शाबासकीची थाप
कधी कधी आपल्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी अनपेक्षित पणे घडतात कि विश्वासच बसत नाही ! भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नुकतीच आमच्या विद्यापीठाला भेट दिली. सिंबायोसिस स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साक्षात नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीत साजरा करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका छोट्याशा घटनेने प्रेरित होऊन मी 'सोनेरी क्षण' हा लेख लिहिला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे कुलपती डॉ मुजुमदार सर व्यासपीठावर उपस्थित असताना त्या कार्यक्रमांत मी जे अनुभवलं, जे बघितलं ते शब्दांत मांडण्याचा एक छोटा प्रयत्न केला. डॉक्टर विद्या येरवडेकर( डॉ मुजुमदार सरांची मुलगी) आणि डॉक्टर मुजुमदार सर यांच्या पर्यंत माझा तो लेख कधी पोहचेल असं मुळीच वाटलं नव्हतं. तरी स्वप्नवत वाटाव्यात अशा काही गोष्टी आयुष्यात घडत असतात, हे नक्की !
एक दिवस सकाळी सकाळी डॉक्टर विद्या मॅडमचा फोन आला. खरं तर आदल्या दिवशीच सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय सुरेख संपन्न झाला म्हणून एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाची जबाबदारी सर्वांनी उत्तम रित्या पार पाडली म्हणून खूप कौतुक झालं, स्नेहभोजन झालं त्यामुळे आत्ता आलेला फोन काहीसा 'वेगळ्या' कारणासाठी असणार ह्याची खात्री होती. त्यामुळे सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमात काय deviation झालेलं असू शकतं ज्याकरता स्वतः मॅडमनी मला फोन केला असावा, याचा विचार करताना होणारी धडपड सांभाळता सांभाळता मी फोन घेतला. 'हॅलो' म्हणताच पलिकडून आलेल्या आवाजाने, त्यांच्या बोलण्याने मी पुरती भारावून गेले. त्यांनी इतक्या प्रेमाने माझं कौतुक केलं कि त्यावर मी आता काय बोलू,असं झालं मला. what's app ची कमालच म्हणून तो लेख नागपूर वरून कोणी आवर्जून मॅडमना पाठवतं काय व त्यांच्यामुळे सरांपर्यंत तो लेख पोचतो काय आणि प्रत्यक्ष फोन करून त्यांच्याकडून कौतुकाची थाप मिळते काय ! सारंच कमाल ! 'किती सुंदर लिहिलं आहेस, अगदी नेमक्या शब्दात मनातलं मांडलं आहेस..मला, दादांना माहिती आहेच तुझी संस्थेशी किती attachment आहे.लेख वाचतांना ती तुझ्या प्रत्येक शब्दांतून दिसते, जाणवते.सिंबायोसिसच्या सुवर्ण महोत्सवाची आठवण म्हणून तुझा लेख कायम जपला जाईल'.. असं त्यांनी म्हणणं माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती !
या आनंदात असतांना पुढच्याच आठवड्यात अजून एक सुखद धक्का बसला जेव्हा आमच्या विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शां.ब.मुजुमदार सरांनी मला भेटायला बोलावलं. सरांनी भेटायला बोलावणं हिच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने विभूषित डॉक्टर मुजुमदार सर आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहेत. इतके वेळा सरांना कामानिमित्त या आधी भेटले आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे पण आज सरांना भेटण्याचं कारण वेगळं होतं, माझ्यासाठी खास होतं.
सरांना भेटायला जाताना नेहमी दडपण येतं, ते स्वाभाविक आहे परंतु एकदा का सरांशी बोलायला लागलं कि ते दडपण पूर्णतः नाहीस होतं हा अनुभव आहे. मग काय खूप उत्सुकतेने सरांना भेटायला गेले. हे माहित होतं, सर जे काही बोलतील ते मला कानांत साठवायचं आहे. मी आत जाताच, 'कविता ये बस . मी तुझा सोनेरी क्षण हा लेख वाचला. काय सुरेख लिहिलं आहेस. शब्दांची नेमकी निवड, मनातला भाव कागदावर नेमका उतरवण्यातली तुझी खुबी, सुरेख ! मला खरंच भावलं तुझं लेखन. खूप खूप कौतुक आहे तुझं, अशीच लिहीत राहा'... सरांच्या या वाक्यांनी डोळे पाणावले, काय बोलू हे सुचेना. सरांनी मला बसायला सांगितलं व म्हणाले, तु इतकं छान लिहिते हे ओळखायला इतकी वर्ष लागली बघ, कामामध्ये या गोष्टी मागे पडतात, हेच खरं.. त्यानंतर सरांशी खूप गप्पा झाल्या. मी कोणत्या शाळेत शिकले, कोणत्या कॉलेज मध्ये होते, घरी कोण कोण असतं , आई बाबा काय करतात, भावंडं किती , मुलगा कुठे असतो, मी कुठे राहते, रोज ऑफिसला कशी येते, लेखनाची आवड कशी निर्माण झाली, काय काय लिहिते, आजवर जे लेखन केलं ते कुठे प्रसिद्ध केलं अशा अनेक प्रश्नांमधून त्यांनी माझ्या विषयी आवर्जून माहिती करून घेतली. लेखनाचा गुण माझ्या बाबांकडून माझ्याकडे आला असं सांगताच त्यांनी माझ्या बाबांची चौकशी केली. ते काय करायचे, काय लिहायचे ते जाणून घेतलं. 