कॅमेऱ्यामागचा 'चेहरा'..
ठराविक दिवशी विशिष्ट व्यक्तीची आठवण आवर्जून येते. आज जागतिक छायाचित्र दिवस.. मग गौतम सरांची आठवण येणार नाही असं कसं होईल !
'कॅमेऱ्यामागचे जादूगार' अशी ओळख असलेलं नाव,म्हणजे गौतम राजाध्यक्ष ! कमालीचे जिवंत भासणारे व आपल्याशी संवाद साधणारे ‘चेहरे’ हि त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची खासियत. लिंटास इंडिया सारख्या ख्यातनाम जाहिरात कंपनीत काम करत असतानाआपल्या लेखनात आलेला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ते कॅमेऱ्याची मदत घेत. पुढे १९७४ सालापासून त्यांनी आपला फोटोग्राफीचा छंद व्यवसाय रुपात आकारास नेला. १९८० मध्ये शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक छायाचित्रणास प्रसिद्धी लाभली. स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांसाठी त्यांनी फोटोग्राफी केली.
१९९७ मध्ये प्रकाशित झालेले 'चेहेरे' हे त्यांचे पुस्तक खूप गाजले. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय पासून दुर्गा खोटे, स्मिता पाटील, शांताबाई शेळके, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, गुलजारजी, पंडित भीमसेन जोशी,जावेद अख्तर, कैफी आझमी अशा तमाम मंडळींची प्रतिबिंब त्यांच्या छायाचित्रांमधून उमटली ! कसबी छायाचित्रकार, प्रभावी व्यक्तिमत्त्व, तल्लख बुद्धी, अभिजात रसिकमन, उत्तम वक्ता या गुणवैशिष्टयांमुळे गौतम राजाध्यक्ष केवळ ‘स्टार फोटोग्राफर’ न राहता स्वत:च ‘स्टार सेलिब्रेटी’ बनले.
बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या विद्यापीठात School of Photography या नवीन कॉलेजचं काम सुरू झालं. या करता गौतम सरांचं मार्गदर्शन तर मिळणार होतंच शिवाय चेअर प्रोफेसर म्हणून ते इथल्या विद्यार्थ्यांना शिकवणार सुद्धा होते. त्यामुळे हा प्रोजेक्ट खूप special होता. केयुरचा फोटोग्राफी हाच विषय असल्यामुळे तो अगदी सुरवातीपासून गौतम राजाध्यक्ष सरांसोबत काम करत होता. त्याच्यासाठी तर हि एक फार मोठी सुवर्ण संधी होती.
गौतम सरांचा स्वभाव अतिशय मृदू होता त्यामुळे विभिन्न क्षेत्रातील, विविध वयोगटातील, विविध विचारांची माणसं त्यांच्याशी अगदी सहजपणे जोडली जात. समोरच्या व्यक्तीच्या कार्य क्षेत्राविषयी जाणून घेत, गप्पा मारत ते समोरील व्यक्तीचा स्वभाव खुलवत व त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत. त्यामुळे केयुरची खूप पटकन मैत्री झाली त्यांच्याशी. हो मैत्रीच, कारण दोघांच्या वयामधली दरी कॅमेऱ्यामुळे कधीच पुसली गेली होती. फोटोग्राफी या विषयावर किती बोलावं, किती शिकावं आणि त्यांना किती ऐकावं असं झालं होतं त्याला. या विषयावरील चर्चा, त्यांचे अनुभव यातून खूप शिकता आलं. फोटोग्राफीच्या तीन वर्षाच्या डिग्री प्रोग्रॅम करता कोणता अभ्यासक्रम असला पाहिजे हे ठरवणं व तो कोर्स सुरु करणं हे सुरवातीचं मूळ उद्दिष्टय होतं कामाचं. सोबत या अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या लॅब कशा असाव्यात, उपकरणे कोणती हवीत, शिकवण्याची पद्धत कशी असावी, या सारख्या अनेक गोष्टींवरती सुद्धा काम सुरु होतं. मुंबई पुणे अशा त्यांच्या चकरा वाढल्या होत्या. गौतम सर आठवडा आठवडा कॅम्पस मधील गेस्ट हाऊस मध्ये राहायचे. केयुरच्या मोबाईल वर 'गौतम राजाध्यक्ष calling' असं पाहायची हळूहळू सवय झाली. एकत्र काम करता करता फॉर्मल बोलणं मागे पडून एक सहजता आली होती या नात्यात..
मला आठवतंय, माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये स्टारडस्ट, फिल्मफेअर सारख्या मासिकांमधले त्यांनी काढलेले माधुरी, जुही, रेखा यांचे फोटो पाहून असं वाटायचं कसले भारी आहेत हे फोटो. तेव्हा फोटोग्राफी बद्दल फारसं ज्ञान नव्हतं पण एवढं नक्की समजायचं कि खूप खास , वेगळे फोटो असायचे ते. एकदा कुतूहलाने, हे फोटो कोणी काढले आहेत हे बघितलं आणि समजलं, तेव्हा ओळख झाली 'गौतम राजाध्यक्ष' या नावाशी. त्यांनी काढलेला फोटो एकदा पाहिला कि तो फोटो VISUAL MEMORY मध्ये एकदम फिट बसायचा, अशी जादू होती त्यांनी काढलेल्या फोटोंमध्ये. केयुरला एकदा मी सांगितलं होतं, कि कॉलेज मध्ये असतांना एक स्वप्न होतं माझं एकदा तरी आपला फोटो काढून घ्यावा, गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून !
एक दिवस संध्याकाळी सरांचा फोन आला ते पुण्यात पोचले हे सांगायला कारण दुसऱ्या दिवशी सकाळी एक मिटिंग होती. सरांनी केयुरला 'उद्या ब्रेकफास्टला ये, मग एकत्र जाऊ', असं सांगितलं कारण त्यांचा तिथीने वाढदिवस होता, त्या दिवशी. फोन झाल्यावर सरांकरता काय घेऊन जावं, असा प्रश्न केयुरला पडला. खरं तर इतक्या मोठ्या स्टार सेलिब्रेटी ला वाढदिवसाला काय द्यायचं हा आमच्यासाठी तसा गंभीर प्रश्न होता. खूप विचार करून मी सुचवलं, 'केयुर मी घरीच केक बनवते, तू घेऊन जा उद्या. आवडेल सरांना, काय वाटतं '.. त्याला माझा विचार आवडला. मग काय प्रचंड उत्साहाने मी लगेच लागले तयारीला, मस्त केक बनवला. घरभर पसरलेला केकचा तो टिपिकल सुवास 'केक छानच झाला आहे' जणू हेच सांगत होता. सकाळी उठल्यावर मस्त पॅकिंग केलं. केयुर ठरलेल्या वेळी केक घेऊन गेला.
गौतम सर खातील का केक मी बनवलेला, आवडेल का त्यांना आपण असा केक पाठवला आहे ते .. असे अनेक प्रश्न मनांत येत होते. एकीकडे ऑफिस करता तयार होता होता मन मात्र प्रश्नांमध्ये अडकलं होतं. केयूर ला जाऊन जवळपास अर्धा पाऊण तास झाला होता. इतक्यात केयुरचाच फोन आला, ' अग गौतम सरांना बोलायचं आहे'.. आणि त्यानी फोन सरांना दिला. मी पुरती गोंधळून गेले, पहिल्यांदाच बोलणार होते त्यांच्याशी. बोलायला सुरवात करताच काही क्षणांत मग ते दडपण निघून गेलं. मी त्यांच्यासाठी स्वतः केक बनवून पाठवला या गोष्टीचं त्यांना खूप कौतुक वाटलं. फोनवर माझं पोटभर कौतुक तर त्यांनी केलंच शिवाय केक खूप आवडलाय आणि तो मी कोणाबरोबरही SHARE करणार नाही व एकटा संपवणार असंही सांगितलं. 'आज मिटिंग झाली कि परत जायचंय मुंबईला पण परत आलो कि केयुर नी सांगितलंय मला, ते तुझं कॉलेज मधलं ड्रीम पूर्ण करू, काढूया तुझा फोटो. इतके दिवस का नाही बोललीस'.. असं म्हणाले. मी इतकी खुश झाले कि 'और क्या चाहिये' असं झालं मला !
दोन सप्टेंबरला आमचं हे फोन वर बोलणं झालं व नंतर ते मुंबईला गेले. तेरा तारखेला संध्याकाळी केयुरशी बोलले फोनवर, दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुंबईवरून येणार होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ते काल रात्री गेले' असा फोन आला. त्या फोनवर तर अजिबात विश्वासच बसला नाही, विश्वास ठेवावा असं वाटलंच नाही. पण जेव्हा त्यांच्या घरी फोन केला तेव्हा समजलं, बातमी खरी होती. हे समजताच केयुर मुंबईकरता निघाला. त्यांच शेवटचं दर्शन घेतलं. तिथून परत निघतांना त्यांच्या सेक्रेटरीने केयुर ला थांबवलं आणि तो म्हणाला, 'सरांनी काही फोटो ठेवले आहेत पॅक करून, त्यांनी काढलेले, कॉलेजमध्ये लावण्याकरता, तुमचं बोलणं झालं होतं ना' .. आणि तो वरती त्यांच्या रूममध्ये गेला. जिन्यावरून खाली उतरतांना त्याच्या हातांत ब्राउन रंगाच्या कागदात पॅक केलेल्या आठ दहा फ्रेम होत्या आणि त्यावर केयुरचं नाव लिहिलं होतं, त्यांच्याच अक्षरांत ...
रात्री केयुर घरी आला तेव्हा कितीतरी वेळ आम्ही त्या फोटोंकडे पाहात राहिलो. मी केयुर ला म्हटलं सुद्धा एक फोटो आपण ठेवू यांत का आपल्याकडे, सरांची आठवण म्हणून .. पण तो नाही म्हणाला. सरांनी कॉलेज करता दिले आहेत ना हे फोटो मग ते तिथेच हवेत. आजही कॉलेज मध्ये त्या फोटोंकडे पाहिलं की गौतम सरांची आठवण येते !
Happy World Photography Day !!!!
No comments:
Post a Comment