Saturday, June 4, 2016

' आईचा फ़ोन  '

आताशा या फोनवर
तुझा आवाजच येत नाही,
'कशी आहेस ?' म्हणून तू
विचारपूसही करत नाहीस

मी लावून सुधा हा फोन
तुझ्यापर्यंत पोहचत नाही
आई, तुझ्याशी आता
मला बोलताच येत नाही

रोजचा तुझा एक फोन,
आतां सारखा आठवत राहतो
अजूनही तो आवाज तुझा,
माझ्या या कानामध्येच राहतो

मनामध्ये दाटलय खूप,
आतां मनात मावत नाही,
तुझ्यानंतर बोलायला
मला मात्र कोणीच नाही

का इतक्यात गेलीस तू ?
अजून खूप बोलायच होतं
'नंतर बोल, आधी खावून घे'
असं अजून ऐकायच होतं

तू नाहीस म्हणून आतां,
फोटो तुझा बघत असते
बाबा म्हणतात 'फोटो का?',
तुझी आई तर इथेच असते

खर सांगू आई तुला ,
तू खूप काही घेऊन गेलीस
अन् जातां जातां एका क्षणांत
मला मोठ करून गेलीस ….



No comments:

Post a Comment