आपलं मन असंख्य आठवणी गोळा करत असतं. या आठवणींना असणारे पदरही वेगवेगळे .. काही आठवणी सुखावह, काही कडवट, काही डोळ्यांत दाटणाऱ्या, काही मनात रुतलेल्या, काही ओठांवर हसू आणणाऱ्या तर काही शब्दांत न मावणाऱ्या .. पण काही मनभर पसरलेल्या .... प्रत्येक स्त्रीचं मन अशा असंख्य आठवणींनी व्यापून गेलेलं असतं.
आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक नात्यानं आपल्याला भरभरून खूप काही दिलेलं असतं. आपली आई, बहीण, वहिनी , मावशी , काकू , आत्या, आजी आणि आपल्या मैत्रिणी . या सर्व जणींकडून काही ना काही आपण शिकत असतो , घेत असतो. त्यांच्या वागण्यातून काही खास गोष्टी, काही चांगल्या सवयी टिपून आपणहि आपल्या आचरणांत आणतो, स्वतःला घडवतो. खाचखळग्यांच्या रस्त्यावरून चालतांना या सर्वांची सोबत खूप मोलाची असते. मात्र हळूहळू एक एक हात सुटत जातो आणि मैत्रीचा धागा मात्र कायमच सोबत राहतो, आयुष्याच्या अनेक वळणांवर...
सुख दुःखाचं गुज , ते चिडवणं , तो हट्ट , ते भांडणं , ते रागावणं, अशा अनेक लाटांवर हि मैत्री फुलत जाते. प्रत्येकीला आपण तिच्या गुण दोषांसकट स्वीकारलेलं असतं आणि म्हणूनच मैत्रीची व्याख्या हि कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही , ती हळूहळू खुलतं जाते. प्रत्येक मैत्रीचा रंग वेगळा , त्याच रूप वेगळं , ती निभावण्याची रीत आगळी.
आपल्या सर्व जणींच्या आयुष्यात आलेल्या आपण साऱ्या मैत्रिणी वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळी कुवत आणि ताकत असणाऱ्या. प्रत्येकीचं क्षेत्र वेगळं , प्रत्येकीचा अनुभव वेगळा, प्रत्येकीचा स्वभाव वेगळा आणि प्रत्येकीचं असणं वेगळं. काही पटकन तोंडावर बोलणाऱ्या तरी मनांतून निर्मळ, जे मनांत तेच ओठांवर असणाऱ्या तर काही शब्दांतून व्यक्त न होवू शकणाऱ्या पण आपल्या कृतीमधून प्रेम व्यक्त करणाऱ्या .. काही मनमोकळं मनातल सांगणाऱ्या तर काही प्रेमाने सर्वांना बांधून ठेवणाऱ्या तर कधी हक्क गाजवणाऱ्या..
आयुष्यातील ती रिकामी जागा 'रीती आहे' याची उणीव भासू नये म्हणून लहान सहान गोष्टींतून ' अग मी आहे ' हे सांगणाऱ्या ... इतक्या रंगानी जर हा मैत्रीचा इंद्रधनुष्य सजला असेल तर अजून काय हवं !!!
आज महिलादिनाच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात असणाऱ्या तुम्हा सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा !!!!
No comments:
Post a Comment