Friday, March 4, 2016

' आई '

आज पुन्हां उशीर झाला ऑफिसला निघताना म्हणजे परत धावत पळत बस पकडण आलं. कोपऱ्यावर गाडी लावून रस्ताच क्रॉस करायचा असतो ऑफिसची बस पकडायला, तरीही तो कोपरा जवळ कधीच वाटत नाही. सकाळचा स्वयंपाक, आदिचा शाळेचा डबा , ह्याचा आणि माझा ऑफिसचा डबा, नाश्ता, चहा आणि इतर बारीक सारीक कामांमध्ये साडेआठ कसे होतात ते त्या घड्याळालाच माहित. कितीही लवकर उठल तरी सर्व आवरून घड्याळ पहाव तर निघायची वेळ झालेली असतेच. पण, मग एकदा का बस मध्ये बसलं कि आहाहा... काय मस्त वाटतं . पुढचा पूर्ण पंचेचाळीस मिनिटांचा वेळ फक्त 'माझा आणि माझाच' असतो. इयर प्लग लाऊन आवडती गाणी डोळे मिटून ऐकण्यात काय मजा असते, ते या वेळी कळतं.

आजही अशीच धावपळ करून बस पकडली आणि ऑफिसला पोहोचले. सकाळ पासून एकापाठोपाठ एक मिटिंग वर मिटिंग. सध्या कामाच लोड थोडं जास्तच होत आणि दिलेल्या वेळेत खूप गोष्टी पूर्णही करायच्या होत्या. त्यात बॉसला हि परवा यु. एस. ला जायच असल्याने तिकडच्या कामाची हि भरीत भर होतीच. एकूण काय तर आजच्या दिवसाची सुरवात आणि शेवट हा मिटिंग रूम मधेच ठरलेला होता.

दुपारचे दोन अडीच झाले होते. 'आतां ब्रेक घेऊ यांत का' ? असा प्रश्न मनांत आणि पोटात डोकावत होता. इतक्यात फोन आला, तेही घरून. मी पटकन फोन घेतला आणि कॉनफरन्स रुम मधून बाहेर आले. आदी शाळेतून आल्यावर आज घरी एकटा होता. रोजच्या सारखं आजीकडे न जातां शनिवारी घरी एकट राहण्याची सवय तो हळूहळू करत होता. मी फोन घेतला, " हेलो,  बोल आदि ', असं वाक्य पूर्ण होण्याच्या आतंच पलीकडून रडण्याचा आवाज येऊ लागला. " काय झाल रडायला ? बोल बेटा ?… "  माझा आवाज ऐकून रडण्याचा सूर हळूहळू वाढतच होता."सोनू काय झाल ? तू सांगीतल नाही तर कसं कळेल आईला काय झालं ते ?" तरीही तो काहीच बोलत नव्हता आणि फक्त रडत होता. आता मात्र मी पण घाबरले, काय झाल असावं ? असा का रडतोय आज ? मी निघाले तरी घरी पोचायला किमान चाळीस मिनिट तरी लागणारच. काय करू आतां ? काहीच कळत नव्हत. त्याच्याची बोलण्याचा प्रयत्न तर करतच होते.  अखेर "आई SSS …. आई SSS …. " असे म्हणून त्याने बोलायला सुरवात केली. " हो बाळा , बोल , काय झालं ?" मी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करत होते. "आई, मी ना अभ्यास करत होतो पण …. " बोलता बोलता हुंदका लागत होता,       " पण , मला काहीच समजत नाहीए, काहीच सोडवता येत नाहीये…",  अखेर त्या रडण्यामागच 'मोठं' कारण पुढे आलं.   "ओह … अस झाल. काही प्रोब्लेम नाही. मी आले कि सोडवूया आपण. मी शिकवेन ना तुला, मग येईल. आता रडायचं नाही, ऐकणार न तू माझ ? आतां एक काम कर, आता अभ्यास ठेवून दे  आणि खेऴ थोडा वेऴ. छान चेहरा धू , पाणी पी. फ्रीज मध्ये लिंबू सरबत करून ठेवलय , ते पी".  मी माझ्याकडून समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि अखेर त्याला पटल कि आई आल्यावर त्याचा हा 'मोठा प्रोब्लेम' चुटकि सरशी सोडवणार  आहे. इतक्या वेळ रडणारे ते डोळे अखेर हसले. "मी खेळतो तू येईपर्यंत " अस सांगून त्याने फोन ठेवलां . त्याची तर समजूत मी काढली पण माझ्या मनाची समजूत काही होत नव्हती. शेवटी सरांना सांगून मी ऑफिस मधून निघाले. सरांनी त्यांच्या ड्रायवरला मला घरी सोडायला सांगितले.

या वेळी रस्ता रिकामा असूनही वेळ जास्त लागतोय, असं वाटू लागलं. अजूनही तो रडण्याचा आवाज कानांत बसला होता. 'इवल्याशा पिलाची त्याने मनाला लावून घेतलेली गोष्ट, ज्याचं उत्तर मिळत नाही त्यासाठी आईला केलेला फोन, समजूत काढण्यासाठी आईने सांगितलेला उपाय ऐकल्यावर थांबलेलं रडण आणि माझी वाट पाहण'…  खूपच अस्वस्थ होते मी. कधी एकदा घरी जाईन आणि त्याला पाहीन असं झाल होत.

तसं पाहिलं तर, खरं तर हि खूपच लहान गोष्ट होती पण एक आई म्हणून मला ती लहान वाटत नव्हती. "आई तू ऑफिसला का जाते"  हा प्रश्न माझ्या चिमुरड्याने मला काही वर्षांपूर्वी जेव्हा विचारला होता तेव्हां खर तर काय उत्तर द्याव हे मला एक क्षण कळल नव्हतं. पण तरीही त्याला समजेल असं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच केला होता. त्याच वेळी " तुला जेव्हां वाटेल तेव्हा मी नक्कीच सुट्टी घेईन " असंही सांगितलं होतं. मी खरच सुट्टी घेते कि नाही हे त्याने पुढच्याच आठवड्यात तपासलही होतं. आपण सांगितल्यावर आई सुट्टी घेते आणि शाळेत आणायला सुधा येते यामध्येच त्याला किती आनंद झाला होता. त्याच दिवशी मला जाणवलं कि किती छोट्या, साध्या आणि सोप्या अपेक्षा आहेत या आणि म्हणूनच काही वेळा पूर्वी फोन वर त्याने 'आई तू घरी ये ' अस न म्हणताही कुठेतरी आत त्याच्या मनात नेमक हेच असाव, असं वाटत होत.

घरी  आले, किल्लीने दार  उघडून आत गेले तर एकदम शांतता. सर्वकडे खेळ पसरलेला, अभ्यासाची वह्या पुस्तक बाजूला टेबल वर होती. सरबताचा रिकामा ग्लासही तिथेच होता. कुठे गेला  ? काय खेळतोय इतक्या शांतपणे ? असा विचार करत आत गेले तर काय, आदि त्याची सर्व चिंता थोड्याच वेळापूर्वी मला देवून एकदम शांत, निरागसपणे झोपला होता आणि मी …







No comments:

Post a Comment