Thursday, December 15, 2016

एक प्रवास, आठवणीतला ....


आज बऱ्याच दिवसांनी रविवारची सकाळ निवांत होती.आम्हा दोघांना ऑफिसला आणि कांतेयला शाळेला सुट्टी, त्यामुळे बाबा कालच इकडे आले होते. या छान थंडीत, टेरेस मध्ये येणार कोवळ ऊन अंगावर घेत ; आमच्या चौघांच्या रंगलेल्या गप्पा आणि सोबत कांदे पोहे व मस्त वाफाळलेला आल्याचा चहा...सुट्टीच्या दिवसाची  एकदम परफेक्ट सुरवात.


बोलता बोलता सहज विषय निघाला आणि बाबांच्या जुन्या आठवणींमध्ये आम्ही सारेच रमलो. वयाच्या १९ व्या वर्षी बाबा भारतीय नौसेनेत कसे गेले इथपासून, तेव्हाची प्रवेश परीक्षा, सुरवातीचे प्रशिक्षण, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग झाल्यावरती घरापासून दूर राहतानाचे अनुभव,पुण्यात NDA मध्ये असतानाच्या आठवणी, ६२ आणि ६५ च्या युद्धातील अविस्मरणीय क्षण,सिंगापूरला जाऊन त्यांनी घेतलेले सबमरीनचे प्रशिक्षण तसेच INS राजपूत , INS ब्रह्मपुत्रा , INS जमुना आणि INS विक्रांत या वेगवेगळ्या जहाजांवरचा अनोखा अनुभव आणि INS विक्रांत वर असलेल त्यांच विशेष प्रेम ... सार काही थक्क करणार.


१९६१ साली माल्टाला ( फ्रान्स / ब्रिटन ) भारतीय नौदलाची विशेष तुकडी पाठवण्यात आली होती. विक्रांत जहाजाची भारतीय नौदलाशी झालेली ती पहिली ओळख. तेथे ते जहाज कमीशन झाले म्हणजॆ आपल्या ताब्यात आले. नौदलाच्या त्याच तुकडीत बाबा होते. INS विक्रांत वरून माल्टा ते मुंबई हा त्यांनी केलेला विक्रांतवरचा पहिला अविस्मरणीय प्रवास......म्हणूनच आजही INS विक्रांतचे नाव काढताच भरून आलेल्या त्यांच्या डोळ्यांनी खूप काही सांगितल.आयुष्यात इतक्या सुंदर आठवणी बाबांना भारतीय नौसेनेने दिल्या.

तेव्हा काळाची गरज म्हणून कमावणं गरजेचं होत, कुळकायद्यात शेत जमीन गेलेली, नोकरी नाही, भावंडांत मोठं असल्याने कुटुंबाची जबाबदारी होती. अशा परिस्थितीत समोर दिसला एकच मार्ग.. अर्ज केला. परीक्षा दिली आणि निवड सुद्धा झाली. एका लहान गावातून अनवाणी निघालेला 'तो' नौदलात दाखलहि झाला. पहिल्याच दिवशी मिळाले तीन प्रकारचे युनिफॉर्म आणि प्रत्येक युनिफॉर्म बरोबर घालायचे वेगवेगळे बुटांचे तीन जोड .... ते पाहून 'त्याच्या' डोळ्यांत टचकन पाणी आलं. अनवाणी पायानी इथवर येऊन , जणू सर्व प्रश्नाची उत्तर 'त्याला' इथेच मिळाली. आता सोबत होती ती निळ्या आकाशाची , अथांग सागराची आणि त्या बोटींची. क्षितिजावर खूप सारी स्वप्न होती आणि मनात ती पूर्ण करण्याची धडपड. एक एक पाऊल पुढे टाकत खुप लांबचा पल्ला गाठला पण कधीही  सुरवात कोठून केली, हे 'तो' नाही विसरला.


योगायोगाने भारतीय नौसेना सप्ताह सुरु होता. NDA मध्ये बाबा १९५८ साली होते म्हणजेच आज ५८ वर्ष झाली होती NDA सोडून. काय हा योगायोग ...  हाच धागा पकडून आम्ही बाबांना त्याच जागी घेऊन जायचे ठरवले जिथे त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी होत्या. घरापासून अर्ध्या तासाचे अंतर होते आणि त्या अर्ध्या तासांत बाबा मात्र अठ्ठावन्न वर्ष मागे पोहचले होते.


तेव्हाच चित्र आणि आजच चित्र यांत खूप बदल झाले होते आणि बाबा तेच बदल डोळ्यांत साठवत होते. त्यांच्या सारख्या इतक्या जुन्या ऑफिसर ला भेटायला साहजिकच तेथील काही ऑफिसर आले आणि पाहता पाहता काही क्षणात तेथील वातावरण एकदमच बदलून गेले.


शरीराने थकलेला जीव पण अजूनही तीच ऊर्जा , तोच अभिमान आणि तोच गर्व. एक एक्स ऑफिसर बोलत होता आणि बाकी ऑन ड्युटी ऑफिसर त्यांचं बोलणं ऐकत होते , प्रश्न विचारात होते. आज खऱ्या अर्थाने बाबा त्यांच्या 'फील्ड' वरती होते. त्या सर्वांचे हावभाव, बोलण्यातील जोश , चेहऱ्यावरचा आनंद मी डोळ्यांत साठवत होते. त्या सर्वांच्या गप्पा अशाच रंगत गेल्या. त्या काही वेळात बाबा जणू 'ते' आयुष्य परत जगले. अखेर निघायची वेळ झाली. सर्वांशी हस्तांदोलन करून बाबा निघाले. बाबांचा हात मी धरला होता , एवढ्यात एक क्षण थांबून बाबा मागे वळले आणि म्हणाले,'कभी जरुरत पडे तो बुला लेना,आ जायेंगे लढने ' तेव्हा मात्र तो ऑफिसर एक कडक सॅल्यूट मारून पुढे आला आणि त्यांना बिलगला. नि:शब्द होवून आम्ही फक्त पाहत होतो .
खूप विलक्षण, खूप वेगळा अनुभव होता.

आजच्या दिवसाने , बाबांसारख मला पण खूप काही दिल. नक्की काय, हे शब्दांत मांडता येण्याच्या खरंच पलीकडचं होत माझ्या करता आणि बाबांकरता सुद्धा !!



Wednesday, November 23, 2016

रोजची संध्याकाळ तितकीच ओढ लावणारी... आकाशातील रंगांची उधळण अन अस्ताला जाणारा तो सूर्य,  पश्चिमेला क्षितिजावर रंगणारा हा रंगांचा सोहळा... रोज त्याच उत्साहाने पाहत होते. सूर्यास्त पाहण्याच जणू वेड लागलं होत, हेच खरं...


सूर्यास्ताच्या त्या केशरी सोनेरी रंगात खूप काही दिसायचं....कधी तारुण्याचे ते दिवस, स्वप्नवत.... मन  फुलपाखरू  होतं जणू... . ना कोणती काळजी , ना कोणता व्याप ;  आपल्याच रंगांत रंगलेल, आयुष्याची स्वप्न रंगवण्यात हरवलेल..  मग हळूहळू दिवस सरले व उडणार मन जमिनीवर आलं. आयुष्याने अनेक रंग हलकेच उलगडून दाखवले... आणि आता या वळणावर ; त्या सूर्याला अस्ताला जाताना पाहून , हातून काहीतरी निसटतंय याची चूटपूट लागली.


निम्मं गेलं आणि निम्मं उरलं, या जाणीवेने मन थोड हळवं झाल. वाटल ... निसटत चाललेल्या या क्षणांत अजून खूप काही मिळवावं ... पौर्णिमेच्या टिपूर चांदण्यात पोटभर फिरावं, हिरवे डोंगर चढावे, वाफाळलेल्या कॉफी सोबत रात्रभर गप्पांची मैफल सजवावी, लॉन्ग ड्राईव्हला जावं , गाण म्हणाव, स्वच्छ निरभ्र आकाशा सारख खळखळून हसावं, समुद्रकिनारी वाळूत दूरवर अनवाणी चालत राहावं , डोळे मिटून आपलं आवडत गाणं ऐकत सार सार विसरून जावं, मनसोक्त रडावं , एकटेपण सुद्धा अगदी भरभरून जगावं, स्वतः वरती प्रेम करावं, अगदी स्वछंद जगावं .....


