांज उभी दाराशी
अवकाश रंगले सारे
गंधाळून अवघे जाता
हे अंतर दोघांमधले ... 
पुन्हा त्याच साऱ्या व्यथा या मनाच्या
कसे सावरावे कळेना मला
अंतरात उठता जुनी वादळे ती
काहूर दाटे डोळ्यांत या ...
 

Tuesday, May 22, 2018

रैना बीती जाए ....

आकाशातला पूर्ण चंद्र , शुभ्र चांदणं आणि जुनी हिंदी गाणी ... हे सर्व सोबत असेल तर लांब कुठंतरी उगाचच  मारलेली एक चक्कर जादुई क्षणांच्या आठवणीने दिवसभराचा सगळा शीण घालवते....

आss  आss  आभी  जा
रात ढलने लगी , चाँद छुपने चला ...आss  आss  आभी  जा
तेरी याद में बेखबर, शमा कि तरह रातभर
जली आरजू दिल जलाsss .. आsss  आsss , आभी जा

तिसरी कसम मधील हे गाणं.. लता मंगेशकर यांचा आवाज.. 'जली आरजू दिल जला', ऐकतांना आपल्याला सुद्धा व्याकुळ करून जातो...

या चांदण्या रात्री हा एकटेपणा आणि तुझी आठवण... तुझ्या सोबत घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणाला परत आठवणीत जगतांना हि रात्र सुद्धा पुरेशी नाही ..

सितारों ने मुह फेरकर कहाँ अलविदा हमसफर
चला कारवा अब चला आsss  आsss  आभी जा ...

या क्षणी तू सोबत असावीस म्हणून मी काय करू.. मी,  माझं गाणं , माझं संगीत यातील आर्तता तुझ्यापर्यंत पोचेल का ?..

आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हें
मेरा सुना पडा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हें ...

तुझ्याविना हे सार सूनं सूनं आहे ... या काळोखात अशा या वेळी मला , तुझ्या आठवणीत बरसणाऱ्या माझ्या डोळयांना सोबत आहे फक्त आकाशातून बरसणाऱ्या या सरींची .... मनाबरोबर डोळेही भिजवणारा पाऊस , आपल्या दोघांच्या आठवणींचा पाऊस .....

बरसे गगन, मेरे बरसे नयन देखो तरसे है मन अब तो आजा
शीतल पवन ये लगाये अगन ओ सजन अब तो मुखडा दिखा जा
तूने भली रे निभाई प्रीत, तुझे मेरे गीत बुलाते हें ....

लता मंगेशकर यांच राणी रूपमती मधील हे अजून एक सुंदर गाणं ... 'ये घडी ना जाये बित ... ' म्हणताना हातातून सुटणाऱ्या त्या क्षणांतील अगतिकता काय सहज व्यक्त होते....

या शांत एकांत वेळी इथे भरून उरलाय फक्त तुझा आभास अन् तुझी आठवण...

आपकी याद आती रही रातभर
चश्म -ए -नम मुस्कुराती रही रातभर .. आपकी याद आती रही ..
रात भर दर्द कि शम्मा जलाती रही .. रातभर
गम कि लौ थरथराती रही .. रातभर
बांसुरी कि सुरीली सुहानी सदा
याद बॅन बन के आती रही..  रातभर .....

गमन मधील छाया गांगुली यांच्या आवाजातील हे गाणं  ... बासरीच्या गोडं आवाजात हरवून जावं तशी मी हरवून गेले आहे , तुझ्या आठवणीत ...या आभाळभर उमललेल्या आपल्या आठवणींच्या चांदण्यात ...

तुझ्या पावलांची आहट , तुझा स्पर्श , तो आभास आणि मी ..

जब मै रातों में तारे गिनता हूँ और तेरे कदमों की आहट सुनता हूँ
लगे मुझे हर तारा तेरा दर्पन ....
आए तुम याद मुझे गाने लगी हर धडकन
खुशबू लाई पवन, मेहेका चंदन...

एस. डी. बर्मन यांच संगीत, गीतकार योगेश आणि किशोरकुमार यांचा आवाज .. शब्द, चाल आणि आवाज यांचा सुरेख मिलाफ ..... मिली मधलं हे गाणं एक हळुवार मन उलगडून दाखवतं ...

आसमंत झाकोळून टाकणारा अंधार आणि हळूहळू संपणारी रात्र ... आणि या विरहात वाट पाहणारी ती ... संध्याकाळी दिलेलं वचन विसरून तो मात्र आलाच नाही ...

रैना बीती जाए ... शाम न आए...  रैना बीती जाए
शाम को भुला शाम का वादा
संग दिये के जागी राधा ... निंदिया न आए ...
रैना बिती जाए ....

हे शब्द , तो आवाज, सारंगीचे सूर, सुंतुर, बासरी आणि गिटारचा मेळ ... सर्व काही आपल्या मनाचा ठाव घेतं ...

अशा कितीतरी सुंदर गाण्यांनी रात्र मग अशीच उमलते आणि मग आठवणींचं चांदण आभाळभर पसरतं ....

 

Friday, April 27, 2018

ऑक्टोबर

खूप मिक्स Review ऐकून हा सिनेमा पाहावा कि नाही असा विचार केला पण सहसा कोणताही वेगळा विषय असाच न पाहाता सोडून देणं जमत नाही म्हणून मग आवर्जून पहिला आणि वाटलं पाहीला नसता तर खूप काही miss केलं असतं. दिग्दर्शक शूजित सरकार आणि वरून धवन हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते एकदम जादू करतं आणि ते वेगळेपण आपल्याला पूर्ण वेळ बांधून ठेवतं ...

वनिता संधू ने साकारलेली शिउली,गीतांजली राव ने साकारलेली तिची आई आणि वरून धवनने साकारलेला  डॅन यांच्यातील वीण , एकमेकांबरोबर निर्माण होत जाणारं नातं आपल्याला निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे सांगत राहतं ...

फाईव्ह स्टार हॉटेल , हॉटेल मॅनॅजमेन्टच्या अभ्यासातील भाग म्हणून तिथे काम करणाऱ्या काही जणांचा ग्रुप.. त्यांच्या कामाच स्वरूप, पद्धत , तेथील प्रत्येकाची जबाबदारी, ती निभावताना त्यांना येणारे रोजचे वेगवेगळे अनुभव आणि आपल्या टीम मेंबर ला सावरण्यासाठी धडपडणारे टीम मधील मित्र मैत्रिणी.... अशा एकदम हलक्या फुलक्या वातावरणांत या सिनेमाची सुरवात होते. याच टीम मध्ये असतात शिउली आणि डॅन. दोघंही भिन्न स्वभावाचे..एकमेकांबरोबर खुपसा संवाद नसणारे, जवळची मैत्री नसलेले तरीही टीम मुळे एकत्र आलेले.

