' गोड बातमी '
'अभी ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नही' रेडीओवरती गाण चालू होतं. गाण ऐकतां ऐकतां नकळत सावनीच लक्ष आजोबांकडे गेलं. डोळे मिटून आरामखुर्चीत बसून गाण ऐकता ऐकता, डोळ्यांमधून वाहणारे अश्रू पाहून तिला खूप वाईट वाटले. त्या गाण्याने जणू त्यांना परत त्याच वळणावर नेऊन ठेवले होते. आजीला जाऊन जेमतेम दोन महिने झाले होते. थोडा बदल होईल म्हणून आदित्य सावनी नुकतेच आजोबांना इथे पुण्याला घेऊन आले होते. ५0 वर्षांची आजीची सोबत आतां फक्त आठवण होऊन त्यांच्या बरोबर होती. आजोबा म्हणायचे, ' हि पैज जिंकली तुझी आजी, माझ्या आधी जायची आणि जातांना मला मात्र अगदी एकट करून गेली.'
खरंच, अवती भोवती सारेजण असूनही आजोबा एकटे होते. प्रत्येकाला काही न काही व्याप होते, आयुष्य होते पण आजोबांच काय ? अगदी रित रित झाल होत त्यांच आयुष्य. आजीचा फोटो उशाशी घेऊन झोपायचे, जुनी गाणी ऐकतांना हळवे व्हायचे. एके काळी काय रुबाब होतां आजोबांचा, आदित्य सांगायचा ना सावनीला. त्यांची कडक शिस्त, वेळ पाळण्याची सवय, रोखठोक स्वभाव, आदरयुक्त भीती वाटायची. आतां मात्र त्यांच्याकडे पाहून केवळ सहानभूती वाटायची. आजी बरोबर आदित्य चे आजोबा सुधा हरवले होते जणू.
माणूस आपल्या आयुष्यात अनेक नाती जोडतो. या अनेक नात्यांत आई वडील, बायको, मुलं हि नातीच खरं तर त्याच आयुष्य बनतं आणि शेवटी आलेलं हे असं रिकामपण अगदी मोडून टाकत त्याला. आजोबा हि असेच मोडले होते, 'आतून' पण तरीही 'मी ठीक आहे', असं दाखवत होते जगाला. कोणावरती अवलंबून नको राहायला म्हणून आपण आपली सगळी काम स्वत: करायचे. पेपर वाचणे , फिरायला जाणे इतकच काय पण T.V. सुधा आजकाल पाहायला लागले होते, नाहीतर TV हे एक कारण असे आजी आजोबांच्या लुटुपुटू च्या भांडणाचे. पण आजकाल म्हणायचे, ' हिला कस समजणार, पुढे काय झाल ते म्हणून पाहतो मी सिरियल आणि झोपेत तिला सांगतो, ' असं म्हणून आजी पहायची त्या सर्व सिरियल पहायचे आजोबा.
सावनी आणि आदित्य खूप जपायचे आजोबांना. दोन वर्षांपूर्वी लग्न झाल दोघांच आणि नोकरी करता पुण्यात स्थाईक झाले दोघे. ऑफिस मधून आल्यावर आजोबांबरोबर चहा पिताना गप्पा आणि रात्री जेवण झाल्यावर सोसायटीत आजोबांना घेऊन चक्कर मारणे, हा जणू रोजचाच पायंडा पडला होता. आजीची जागा आपण नाही घेऊ शकणार पण आजोबांना एकट वाटू नये, याकरता दोघांची धडपड सुरु असायची.