उरलेल्या आयुष्याबद्दलच चित्र अजूनच साफ होत गेलं. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते.  रोजच्या काल पेक्षा आज किती सुंदर आणि वेगळा साजरा होईल, हे पाहणच महत्वाचं....


शेवटी काय....  तर आपल्या आयुष्याच्या कॅनवास वरती कोणते आणि किती रंग भरायचे, हे आपणच ठरवायला हवं .....







Saturday, November 19, 2016

आयुष्य


मी नव्याने आज मजला,
थांबून थोडे पाहिले
काय हरवले, काय गवसले
हे हिशोब काही मांडले


कधी मनातले ना सांगू शकले,
परी नजरेतून ते जाणले
काही अशा सोबतीत अवघे,
आयुष्य सोपे जाहले


कधी अडखळले , कधी धडपडले
कधी वाटले, सारे संपले
त्या वळणावर, त्या टोकावर
मग अवचित कोणी भेटले ...


अनूभवाने ठोकून ठोकून,
सुंदर पैलू पाडले
मुखवटा चढवून, जगणाऱ्यांना
जवळून काल मी पाहिले


उरल्या सुंदर नात्यांचे मग
अलवार बहरले ताटवे
गंधाळूनि मग अवघे गेले
आयुष्य माझे आज हे .....

Friday, November 18, 2016

एकटा ..


शब्द सारे संपले ते , फक्त उरल्या जाणीवा
    सांजवेळी या किनारी , उरलो आतां एकटा .... 

Thursday, November 17, 2016


व्हेंटिलेटर


सिनेमाच्या निमित्ताने परत एकदा या शब्दाची भेट झाली. दोन वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला हाच तो व्हेंटिलेटर. लाईफ सपोर्ट सिस्टिम एवढाच काय तो त्यावेळी समजलेला अर्थ .. पण नंतर वाटलं , आजच मरण उद्यावर ढकलणार एक साधनच ते. अगदी जवळच्या माणसाला व्हेंटिलेटर वर पाहणं , यासारखं दुर्दैव नाही.


काय गंमत आहे पहा, एकीकडे या हॉस्पिटलमध्ये आपली व्हेंटिलेटर शी नव्याने ओळख होते आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या माणसांची परत नव्याने भेट घडते.. होत राहते ... रोजच.


आपलं कर्तव्य ओळखून दिवस रात्र पेशंटची सेवा करणारे डॉक्टर, नर्स हे लोक एकीकडे आणि फक्त रीत म्हणून भेटायला येणारे दुसरीकडे. बरं , ते आधार द्यायला येतात कि आधार जाणार याची जाणीव करून द्यायला , हेच समजत नाही. खरं तर तेव्हा प्रेमाचा एक हात हवा असतो , जे आपल्या हातात नाही ; तरीही त्यासाठी त्या वरच्याशी भांडायला आधार हवा असतो , डोक्यावर हात ठेवून बोलणारा प्रेमाचा एक शब्द हवा असतो ....


सर्व छान असतांना कधीही भेटायला न येणारे , हक्कानी चौकशीचा कधी एक फोन न करणारे चेहरे मग अचानक आजूबाजूला दिसू लागतात अन् तेंव्हा जीव गुदमरू लागतो. अशा वेळी न सांगता आपलं मन ओळखणारे , पाठीवर प्रेमाने हात ठेवणारे, काहीही न बोलता आपला हात घट्ट धरणारे काही हात आपल्यासाठी व्हेंटिलेटर होतात.


पेशंटचा व्हेंटिलेटर काढायचा कि नाही हा प्रश्न शेवटी डॉक्टर विचारतात आणि तो कर्ता करविता सारेच प्रश्न संपवतो. एक दोन दिवस होत नाहीत तर 'पुढची कार्य ' हा चर्चेचा विषय कानावर आदळतो आणि परत त्याचा श्वास अडकतो. अरे जो गेलाय ते दुःख आधी स्वीकारू तर द्या , मोडलेल्या माणसांना सावरणं महत्वाचं कि हे बोलणं. ज्याच्यावर वेळ येते तोच फक्त कोसळलेला बाकीचे फक्त व्यवहाराने चालणारे. बरं , थोड्या रूढी परंपरा सोडू म्हटलं तर त्यावरून वादंग; अरे ज्या कुटुंबाला फरक पडलाय त्याला ठरवू द्या ना , तुम्ही का विडा उचलता .. तुम्हाला फरक पडलाय का ? नाही ना , नाहीतर 'ती' बातमी मिळाल्यावर आधी जेवून मग नसता आलात हॉस्पिटलात आणि हो काल कुठल्याशा प्रदर्शनात जावून जी खरेदी केली तुम्ही , ते चाललं का तुम्हाला या सुतकात ... अरे किती खोटं जगाल.


कर्तव्य विसरायचं आणि वेळ आली कि हक्काची मागणी करायची , बहुतांश घरात दिसणार एक विदारक सत्य. आयुष्य किती अमूल्य आहे , अस्थिर आहे ते जवळच्या माणसाला जाताना पाहून समजत, पण म्हणून काय तो अनुभव येईपर्यंत वाट पहायची ? तो खोटा अहम आधीच नाही का सोडू शकत आपण. किती आणि कसं जगलोय असा विचार करतांना किती उरलय हे पण तर पाहायला नको का ? मोकळ्या मनानं नात्यांच्या या दुनियेत एक पाऊल पुढे टाकलं , तर आपण काही लहान नाही होणार हे कधी समजणार आपल्याला ?


पण एक बरं झाल, या चित्रपटाच्या निमिताने का होईना आपल्या नात्यांचा विचार तर काहीजण करू लागले. आणि हो अजून इतका वेळ आहे आपल्याकडे ; जे या आधी करायचं राहिलं ते आतां करायला .. एक प्रेमाची मिठी मारायला , हक्कानं काही द्यायला काही घ्यायला , मनापासून माफी मागायला , झालं गेलं विसरून जायला , परत एकदा एकत्र यायला ... कधीही न उलगडलेले नात्यांचे धागे या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करायला.


कदाचित यामुळे जर कधी आपण व्हेंटिलेटर वर गेलो तर त्यावेळी आपल्या नात्यांना कुठल्याच व्हेंटीलेटरची गरज भासणार नाही , हे नक्कि .......

Saturday, November 5, 2016

मैफिल


सारं जग उजळून गेल आणि मनातले काही अंधारे कोपरे,  आज जरा जास्तच सलू लागले. आयुष्यातली ती रिकामी जागा अन् मनांत न मावणाऱ्या असंख्य आठवणी. एखादी मैफिल संपूच नये असं वाटत असताना संपते अन मनाला चूटपूट लावून जाते. पण काही स्वर आणि शब्द मात्र मनातच रेंगाळतात तसच काहीस...


तिन्हीसांजा झगमगणारे आकाश दिवे, दिपमाळा, रांगोळ्या, मातीचे किल्ले, त्यावरची चित्रे, फटाक्यांची आतिशबाजी.... एकीकडे रंगांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशात सारा आसमंत न्हाऊन गेला होता तर दुसरीकडे सारा काळोख, इथे दाटला होता, माझ्या मनांत.


सकाळची तिची चाललेली लगबग, ती खमंग फराळाची तयारी, दारासमोर तिने लावलेली दिवाळीची पहिली पणती, उटणं-तेल वाटीत काढून , पाट रांगोळी सजवून , गरम पाण्याची तयारी होताच आपल्याला गाढ झोपेतून उठवणारी आपली 'आई'. घराघरांतून दिसणार हे दिवाळीच चित्रं. पण माझ्या या चित्रातून मात्र, ती केव्हाच  हरवली होती, आकाशातील त्या लक्ष लक्ष चांदण्यात.


'बोले अखेरचे तो, आलो इथे रिकामा ; सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे '... आरती प्रभूंच्या या ओळींप्रमाणेच या बहरलेल्या बागेतून ती मात्र गेली होती ... कायमचीच .