३१ डिसेंबर च्या पार्टीत अपघाताने शिउली तिसऱ्या मजल्यावरून खाली पडते आणि कोमात जाते आणि याच वळणावर चित्रपट खऱ्या अर्थाने सुरु होतो... हॉस्पिटल मध्ये शिउली कोमात असतांना, तिची ट्रीटमेंट सुरु असतांना दुसरीकडे बाकीच्यांच आयुष्य हळूहळू नॉर्मल होतं. शिउलीचे शेवटचे शब्द 'Where is dan ?' डॅनला अस्वस्थ करतात आणि तिथेच एक नातं जन्म घेत.. आणि याच निःशब्द नात्याची गोष्ट आहे ऑक्टोबर ....

'Where is Dan ?' हे शब्द त्याला स्वस्थ बसू देत नाहीत .. या प्रश्नाच्या मागचं कारण आणि तिला त्या प्रश्नाचं  द्यायचं असलेलं उत्तर यासाठी सुरु होते त्याची धडपड. अगदी छोट्या छोट्या संवादातून त्याच मन उलगडत जातं. पहिल्यांदा तिला ICU मध्ये पाहून आल्यापासून त्याची होणारी घालमेल आपल्यालाही अस्वस्थ करते.

शिउलीच्या आईची प्रचंड ताकदीची भूमिका गीतांजली रावने साकारली आहे. कमी संवाद असूनही त्या मोजक्या संवादात, नजरेतून व्यक्त होणारी कणखर आई.. शिउलीने प्रथम अम्मा म्हटल्यावर कोसळणारी आई .. आणि शिउली गेल्यावर तिच्यासाठी लावलेलं प्राजक्ताच झाड एकटं कसं ठेवणार म्हणून ते डॅनला देणारी आई .. आपल्याला सुन्न करते.

शब्दांत काहीही न बोलू शकणारी, फक्त डोळ्यांनी बोलणारी शिउली आणि तिच्या संवेदना जाणून घेणारा डॅन खूप काही सांगून जातात आणि आपण त्या नात्याच्या प्रेमात पडतो...

हॉस्पिटल मध्ये ट्रीटमेंट देणारे डॉक्टर खरंच जिनियस आहेत ना याची खात्री reception वरच्या माणसाशी बोलून करून घेणारा डॅन, रात्री हॉस्पिटल मध्ये एन्ट्री साठी पास नाही म्हणून security ला convince करणारा  डॅन, रोज हॉस्पिटल मध्ये जावून शिउलीला भेटणारा आणि मनातलं बोलणारा डॅन, तिच्यासाठी तिची आवडती  प्राजक्ताची फुलं वेचून तिच्या उशाशी ठेवणारा डॅन, सिस्टरच आयुष्य जवळून जाणून घ्यायचा प्रयत्न करणारा डॅन, शिउलीच्या काकांपासून व्हेंटिलेटरच स्वीच लांब ठेवण्याची काळजी घेणारा डॅन, तिचा मृत्यूबरोबरचा संघर्ष थांबावा आणि परत तिचं आयुष्य सुरु व्हावं म्हणून झटणारा डॅन आणि तिच्या आई समोर खूप positive energy घेऊन उभा असलेला डॅन .....  डॅन या व्यक्तिरेखेत खुप काही आहे. अतिशय हळुवार पणे उलगडत जाणारी त्याची व्यक्तिरेखा..  तो माणूस म्हणून किती प्रगल्भ आहे, याचा प्रवास मनाला खूप भिडतो.

प्राजक्ताची इवलीशी फुलं .. कमी आयुष्य असणारी . झाडावरून ओघळून पडणारी .. त्यांचा आणि शिउलीच्या आयुष्याचा संदर्भ नेमकेपणाने इथे टिपला जातो...

करियर चा विचार सोडून, रेस्टॉरंटच स्वप्न विसरून तो शिउली मध्ये गुंतत जातो. तिच्या कोमातून बाहेर आल्यावर होणाऱ्या छोट्या छोट्या प्रगतीमध्ये खुश होतो. तिच्या डोळ्यांच्या हालचालीत स्वतःला शोधतो. तिच्या पासून दूर जावून राहू शकत नाही तेव्हा परत येवून तिचं आणि त्याचं असलेलं निःशब्द नातं परत जपतो...

शिउलीच जाणं स्वीकारून तिच्या घरातील प्राजक्ताच झाड आठवण म्हणून घेऊन जाणारा डॅन , या फ्रॅम वर सिनेमा संपतो...

नक्की पाहावा असा 'ऑक्टोबर ' ....
 

Wednesday, April 4, 2018

बालभारती

बालभारती या शब्दाशी आपली पहिली ओळख झाली आपण शाळेत असतांना आणि तेव्हापासूनच या शब्दाभोवती आपल्या कितीतरी छान आठवणी गोळा होतं गेल्या.

जून महिना आला कि शाळा सुरु होण्याचे वेध लागतात. नवीन वह्या, नवीन दप्तर आणि नवीन पुस्तकं !हि नवीन पुस्तकं आली कि त्या कोऱ्या पुस्तकाच्या वासाबरोबर त्यातील अनेक सुंदर सुंदर गोष्टी आणि कविता वाचतांना मिळणारा आनंद प्रत्येकानेच अनुभवलाय. शाळेचे ते छान दिवस आणि तेवढ्याच अमूल्य त्या  आठवणी आज आपल्या प्रत्येकाच्याच मनांत अजूनही ताज्या आहेत. बालभारतीच्या पुस्तकांतील याच आठवणी पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी माझ्या मुलामुळे मला मिळत गेली.

दोन वर्षांपूर्वी इयत्ता नववीचा अभ्यासक्रम बदलला. शाळा सुरु होऊन महिना झाला तोवर एका पाठोपाठ एक नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं बाजारात येत होती. त्याच वेळी पुढच्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलणार असं समजलं. पुढच्या वर्षी दहावीची पुस्तकं वेळेत येतील कि नाही म्हणून चर्चाही झाली. त्या वर्षीचा अनुभव बघता पुढ्च्या वर्षीच्या पुस्तकांचं थोडं जास्तच टेन्शन होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नववीच्या दिवाळीपासूनच १० वीच्या क्लासेसच्या ऍडमिशन सुरु झाल्या आणि परत एकदा दहावीची पुस्तकं हा विषय चर्चेकरता बाहेर आला. ९ वी ची परीक्षा झाली कि लगेच १० वी चा क्लास सूरु होणार, शाळा सुरु होणार पण मग पुस्तकांचं काय ? आम्हा मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये तर हमखास या विषयावर बोलणं व्हायचच. शेवटी ठरलं कि आपण बालभारतीच्या ऑफिस मधेच फोन करू आणि विचारू , म्हणजे नक्की काय ते समजेल.

