Thursday, July 1, 2021

 दाटून कंठ येतो...


काही गाणी आयुष्यातील अवघड वळणांवर पुन्हा नव्याने भेटतात..खरं तर शब्द तेच,भाव तोच,तीच आर्तता,चालही तीच तरी प्रसंगानुरूप अर्थ मात्र अजूनच गहिरा होत जातो,  मनाला स्पर्शून जातो आणि डोळ्यांत मळभ भरून यावं असं काहीसं होतं. असंच आहे शांताबाईंनी लिहिलेलं एक अजरामर गाणं. मागच्या काही दिवसांत परत एकदा ओळख झाली या गाण्याशी .. नव्याने ! कारण या वेळी संदर्भ, परिस्थिती सारं काही बदललं होतं... आणि विचित्र योगायोग, तो पण कसा तर माझ्या बाबांच्या सर्वात आवडत्या गायकाने म्हणजेच श्री.वसंतराव देशपांडे यांनी गायलेले हे गीत राहुल देशपांडे या माझ्या आवडत्या गायकाच्या आवाजात त्याच्या YOUTUBE चॅनेल वर रिलीज होणं व ते सुद्धा बाबा गेले त्याच आठवड्यात आणि तेंव्हाच मी ते ऐकणं ..  'दाटून कंठ येतो.....' 

१९७९ पासून आजवर हे गाणं कितीतरी वेळा ऐकलंय, कधी नकळत कानावर पडलंय पण यावेळी ते ऐकतांना जे वाटलं ते खूप खूप वेगळं होतं.. लग्न झालं तरी एकाच शहरात राहताना बाबांपासून दूर असं कधी जावंच लागलं नाही. मनात आलं कि कधीही घरी जायचं आणि बाबांना भेटायचं इतकं सोपं होतं सारं.. पण सध्याच्या परिस्थितीत हेच इवलसं अंतर कधी मोठं होत गेलं, तेही काही क्षणांत ते कळलंच नाही. निरोप न घेताच बाबा निघून गेले,कायमचे... कोरोना या एका शब्दाने हे अंतर इतकं वाढलं की त्यांना एकदा स्पर्श करण्याचं, जवळून डोळे भरून पाहायचं सुख सुद्धा त्याने हिरावून घेतलं.. 

आपण आई होतांना पोटांत जाणवणारी बाळाची हालचाल किती सुखद असते नाही. त्या नऊ महिन्यात आपल्या बाळाने ऐकलेला आपला आवाज, आपल्या हृदयाची धडधड व आपला स्पर्श 'आई' म्हणून सर्वात आधी आपल्याला आपल्या बाळाशी जोडतो. बाळाच्या जन्मानंतर त्याला बाबाचा स्पर्श,बाबाचा आवाज आणि सहवास मिळायला सुरवात होते. असं म्हणतात मुलं आईच्या आणि मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात. खरं तर आपल्या काळजाचा तुकडाच, मग मुलगा काय किंवा मुलगी काय .. पण तसूभर का होईना मुली बाबाच्या जास्त लाडक्या असतात, हेच खरं.मला अजूनही आठवतंय मी लहान असतांना बाबा ऑफिस मधून यायच्या वेळी घराबाहेर पायरीवर बसून बाबांची वाट पाहण्यात काय मजा यायची. कोपऱ्यावर बाबा येतांना दिसले कि चेहऱ्यावर हसू पसरायचं.कधीही 'काय आणू तुझ्यासाठी?' असं बाबांनी विचारलं तर 'फुटाणे आणा' हे माझं उत्तर ठरलेलं. 'अग तेव्हा फुटाणे आणण जमायचं, पैसे नसायचे फारसे जवळ.पण तू कधी खर्चात नाही टाकलंस पोरी मला' असं ती जुनी आठवण सांगताना कातर होणारा बाबांचा स्वर आजही कानात ताजा आहे !

त्या दिवशी राहुल देशपांडे यांच्या आवाजात हे गाणं ऐकतांना अशा कितीतरी आठवणी डोळ्यांत एकदम तरळल्या. माझ्या जन्मानंतर त्या आनंदात माझ्यावर कविता लिहिणारे बाबा, त्यांच लेखन कौशल्य माझ्या ठायी यावं म्हणून मुद्दाम माझं नाव 'कविता' ठेवणारे माझे बाबा मग परत परत मला दिसत राहिले. या गाण्याच्या पहिल्या कडव्यापासून सुरु झालेला माझा बाबांसोबतच्या आठवणींचा प्रवास,आम्ही एकत्र घालवलेल्या अनेक क्षणांना परत एकदा स्पर्श करून आला आणि शेवटच्या कडव्यावर मात्र पुरता अडखळला.. असं वाटलं जे गमावलंय त्याची सावली या गाण्यात डोकावते आहे. 'घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे' ... हि ओळ काही क्षणांकरता बाबांजवळ घेऊन गेली. त्यांच जाणं आपल्याला किती पोरकं करून गेलंय हे सांगून गेली... 'आत्मजा' या शब्दांतील गोडवा खऱ्या अर्थाने ज्याला समजला होता आता तोच आपल्याजवळ नाही पण तरीही जातांना त्याने आपल्याकडून सुखानं राहण्याचं वचन घेतलंय.. 

मराठीत या नात्याचं शांताबाईं इतकं सुरेख,अलवार,नाजूक शब्दचित्र दुसरं कोणीच चितारलेलं नाही. अगदी कमीत कमी वाद्यांच्या संगतीत राहुलच्या आवाजात हे गाणं ऐकतांना आपसूकच डोळे मिटले.. अव्यक्त भावनांना शब्द आणि सूर दोन्ही सापडले..वाटलं,हे गाणं जितकं बाबांचं आहे तितकंच ते माझं पण आहे ...  


No comments:

Post a Comment