आता मागे उरल्या होत्या फक्त तिच्या आठवणी. या शब्द नि:शब्द किनाऱ्यावरती आता कोणाचीही सोबत नको होती. दिवाळीच्या पणत्यांच्या त्या मंद प्रकाशात, त्या पोरकेपणाच्या जाणीवेने डोळे मिटताच या मैफिलीत मला एकच गाणं ऐकू येतं होत  .... ग्रेस याचे शब्द आणि हृदयनाथजींचा आवाज...
'ती गेली तेंव्हा रिमझिम , पाऊस निनादत होता ....... '

Wednesday, October 19, 2016

आलूपराठा

'आज जेवायला आलू पराठा बनवू का ?' या प्रश्नावर "हो आई, कर आलू पराठा"..  या काही क्षणानंतर आलेल्या कांतेयच्या उत्तराने डोळ्यांत पाणी आलं . आज जवळपास वर्षानंतर आलू पराठा बनवायला तो हो म्हणाला होता आणि मी मात्र त्याच्या उत्तरानी थोडी अस्वस्थ आणि थोडी खुश ही झाले.

'आजी आणि आलूपराठा' या समीकरणातून कांतेयची आजी वर्षापूर्वी हरवली होती. कळायला लागल्यापासून आजीने 'काय बनवू' अस विचारल कि 'आलू पराठा' हे उत्तर ठरलेलं. कांतेय येणार म्हटल्यावर सकाळी उठल्या उठल्या आजीने कुकरला बटाटे उकडायला लावले कि आजोबा, मामा, मामी पासून काम करणाऱ्या रेणू आणि शांताला पण समजायच कि आज कोणाची स्वारी येणार आहे ते.

कांतेयची आजी होती अगदी सुगरण. जो पदार्थ करेल तो अगदी जीव ओतून बनवायची आणि एक खास वैशिष्ट्य  म्हणजे प्रत्येक वेळी पदार्थाची चव पण अगदी तीच.. नारळ घालून केलेला रव्याचा लाडू असो , नारळाची बर्फी , पुरणाची पोळी, कडबू, खव्याच्या साटोऱ्या , गव्हाची खीर, वांग्याची भाजी अथवा साधा आमटी भात.. खरं तर याच चवीनं तिनं माणसं जोडली. त्या काळी जेव्हा तिने संसाराला सुरवात केली तेव्हा तिच्याकडे ना पैसा होता ना कोणाची कुठली मदत. पण जे काही होत त्यात समाधान होतं, सुख होतं ,आनंद होता आणि बहुदा तेच तिच्या हातात झिरपलं होतं आणि म्हणूनच तिच्या हाताला चव होती.

साधारण वर्षापूर्वी सार सार सुटलं. ती गेली आणि सोबत ती चवही. आई, बायको, सासू या अलवार नात्यांमध्ये तिची रिकामी झालेली जागा कालांतराने आम्ही स्वीकारली होती पण "आजी" म्हणून कांतेय साठी ती रिकामी जागा अजूनही त्याला अस्वस्थ करत होती. तिचं अस अचानक नाहीस होणं त्याला पचत नव्हतं. तो लहान निरागस जीव ' आजी इज नो मोअर' याचा अर्थ अजूनही शोधतच होता.

कालपर्यंत तिच्या मांडीवर खेळलो,तिची अंगाई ऐकून झोपलो,तिचं बोट धरून चालायला शिकलो,जिने आजवर  चिऊकाऊच्या गोष्टी सांगत भरवलं ती आजी बरं नाही म्हणून हॉस्पिटल मध्ये का असेना पण होती आणि आज अचानक नाही .. या असण्यानसण्यातला फरक समजायला तो खूपच लहान होता. आजीला शोधता शोधता जणू तोच हरवला होता.

'येणारा प्रत्येक माणूस कधीतरी जातो' हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. माझी आई गेली होती आणि ज्याची मी आई आहे त्याला मात्र , त्याच्या आयुष्यातून मी कधीतरी जाईन या भीतीने ग्रासले होते. माझ्यासाठी तो खूपच हळवा झाला होता , मला जपू लागला होता.

हळूहळू दिवस जात होते. आजी-आबा या जोडशब्दातून हरवलेल्या आजीमुळे आबांना टाळणारा कांतेय आता त्यांना चालताना आधारासाठी हात देत होता. माझ्या चेहऱ्यावरून माझ्या मनाचा अंदाज घेत 'तुला आजीची आठवण येत असेल तर मला सांगू शकतेस तू ' असं म्हणायचा. त्या इवल्या डोळ्यांत दिसणारी ती सोबत पाहून वाटायचं आई गेली , पण जाताना मलाच नाही तर याला पण मोठ करून गेली.

आज आलू पराठा खाताना 'आजी सारखा नाही झालाय पराठा 'असं त्याने म्हणताच त्या डोळ्यांत दिसलेल्या त्या मिश्किल हसण्यात मला मात्र सार काही मिळालं होत....













Friday, August 19, 2016

आयुष्याच्या सांजवेळी तिची साथ सुटते आणि
आलेल्या त्या एकाकीपणात, फक्त तीच दिसते .....

जळे रात सारी, जुन्या आठवांनी
सांगू तुला मी, हे सारे कसे
काळोख दाटे, नभांत अवघा
डोळ्यांत सजले परि चांदणे ...

उगाच होई, कधी भास वेडा
असे तूच माझ्या, पुन्हा सोबती
अनोळखी वाटेवर दिसली,
या मनांत रुतली तुझी सावली .....

रेशीम हळवी, ती  सोबत विरली
आतां शेवटाला, कसे जायचे
निष्पर्ण होतां, आयुष्य सारे
पाचोळ्यांत उरले, शोधायचे .....




 

Thursday, August 4, 2016

आठवणींच्या कोसळती या , उधाणलेल्या धारा
                    संथ लयीची रिमझिम हळवी, अलवार जसा तू यावा
कांकणांची उगाच किणकिण , तो पैंजण नाद स्मरावा
                    तुझ्या बरसण्यात मजला, भास सुरांचा व्हावा ..... 

Saturday, July 2, 2016

' पहिला पाऊस  '

शहारा गुलाबी,
     अलवार आला
भिजवून गेला,
     जरासा जरासा

हळव्या क्षणांचा,
     ओल्या स्पर्शाचा
बरसून गेला,
     जरासा जरासा

कधी संथ लयीचा,
     तो रिमझिम आला
हरवून गेला,
     जरासा जरासा

गंधात न्हाऊन,
      सांगून गेला
गोष्टी मनीच्या,
      जरासा जरासा

पैंजणे  थेंबांची,
      देवून गेला
मातीस ओल्या,
      जरासा जरासा

एकांती गझलेत,
     रिमझिम गावा
परतून यावा,
     जरासा जरासा ....










 

Friday, July 1, 2016

चिंब रात पावसाळी,
          सारा भिजला काळोख
'आलापां' त बरसला,
          आज 'मल्हार' रानांत

ओसरल्या आठवणी,
          झाले मोकळे आकाश
गंध  मारव्याचा गेला,
          वेड लावून जीवास ..... 
' गाणारा पाऊस '

"रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
 भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन "......

आज कोसळणारा हा पाऊस 'पाहून' आणि 'ऐकून' या गाण्याची आठवण झाली. खरं तर तो 'बरसत' होता पण आठवण 'रिमझिम' ची झाली. किशोरजींच्या आवाजातील आर्तता आणि बाहेर पडणारा तो पाऊस. खरंच वेड लावतो हा आवाज अन् हा माहोल. दूसरीकडे हेच गाणं लताजींच्या आवाजात खट्याळ वाटतं , ऐकताना आणि पाहताना .... वाटतं, या पावसांत हातात हात घेऊन असच बेधुंद थोडं आपणही फिरावं.

कधी हलक्या पायांनी येणारा , तर कधी बेधुंद बरसणारा, अविरत कोसळणारा तर कधी खट्याळपणे उन्हाबरोबर लपंडाव खेळणारा हा पाऊस, प्रत्येकाच्या जवळचा असतो आणि प्रत्येकाला वेगळा भासतो. पावसाची रिपरिप कधी हळुवार रिमझिम वाटते, तर कधी कोसळणाऱ्या त्याला पाहून मन अगदी बैचेन होते.