साधारण जानेवारी महिन्यामध्ये मी फोन केला कि, 'मला १० वी च्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची चौकशी करायची आहे कि ती पुस्तकं साधारण केव्हापर्यंत बाजारात येतील ?'. पलीकडून अतिशय जबाबदारीने उत्तर आलं कि "अजिबात काळजी करू नका, आम्हाला सुद्धा मुलांची चिंता आहे. आम्ही शनिवार रविवार सुटी न घेता काम करतो आहोत. सर्व शिफ्ट मध्ये काम सुरु आहे. ताई , तुम्हाला तुमच्या एका मुलाची चिंता आहे पण अहो आम्हाला सर्व मुलांची चिंता आहे , नका काळजी करू. आम्हाला सांगितलंय ना वेळेत करायचं ते  आम्ही करू". हे ऐकून मला सुखद धक्का बसला. 'खूप खुप धन्यवाद' इतकंच बोलू शकले मी तेव्हा. आजकाल आपण किमान नीट उत्तर मिळावं इतकीच अपेक्षा करतो पण इथे मिळालेल्या उत्तरात तर खूप काही होतं. एक जबाबदारी, ठामपणा, वेळेचं बंधन पाळण्याची जिद्द आणि आपल्या कामावरची श्रद्धा. आजकाल दुर्मिळ होत चाललेल्या अशा अनुभवाने मी मात्र भारावून गेले.

मग हाच निरोप पुढे मैत्रिणींना सांगितला आणि प्रत्येकीचा जीव थोडा का होईना पण भांड्यात पडला. फेब्रुवारी महिना गेला, मार्च महिन्यात एप्रिल महिन्याचं शाळेचं वेळापत्रक मिळालं. पंधरा एप्रिल पासून १० वी ची शाळा सुरु होणार होती. झालं , परत एकदा सर्व चर्चा पुस्तकांवरच येऊन थांबली .

मी परत एकदा बालभारती मध्ये फोन केला आणि चौकशी केली. तेव्हा पलीकडून मिळालेला प्रतिसाद सुद्धा पहिल्या इतकाच छान होता. "ताई, प्रुफ चेकिंग झालंय , पुस्तकं प्रिंटिंग मध्ये आहेत. अहो मुंबईला जावं लागतं प्रूफ चेकिंगला . आठवडा आठवडा लागतो तिथं थांबायला. प्रूफ चेकिंग मोठं काम असतं, प्रिंटिंग काय आमच्या हातात आहे, ते मशीनवर करायचं, ते आम्ही करू आता. तुम्हाला शाळा सुरु होईपर्यंत पुस्तकं नक्की मिळणार साधारण एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात हे नक्की आणि हो तुम्हाला अजून खात्री करायची असेल तर साहेबांशी बोला कि, त्यांना पण खूप फोन येतायेत खात्री करण्यासाठी, " मी त्यांचे आभार मानून फोन ठेवला.

मला जे ऐकायचे होतं तेच उत्तर मिळालं म्हणून मी हा प्रतिसाद किंवा अनुभव सुखद होता असं नाही म्हणत तर माझ्यासारखेच शंका असणारे अनेक पालक फोन करतच असतील त्यांना पण प्रत्येकाला न कंटाळता उत्तर देणं , तो विश्वास दाखवणं खूप महत्वाचं आणि बालभारतीची टीम हे सर्व करत होती.

सांगितल्याप्रमाणे ३ एप्रिल २०१८ ला बालभारती ने दहावीची सर्व पुस्तकं उपलब्ध करून देऊन दहावीच्या सर्व मुलांना , पालकांना आणि शिक्षकांना एक सुखद धक्का दिला.

या वर्षी दहावीची पुस्तकं , परीक्षेचं स्वरूप सर्वच बदललेलं. त्यामुळे साहजिकच मागच्या कोणत्याही परीक्षेचे पेपर तसे उपयोगी पडणारे नव्हते. सराव करण्याकरता काहीच उपलब्ध नव्हतं. हि नेमकी अडचण ओळखून बालभारतीने प्रत्येक विषयाचे ३ / ४ पेपर आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले . इतकंच नाही तर ते पेपर तपासण्यासाठी त्यांची उत्तर पत्रिका सुद्धा दिली यामुळे सर्व पालकांना खूप खूप मदत झाली.

वेळेवर पुस्तकं आली नाहीत कि आपण अगदी उघडपणे बालभारतीला दोष देतो; त्या मागची कारणं सुद्धा शोधायचा प्रयत्न करत नाही परंतु यावर्षी वेळेवर किंवा वेळेआधी पुस्तकं तयार करण्यात बालभारती टीमने जो पुढाकार घेतला, जे कष्ट घेतले त्याच खरंच खूप खूप कौतुक आहे.

एकूण काय तर या दहावीच्या निमित्ताने बालभारती कार्यालयातील फोनवरचा माझा प्रवास मला अनेक सुखद अनुभव देऊन गेला !


 

Tuesday, April 3, 2018

' चिऊताई '


आज वर्ल्ड sparrow डे ... सकाळी फेसबुकनीच  सांगितलं. लगेच कांतेयनी काढलेल्या या फोटोंच कोलाज सुद्धा बनवलं. राहून राहून एक मात्र जाणवलं या sparrow पेक्षा 'चिऊताई' शब्दातच जास्त गोडवा आहे नाही. कितीतरी वेळ चिऊताई या शब्दाभॊवती मन असंच रेंगाळलं आज.

आपली लहानपणी पक्षी या शब्दाशी पहिली ओळख बहुदा चिऊताई हा शब्द ऐकून आणि तिला पाहूनच झाली ना .. अंगणात दाणे वेचणारी चिऊताई तेव्हा इतकी दुर्मिळ नक्कीच नव्हती. चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकतच कितीतरी वेळा आईने मऊ भात भरवला आणि बाबाच्या कडेवर बसून कितीतरी वेळा अंगणातील चिऊताई आपण पाहिली. कितीही मोठे झालो तरी चिमणी पेक्षा 'चिऊताई' शब्दच ओठांतून जास्त बाहेर पडला.

घास भरवताना आई गोष्ट सांगायला सुरवात करायची..  एकदा काय होतं, मोठा पाऊस येतो आणि काऊच घर वाहून जातं . मग तो येतो चिऊताई कडे  'चिऊताई चिऊताई दार उघड'. ती म्हणते 'थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे ' हा चिऊ काऊ चा संवाद प्रत्येक घरी ऐकू येणारा ..

या गोष्टींत चिऊताई पिलू झोपेपर्यंत दार उघडतंच नाही आणि कावळा मात्र दार वाजवत राहतो. पिलाला भात भरवू दे , त्याला अंघोळ घालू दे , त्याला टिटपावडर करू दे, त्याला कपडे घालू दे , त्याला अंगाई गाऊ दे, त्याला झोपवू दे अशी कारणं सांगून दार न उघडणारी चिऊताईच आपल्याला जास्त भावते. तिच्यातील प्रेम, वात्सल्य , माया बहुदा आपल्यातही झिरपते... व म्हणूनच या चिऊताईच्या गोष्टी आपण पुढे आपल्या पिलालाही सांगतो  आणि  चिऊताईच्या गोष्टीचा हा प्रवास पुढे असाच चालू राहतो.

