जिंदगी 'गुलज़ार' है .....
कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजा़र साहेबांशी !
कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून ते कायमच जास्त आवडले.
किशोर कदम, अर्थात कवी सौमित्र यांनी एका कार्यक्रमांत त्यांची एक आठवण सांगितली होती. नदीच्या काठावर गुलजार साहेबांबरोबर उभे असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांनी गुलज़ारजींना प्रश्न केला, ''आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है.'' तेव्हा 'गुलजार' या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली, असं ते म्हणाले होते.
त्यांच्या गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं शब्दांत मांडता येणं खरं तर किती अवघड आहे. स्वतः अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीचं मन, तिच्या भावना समजून त्या त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ! गुलजारजी म्हणतात,''चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागतं, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते, जगावी लागते."
प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले, मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तेव्हा शाम रंग मागणारी त्यांची नायिका किती वेगळी आहे ते जाणवतं. प्रेमात पडल्यावर तिला, ' जीने की तुमसे, वजह मिल गयी है, बड़ी बेवजह जिन्दगी जा रही थी'.. असं म्हणावसं वाटतं... "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", असं म्हणत ती त्याच्या डोळ्यातील भाव वाचते तर कधी " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो, तेरे कदमों से, चुन के मंज़िल चले और कहीं, दूर कहीं".. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें.. बेहेने दो".. गात तिला प्रत्येक क्षण जगायचा आहे. एक सौ सोला चांँद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे है" ते परत पाठव असं सांगताना, ती पतझड, तिचं 'मेरा वो सामान लौटा दो' हे आर्जव खूप खोलवर रुततं. ' दो नैनो में आसूंँ भरे है, निंदिया कैसे समाए", असं गात "जिंदगी तो काटी ये रात कट जाए" या शब्दांतून तिची तगमग व्यक्त होते. 'खाली हात शाम आई है, खाली हात जायेगी', ऐकतांना ते शब्द आरपार अस्वस्थ करतात .... प्रत्येक गाण्यात तिचं एक वेगळं रूपं दिसतं !
गुलजार साहेबांची गाणी म्हणजे प्रत्येक गाण्यात एक गोष्ट असते, आपली .. आपण अनुभवलेली, आपलीच वाटणारी इतक्या चपखलपणे शब्दांमध्ये मिसळून जाणारी ! प्रत्येक गाणं त्यांचं वेगळेपण दाखवून जातं.
'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच वास्तव आहे, जे स्वीकारावं लागतं. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....हे प्रत्येकाला स्वतः अनुभवावं लागतं.
'जब तारे जमीन पर जलते हें , आकाश जमीन हो जाता हें, उस रात नहीं फिर घर जाता, वो चाँद यहीं सो जाता हें.. पलभर के लिए इन आँखो में , हम एक जमाना ढुंढते है' .... हि आपलीच गोष्ट. 'इन भूलभुलैया गलियों में अपना भी कोई घर होगा, अंबर पे खुलेगी खिडकी या खिडकी पे खुला अंबर होगा ' आणि हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांतील, आपण प्रत्येकाने कधी ना कधी पाहिलेलं एक गोड स्वप्न.. शब्दांमधून कागदावर उतरलेलं !
रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ .. मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस...
इजाजत.. एक चिरतरुण काव्य ! कितीही वेळा बघितला तरी प्रत्येक वेळी तेवढाच आवडणारा आणि प्रत्येक वेळी काहीतरी नविन देवून जाणारा. तो पाहतांना 'पावसाच्या बरसणाऱ्या सरींच्या सोबत गुलजारजींची कविता त्यांच्याच आवाजात आपण ऐकतोय' असंच वाटत राहतं. या चित्रपटाच्या प्रेमात पडल्यापासून असा एकही पावसाळा गेला नाही कि 'इजाजत' पाहिला नाही, इतकी जादू या सिनेमाने केली आहे मनावर. इजाजत म्हणजे एक अलवार प्रेमकहाणी, नजरेत आणि कानांत साठवून ठेवावी अशी !
लहानपणी आई गेली, तिचा चेहराही आठवत नाही, जवळ तिचा साधा फोटोसुद्धा नाही. तरीही 'दो नैना और एक कहानी , थोडा सा बादल थोडा सा पानी' आणि 'सुरमई अंखियों में नन्हा मुन्हा एक सपना दे जा रे' सारखं गीत ते लिहितात. या भावना मांडताना इतक्या बखुबी भाषा वळवण्याचं त्याचं कसब थक्क करणारं आहे.
संवेदनशीलता आणि तरल भाव हे गुलजार साहेबांच्या गाण्याचं खास वैशिष्ट्य ! आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे अजून एक वैशिष्ट्य. आपल्या कल्पनांना शब्दरूप देऊन त्यांनी अजूनच मोहक बनवलं. 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्शून जातो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले' , सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे कि जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', यातील मनाची अवस्था टिपायला फक्त आणि फक्त गुलजारचं हवेत.
आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तरी कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो !
त्यामुळे 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...
आज त्यांचा वाढदिवस ! गुलजा़र जी, तुम्हाला आभाळभर शुभेच्छा ! तुमच्या गाण्यांसोबत आमचा हा प्रवास असाच सुरु राहो !!!
© कविता सहस्रबुद्धे
(18 August 2021)