" पहेले भी यूं तो बरसे थे बादल, पहेले भी यूं तो भिगा था आँचल ," हें ऐकतांना हाच पाऊस या आधी इतका रोमँटिक कधी वाटलाच नाही. पण 'तो' आला आणि हा पाऊस जणू अगदी नव्याने भेटला... आजचा पाऊस बघतांना ते सार काही आठवलं.

" रिम झिम रिम झिम, रून झुंन रून झुंन ... भिगी भिगी रूत में, तुम हम हम तुम .. चलते हें "...
या गाण्यांत 'बजता हें जलतरंग , पेड की छत, बुंदो के मोती, बादल की चादर ओढे सोई दिशाए , झिलोंके आईने , बादल खोले आई घटाए', असं ऐकल्यावर मनांत येतं , सारं काही सोडून या पावसांत दूरवर जावं आणि मस्त भिजावं .

त्याच्या विरहात, 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग गए थे ', या ओळी गुणगुणतांना हा पाऊस अजूनच त्याची आठवण करून जातो. ' गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो', म्हणतांना हे मनही अगदी चिंब भिजत 

या पावसांत त्या टपोऱ्या थेंबांकडे पाहून, ' बुंदो के मोतियों में घुले के एहसास आया , वक्त से निकल के लम्हा दिल के पास आया, ' हे आठवलं नाही असं होतच नाही. ' ये साजिश हें बुंदो की , कोई ख्वाईश हें चूप चूप सी ', हे म्हणतं, पावसांत भिजण्याची 'ख्वाईश' पूर्ण करायलाच हवी.

पाऊस कसा अन् कधी पडतो यावर बरेचदा येणाऱ्या आठवणी अवलंबून असतात. काही मनाजवळच्या तर काही मनात रुतलेल्या. पावसात 'या आठवणींची जितकी आठवण यावी' तितकी इतर ऋतूंत येणं तसं विरळच.

'ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होतां '.... ग्रेस, हृदयनाथ आणि पाऊस !! या पावसांत हे गाणं अजूनच व्याकुळ करून टाकतं. 'ती' आयुष्यात असली तरीही आणि नसली तर .. बाहेरच्या पावसाबरोबर डोळ्यांतूनही मग हा पाऊस बरसू लागतो.

मुसळधार पावसांत लॉन्ग ड्राईव्हला जाऊन ' ऋतू हिरवा ', ' श्रावणात घन निळा', ऐकत भिजण्यातील मजा काही औरच. अशा या पावसांत आठवणी आणि गाण्यांसोबत मस्त भिजूयात ...... 

 

Monday, June 27, 2016

मैत्री

एक स्ट्रॉन्ग कॉफी,
मस्त छान वाफाळलेली
कयानीच्या केक सोबत,
मैफल गप्पांनी रंगलेली

वेळ काढून भेटण्यात,
खरंच वेगळी मजा असते
मन मोकळं करायला,
हिच सोबत हवी असते

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय,
कधी मन जाणून घेणं
कौतुकाची थाप देवून,
एकमेकांना आधार देण

आनंदात तर येतात सारे,
दुःखात मैत्री धावून येते
न मागता न सांगता,
खूप काही देऊन जातं

निखळ मैत्रीत अजून,
सांगा बर काय हवं ?
शब्दांत सांगता न येणारं,
ते हळवं नातं खरं .....
 

Monday, June 13, 2016


' अल्लड पाऊस '

चिंब ओले आसमंत, वाहे अल्लड हा वारा 

मुक्तपणे बरसला, गर्द मेघांचा हा थवा 

साद गंधातून नवी, ओल्या मातीतून आली

भिजे आभाळ ते निळे अन् पायवाट जूनी  
              
अशावेळी उगा वाटे, पुन्हा पावसांत जावे 

रिमझिम त्याच्यासवे, थोडे आपणही गावे 

निथळती झाडवेली, इंद्रधनू अंबरात 
 
साठवून ओंजळीत, घ्यावे सतरंगी क्षण …
 

Saturday, June 4, 2016

' आईचा फ़ोन  '

आताशा या फोनवर
तुझा आवाजच येत नाही,
'कशी आहेस ?' म्हणून तू
विचारपूसही करत नाहीस

मी लावून सुधा हा फोन
तुझ्यापर्यंत पोहचत नाही
आई, तुझ्याशी आता
मला बोलताच येत नाही

रोजचा तुझा एक फोन,
आतां सारखा आठवत राहतो
अजूनही तो आवाज तुझा,
माझ्या या कानामध्येच राहतो

मनामध्ये दाटलय खूप,
आतां मनात मावत नाही,
तुझ्यानंतर बोलायला
मला मात्र कोणीच नाही

का इतक्यात गेलीस तू ?
अजून खूप बोलायच होतं
'नंतर बोल, आधी खावून घे'
असं अजून ऐकायच होतं

तू नाहीस म्हणून आतां,
फोटो तुझा बघत असते
बाबा म्हणतात 'फोटो का?',
तुझी आई तर इथेच असते

खर सांगू आई तुला ,
तू खूप काही घेऊन गेलीस
अन् जातां जातां एका क्षणांत
मला मोठ करून गेलीस ….



Tuesday, May 10, 2016

' परत प्रेमात पडायचय…  '

मनातलं बोलता आलं नाही,
म्हणून लिहिली कविता
तर कधी डोळ्यांतील वाचलं नाहीस,
म्हणून लिहिली कविता …

माझ्या या कवितेत
तू कधी होतोस वारा,
तर कधी पौर्णिमेचा चांदवा.
मोरपंखी स्वप्नातला तू ,
कधी त्या बेधुंद पावसासारखा …
मनाच्या गाभाऱ्यातला
एक अलवार तरंग,
तर कधी उमलत्या बहरांमधल
गोड गुलाबी स्वप्नं …

पण कॅनव्हास, ब्रश , कॅमेऱ्यांत
शब्दांची हि भाषा,
तुला कधी कळलीच नाही
आणि तुझ्या रंगांची जादू
मला तशी समजलीच नाही.

घालमेल , हुरहूर, तगमग, ओढ
या शब्दांचे अर्थ जसे उमजत गेले
तसे अलवार मोरपंखी  नाते
अजूनच खुलत गेले ….

आभाळभर पसरलेला काळोख
अन् तो निळा समुद्र किनारा,
मूठभर चांदण घेऊन
त्या चित्रांत रंग भरणारा तू ….
कदाचित तुही तेच सांगत होतास
शब्दांनी नाही तर रंगानी ….

उन्हं कलती झाल्यावर,
त्या पिवळ्याजर्द रानफुलांत
थव्याथव्याने परतणाऱ्या
पाखरांच्या किलबिलाटात
त्या हिरवाकंच रानांत
जणू तू मलाच शोधत होतास …
कारण रंगांची भाषा
आतां मलाही येऊ लागलीए …

अस वाटतंय ,
नव्यान काही लिहावं
अन् त्या नव्या कवितेसाठी
परत प्रेमात पडावं … तुझ्याच  !!!
 
शिशिर …

अनेक ऋतु आले अन् गेले
पण शिशिरातील आठवणींचा मोहर,
आजही कायम आहे.
टपटप गळणाऱ्या पानांच्या,
अविरत झंकारात
आजही उमलत जाते,
एक एक आठवण …. तुझीच

कधी अवेळी दाटून येतं ते मळभ
मनाला हुरहूर लावणार,
हळुवार मागं घेऊन जाणार….

दरवर्षी शिशिरात असाच सजतो,
हा प्रवास,
पालवीपासून या पानगळी पर्यंतचा …. 
एक पुरानी याद हे लौटीं
बारिश में, तनहाई में
ख़ामोशी से छेड़ रही यूँ
कई पुराने अफ़साने

कुछ उसने , कुछ मैंने बोला
अल्फाजो से, आँखों से
दिल की बात ना फ़िर केहे पाए
मौसम बदले रातों में  !!!
रंग अलगत या मनाचे,
आकाशी त्या पांगले 
तू येतां आठवणीत माझ्या,
नभांत फुलले चांदणे 

डोळ्यांत उतरे आतुरता अन्
श्वास होती मोकळे 
दूर रंगले क्षितिजावरती,
आठवणींचे सोहळे … 

Saturday, April 30, 2016

कॉफी आणि बरंच काही ... 