दूर गेलेल्या आपल्या पिलांना साद घालणाऱ्या आईचं मन, अवती भोवती त्यांचा कोलाहल नाही म्हणून खिन्न झालेलं मन  गदिमांनी आपल्या काव्यातून व्यक्त करतांना त्यांना 'चिमण्यांनो' म्हणून आर्त साद घालून काय सुरेख व्यक्त केलंय ...

"या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या,
जाहल्या तिन्ही सांजा जाहल्या
दाही दिशांनी आतां येईल अंधाराला पूर,
अशा अवेळी असू नका रे आई पासून दूर
चूक चूक करिते पाल उगाच, चिंता मज लागल्या
अवतीभवती असल्यावाचून कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा , आमुच्या कधीच कामाचा
या बाळांनो या रे लवकर वाटा अंधारल्या ..... "

खरंच प्रत्येक घरात असणारा हा चिमण्या पाखरांचा चिवचिवाट आपल्या घरट्याला घरपण देत असतो...


एकूण काय तर या चिऊताईनी आपल्याला खरंच खूप आठवणी दिल्या आहेत आणि या निमित्ताने त्या आज परत गोळा झाल्या , इतकंच....

 

Monday, April 2, 2018


प्रत्येकाच्या खिडकीतलं आभाळ तसं वेगळं
निळाई असते तीच तरी क्षितिज मात्र वेगळं

आसमंती गंधाळतो कधी माळलेला मोगरा
केशर शिंपीत जाणारा तो कधी सोबत निळा चांदवा

गाढ एकांतात कधी असतो नजरेचाच आवाज
डोळ्यांमध्ये विस्कटलेली ती काजळ काळी पहाट

निळ्या सावळ्या स्पर्शाचा सतारीचा झंकार
शब्दांविना फुलतो जसा पावरीचाच आवाज ....

 

Monday, March 12, 2018


आकाशवाणी पुणे क्रेंद्र. संध्याकाळचे सात वाजतायेत. प्रसारित होत आहे विशेष बातमीपत्र.
आजच्या महिलादिना निमित्त झालेल्या घडामोडींवर नजर टाकणार एक खास वृत्त.

पुणे शहरातील एरंडवणा विभागातील अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या King And Queens गटाने माफ करा फक्त महिला पालकांच्या अतिशय उत्साही Queens गटाने आजचा हा महिलादिवस खूप आनंदाने धुमधडाक्यात साजरा केला.

दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा मागच्या बातमीपत्रात आम्ही सांगितलाच. आता संध्याकाळच्या रंगबिरंगी कार्यक्रमाचा हा 'डिटेल रिपोर्ट' आमच्या खास प्रतिनिधी कडून.

स्थळ - हॉटेल बॅरोमीटर , वेळ - संध्याकाळचे ८.०० , तापमान - ४२ डिग्री ( एकदम हॉट ) हवा - गुलाबी बोचरी

आता पार्टी म्हटलं कि जशी हवा पाहिजे एकदम त्याला परफेक्ट atmosphere. या एकदम 'हटके' हॉटेल मध्ये दहा जणींसाठी टेबल आधीच बुक. आधीच्या बातमीपत्रातील समस्त ताई वर्ग इथे एकदम gorgeous look मध्ये आणि झालेली पार्टीची सुरवात.

हर्षदा क्लासनंतर मुलांना घरी सोडून येणार म्हणून थोडी उशिरा येणार तर स्वप्ना last moment call मुळे येऊ शकनार नाही हि आताच पोहोचलेली खबर. पण स्मिता आणि भारतीच काय ? त्या अजून का नाही आल्या याची चौकशी करतां फोनवर समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत याची खास नोंद घ्यावी.

मिनाली आणि कविता सर्वात आधी वेळेवर पोहचलेल्या .. एकदम matching jwellary & नवीन ड्रेस .. टेबल बुक करून आपल्या मैत्रिणींची वाट पाहणाऱ्या. इतक्यात रेड कार्पेट वरून एकदम हॉट लुक मध्ये अंजुची entry.  केस धुवून , सेट करून तयार व्हायला वेळ लागला या excuse नी excuses चा फुटलेला  नारळ .. अर्चू एकदम aadya ज्वेलरी घालून ब्लॅक ड्रेस मध्ये तर कल्पना पलाझो मध्ये. मीनल साठी काल ऑफिस मध्ये blue ड्रेस कोड होता जो तिने इथेही follow केला , खास इंडिगो टॉप घालून. शिल्पाच एकदम खास पेहेरावात आगमन आणि तिच्या ड्रेस वरील सेक्सी कट्स वरून रंगलेली चर्चा. इतक्यात स्मिताची entry आणि तिने कोणता ड्रेस घातला हे पाहण्याआधी तिच्या चेहऱ्यावरच्या निरागस हसण्याकडे प्रत्येकीचं गेलेलं लक्ष ...

सुंदर मुलींनी, तरुणींनी , चाळीशी पार केलेल्या बर्फी कॅटेगरी मधील womens नि हे हॉटेल ओथंबून वाहत असतांना महिला दिनाचे औचित्य साधून इथे Cadbury देऊन हॉटेल नि केलेलं प्रत्येकीचं स्वागत, हि कल्पना खूप आवडली, भावली. एक छोटा प्रयत्न , आपल्या भावना एका स्त्री समोर व्यक्त करण्याचा .. खूप छान प्रथा !!

कॅडबरी च्या आनंदात हाय हॅलो करत गप्पा सुरु झाल्या आणि भारतीची एन्ट्री झाली. तिच्या चेह्ऱ्यावरच्या त्या गोड हसण्याने आणि लाजण्याने उशीर होण्याची कारणं सर्वांना आपोआप समजली. पावडर खूप लागली , ती पुसायला वेळ गेला , विनीत खारा दाणा म्हणाला हि आधीच्या excuses मध्ये अजून भर पडली. पण ती आज नेहमी पेक्षा वेगळी दिसत होती , सुंदर दिसत होती हे नक्की.

अजून हर्षदा अर्ध्या तासांत येणार म्हणून आतां ऑर्डर द्यावी असं सर्वानुमते ठरल.काय ऑर्डर द्यायची यावर खूप चर्चा रंगली.  फ्रेंच fries सूप आणि दोन स्टार्टर्स ठरले पण ऑर्डर घेणाऱ्या त्या हुशार मुलाने सर्व ऑर्डर बदलली. सूप वरून मारलेली उडी cocktail वरून mocktail मध्ये पडली. यावेळी घासफुस खाणारा एक स्वतंत्र गट आपोआप निर्माण झाला आणि त्यांनी सूप ऊस शब्दावरच आपली गाडी अडवली. ऑर्डर घेणाऱ्या त्या बिचाऱ्याला आख्ख मेनू कार्ड तोंडपाठ असल्याचं दाखवावं लागलं. Finally दोन ग्रुप मध्ये ऑर्डर दिली गेली, एक complete फूडी तर दुसरा घासफूस category .

