Tuesday, May 10, 2016

' परत प्रेमात पडायचय…  '

मनातलं बोलता आलं नाही,
म्हणून लिहिली कविता
तर कधी डोळ्यांतील वाचलं नाहीस,
म्हणून लिहिली कविता …

माझ्या या कवितेत
तू कधी होतोस वारा,
तर कधी पौर्णिमेचा चांदवा.
मोरपंखी स्वप्नातला तू ,
कधी त्या बेधुंद पावसासारखा …
मनाच्या गाभाऱ्यातला
एक अलवार तरंग,
तर कधी उमलत्या बहरांमधल
गोड गुलाबी स्वप्नं …

पण कॅनव्हास, ब्रश , कॅमेऱ्यांत
शब्दांची हि भाषा,
तुला कधी कळलीच नाही
आणि तुझ्या रंगांची जादू
मला तशी समजलीच नाही.

घालमेल , हुरहूर, तगमग, ओढ
या शब्दांचे अर्थ जसे उमजत गेले
तसे अलवार मोरपंखी  नाते
अजूनच खुलत गेले ….

आभाळभर पसरलेला काळोख
अन् तो निळा समुद्र किनारा,
मूठभर चांदण घेऊन
त्या चित्रांत रंग भरणारा तू ….
कदाचित तुही तेच सांगत होतास
शब्दांनी नाही तर रंगानी ….

उन्हं कलती झाल्यावर,
त्या पिवळ्याजर्द रानफुलांत
थव्याथव्याने परतणाऱ्या
पाखरांच्या किलबिलाटात
त्या हिरवाकंच रानांत
जणू तू मलाच शोधत होतास …
कारण रंगांची भाषा
आतां मलाही येऊ लागलीए …

अस वाटतंय ,
नव्यान काही लिहावं
अन् त्या नव्या कवितेसाठी
परत प्रेमात पडावं … तुझ्याच  !!!
 

No comments:

Post a Comment