आज सकाळी सकाळी चक्क विवेकचा फोन आला आणि तेही ' संध्याकाळी कॉफी ला सगळे भेटू, ग्रुप वर टाक ' या आदेशासकट. मी फक्त ' सूर्य आज कुठे उगवला ' असं म्हणेपर्यंत त्याने फोन ठेवला सुधा, किती हि घाई.     'काय झाल आज याला, काही काम आहे कि सहज भेटायचं आहे ', असे अनेक विचार मनात डोकावून गेले.

विवेक माझा शाळेपासूनचा मित्र. शाळा सोडून पंचवीस वर्ष होऊन गेली पण शाळेने दिलेला मित्र मैत्रींणींचा ठेवा आजही बरोबर आहे आणि म्हणूनच आत कुठेतरी लहानपण अजूनही जिवंत आहे. 'बावळट, मूर्ख' सारखे शब्द आजही यथेच्य विहार करू शकतात या मैत्रीत आणि याच मैत्रीच्या हक्काने काहीही मागू शकतो एकमेकांकडे,  नाहीतर बायकोलाही आणली नसेल पण मैत्रिणींसाठी अमेरिकेहून 'पर्स' आणि जपान वरून 'बाहुली' आणणारे हे मित्र तसे दुर्मिळच.

मिळालेल्या आदेशाचे पालन करून मी ग्रुप वर मेसेज टाकला व रात्री आठ वाजता नेहमीच्या अड्ड्यावर ठरल्या प्रमाणे सारे पोहोचले. नेहमीप्रमाणे मी सर्वांत आधी आणि नंतर नीरज, ललीत विवेक व अर्चना सर्वात शेवटी येणार हे कायमचं ठरलेल. कितीही बोललं तरी उशिरा येण्याची सवय अर्चना काही सोडत नाही. 

खर तर वयानं मोठे झालो होतो पण या कॉफ़ीच्या नावाखाली अधून मधून लहानपण जगत होतो आम्ही. रोजच्या धावपळीत आणि कामाच्या व्यापात ते निवांत क्षण वेगळी ऊर्जा द्यायचे. महिन्यातून एकदा भेटायचं हे ठरलेलं आणि जमलंच तर अधे मध्ये पण ठरवून भेटायचो. कधी खूप कंटाळा आला म्हणून तर कधी वीकएंड ला चालायला जायचं आणि वैशाली रुपाली मध्ये नाश्ता करायचा हे ठरलेलं. 

"काय झाल रे आज अचानक ' तू ' बोलावलस कॉफीला ?" विवेकला आमचा प्रश्न अपेक्षित होताच. " दोन वर्ष ऑफिसच्या कामाकरता लंडनला जायला सांगितले आहे, अजून तारीख नाही ठरली पण कदाचित महिना अखेर पर्यंत जावं लागेल." एकदम गुगलीच टाकली याने आल्या आल्या. इतक्यात अर्चना म्हणाली, "अरे वा, भारीच कि". नीरज म्हणाला " किती मोठा प्रोजेक्ट आहे? तुझा रोल काय ? तोच कि काही वेगळं काम आहे?" याचे प्रश्न पण एकदम त्याच्याच सारखे असायचे, स्कॉलर स्टाईल. ललित म्हणाला, "अरे सतीश आहे लंडन ला, कोणीच नाही अस नाही रे", पार लंडनला पोहोचला पण हा विचारांत. "अरे एकटा जातो आहेस कि सर्वांना नेतोयेस ? मुलांच शाळेच काय ?आई येणार आहे ना तुझ्याबरोबर ?", माझे प्रश्न एकदम सुटसुटीत होते. 

सर्वांचे इतके सारे प्रश्न ऐकून विवेक गोंधळून गेला. "अरे हो हो, किती बोलाल ? दम खा जरा. मी जाणार नाहीये", आतां यॉर्कर होता हा विवेकचा . " ए बावळट काय चालू आहे तुझ ? नक्की सांग काय ते " अर्चना तिच्या अंदाजात सुरु झाली. हैप्पी गो लकी आहे ती . मला मात्र समजेना हा विवेक नक्की काय बोलतोय. समजायला जरा तसा  अवघडच आहे तो. इतकी वर्ष झाली तेव्हा आता कुठे त्याचा अंदाज येत होता पण तरी खोली मात्र सापडली नव्हती.

"अरे मला नाही जायचं, कंटाळा आला आहे यार असं कधी एक, तर कधी दोन वर्षांकरता बाहेर जायचा. मुलांचा शाळेचा विचार करून त्यांना इथे ठेवल तर तिकडे मी एकटा. नाही करमत त्यांना आणि मलाही. किती दिवस असं रहायच ? आता नको, बास." विवेकच हे रूप नवीन होत. आत कुठेतरी त्याची चाललेली घालमेल आज त्याच्या चेहऱ्यावर दिसतं होती.

करियर साठी नोकरी मध्ये धावतां धावता हातून निसटलेल्या किती तरी लहान सहान गोष्टी आयुष्याच्या एका वळणावर एकदम दिसू लागतात तसं काहीसं झालं होतं त्याचं. एकीकडे मिळालेल यश तर दुसरीकडे हरवलेले काही अमुल्य क्षण !! खरं तर यात तुलना होऊच शकत नाही पण नकळत जेव्हा आपलंच मन हि तुलना करू लागत तेव्हा विचारांचा गुंता होऊन जातो. 

विवेकच बोलण ऐकलं आणि क्षणभर सगळेच गप्प झाले. अशा वेळी विचार करून बोलणारा एकच जण होता इथे आणि तो म्हणजे, नीरज. आमचा ग्रुप उगाच नाही स्कॉलर म्हणायचा त्याला. नीरज म्हणाला, ' शांत हो अरे, कुठून कुठे पोचलास. नाही जायच ना, तर सांगून टाक बॉसला. तुला जे वाटतं आहे ते  बरोबर आहे कि नाही हे शोधायची गरज काय ? दुसरा कोणी जाऊ शकेल ना या प्रोजेक्ट वर ? मग झालं तर…'  बापरे एका मिनिटात प्रश्न सोडवला होता नीरजने. ते ऐकून सुद्धा किती बरं वाटलं. एक यशस्वी सर्जन होऊ शकला असता नीरज असं मला नेहमी वाटतं इतकी स्थिरता आहे त्याच्या विचारात आणि आचारात सुधा. त्याच्या याच गुणाने कदाचित वयाच्या पस्तिशीत नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करण्याची हिम्मत त्याला दिली असावी.

" वेडा आहे का तू विवेक ? अरे असे चान्स परत परत येत नसतात. जावून ये कि ? काय होतं. हे शाळेचं वर्ष  संपल कि घेऊन जा मुलांना. मस्त एन्जॉय कर", अर्चनाने तो माहोल जरा हलका केला. तिचं बोलण सुरु झाल कि गप्प बसाव लागत इतक्या स्पीड ने सुरु होते तिची गाडी. "अरे, चाळीशी आल्यासारखा काय करतोयेस ? आणि आली असली तरी तसं वागायचं नसत. तू जा, मागून आम्ही येऊ. मग जाऊ आपण सगळे युरोप ट्रीपला, आपल नेक्स्ट गेट- टूगेदर तिकडे, काय मस्त आहे कि नाही कल्पना"..  कोणाच काय तर कोणाच काय. आता मात्र विवेकला काय बोलावं सुचेना, चीड चीड झाली त्याची. 

ललित त्याच्या नेहमीच्या शैलीत हसतं होता. त्याची परीस्थिती काही वेगळी नव्हती. बारा बारा तास कंपनीत तोही असायचाच कि आणि तेही कमी म्हणून रात्री घरून पण काम करायचा. त्यामुळे विवेकच बोलणं त्याला समजतं होतं आणि पटतं सुद्धा होतं. त्यामुळे 'जे ठरवशील ते नीट विचार करून ठरव', हा त्याचा सल्ला अगदी योग्य होता.