मग मधेच 'भारतीला कॅडबरी दिली नाही तुम्ही', या अंजुनी केलेल्या गोड तक्रारीची दखल त्या मॅनेजर ला घ्यावी लागली आणि भारतीला कॅडबरी मिळाली.

स्टार्टर्स आले , mocktail आले, सूप आलं , cheers झालं , फोटो झाले , starters ची चव पण चाखली. भारतीनी काहीतरी वेगळं मागावलय असं वाटून मधेच मीनाली ने त्या mocktail ची cocktail समजून चव पण चाखली.
थोड्या वेळांन लक्षात आलं , स्मिता गायब. शाब्दिक शोध मोहीम घेता समजलं आज गुरुवार आणि दत्ताला जायचं राहिलेलं म्हणून चक्क दत्ताला गेलेली. ' येतांना घाईने आले त्यामुळे वाटेत मंदिरात जायचं राहिलं ', आणि आता आठवलं म्हणून ' मी आलेच ग ', इतक्या सहजपणे गेली आणि आली सुद्धा .

स्मिता ने कविता ला दिलेलं 'आज तू छान दिसते आहेस', हे compliment आणि त्यावर अर्चू ने उलगडलेला स्किन चा पोत .. यांत तिघी रमल्या.

मग हर्षदा आली, सुंदर वन पीस मध्ये. आता घासफूस गटात उत्साहाचं वातावरण पसरलं. हर्षदा , भारती नंतर स्मिता आणि मीनलच या गटात उत्साहात स्वागत झालं. त्या जल्लोषात त्यांनी सूप आणि सलाड वर खूप उड्या मारल्या. मीनाली , अंजली, कल्पना ,कविता , अर्चना , शिल्पा या फूडी मुलींनी इकडे पनीर, मशरूम वर यथेच्छ ताव मारला.

गप्पांच्या नादात कोणाला अबू धाबीला जावू असं ऐकू आलं तर अजून शेगाव ला नाही गेलो आपण याची आठवण झाली . गोव्याला जावू, छोटे कपडे घालू , पब मध्ये जावू या अंजु च्या प्रस्तावाला मीनलने अनुमोदन दिल कारण तिने अजून पब बघितला नव्हता. हे ऐकून अंजु एकदम motivate झाली. तिचा उत्साह पाहून 'आता डाएट करून बारीक व्हायचं का जायच्या आधी,'  हा प्रश्न अर्चू ने विचारला आणि अंजुने 'जमणार नाही ', असं उत्तर देवून आपण आहोत तसं स्वत:वर प्रेम करा हा संदेश दिला.

वन पीस टाकला का शिवायला, जुहीज कडे जावू या, आता उन्हाळा आला त्यामुळे sleeevless कपडे हवेत ग शिल्पा सारखे कट असलेले असे विषय रंगू लागले. अंजु ने इतर मुलींकडे पाहा किती छोटे कपडे घातले आहेत याकडे लक्ष वेधले.

मेन course ला काय ऑर्डर द्यायची यावर मिनाली ला pizza . शिल्पा ला हिरव्या नुड्ड्ल्स , मीनलला पराठा खावासा वाटू लागला. शेवट ऑर्डर घेणाऱ्या त्या मुलानी हा सावळा गोंधळ पाहून एकदम भारी ऑपशन्स suggest केले व चर्चेला पूर्ण विराम दिला.

मधेच या प्लेट्स बदला म्हणून काहींनी प्लेट्स बदलायला लावल्या. एकूण काय एकदम happening टेबल चा मान cocktail न मागवताही या टेबललाच मिळाला.

स्टार्टर्स , सॉफ्ट ड्रिंक्स , मेन कोर्सचा हा प्रवास आता डेसर्ट पर्यंत पोहोचला होता. ' मी नाही ह त्यात ', असं सांगणारी स्मिता नंतर मात्र choco volnet brownie with icecream खातांना दिसली.

बिल पे करण्याची जबाबदारी अर्चू ने उचलली व त्याकरता बॅरोमीटर च्या मशीनने तिची सर्व कार्ड्स वापरून पहिली. टेबल पाशी रेंगाळण्याचा मोह त्या मशीन आणि मॅनेजरला हि आवरता आला नाही :)

बाहेर आल्यावर रंगलेला फोटो सेशन चा माहोल बाकी लोकांसाठी पण करमणूक म्हणून छान होता. स्मिता ला मग घरी जावेसे वाटेना, कोणाला कॉफी प्यावी असं वाटू लागल तर कोणाला गप्पा मारत night over करावसं. शेवटी अंजली कडे एक खास पार्टी करायचा बेत आखला गेला. येणाऱ्या गुढी पाडव्याचा मुहूर्त सोडून ठरवू असा निर्णय झाला नाहीतर झुलणाऱ्या गुढ्या दिसायच्या असं म्हणून साऱ्या जणी पोटभर हसल्या.

घड्याळाचे काटे ११ कडे धावत होते , उद्या मुलांना डब्यात काय द्यायचे हा विचार मनांत मधेच डोकावत होता तरी पाय मात्र तिथेच रेंगाळले होते . अंजली कडे पुढची पार्टी करू या नोट वर सगळ्यांनी एकमेकींचा निरोप घेतला , पुन्हा परत भेटण्यासाठी....

अशा प्रकारे दिवसभर हा दिन उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.

दोन्ही वैशाली नसल्यामुळे पुढचं celebration त्या दोघींच्या पुणे आगमनानंतर 'कॉफी आणि बरंच काही', मध्ये होणार असल्याची चर्चा कानावर पडली.

आतां इथेच घेवू एक विश्रांती , ब्रेक नंतर परत भेटू ...









 
नमस्कार , आकाशवाणी पुणे.

सकाळचे सात वाजतायेत, सादर आहे आमच्या पुणे केंद्रातून स्थानिक बातमीपत्र.

जागतिक महिलादिन म्हणून आजच्या दिवसाची सुरवात अतिशय उत्साहात झाली. रात्री १२ वाजून २ मिनिटांनी सर्वप्रथम शुभेच्छा देण्याचा मान कविता ताईंनी मिळवला. आपल्या लेखणीतून सर्व मैत्रिणींना शुभेच्छा देणारा संदेश आणि काही सुंदर आठवणींना उजाळा देणारे फोटो त्यांनी 'कायप्पा' वर प्रसिद्ध केले. ते वाचून आपल्या सर्वांच्या मनांत जे आहे तेच त्यांनी शब्दांत मांडलय याची प्रचिती गटातील सर्वांना आली.

