दादा..
अगदी निवांत वेळी, जूना फोटोंचा अल्बम घेवून बसाव आणि प्रत्येक फ़ोटो मधे साठवलेली आठवण अगदी परत परत पाहावी तसंच काहीसं झालंय, दादांबद्दल लिहितांना...
जून महिना सुरु झाला आणि तीन वर्षांपूर्वी झालेला दादांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आठवला. नखशिखांत नटलेलं नागपुरचे घर, नातेवाईक मित्र मंडळींनी आलेली बहार, सनईचे सूर, फुलांचे तोरण, दारातील रांगोळी,पंचपक्वान्नांचा दरवळ, कार्यक्रमाची तयारी करतांना घरातल्या मंडळींची चाललेली लगबग आणि हा कौतुक सोहळा पाहून,अनुभवून समाधानानं भरून पावलेले दादांचं ते प्रसन्न रूप .. 'सुवास' नी डोळेभरून पाहिलेला दादांसोबतचा तोच शेवटचा सोहळा !
दादांना जाऊन आता वर्ष होईल पण अजूनही ते नाहीयेत हे खरंच वाटत नाही .. 'माणिकss ' म्हणून त्यांनी आईंना मारलेली हाक आजही तितकीच ताजी आहे, सकाळी उठल्यावर दादांच्या हातच्या चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे तर वर्ध्यावरून येताना आम्हाला आवडतो म्हणून आठवणीने आमच्यासाठी आणलेला तो गोरसपाक सुद्धा तितकाच आठवतोय ! आजही पार्ले जी बिस्कीट पाहिलं कि आठवण होते दादांची. खरंच .. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून दादा अजूनही सोबत आहेत.
दादांचा आणि माझा बावीस वर्षांचा सहवास .. या सहवासांत दादांनी खूप काही दिलं, खूप काही शिकवलं .. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ! अशी खूप कमी माणसं आहेत आजुबाजूला जी खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत आणि दादा या बाबतीत खरंच खूप खूप श्रीमंत होते. नात्याचे मैत्रीचे अनेक धागे त्यांनी जपले, जोपासले. बहीण भावंडं असोत, मित्रपरिवार असो, नातवंड असोत किंवा नातवंडांचे मित्र मैत्रिणी, प्रत्येकाशी त्यांच एक सुरेख नातं होतं; निस्वार्थ, प्रेमळ, आपुलकीचं आणि मुख्य म्हणजे मैत्रीचं ! कारण कोणत्याही नात्यांत जेव्हा मैत्री असते ना तेव्हाच ते नातं बहरतं !! अगदी इथे पुण्यात माझ्या शेजारी राहणाऱ्या पटवर्धन काकूंकडे सुद्धा आई दादा आले कि कॉफी पार्टी ही ठरलेली .. प्रत्येकाशी त्याच्या वयाप्रमाणे लहान , मोठं होऊन संवादातून वयातली दरी मिटवण्याचे कसब त्यांच्याजवळ होतं. एक वडील म्हणून,नवरा म्हणून,आजोबा म्हणून,सासरे म्हणून,शिक्षक म्हणून, भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून बहुतेक या साऱ्याच भूमिकांमध्ये मी त्यांना खूप जवळून पाहिलंय आणि मला वाटतं त्यांनी जगलेली प्रत्येक भूमिका ते भरभरून जगले व म्हणूनच आज प्रत्येकाला त्यांची उणीव भासते. केयुरला अनेक वेळा फोन उचलून आत्ता हि गोष्ट दादांना सांगावी असं वाटतं तर कधी छान sketch जमलं कि 'आजोबांना हे नक्की आवडलं असतं', हि भावना कांतेयला स्पर्शून जाते. आजही दादांच्या आवडीचा पदार्थ केला कि त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही...
दादांचं अनपेक्षितपणे जाणं मनाला अगदी चटका लावून गेलं. खूप काही बोलायचं होतं त्यांच्याशी.. मनातलं कधी बोलून दाखवलं नाही ते कधीतरी व्यक्त करायचं होतं. त्यांच्यासोबत आनंदाचे अजून खूप सारे क्षण गोळा करायचे होते, त्यांना त्यांच्या सर्व नातवंडांचं कौतुक करतांना पाहायचं होतं. आजही त्याच उत्साहाने आईंसोबत वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातांना त्यांना पाहायचं होतं आणि हो ,आम्हाला पण त्यांच्याकडून अजून थोडं कौतुक करून घ्यायचं होतं.. हक्कानं कौतुक करणारी, पाठीवर शाबासकीची थाप आणि आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवणारी आपलीच माणसं अशा प्रकारे निघून गेली ना कि अगदी पोरकं वाटायला लागतं ..
दादा गेले पण जातांना एक शिकवण देऊन गेले. मला आठवतंय, दादा आजारी पडायच्या अगदी एक दिवस आधी मी दादांना एक गोष्ट लिहून पाठवली होती, तो गोष्ट होती दादा आणि त्यांच्या भावंडांबद्दल. ती वाचुन दादांनी लगेच मला मेसेज तर केलाच पण लगोलग फोन सुद्धा केला आणि म्हणाले 'तुम्ही सगळे जण सुद्धा कायम असंच एकत्र राहावं हि माझी इच्छा आहे'. खरं तर असं बोलण्याचा,सांगण्याचा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे मला वाटलं आज असं का बोलतायत दादा ? पण मग मीच विचार केला काही हक्कानं, प्रेमानं सांगतायत..थोडे हळवे झालेत ! मी म्हटलं त्यांना 'हो दादा नक्कीच प्रयत्न करू' आणि तेच माझं त्यांच्या सोबतचं शेवटचं संभाषण ठरलं. आता ती गोष्ट आठवली कि वाटतं, जाता जाता जणू संस्कारांची एक शिदोरी देऊन गेले दादा .. आता ते संस्कार जपणं, रुजवणं आपल्याच हातात आहे, नाही का !!!
No comments:
Post a Comment