मी शांत होते. काहीच बोलले नाही. चाळीशी ओलांडली कि विचारांत घडत असलेला बदल मी स्वतः अनुभवत होते. आयुष्याकडॆ कृतज्ञतेने बघता आलं पाहिजे हा प्रयत्न करत होते. कुटुंबाबरोबरच आपल्या सोबत असलेले आपले मित्र मैत्रिणी किती महत्वाचं हे मी अनुभवत होते. वेळप्रसंगी असलेला त्यांचा आधार,व्यक्त होण्यासाठी असलेली हक्काची जागा, एकमेकांबरोबर मोकळेपणाने होणारे संवाद, लुटुपुटुची भांडणं यांनी आपलं आयुष्य किती समृद्ध आहे याची लख्ख जाणीव होत होती. त्यामुळे मी त्याला मन जे सांगेल तेच कर हा सल्ला दिला.  


इतक्यात ऑर्डर दिलेली कॉफी आली. आज कॉफी पिताना पहिल्यांदा जाणवल कि टेबल वर आलेल्या कॉफी मध्ये बरेच फ्लेवर होते; मोका, कॉल्ड कॉफी, आयरिश कॉफी, कॉफी विथ आइसक्रीम आणि साधी फिल्टर कॉफी सुधा. प्रत्येकाची आवड वेगळी होती पण चव मात्र कॉफीचीच होती…


- कविता मराठे 

 


' नास्तिक ते आस्तिक … एक प्रवास '


रविवारी किशोरचा फोन आला, सागरमाथा सर करून पुण्यात आल्यावर त्या दिवशी फोन वर अभिनंदन केल पण खूप काही बोलता आल नाही म्हणून काल त्यानेच मुदाम फोन केला आणि मनसोक्त गप्पाही झाल्या.

जिथे लहानाचा मोठा झाला त्या परिसरात कौतुक सोहळा झाला, अगदी खास मराठमोळ्या  पद्धतीत.  एवरेस्ट मोहीमेवरून त्या दिवशी तो पुण्यात परत आला होता.  काल बोलतांना फोनवर तोच आवाज , तोच आत्मविश्वास  होतां आणि या वेळी त्याला समाधानाची झालर होती. जे ठरवल ते मिळाल्याची, मिळवल्याची… 

मी म्हणाले  "अरे आराम कर थोडे दिवस मग भेटूच ", तर म्हणाला " अग बँकेत निघालोय ".मी  चकितच झाले. " यू आर सिम्पली ग्रेट , दोन दिवस पण नाही झाले तुला येवून आणि रुटीन सुरु ,  कसा आहेस तू ? तर म्हणाला " मी एकदम मजेत , १२  किलो वजन कमी झालय, थोडा थकवा आहे, बाकी फिट . कधी भेटायचं ते ठरव म्हणजे सगळे भेटू".  एवरेस्ट मोहिमेवर निघायच्या आदल्या दिवशी शाळेच्या ग्रुप बरोबर कॉफी आणि गप्पा झाल्या होत्या आणि एवरेस्ट सर करून आल्यावर परत त्याच जागी भेटायच हे  सुधा ठरल होतं.

आता न राहवून मी म्हटल, " तू जायच्या आधी नाही बोलले पण आता बोलल्याशिवाय राहवत नाहिये.  गणपतीला नक्की जाउन ये आतां. मला माहिती आहे तुझा विश्वास नाही म्हणून जायच्या आधी नाही बोलले तुला,  पण आता ऐक माझं .नक्की जा. " तो काहीच बोलला नाही. "एक सांग मला ,तुझा देवावर विश्वास नाही ? पण  मग कधी वाटल का तुला समिट वर असताना कि  काहीतरी नक्कीच आहे जिथे आपल्याला नमाव लागत ?" या प्रश्नावर फक्त हसला.…  खरच त्याच उत्तर यावेळी बदलल होत.

तो  म्हणाला, " आपली श्रद्धा, कष्ट, जिद्द कितीही खरी असली तरी  'तो' आहे हे पटल मला. माझ्यासारखा नास्तिक आस्तिक झाला. सर्व काही बाजूला ठेऊन त्या दिवशी त्या रोपला नमस्कार केला मी. बेस कॅम्प पासून वाटेत भेटलेल्या प्रत्येकाने काहीतरी दिलं , धागा, फोटो, छोटा विक्टरी FLAG आणि आशीर्वाद … सर्व काही बरोबर नेल मी . माहित नाही पण विश्वास ठेवावासा वाटला 'त्या प्रत्येकावर' … अग परत येतांना नेपाळ मध्ये दोन वेळा त्या पशुपतीनाथ मंदिरातहि गेलो , काय सांगू "… खूप छान वाटल ऐकून.

तो बोलत राहिला आणि मी विचारत … "एक सांग मला, कधी भीती नाही वाटली तुला No one has travelled the bridge of success without ever crossing the streets of failure" यावर त्यानी दिलेलं उत्तर खरच खास होतं . तो म्हणाला , " वाटली ना , सर्वात पहिल्यांदा १८ एप्रिलला बेस कॅम्पवर झालेल्या अपघातानंतर नेपाळ बरोबर चायना रूट सुधा बंद होईल का ? अशी शंका मनात आली . इथवर येवून रिकामं परतावं लागणार का ? याची भीती वाटली. पण नशिबाने साथ दिली आणि थोड्या उशिरा का होईना आमची चढाई सुरु झाली "  बापरे , 'भीती' या शब्दाची त्याची आणि माझी व्याख्या खूपच वेगळी होती. 

एक क्षण दोघंही गप्प होतो …

मग तोच म्हणाला, "अगं फक्त दीडशे मीटर अंतर उरलेलं असतांना एक जण परत फिरला. शेर्पाशी काही बोलला , मला समजल नाही तो काय म्हणतोय ते पण बहुदा म्हणाला असावा,' बास, आता नाही जाऊ शकत मी पुढे '. आणि माझ्या समोरून परतला . त्याच स्वप्न इतक्या जवळ होत आणि तो मात्र … मी विचार करून काही बोलणार तोवर तो मागे फिरला सुधा.  त्याचा विचार करत मी पुढे जात होतो पण माझ मन मात्र मागेच राहिलं होतं . 'त्यानी असं अर्धवट सोडून जायला नको, मी का नाही थांबवायचा प्रयत्न केला त्याला ?' माझी पावलं मंदावली . त्याच्यासाठी मीच देवाला विनवू लागलो … माहित नाही काय झालं पण थोड्याच वेळांत आश्चर्य म्हणजे  तो परत फिरून तिथवर आला होता अन् पाहता पाहता मला ओलांडून पुढे गेलाही. किती खुश झालो मी. खूप आनंद झाला त्याला पुढे जातांना पाहून, खूप वेगळ वाटल.….  हे ऐकून नकळत डोळ्यांत पाणी आलं.

या संपूर्ण प्रवासात किती वेगवेगळे अनुभव त्याने घेतले होते. अनेक वर्षांची अपार मेहनत, त्याची जिद्द आणि  मनाची तयारी आम्ही जवळून पाहिली होती. आतून बाहेरून हालवून टाकणाऱ्या अनेक गोष्टी त्याने पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या पण जिद्द सोडली नव्हती कारण अनेक वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्नं त्याला पूर्ण करायचं होतं. त्याच्यामुळे नकळत आम्ही सुधा जोडले जात होतो … त्या एवरेस्टशी  !!

"मला सांग , एवरेस्ट सर करण्याची अपेक्षित वेळ होती सकाळी सहा ते आठच्या मधे पण तूला जवळ पास दोन ते तीन तास उशीर झाला , तो का ? आम्ही बेस कॅम्पच्या सतत संपर्कात होतो.  तुझ्या बरोबर असणाऱ्या दोघांनी सकाळी सातच्या सुमारास चढाई पूर्ण केली पण तू खूप वाट पहायला लावलीस. शेवटी तर आमचाही धीर सुटत चालला होता " मी अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते.  किशोर म्हणाला , " या वेळी फक्त दोन दिवस वातावरण अनुकूल होतं. त्यातील एक दिवस चायना नी  आपल्या लोकांकरता राखीव ठेवला आणि दुसरा बाहेरील सर्वांकरता . जवळ पास तीनशे जण होतो आम्ही समिट करतां " माझ्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला " बापरे "… किशोर इतके 'वेडे 'इतके जण आहेत हे ऐकून मी नि:शब्द झाले. 
'चायना रूट हा climbers route म्हणून प्रसिद्ध आहे , खरा गिर्यारोहक याच मार्गाने जातो आणि त्याच्या रक्तात असते ते फक्त स्वप्न , एवरेस्ट सर करण्याचे' , हे वाक्य कानांत तसंच रेंगाळल होत. 
अजून विचारावं असं माझ्याकडे आणि सांगाव असं किशोरकडे खूप काही होतं पण प्रत्यक्ष भेटून ऐकायला काही गोष्टी तशाच ठेवल्या… 




 
मन बावरे होई कातर
काहूर सावळे दाटले
विरले ओठांत गीत
उरले गंध विराणे ….