आज सकाळ पासून सावनी झोपूनच होती, जरा बरं वाटत नव्हतं तिला. आदित्य सुधा घरीच होता. आजोबा थोडेसे अस्वस्थ होते. ' तुम्हा मुलांना तब्येतीची काही काळजी घेता येत नाही. वेळेवारी खाण नाही, दुध प्यायला नको. एकसारख कॉम्पुटर समोर बसून काय ते काम आणि काय ती कॉफी सारखी', आजोबा आपल्या परीने बोलत होते. आदित्य म्हणाला, ' काय हे. कशाचा कशाशी संबंध जोडताय आजोबा. मी सांगीतल ना तुम्ही काळजी करू नका, डॉक्टरकडे जातोय ना आम्ही. बर वाटेल औषध घेऊन.' असं बोलून आदित्य सावनी ला घेऊन गेला हि डॉक्टरांकडे आणि इकडे आजोबा मात्र येरझाऱ्या घालू लागले. दोन तीन वेळा भास झाला म्हणून दार सुधा उघडून झालं, तास दिड तास झाला होता त्या दोघांना जावून. आता मात्र आजोबा थकून आराम खुर्चीत बसले आणि त्या fan च्या गार वाऱ्यांत त्यांचा डोळा लागला.
'अहो, झोपलात का, बसल्या बसल्या?' आजीचा आवाज ऐकून आजोबा जागे झाले. 'नाही गं, थोडा पडलो होतो इतकच. मुलांची वाट पाहतोय'. आजी म्हणाली, ' मी काय म्हणते, नका काळजी करु. गोड बातमी घेऊन येतील पहा आपले अदु आणि सावनी'. ' गोड बातमी'? आजोबा जरां गडबडले. आजी नेहमीच्या सवयीने म्हणाली,'अहो, अस काय करताय ? गोड बातमी हो, गोडSSs बातमी ….'. हे ऐकताच आजोबांचा चेहरा एकदम खुलला, ' हं… हं समजल, समजल मला. अरे माझ्या लक्षातच नाही आलं. उगीच ओरडलो सकाळी मुलांना, तू पणजी आणि मी पणजोबा …हा हा हा '. आजी हे ऐकून गालातच हसली. त्या सुरकुतल्या चेहऱ्यावरती खळ्या अजूनच खुलून दिसत होत्या. समजुतीच्या स्वरात आजी म्हणाली , ' आतां तुम्हालाच काळजी घ्यायला हवी मुलांची, थोडी मदत करायला हवी घरात त्यांना , मी असते तर …. ' 'हो गं , करीन मी मदत, तू नको काळजी करू,' आजोबा बोलून गेले आणि इतक्यात दारावरची बेल वाजली. एकदा … दोनदा … तिसर्यांदा… आजोबा दचकून जागे झाले. 'आलो रे आलो ', म्हणत दरवाज्यापाशी गेले, कधी एकदा दार उघडीन असं झाल होतं त्यांना.
दारात सावनी आणि आदित्य ला पाहून म्हणाले, 'काय झाल बाळा, काय म्हणाले डॉक्टर ?' आदित्य म्हणाला , 'काही नाही आजोबा, सगळ ठीक आहे. आजोबांचे कान काहीतरी वेगळं ऐकण्यासाठी आतूर होते. ' अरे बोल राजा, आनंदाची बातमी आहे ना, ते सांग ना आधी.' आजोबांच्या या वाक्याने दोघेंही गडबडले. आदित्य म्हणाला, 'आजोबा तुम्हाला कसं माहित ?' हे ऐकून आजोबा अजूनच खुश झाले, 'म्हणजे खर आहे तर…वा वा वा, अरे हेच तर ऐकायच होत मला. आताच हि सांगून गेली मला कि मी पणजोबा होणार आहे ' आणि असं म्हणत आजोबांनी आदित्यचा हात हातांत घेतला. डोळ्यांच्याकडा नकळत ओल्या झाल्या होत्या, त्या पुसत म्हणाले ' सावनी आदित्य, खुश राहा बेटां'. अस म्हणून ते देवघराकडे गेले.
आजीचा आनंदी चेहरा सारखा समोर येत होता. देवाचे मनापासून आतून आभार मानायचे होते त्यांना कारण पुढे चालण्याकरता एक आशेचा किरण दिला होता त्यानी, येणाऱ्या चिमुकल्या पिलाच्या ओढीने जगायला नवीन उमेद मिळाली होती. कालपर्यंत जगण्याची इच्छा नसलेले आजोबा आज मात्र उद्याच्या स्वप्नांत केव्हांच हरवून गेले होते ….