डॉ. स्वप्ना यांनी हाच विचार पुढे नेत 'एका स्त्रीच खरं सौंदर्य नक्की कशात आहे',  हा एक सुंदर विचार सर्वांसमोर मांडला. आपल्या गालावरील खळ्यांसाठी आणि चेहऱ्यावरील गोड smile मुळे सर्वांना परिचित असलेल्या डॉ. स्वप्ना कामात कितीही व्यग्र असल्या तरी त्या ' सर्व बाळांमधून' वेळात वेळ काढतात हे खरंच खूप कौतुकास्पद आहे.

अंजली ताईंनी 'कायप्पा' वर दोन कॅडबरी पाठवून लगेच आपल्या दोनही मैत्रिणींच कौतुक केलं. भारतीताई, वैशालीताई , शिल्पाताई , मीनलताई , अर्चनाताई, कल्पनाताई, स्मिताताई , मिनाली ताई यांनी मैत्रिणीचं कौतुक तर केलच शिवाय महिला दिनाच्या शुभेच्छाहि दिल्या.

जास्त गोड खाऊ नये आणि जरा स्वतःच्या फिगर कडे सगळ्या मैत्रिणींनी लक्ष द्यावं म्हणून cabury  चे फोटो पाठवून शिल्पा ताईंनी आपलं प्रेम आणि काळजी दोन्ही व्यक्त केलं. या सर्व गडबडीत मीनाली ताईंची बागेतील फुलं सुकून गेली. खरं तर रोज फुलं पाठवून सकाळची प्रसन्न सुरवात करून देणारी हि फुलराणी, आज महिला दिनाच्या शुभेच्छांमध्ये हरवून गेली.

कल्पना ताईंनी आपण जसे आहोत तसं स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा या खूप अर्थपूर्ण संदेश पाठवला. त्यावर परत कविता ताईंना आपले विचार व्यक्त करायचा मोह काही आवरला नाही. अंजली ताईंनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या बंगल्यावर रंगलेल्या मैफिलीचा फोटो पाठवला आणि डॉ. स्वप्ना यांच्या विचाराशी सहमती दर्शवण्यासाठी त्यांनी परत तोच विचार share केला.

वैशाली ताईंनी इतक्यात वातावरणात एक अनोखा अंदाज वापरून तेहेलका केला. आदिमानव किती झाडांवर लटकून पान , फुलं , झावळ्या गोळा करत असेल बायकोसाठी त्यापेक्षा AC मध्ये बसून साडी खरेदी कीती सोपी हि आजकालच्या नवऱ्यांची स्थिती किती बरी यावर जोक टाकला आणि प्रत्येकीने डोळे मिटून आपल्या नवऱ्याला झाडावर spiderman सारखं लटकून पान फुलं तोडताना पाहिलं. स्मिता ताईंनी त्या स्वप्नातून बाहेर न येताच आपला संदेश पानां फुलातून व्यक्त केला.

इतक्यात वैशाली ताईंनी एका स्त्रीची ताकत काय असते हे एका खळ्खळ्णाऱ्या नदीची उपमा वापरून उलगडून दाखवलं. या विचाराच कौतुक होत असतानाच अंजली ताईंनी माणसाचं रूपांतर वाघ आणि शेळी मध्ये करू  शकणाऱ्या स्त्रीच एक आगळं रूप दाखवून हास्याची लाट आणली.

या सर्व गडबडीत संध्याकाळच्या कार्यक्रमाची सूत्र मीनाली ताईंनी जोरदार हलवली आणि सर्वांची उपस्थित राहण्याची सर पावसासारखी कोसळली.

तोवर कल्पना ताईंनी प्रत्येक स्त्री मागे एक पुरुष नाही तर एक मैत्रिणींची गॅंग असते हे सांगून आणि स्मिता ताईंनी एक स्त्री आपल्या पावलांनी काय काय घेऊन येते हे सांगून तर मीनल ताईंनी get together चा फोटो पाठवून वातावरणातील जोश कायम ठेवला .

भारतीताई आणि हर्षदाताई संध्याकाळच्या पार्टी च्या कल्पनेत, स्वप्नात, तयारीत इतक्या व्यस्त होत्या कि पार्टीया येणार कि नाही हेच सांगायच्या विसरल्या तर मिनलताई ऑफिस मधल्या पार्टीत रमल्या होत्या.  शेवटी कविताताईंनी त्यांना जागं केलं.

मुंबई च्या सूत्रांकडून समजलेल्या वृतानुसार तिकडे कतार एरलाईन्स ची सेवा विस्कळीत झाली. पुण्याच्या  वैशाली ताई second हनीमून कि महिलादिन या निर्णयावर विमानतळावर अडकल्यामुळे पायलट आणि airhostess यांना चांगलाच घाम फुटला. अखेर इथे मन ठेवून त्या विमानात चढल्या आणि business क्लास मध्ये जागा देऊन त्यांच विमानात स्वागत करण्यात आलं. नुकत्याच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार त्या आणि अमोघदादा कतार ला सुखरून रवाना झाले आहेत. जाताना कायप्पा वर आपण उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले म्हणजे मंत्रिमंडळ त्यांच्या संपर्कात राहू शकेल.....

पुढचं बातमीपत्र सादर होईल संध्याकाळी सात वाजता. तोवर , नमस्कार.





 

Wednesday, March 7, 2018



आपलं मन असंख्य आठवणी गोळा करत असतं. या आठवणींना असणारे पदरही वेगवेगळे ..  काही आठवणी सुखावह, काही कडवट, काही डोळ्यांत दाटणाऱ्या, काही मनात रुतलेल्या, काही ओठांवर हसू आणणाऱ्या तर  काही शब्दांत न मावणाऱ्या .. पण काही मनभर पसरलेल्या .... प्रत्येक स्त्रीचं मन अशा असंख्य आठवणींनी व्यापून गेलेलं असतं.

आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक नात्यानं आपल्याला भरभरून खूप काही दिलेलं असतं. आपली आई, बहीण, वहिनी , मावशी , काकू , आत्या, आजी आणि आपल्या मैत्रिणी . या सर्व जणींकडून काही ना काही आपण शिकत असतो , घेत असतो. त्यांच्या वागण्यातून काही खास गोष्टी, काही चांगल्या सवयी टिपून आपणहि आपल्या आचरणांत आणतो, स्वतःला घडवतो. खाचखळग्यांच्या रस्त्यावरून चालतांना या सर्वांची सोबत खूप मोलाची असते. मात्र  हळूहळू एक एक हात सुटत जातो आणि मैत्रीचा धागा मात्र कायमच सोबत राहतो, आयुष्याच्या अनेक वळणांवर...

