Thursday, July 1, 2021

 करून तर पहा ..


कालच मैत्रिणीकडे गेले होते, नेहाकडे. महिनाभरापूर्वी तिचे वडील गेले. वडिलांना जाऊन आठवडा होत नाही तोच तिच्या मुलाला आणि नवऱ्याला कोरोना झाला त्यामुळे ती खूप टेन्शन मध्ये होती. कोरोना या शब्दाची भीती बसली होती तिच्या मनांत. पण सगळं व्यवस्थित सांभाळलं तिने. आता दोघेही कोरोना मधून बरे झाले म्हणून आवर्जून ठरवून गेले तिच्याकडे, सर्वांना भेटायला आणि तिच्याशी गप्पा मारायला. वाटलं, इतके दिवस कोणी आलं गेलं नसेल, आपण गेलो तर बरं वाटेल सर्वांना. तिला आवडतात म्हणून मटार करंजी, पायनॅपल शिरा आणि केक टोस्ट घेऊन गेले. तिला सांगितलं, 'आलं घालून वाफाळलेला चहा मात्र तुझ्या हातचा हवा'. खूप खूष होती मी आले म्हणून. मग काय गप्पा झाल्या, खाऊची तारीफ झाली. चहाचे कप घेऊन मग आम्ही दोघी टेरेस वर गेलो. मस्त गार हवा, निळ्या काळ्या रंगांनी भरलेले आकाश, पक्षांचा चिवचिवाट आणि खूप दिवसांनी मिळालेला निवांतपणा .. अजून काय हवं !

माझ्या हातावर हात ठेवून नेहा म्हणाली, 'खूप बरं झालं आलीस' ..तिच्या स्पर्शातून खूप काही समजलं, तिने न सांगताच ! तशा दोन / तीन चकरा झाल्या होत्या माझ्या ते सर्व जण घरीच quarantine असतांना पण भेट नव्हती झाली. दारा बाहेर सामान ठेवून फोन केला होता, 'दार उघडून पिशव्या घे ग खाऊच्या आतमध्ये'.. खरं तर असं सांगताना मला आणि ऐकतांना तिला पण नक्कीच कसं तरी झालं असणार, पण नाईलाज होता. सतत भेटणाऱ्या आम्ही मैत्रिणी आजकाल जी काही भेट व्हायची ती फोन वरच त्यामुळे आपल्याच मैत्रिणीला इतके दिवसांनी प्रत्यक्ष पाहून खूप बरं वाटलं.. जवळपास दिड वर्ष झालं आता, आपल्या सर्वांचच पूर्वीचं आयुष्य हरवून. कधीही वाटलं भेटावं तर आमचं नेहमीच्या जागी कॉफी आणि बरंच काही ठरलेलं .. पण हळूहळू सगळंच बदललं तरी जे समोर आहे त्याला स्वीकारून आपण सर्व जण चालतो आहोतच कि. फोन वरून, झूम कॉल वरून दुधाची तहान ताकावर भागवतो इतकंच त्यामुळे असं प्रत्यक्ष भेटण्यातली मजा काही औरच !! एका गोष्टीचं मात्र खूप समाधान आहे आणि अभिमान सुद्धा कि आम्ही मैत्रिणींनी कोणालाही गरज पडली तेव्हा न सांगता हक्कानं एकमेकींना खूप मदत केली... 'न सांगता' हे सर्वात महत्वाचं, कारण समजून उमजून विचार करून कोणासाठी हक्कानं काही करणं यातलं समाधान जो करतो त्याला आणि ज्याच्यासाठी करतो त्याला सुद्धा खूप काही देऊन जातं हे नक्की ! 

या काळात जसं माणसा माणसांमधली अंतरं कमी झाली तशी काही अंतरं वाढली सुद्धा. प्रत्येकाला सुखद अनुभवच आले असं नाही तर अनपेक्षितपणे काही अनुभव डोळ्यांच्या कडा भिजवून सुद्धा गेले. नेहा म्हणाली, 'अग शेजारी राहणाऱ्या आरतीने फक्त फोन वर चौकशी केली ग, आता महिना होऊन गेला तरी आली नाही भेटायला. आपण इतके शिकलेले, सुशिक्षित लोक आणि आपणच असं वागायचं. खूप वाईट वाटलं. अग, माझ्याकडे काम करणाऱ्या राधाबाई रोज बेल वाजवत होत्या, ताई सांगा काय आणून देवू म्हणून  .. काय बोलू, काही जण माणुसकी पार विसरलेत ग'...

आज नेहाने सांगितले तसे कितीक अनुभव आपण सर्वानीच ऐकले आहेत, अनुभवले आहेत. कोरोना मधून बरं होऊन महिना झाला तरी कामाला येणाऱ्या बाईंना 'त्यांच्याकडे गेलीस तर आमच्याकडे येऊ नको', असं सांगणारी, लिफ्ट मध्ये एकत्र जायला नको म्हणून तोंडावर लिफ्टची दारं लावणारी मंडळी खरंच आपल्या समजण्याच्या पलीकडची आहेत .. अरे निगेटिव्ह रिपोर्ट आलाय , घरी व्यवस्थित sanitization करून घेतलंय आणि मुख्य म्हणजे आता बरं होऊनही दोन / तीन आठवडे झाले आहेत असं असतांनाही अशा सुशिक्षित लोकांकडून या दुखण्यातून बरं झालेल्या रुग्णांना,त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी हि वागणूक पाहून त्यावर काहीही बोलूच नये असं वाटतं. विविध स्तरांवर हे चित्र कमी अधिक प्रमाणात सारखंच आहे. 'डॉक्टरांची मुलं आहेत ती, त्यांच्याबरोबर नका खेळू, त्यांचे आईवडील रोज जातात हॉस्पिटल मध्ये'.. अशी अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचलेली या मानसिकतेची झळ फार फार वाईट आहे. 

मागच्या वर्षी आपण सगळेच घाबरलेले होतो. फारशी माहिती नव्हती त्यामुळे पुष्कळ भीती होती मनांत. कालांतराने थोडं चित्र बदललं. लस आली आणि थोडा दिलासा मिळाला. वेळोवेळी शासनाकडून जाहीर होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमुळे आपल्या सर्वांनाच एक प्रकारची मदत झाली. पण दुसरी लाट तिचं भयानक रूप घेऊन आली जे आपण सर्वांनी खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय .. आपला आयुष्याकडे पाहायचा दृष्टिकोन संपूर्णपणे बदलून टाकणारी हि लाट सोबत खूप काही घेऊन गेली आणि खूप काही शिकवून गेली. पण आपण खरंच काही शिकलोय का ? असा प्रश्नच पडतो असे कटू अनुभव ऐकले कि .. 

अजून लढाई नक्कीच संपलेली नाही त्यामुळे आपण प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलू यांत ना ..  योग्य काळजी घेऊन आपण आजूबाजूच्या एका कुटुंबाला जरी मदत करू शकलो ना तर त्यातून मिळणारा आनंद खरंच लाख मोलाचा आहे, करून तर पहा !!!

- कविता सहस्रबुद्धे 

No comments:

Post a Comment