 

Friday, March 4, 2016

' आई '

आज पुन्हां उशीर झाला ऑफिसला निघताना म्हणजे परत धावत पळत बस पकडण आलं. कोपऱ्यावर गाडी लावून रस्ताच क्रॉस करायचा असतो ऑफिसची बस पकडायला, तरीही तो कोपरा जवळ कधीच वाटत नाही. सकाळचा स्वयंपाक, आदिचा शाळेचा डबा , ह्याचा आणि माझा ऑफिसचा डबा, नाश्ता, चहा आणि इतर बारीक सारीक कामांमध्ये साडेआठ कसे होतात ते त्या घड्याळालाच माहित. कितीही लवकर उठल तरी सर्व आवरून घड्याळ पहाव तर निघायची वेळ झालेली असतेच. पण, मग एकदा का बस मध्ये बसलं कि आहाहा... काय मस्त वाटतं . पुढचा पूर्ण पंचेचाळीस मिनिटांचा वेळ फक्त 'माझा आणि माझाच' असतो. इयर प्लग लाऊन आवडती गाणी डोळे मिटून ऐकण्यात काय मजा असते, ते या वेळी कळतं.

आजही अशीच धावपळ करून बस पकडली आणि ऑफिसला पोहोचले. सकाळ पासून एकापाठोपाठ एक मिटिंग वर मिटिंग. सध्या कामाच लोड थोडं जास्तच होत आणि दिलेल्या वेळेत खूप गोष्टी पूर्णही करायच्या होत्या. त्यात बॉसला हि परवा यु. एस. ला जायच असल्याने तिकडच्या कामाची हि भरीत भर होतीच. एकूण काय तर आजच्या दिवसाची सुरवात आणि शेवट हा मिटिंग रूम मधेच ठरलेला होता.

दुपारचे दोन अडीच झाले होते. 'आतां ब्रेक घेऊ यांत का' ? असा प्रश्न मनांत आणि पोटात डोकावत होता. इतक्यात फोन आला, तेही घरून. मी पटकन फोन घेतला आणि कॉनफरन्स रुम मधून बाहेर आले. आदी शाळेतून आल्यावर आज घरी एकटा होता. रोजच्या सारखं आजीकडे न जातां शनिवारी घरी एकट राहण्याची सवय तो हळूहळू करत होता. मी फोन घेतला, " हेलो,  बोल आदि ', असं वाक्य पूर्ण होण्याच्या आतंच पलीकडून रडण्याचा आवाज येऊ लागला. " काय झाल रडायला ? बोल बेटा ?… "  माझा आवाज ऐकून रडण्याचा सूर हळूहळू वाढतच होता."सोनू काय झाल ? तू सांगीतल नाही तर कसं कळेल आईला काय झालं ते ?" तरीही तो काहीच बोलत नव्हता आणि फक्त रडत होता. आता मात्र मी पण घाबरले, काय झाल असावं ? असा का रडतोय आज ? मी निघाले तरी घरी पोचायला किमान चाळीस मिनिट तरी लागणारच. काय करू आतां ? काहीच कळत नव्हत. त्याच्याची बोलण्याचा प्रयत्न तर करतच होते.  अखेर "आई SSS …. आई SSS …. " असे म्हणून त्याने बोलायला सुरवात केली. " हो बाळा , बोल , काय झालं ?" मी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. "आई, मी ना अभ्यास करत होतो पण …. " बोलता बोलता हुंदका लागत होता,       " पण , मला काहीच समजत नाहीए, काहीच सोडवता येत नाहीये…",  अखेर त्या रडण्यामागच 'मोठं' कारण पुढे आलं.   "ओह … अस झाल. काही प्रोब्लेम नाही. मी आले कि सोडवूया आपण. मी शिकवेन ना तुला, मग येईल. आता रडायचं नाही, ऐकणार न तू माझ ? आतां एक काम कर, आता अभ्यास ठेवून दे  आणि खेऴ थोडा वेऴ. छान चेहरा धू , पाणी पी. फ्रीज मध्ये लिंबू सरबत करून ठेवलय , ते पी".  मी माझ्याकडून समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर त्याला पटल कि आई आल्यावर त्याचा हा 'मोठा प्रोब्लेम' चुटकि सरशी सोडवणार  आहे. इतक्या वेळ रडणारे ते डोळे अखेर हसले. "मी खेळतो तू येईपर्यंत " अस सांगून त्याने फोन ठेवलां . त्याची तर समजूत मी काढली पण माझ्या मनाची समजूत काही होत नव्हती. शेवटी सरांना सांगून मी ऑफिस मधून निघाले. सरांनी त्यांच्या ड्रायवरला मला घरी सोडायला सांगितले.

या वेळी रस्ता रिकामा असूनही वेळ जास्त लागतोय, असं वाटू लागलं. अजूनही तो रडण्याचा आवाज कानांत बसला होता. 'इवल्याशा पिलाची त्याने मनाला लावून घेतलेली गोष्ट, ज्याचं उत्तर मिळत नाही त्यासाठी आईला केलेला फोन, समजूत काढण्यासाठी आईने सांगितलेला उपाय ऐकल्यावर थांबलेलं रडण आणि माझी वाट पाहण'…  खूपच अस्वस्थ होते मी. कधी एकदा घरी जाईन आणि त्याला पाहीन असं झाल होत.

तसं पाहिलं तर, खरं तर हि खूपच लहान गोष्ट होती पण एक आई म्हणून मला ती लहान वाटत नव्हती. "आई तू ऑफिसला का जाते"  हा प्रश्न माझ्या चिमुरड्याने मला काही वर्षांपूर्वी जेव्हा विचारला होता तेव्हां खर तर काय उत्तर द्याव हे मला एक क्षण कळल नव्हतं. पण तरीही त्याला समजेल असं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला होता. त्याच वेळी " तुला जेव्हां वाटेल तेव्हा मी नक्कीच सुट्टी घेईन " असंही सांगितलं होतं. मी खरच सुट्टी घेते कि नाही हे त्याने पुढच्याच आठवड्यात तपासलही होतं. आपण सांगितल्यावर आई सुट्टी घेते आणि शाळेत आणायला सुधा येते यामध्येच त्याला किती आनंद झाला होता. त्याच दिवशी मला जाणवलं कि किती छोट्या, साध्या आणि सोप्या अपेक्षा आहेत या आणि म्हणूनच काही वेळा पूर्वी फोन वर त्याने 'आई तू घरी ये ' अस न म्हणताही कुठेतरी आत त्याच्या मनात नेमक हेच असाव, असं वाटत होत.

घरी  आले, किल्लीने दार  उघडून आत गेले तर एकदम शांतता. सर्वकडे खेळ पसरलेला, अभ्यासाची वह्या पुस्तक बाजूला टेबल वर होती. सरबताचा रिकामा ग्लासही तिथेच होता. कुठे गेला  ? काय खेळतोय इतक्या शांतपणे ? असा विचार करत आत गेले तर काय, आदि त्याची सर्व चिंता थोड्याच वेळापूर्वी मला देवून एकदम शांत, निरागसपणे झोपला होता आणि मी …







Sunday, February 28, 2016

पणजी आजी '

"कांतेय, निबंध झाला का लिहून ? पुढच्या आठवड्यात वही द्यायची आहे ना, चला बसा आता. काय लिहायचं आहे, ठरला का विषय?" एकीकडे मटार सोलता सोलता मी कांतेयला सूचना देत होते. सध्या ख्रिसमसची सुट्टी सुरु होती. आज थंडी जरा जास्तच होती त्यामुळे स्वारी या वेळी खाली खेळायला जाता, घरीच होती.

