' पणजी आजी '
"कांतेय, निबंध झाला का लिहून ? पुढच्या आठवड्यात वही द्यायची आहे ना, चला बसा आता. काय लिहायचं आहे, ठरला का विषय?" एकीकडे मटार सोलता सोलता मी कांतेयला सूचना देत होते. सध्या ख्रिसमसची सुट्टी सुरु होती. आज थंडी जरा जास्तच होती त्यामुळे स्वारी या वेळी खाली खेळायला न जाता, घरीच होती.
हातातल काम आटोपुन मी बाहेर आले तर कांतेय वही घेऊन लिहायला बसतच होता. तो म्हणाला, "आई, मी पणजी आजी बद्दल लिहिणार आहे 'माझी पणजी आजी,' ठरलय माझं"... "अरे वा, एकदम पणजीआजी कशी आठवली आज ?" मला जरा कुतूहल वाटले.'पहिली जंगल सफारी, आवडता सण दिवाळी, माझे स्वप्न, या विषयांवरुन आज गाडी पणजी आजीकड़े कशी काय वळली' ? "अग आई, माझ्या वर्गात मी सोडून कोणा कडेच नाहिए पणजी आजी", असं त्याने म्हणताच डोळ्यांत टचकन पाणी आलं.
"हो रे, खरच की", असं म्हणत मी त्याच्या पाठीवर हात ठेवला. अगदी उत्साहाने तो आपल्या पणजी आजीबद्दल लिहू लागला.
'पणजी आजी' या नावातच किती गोडवा आहे आणि तिचं प्रेम मिळण म्हणजे खर तर भाग्यच. हि पणजी आजी आहे पण खूप 'स्पेशल', १०२ वर्षांची, वयाच्या ६० व्या वर्षी सायकल शिकलेली, तीस वर्षांपूर्वी सोलर कुकर वर स्वयंपाक करणारी, आजच्या जमान्यांत स्काईप करणारी आणि सेल्फ़ी सुधा काढ़णारी. पणजी आजीची अनेक रूप एका क्षणांत डोळ्यांसमोर आली.
माझ लग्न ठरलं तेव्हां अठरा वर्षांपूर्वी प्रथम मी तिला पाहिलं. आजीच सुख तसं कमीच मिळालं होत त्यामुळे नकळत कुठेतरी तिची ओढ वाटू लागली. हळू हळू सहवास वाढला आणि 'अहो आजी' ची 'अगं आजी' झाली. आजेसासुबाई असूनही माझ्याकरता मात्र ती आजीच होती. चैतन्य, समाधान, उत्साह, आपुलकीने काठोकाठ भरलेली; मुलं , सुना, नातवंड, पतवंड, नातसुनांमध्ये रमणारी; घराच ' खरं वैभव ' असलेली आजी !!
दुसऱ्या दिवशी ऑफिसमधुन सरळ आजीकडे गेले. 'आज रविवार नाही मग कशी आलीस ? ' हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर डोकावत होता. "आजी तुझी आठवण आली म्हणून आले", अस म्हणताच ती हसली. "ऑफिस मधून परस्पर आलीस ना, चल मस्त कॉफी बनवते तुझ्यासाठी", असं म्हणत ती स्वयंपाक घरात गेली. एक क्षण इतक छान वाटल असे लाड करुन घ्यायला, पण दुसऱ्याच क्षणी "मी करते कॉफी आजी, तू बस," अस म्हणत मी आत गेले. पण शेवटी कॉफी तिनेच केली. "आज इतकी दमल्यासारखी का दिसते आहेस ?" आजीच्या प्रश्नाला 'हो ग, खरंच दमले आहे ' असं प्रामाणिक उत्तर द्यावं की तिच्या या वयातल्या उत्साहाकडे पाहून 'नाही ' म्हणाव यातच अडख़ळले मी. वाफाळलेली मस्त कॉफी पिताना आजीबरोबर छान गप्पा रंगल्या.
आजीकडे पाहून मला नेहमीच प्रश्न पडायचा कि आजी इतकी खुश, सतत उत्साही कशी राहु शकते ? मनात आलेला हा साधा सोपा प्रश्न मी अगदी सहजपणे आज तिला विचारला.
आजी म्हणाली, " अग, आपण आतून, मनानं प्रसन्न असलं तर चेहऱ्यावर आपसूकच ती प्रसन्नता दिसते. मन आपल आहे मग त्याच्या पर्यंत काय न्यायच आणि काय नाही हे आपल्याच हातात असायला हव." या दोन वाक्यांत आजी खूप काही सांगून गेली. किती बरोबर होत ते. इतका साधा सरळ विचार कधी केलाच नव्हतां.
आजी म्हणाली, " अग, आपण आतून, मनानं प्रसन्न असलं तर चेहऱ्यावर आपसूकच ती प्रसन्नता दिसते. मन आपल आहे मग त्याच्या पर्यंत काय न्यायच आणि काय नाही हे आपल्याच हातात असायला हव." या दोन वाक्यांत आजी खूप काही सांगून गेली. किती बरोबर होत ते. इतका साधा सरळ विचार कधी केलाच नव्हतां.
आजीशी बोलतांना नेहमी जाणवायच कि लहान सहान गोष्टीत नेहमी आनंद शोधते ती. काळाप्रमाणे स्वत:ला अगदी सहजपणे बदलत आली आहे आजवर कदाचित यामुळेच प्रत्येकाच्या जवळची आहे, प्रत्येकाला हवीशी आहे. तिला पाहून खूप काही शिकण्यासारख आहे. आनंदी आणि निरोगी आयुष्य हवं असेल तर आजीसारखं हवं हे नक्की.
एक विचार मनात आला, आपल्यासारखेच आजीकडे सुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत तरी गोळा करायला क्षण मात्र, बरेच आहेत…
एक विचार मनात आला, आपल्यासारखेच आजीकडे सुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत तरी गोळा करायला क्षण मात्र, बरेच आहेत…
No comments:
Post a Comment