सुख दुःखाचं गुज , ते चिडवणं , तो हट्ट , ते भांडणं , ते रागावणं, अशा अनेक लाटांवर हि मैत्री फुलत जाते. प्रत्येकीला आपण तिच्या गुण दोषांसकट स्वीकारलेलं असतं आणि म्हणूनच मैत्रीची व्याख्या हि कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही , ती हळूहळू खुलतं जाते. प्रत्येक मैत्रीचा रंग वेगळा , त्याच रूप वेगळं , ती निभावण्याची रीत आगळी.

आपल्या सर्व जणींच्या आयुष्यात आलेल्या आपण साऱ्या मैत्रिणी वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळी कुवत आणि ताकत असणाऱ्या. प्रत्येकीचं क्षेत्र वेगळं , प्रत्येकीचा अनुभव वेगळा, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आणि प्रत्येकीचं असणं वेगळं. काही पटकन तोंडावर बोलणाऱ्या तरी  मनांतून निर्मळ, जे मनांत तेच ओठांवर असणाऱ्या तर काही शब्दांतून व्यक्त न होवू शकणाऱ्या पण आपल्या कृतीमधून प्रेम व्यक्त करणाऱ्या .. काही मनमोकळं मनातल सांगणाऱ्या तर काही प्रेमाने सर्वांना बांधून ठेवणाऱ्या तर कधी हक्क गाजवणाऱ्या..
आयुष्यातील ती रिकामी जागा 'रीती आहे' याची उणीव भासू नये म्हणून लहान सहान गोष्टींतून ' अग मी आहे ' हे सांगणाऱ्या ... इतक्या रंगानी जर हा मैत्रीचा इंद्रधनुष्य सजला असेल तर अजून काय हवं !!!

आज महिलादिनाच्या  निमित्ताने माझ्या आयुष्यात असणाऱ्या तुम्हा सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा !!!!

 

Monday, February 26, 2018

वेगळे आभाळही अन् चांदणे हि वेगळे
वेगळ्या वाटांवरी या चालणे हे वेगळे .... 
एक होते स्वप्न तरीही भिन्न त्याची स्पंदने
हे क्षणाचे दुःख नाही, 'आर्त ' याचे वेगळे .... 

Saturday, February 3, 2018


हंपी

सिनेमाचं हे नाव वाचून सिनेमाबद्दल खूप उत्सुकता होती. कारण ट्रेलर मध्ये जी काही फोटोग्राफी आणि लोकेशन्स ची झलक मिळाली होती ती पाहून सिनेमा पाहायचं हे तर नक्की होत.

रोजच्या आयुष्यात फेसबुक आणि whatsapp मुळे आपण सतत सर्वांच्या संपर्कात असतो. आपल्या भावना व्यक्त करण्याकरता smilys वापरतो , comments करतो. पण तरीही एकमेकांसमोर बसून तासनतास गप्पा मारण्यात , चेहऱ्यावरील भाव वाचून एकमेकांना समजून घेण्यात,समजावण्यात जी मजा आहे ती यात नक्कीच नाही.

प्रेमावर विश्वास नसलेली ईशा, वास्तुविशारद असलेला एक महिना होऊनही अजूनही हंपीतच रमलेला कबीर , आणि आपल्या मैत्रिणीसाठी दिल्लीवरून खास हंपीला आलेली गिरीजा ..  ईशा कबीर आणि गिरीजा या पात्रांसोबत आपण हंपीत अगदी रमून जातो. एक रिक्षावाला, हातानी विणलेल्या वस्तू विकणारी बाई आणि एक साधू हि सोबतीची पात्र.

अमलेंदू चौधरी यांची कॅमेरा फ्रेम प्रत्येक लोकेशन अजूनच रोमँटिक बनवते, 'अपने हि रंग में',  हे राहुल देशपांडेच्या आवाजातील गीत, सिम्पल आणि स्वीट कॉस्ट्यूम्स , छोटे पण अर्थपूर्ण संवाद आपल्याला यांच्या गोष्टींत सामावून घेतात आणि आंपण ईशा कबीर आणि गिरीजा मधेच स्वतःला शोधायला लागतो. हंपी हा एक सिनेमा न राहता एक काव्य होतं ....

एकूण काय तर , आपल्याला सुद्धा असा ब्रेक हवाच
  

Wednesday, January 17, 2018


निरोपाची होती तेव्हा
तिन्हीसांज वेळ
सुटला तो हातातून
माझ्या तुझा हात
काय उरे काय रिते
कसला हिशोब
हुरहूर तीच उरी
पून्हा सारे तेच....
आठवण येता तुझी
लख्ख तो काळोख
दिसेनासे होई सारे
डोळ्यांत पाऊस....
 

Tuesday, January 9, 2018

जसा 'माहोल' आहे तशी गाणी ऐकावी, असं मला नेहमी वाटतं. कधी तो माहोल मनाचा असतो तर कधी आजूबाजूच्या वातावरणाचा.. आज दोन्हीही माहोल जमून आले होते. अस्ताला जाणाऱ्या त्याला पाहताना  माझ्याच मैफिलीत रमलेली मी आणि माझी गाणी ...

'फिर वही शाम वही गम वही तनहाई हें , दिल को समझाने तेरी याद चली आई हें , फिर वही शाम' .... तलत मेहमूद यांचा आवाज आणि मदन मोहनजींचे शब्द. ' जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के न हो , जो अधुरी रही वो बात कभी हो के न हो ' ....  आयुष्यात निसटून गेलेल्या त्या क्षणांत, ती  'अधुरी' गोष्ट आज परत नव्याने दिसू लागली. आता परत कधीच भेट होणार नाही आणि मनातलं तुझ्याशी बोलताही येणार नाही.....

'आए तुम याद मुझे , गाने लगी हर धडकन '... साहिरजींचे शब्द आणि किशोरजींचा आवाज...
आठवणी ...  नेहमीच हुरहूर लावणाऱ्या. दिवसा पुसट होऊन संध्याकाळी गहिऱ्या होणाऱ्या. 'जब में रातोमें तारे गिनता हूँ , और तेरे कदमों कि आहट सुनता हूँ , लगे मुझे हर तारा, तेरा हि दर्पण '...... आजही तुझाच भास होतोय , त्या प्रत्येक ताऱ्यात मला फक्त तूच दिसतेयस ....

'किसका रस्ता देखे , ए दिल ए सौदाई , मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई'... त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहून नकळत बाहेर पडणारा हळवेपणा ... तू परत फिरून येणार नाही तरीही पाहिलेली तुझी वाट . कित्येक दिवस सूर्यास्ताच्या वेळी , क्षितिजाकडे पाहून तुला घातलेली साद ... मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई...