हातातल काम आटोपुन मी बाहेर आले तर कांतेय वही घेऊन लिहायला बसतच होता. तो म्हणाला, "आई, मी पणजी आजी बद्दल लिहिणार आहे 'माझी पणजी आजी,' ठरलय माझं"... "अरे वा, एकदम पणजीआजी कशी आठवली आज ?" मला जरा कुतूहल वाटले.'पहिली जंगल सफारी, आवडता सण दिवाळी, माझे स्वप्न, या विषयांवरुन आज गाडी पणजी आजीकड़े कशी काय वळली' ? "अग आई, माझ्या वर्गात मी सोडून कोणा कडेच नाहिए पणजी आजी", असं त्याने म्हणताच डोळ्यांत टचकन पाणी आलं.

"हो रे, खरच की", असं  म्हणत मी त्याच्या पाठीवर हात  ठेवला. अगदी उत्साहाने तो आपल्या पणजी आजीबद्दल लिहू लागला.


'पणजी आजी' या नावातच किती गोडवा आहे आणि तिचं प्रेम मिळण म्हणजे खर तर भाग्यच. हि पणजी आजी आहे पण खूप 'स्पेशल', १०२ वर्षांची, वयाच्या ६० व्या वर्षी सायकल शिकलेली, तीस वर्षांपूर्वी सोलर कुकर वर स्वयंपाक करणारी, आजच्या जमान्यांत स्काईप करणारी आणि सेल्फ़ी सुधा काढ़णारी. पणजी आजीची अनेक रूप एका क्षणांत डोळ्यांसमोर आली.

माझ लग्न ठरलं तेव्हां अठरा वर्षांपूर्वी प्रथम मी तिला पाहिलं. आजीच सुख तसं कमीच मिळालं होत त्यामुळे नकळत कुठेतरी तिची ओढ वाटू लागली. हळू हळू सहवास वाढला आणि 'अहो आजी' ची 'अगं आजी' झाली. आजेसासुबाई असूनही माझ्याकरता मात्र ती आजीच होती. चैतन्य, समाधान, उत्साह, आपुलकीने काठोकाठ भरलेली;  मुलं , सुना, नातवंड, पतवंड, नातसुनांमध्ये रमणारी;  घराच ' खरं वैभव ' असलेली आजी !!

दुसऱ्या दिवशी ऑफिसमधुन सरळ आजीकडे गेले. 'आज रविवार नाही मग कशी आलीस ? ' हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर डोकावत होता. "आजी तुझी आठवण आली म्हणून आले", अस म्हणताच ती हसली. "ऑफिस मधून परस्पर आलीस ना, च मस्त कॉफी बनवते तुझ्यासाठी", असं म्हणत ती स्वयंपाक घरात गेली. एक क्षण इतक छान वाटल असे लाड करुन घ्यायला, पण दुसऱ्याच क्षणी "मी करते कॉफी आजी, तू बस," अस म्हणत मी आत गेले. पण शेवटी कॉफी तिनेच केली. "आज इतकी दमल्यासारखी का दिसते आहेस ?" आजीच्या प्रश्नाला 'हो , खरंच दमले आहे ' असं प्रामाणिक उत्तर द्यावं की तिच्या या वयातल्या उत्साहाकडे पाहून 'नाही ' म्हणाव यातच अडख़ळले मी. वाफाळलेली मस्त कॉफी पिताना आजीबरोबर छान गप्पा रंगल्या

आजीकडे पाहून मला नेहमीच प्रश्न पडायचा कि आजी इतकी खुश, सतत उत्साही कशी राहु शकते ?  मनात आलेला हा साधा सोपा प्रश्न मी अगदी सहजपणे आज तिला विचारला. 
आजी म्हणाली, " अग, आपण आतून, मनानं प्रसन्न असलं तर चेहऱ्यावर आपसूकच ती प्रसन्नता दिसते. मन आपल आहे मग त्याच्या पर्यंत काय न्यायच आणि काय नाही हे आपल्याच हातात असायला हव." या दोन वाक्यांत आजी खूप काही सांगून गेली. किती बरोबर होत ते. इतका साधा सरळ विचार कधी केलाच नव्हतां.

आजीशी बोलतांना नेहमी जाणवायच कि लहान सहान गोष्टीत नेहमी आनंद शोधते ती. काळाप्रमाणे स्वत:ला अगदी सहजपणे  बदलत आली आहे आजवर कदाचित यामुळेच प्रत्येकाच्या जवळची आहे, प्रत्येकाला हवीशी आहे. तिला पाहून खूप काही शिकण्यासारख आहे. आनंदी आणि निरोगी आयुष्य हवं असेल तर आजीसारखं हवं हे नक्की.

एक विचार मनात आला, आपल्यासारखेच आजीकडे सुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत तरी गोळा करायला क्षण मात्र, बरेच आहेत…



Sunday, January 17, 2016

' शेवटचा प्रवास '

मागील वर्षी आजच्याच दिवशी सुरु झालेला तिचा शेवटचा प्रवास. आज त्या आठवणी अगदी अस्वस्थ करत होत्या. सकाळ पासून का कोण जाणे ते चित्र डोळ्यांसमोरून जातच नव्हते. हॉस्पिटल, डॉक्टर, नर्स आणि समोरच देऊळ. 'आईला बर करा हो' असा आतून येणारा आर्त आवाज एकीकडे त्या डॉक्टरांपर्यंत आणि दुसरीकडे त्या देवळातल्या देवापर्यंत पोहोचतच नव्हता. एक एक दिवस खालावत जाणारी तिची प्रकृती अस्वस्थ करत होती. ' छान, सात्विक आयुष्य जगल्यानंतर इतकं अनपेक्षित मरण यावं ' हा विचार, मनातून जातच नव्हता.

आज बाबा पहिल्यांदा माझ्याकडे राहायला आले. माझ्या लग्नानंतर १५ वर्षांत प्रथम आणि तेही आतां आई नसतांना..  बाबांना पाहून मला नेहमीच अभिमान वाटायचा, तर कधी आदरयुक्त भीती वाटायची पण आज त्यांना पाहून मी अक्षरशा: मोडून पडले.

तिन्ही सांजा झाली म्हणून देवाजवळ दिवा लावला. बाबा आरामखुर्चीत बसले होते. दोघांच्याही मनांत खूप काही होते पण आज शब्दांची ताकतही कमी पडली होती , शब्दांनाही ते मांडता येत नव्हते. हि भयाण शांतता नकोशी झाली म्हणून मी रेडिओ लावला आणि हातात पुस्तक घेऊन बसणार इतक्यात जाहिरात संपून रेडिओवर गाण लागल… ' अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही ' नेमक हेच गाण लागायला हव होत का आता ? माझ सर्वात आवडत गाण आज मात्र मला नको होत.

डोळे बंद करून तन्मयतेने गाण ऐकणारे बाबा, त्यांच्या डोळ्यांतून अलगत वाहणारे ते पाणी, जणू ते त्याच वळणावर परत जावून पोहोचले होते जिथे आई त्यांना एकट सोडून गेली होती. गाण बंद कराव की तिथून निघून जावं या संभ्रमात असतानाच दारावरची बेल वाजली.

चिन्मय , कॉलेज मधून आज स्वारी थोडी उशिरा आली होती. " आई, आजोबा कुठे आहेत ? आज एक सरप्राइज आहे त्यांना."  मी  एकदम दचकले. "कसल सरप्राइज देतोस आतां या म्हातार्याला ? " बाबांचा मागून आवाज आला. चिन्मय म्हणाला , "अहो  आजोबा चला, जेवून आपण जायच आहे कुठेतरी." "अरे पण मी कुठे जात नाही  रे आताशा ", बाबा अजूनही तिथेच होते. पण चिन्मयच पुढच वाक्य मी ऐकल आणि जे मला जमल नाही ते त्यानी एका क्षणात करून दाखवल. "आजोबा तिकीट काढली आहेत मी आपली आणि ते हि कट्यार….  ची , चला आपण जाऊ या " आणि हे ऐकताच ' त्या ' गाण्याने बदललेला सूर आतां मात्र एकदमच बदलून गेला.

लहान मुलांना आमिष दाखवून शांत करता येत याचा जणू प्रत्ययच आला, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच शेवटी …