'किती वर्ष झाली तुला इथे' असं त्यांनी विचारताच मी सांगितलं 'सर , १६ वर्ष पूर्ण झाली', तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू पसरलं, समाधानाचं. साहजिकच आहे, आपल्या इथे काम करणाऱ्या प्रत्येकाची ते काळजी घेतात मग तो ड्राइव्हर असो अथवा इतर उच्च पदस्थ ! इथे काम करणारा प्रत्येक जण आनंदी आणि समाधानी असावा हा त्यांचा प्रयत्न असतो, कायमच. १८, २०, २५ वर्ष इथे नोकरी करत समाधानाने वावरणारे माझ्यासारखे अनेक जण आहेत इथे ज्यांना पाहिल्यावर सरांच्या चेहऱ्यावरचं समाधान अगदी आनंदाने झळकतं ! मला आठवतंय, कांतेय चार वर्षाचा असतांना घडलेली ऑफिस मधली एक गोष्ट. मी रात्री नऊच्या सुमारास ऑफिस मधून निघत होते आणि नेमकी त्याच सुमारास डॉ मुजुमदार सरांची अँबॅसिटर ऑफिसच्या गेट मधून आत येत होती. मला पाहून सरांनी गाडी थांबवायला सांगितली आणि विचारलं,'किती वाजले आहेत तुझ्या घड्याळात' ? मी जरा बावरले , गोंधळले, घड्याळ बघितलं आणि म्हणाले 'नऊ वाजलेत'. यावर सर म्हणाले, 'आज इतक्या वेळ ऑफिस मध्ये ? घरी कोणी रागवत नाही का उशीर झाला तर ? मुलगा केवढा आहे तुझा ? मग तरी इतक्या उशिरा पर्यंत थांबून काम करायची काय गरज आहे ? उद्यापासून इतक्या उशिरा पर्यंत थांबून काम केलेलं मला चालणार नाही'. आजवर जवळपास २५ वर्ष नोकरी केली पण उशिरा थांबून काम केलं म्हणून मला हक्काने रागवणारे, समजावणारे, माझ्या सारख्या प्रत्येकाच्या सोबत नोकरीच्या बरोबरीने असलेल्या आमच्या घरच्या जबाबदारीची जाणीव ठेवणारे फक्त आणि फक्त सर आहेत.
अगदी मोकळेपणाने सरांशी बोलतांना खूप भारी वाटलं. गप्पांच्या ओघात मग सिंबायोसिसच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचा विषय निघाला. आपले पंतप्रधान इतक्या मोठ्या पदावर असूनही किती साधे आहेत याची अनुभूती घेतलेले आम्ही दोघे त्यांच्या बद्दल भरभरून बोललो. सर म्हणाले, मोदीजींना आपल्या कॅम्पस वर आणण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं. गप्पांच्या ओघात मी सांगितलं सरांना कि पंतप्रधानांना प्रत्यक्ष बघायला मिळालं म्हणून आमचा मित्रपरिवार, आमच्या घरचे सर्वजण आम्हाला नशीबवान म्हणत होते. आणि हे शक्य झालं, फक्त तुमच्यामुळे. मग सरांना मी एक किस्सा सांगितला. 'सर,आपल्याकडे कार्यक्रम झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हणाली, काल रात्री आईला फोन केला तर ती देवाचं म्हणतं होती. मी विचारलं, या वेळी का देवाचं म्हणते आहेस तर ती म्हणाली, अग मोदीजी आले होते ना आपल्या पुण्यात, सर्व कार्यक्रम छान पार पडले, आणि ते सुखरूप घरी पोहचले म्हणून देवाचे आभार मानत होते'.. सर म्हणाले 'किती मनापासून प्रेम करतात सगळे त्यांच्यावर,अजून काय हवं'.
बोलता बोलता सरांनी फोन लावला, श्री. विठ्ठल मणियार यांना. सर म्हणाले, 'अग त्या दिवशी खूप कौतुक करत होते ते तुझं,आता त्यांना सांगतो तू समोर आहेस तर प्रत्यक्ष बोल तिच्याशी'. सरांचे मित्र इतकीच मला असलेली त्यांची ओळख, पण बाहेरच्या जगात त्यांचं किती मोठं नाव आहे हे त्या क्षणी मला माहित नव्हतं. 'त्या दिवशी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही मोदीजींच्या कार्यक्रमाला पण तुझ्या लेखातून सारं चित्र डोळ्यासमोर उभं केलंस तू' हि त्यांच्याकडून मिळालेली दाद खूप काही देऊन गेली कारण ते खुप उत्कृष्ट लिहितात हे मला माहित होतं. नंतर आठवणीने माझ्यासाठी त्यांनी एक पुस्तक बक्षिस म्हणून पाठवलं ते वेगळं. ते पुढे म्हणाले 'अग मी तो लेख नंतर पवार साहेबांना पण पाठवला होता WA वर, त्यांनी सुद्धा तुझं कौतुक केलं आणि विचारलं मला फोन करून, हे कोणी लिहिलं आहे' ? हे ऐकून मी खरोखर निःशब्द झाले. डॉ मुजुमदार सरांनी मला सांगितलं पवार साहेब म्हणजे शरद पवार. जे काही घडत होतं ते खरं आहे कि स्वप्न असं वाटू लागलं.
'किती घेशील दो कराने' असं काहीसं झालं होतं माझं. तासभर इतक्या साऱ्या आठवणी गोळा करून मी निघाले, सरांना नमस्कार करायला वाकणार इतक्यात सर म्हणाले, 'थांब बूट काढू दे' .. मग मी सुद्धा चप्पल काढून सरांना नमस्कार केला. सरांना निघतांना मी इतकंच म्हटलं, 'खूप जणांनी कौतुक केलं मी जे लिहिलं होतं त्या लेखाचं पण साक्षात तुमच्या कडून मिळालेली ही शाबासकी माझ्यासाठी लाख मोलाची आहे कारण ती घरची आहे !!!
©कविता सहस्रबुद्धे