'बिती ना बिताई रैना , बिऱहा कि जाई रैना , भिगी हुई अखियोंने लाख बुझाई रैना '.. गुलजारजींचे  शब्द आणि लताजींचा आवाज. ' भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए ' हि आर्तता खरंच आठवण करून देते 'तुझी' .. आजही त्या नावाने , त्या आवाजाने कोणीतरी हाक मारावी असं वाटतं. 'चाँद कि बिंदीवाली बिंदीवाली रतिया '... पाहून फक्त तू आठवतेस ....

'कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ कि दुल्हन बदन चुराए , चुपके से आए ... मेरे खयालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाये'... दिवसांना सुख दुःखाचे सोयर सुतक नसते. आपल्या आयुष्यातुन जाणाऱ्या कोणासाठीच ते थांबत नाहीत. विस्मरणात गेलेल्या आठवणी मग कित्येकदा डोळ्यातून बाहेर पडतात.. " भर आई बैठे बैठे जब युं ही आँखे"... आपल्या मनातील ती सल फक्त आपल्यालाच ठाऊक असते ... "दिल जाने मेरे सारे भेद ये गेहेरे' ... हे सार काही आत कुठंतरी लपवून ठेवावंसं वाटतं...

'आपकी याद आती रही, रातभर ... चश्म-ए-नम , मुस्कुराती रही रातभर'.... किती आठवू आणि किती विसरू तुला.. प्रत्येक आठवणीत तू नव्याने भेटत राहतेस ....

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच आहे वास्तव, जे स्वीकाराव लागत. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने  होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....

आणि तरी सुद्धा, कितीही उदास वाटलं तरी मनांत एक आशा नक्कीच असते "जब भी ये दिल उदास होता हें , जाने कौन आसपास होता हें '.....  ती नाही तरीही ती आहे .. तिचा भास आहे .. ती इथेच आहे.

प्रत्येकाला कवितेत , गाण्यात आपापला अर्थ शोधायचा असतो..  मलाही आज , या माझ्या मैफिलीत तो सापडला ... वेगळा तरीही माझा ..

आज, या प्रत्येक गाण्यात मला आई दिसली .... आणि अजून एकदा, मी तिला खूप miss केलं ....
डझनभर ...

पहिल्यांदा आई कडून ऐकला हा शब्द, खूपदा वापरायची ती. लहान असतांना तिच्या बरोबर भाजी फळं घ्यायला गेल्यावर अनेकदा कानावर पडलाय हा शब्द. शाळेत असतांना 'डझन' हा शब्द गणितात ऐकला, वापरला. नंतर किती तरी वेळा हा शब्द ऐकत, वापरत मोठे झालो.

खूप सहज पणे ऐकण्यात बोलण्यात येणारा हा शब्द. 'डझनभर कपडे आहेत तरी कमीच पडतात', 'डझनभर जमवायच्या आहेत का चपला ? किती चपला घ्यायच्या ते', 'डझनभर स्थळं पाहिली तेव्हा कुठे जमलं हे स्थळं' , 'एकेका हातात डझनभर बांगड्या घाल','खेळण्यातल्या गाड्या डझनानी आहेत माझ्याकडे',अशा अनेक वाक्यात हा शब्द वारंवार भेटतच राहिला...

पण आयुष्याच्या एका वळणावर या 'डझन' शब्दाशी परत एकदा गाठ पडली आणि त्यात एक वेगळाच गोडवा आहे हे जाणवलं तेव्हा..

नेहमी असं म्हणतात कि जीवाला जीव देणारी मैत्री हवी... खरं तर मित्र मैत्रिणी तर भरपूर असतातच कि  प्रत्येकाकडे पण एकाच सरीत गुंफलेल्या 'एक डझन मैत्रिणी' फक्त आपल्याच प्रत्येकीकडे आहेत. मनापासून जीव लावणाऱ्या, हक्काने काही सांगू आणि मागू शकू अशा, चेहऱ्यावरून मन ओळखणाऱ्या, जसं आवरून येऊ त्यावरून मूड ओळखणाऱ्या, जगातील सारी tensions बाजूला सारून हसायला लावणाऱ्या, अडचणीत धावून येणाऱ्या, ज्यांच्याबरोबर अशक्य वेडेपणा करू शकू अशा आणि जिभेला हाड नसतं हे ज्यांच्याबरोबर अगदी पटत अशा या माझ्या डझनभर मैत्रिणी....

प्रत्येक फुलात असतो वेगळा रंग आणि गंध तसंच प्रत्येकीत लपलेलं एक वेगळं सौंदर्य, प्रत्येकीचं एक वेगळं अस्तित्व. प्रत्येकीकडून काही ना काही शिकण्यासारखं आणि प्रत्येकी कडून निश्चित काही न काही घेण्यासारखं. वेगवेगळ्या परिस्थितीतून एकत्र आलेल्या, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिक्षण घेतलेल्या, वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि तरीही एकमेकींशी जोडलेल्या. छोट्या छोट्या गोष्टीत एकमेकींना जपणाऱ्या, हक्कानं भांडणाऱ्या आणि भांडणात सुद्धा प्रेम शोधणाऱ्या ...

खरं सांगू का ... तीन वर्षांपूर्वी आई गेली तेव्हा आयुष्यात जे काही रितं झालं ते कधीच भरून येण्यासारखं नव्हतं आणि नाही.. पण जे काही रितं झालं त्याची सल, त्याची बोच विसरायला तुमच्या सगळ्यांमुळे कुठेतरी मदत झाली असं प्रामाणिकपणे वाटतंय आणि म्हणून सांगावस सुद्धा. २०१५ साली ३ जानेवारी ला सुरु झालेला आईचा शेवटचा प्रवास २२ जानेवारीला संपला.. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक डिसेंबर महिन्यात सुरु झालेली जीवाची घालमेल, तगमग मी कधीच थांबवू शकले नाही. दिवसागणिक वेळेगणिक अजूनही ते सारं काही रोज नजरेसमोरून जातं आणि मग मी स्वतःला ते विसरायला लावून तिच्या सुंदर आठवणी समोर आणते... 

आपण काल खूप मज्जा केली, वेडेपणा केला , खूप खळखळून , पोट धरून हसलो ... Christmas नंतर लोणावळा ट्रिप केली. आर डी बर्मनदांचा कार्यक्रम पाहिला, शनिवारी हर्षदा वैशाली बरोबर सिनेमा पाहिला आणि कालची धमाल पार्टी .. मला अवघड असणाऱ्या या साऱ्या दिवसात या वर्षी मी खूप खूप वेगळ्या वातावरणात होते. काल रात्री एकदा अपराधीपण आलं .. तीन वर्षांपूर्वी याच दिवसात आईला वाचवायचा प्रयत्न करणारी मी आणि आजची मी यात खूप खूप अंतर होतं ...

कदाचित या तीन वर्षांतील हा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता पण तुम्हा सर्वांमुळे तो शक्य झाला हे मात्र नक्की....  आई गेली पण जातांना मैत्रिणींचा आशीर्वाद देऊन गेली हे नक्की .....