Sunday, November 28, 2021

आजही प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे गाईड. व्यावसायिक असूनही कलात्मक असणारा, जितक्या वेळा पाहावा तितका नव्याने उलगडत जाणारा. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकार एस.डी. बर्मन यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी साधं नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं.याचं दुःख दिग्दर्शक विजय आनंद यांना कायमच राहिलं. खरं तर कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडचं संगीत होतं ते ..त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा काही चित्रपटांपैकी एक ! 

2012 मध्ये, टाइम मासिकाने 'सर्वोत्कृष्ट बॉलिवूड क्लासिक्स' च्या यादीत नंबर चार वर या चित्रपटाला स्थान दिलं होते. त्या काळी मेहबूब खान, बिमल रॉय, राजकपूर सारख्या काही दिग्दर्शकांनी गाण्यांना ग्लॅमर दिलं परंतु गाण्याच्या चित्रीकरणाला एका वेगळ्या उंचीवर खऱ्या अर्थानं नेलं ते 'गोल्डी' म्हणजेच दिग्दर्शक 'विजय आनंद' यांनी. त्यांच्या ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, तिसरी मंझिल आणि गाईड चित्रपटांतील प्रत्येक गाणं म्हणजे absolutely एक व्हिजुअल ट्रीट आहे ! 

गाईड चित्रपटाचं संगीताचं काम सुरु होण्यापूर्वीच सचिनदांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढचे काही दिवस ते हॉस्पिटल मधेच होते. तेव्हा देवसाहेब आणि गोल्डी यांनी 'कितीही थांबावं लागलं तरी आम्ही थांबू पण गाईड चे संगीतकार तुम्हीच असाल', असं सचिनदांना सांगितलं. गाईड च्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा आणि शैलेंद्र यांच्या गीतलेखनाचा खूप मोठा वाटा आहे. 

चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगात एक भाव असतो. कथा, त्यातील प्रसंग, कलाकारांचे संवाद तसंच त्यांच्या अभिनयातून पुढे साकारणाऱ्या गोष्टीमधून हा भाव अजूनच गहिरा होत जातो. जेव्हा हाच भाव संवाद पेलू शकत नाहीत तेव्हा तो भाव गाण्यांतून साकारतो. गाण्यांतून​ ​गोष्ट पुढे नेण्याचं कसब गोल्डी कडे होतं. त्यांनी साकारलेली बरीच गाणी 'Director's Song' म्हणून ओळखली जातात. नायक नायिकेचा संवाद सुरु असतांनाच शॉट कट न होता त्या शॉटचं एक्सटेंशन वाटावं असं गाणं सुरु होण्याचं एक झळाळतं उदाहरण म्हणजे ,' ​​तेरे मेरे सपने अब एक रंग है .... '

उदयपूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरोवराजवळ हे गाणं चित्रित केलं गेलं. सूर्यास्ताच्या वेळी असलेला प्रकाश केवळ दहा ते पंधरा मिनिटं टिकत असल्याने तेवढ्याच वेळेत  हे गाणं हवं तसं चित्रित करणं हि एक परीक्षा होती. शेवटी गोल्डी व या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी हवा तो परिणाम साधता यावा म्हणून एका झाडाच्या आडून ते चित्रीत केलं, फक्त चार शॉट्स मध्ये !  या गाण्याचं लोकेशन, ती सूर्यास्ताची वेळ, मागील तळ्यातील संध्याकाळचा हलका प्रकाश, आकाशातील ते रंग, कातरवेळचा मंद अंधार, लयदार फिरणारा कॅमेरा, शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदांचं संगीत आणि पडद्यावर रोझी आणि राजू गाईड .. सारंच जादुई .. एक असीम काव्यमय चित्र​​च जणू​, ​'तेरे मेरे सपने अब एक रंग है​'​ ​.....​

No comments:

Post a Comment