Thursday, August 31, 2017

सैनिक


अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतोंका ,
श्रेष्ठत्व के विवादपर साथ छोडा एक दुसरोंका !!
' इन पांचोसेभी शक्तीशाली है कोई इस दुनियामे ?'
ब्रह्मदेवने चिंतित होकर पूछा हमें !
'हे भगवन् , इन पांचो के सामने हमारा एकमात्र हि काफी हें
वह आगसे भी प्रखर है , तुफ़ानोंसे  भी तेज से
पानीसे गतिमान , धरती से सहिष्णु और व्योम से भी उंचा है  !
वह हमारी आन हें , हमारी शान है
सऱहदपर खडा भारत माँ का जवान है !'
सर्वश्रेष्ठ होकर भी वह किसी विवाद में नही उलझता,
हमारे सुनहरे 'कल' के लिए वह हमारा 'आज' हें गवाता
गर्व हें तुमपर , नाज हें तुमपर, तुमपर  हें अभिमान ,
लज्जित पंचमहाभूतों सहित हमारा कोटी कोटी प्रणाम !!

- अनुराधा प्रभुदेसाई

शहरी, चौकटीबद्ध, सुरक्षित आयुष्य जगत असतांना आपल्याला आपल्या देशसीमेवर चालणाऱ्या गोष्टींची खरंच खोलवर जाणीव असते ? आपल्याला स्वातंत्र्य मिळून  ७० वर्ष झाली पण 'स्वातंत्र्याचा' आणि एक भारतीय असल्याचा, 'भारतीयत्वाचा' खरा अर्थ आपल्याला समजलाय ? स्वैराचार आणि स्वातंत्र्य यातील फरक आपण ओळखलाय ?  लक्ष्य फौंडेशन च्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी जेव्हा हे प्रश्न विचारले तेव्हा ऑडिटोरियम मध्ये फक्त शांतता होती. प्रत्येक जण स्वतःला हाच प्रश्न विचारत होता, त्याची उत्तरं शोधत होतां.

'सैनिक..  तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा'. त्यांच्या बोलण्यातून हा सैनिक हळूहळू उलगडत होता. स्वान्त: सुखाय आयुष्य जगणाऱ्या सर्वांना थोडा वेगळा विचार करायला लावणारे त्यांचे शब्द .आपल्याला माहीत नसलेल्या त्याच्या आयुष्यातील दररोजच्या युद्धाशी ओळख करून देणारे शब्द ... ८ तासाच्या चौकटीत ऑफिसमधे काम करून दमणाऱ्या आपल्याला ३६/ ४० तास बॉर्डर वर एकाजागी उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या  सैनिकाची गोष्ट सांगणारे शब्द .. ५६ ते -५६ डिग्री तापमानात कोठेही उभा राहणारा सैनिक.. केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी "सिर्फ दिमाग में डाल देना हें, बाकी आसान हें " इतक्या सोप्या सरळ अर्थाने समजून त्या करणारा सैनिक ... समुद्र सपाटीपासून ८ हजार फूट ते १८ हजार फुटांवर विरळ ऑक्सिजन मधे या देशासाठी पाय रोवून उभा असणारा सैनिक ...कोणत्याच गोष्टीसाठी रिटेक ची अनुमती नसलेला सैनिक....

खरंच हा सैनिक आपल्याला माहित आहे ?

आकाशात उंच भरारी मारणाऱ्या त्या गरुडाला सुद्धा वाऱ्यापेक्षा आपल्या पंखांवर जास्त विश्वास असतो. डोक्याला जखम , हात प्लास्टर मध्ये, पोटावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया, डावा पाय मिसिंग असणारा कॅप्टन शौर्य जेव्हा "मी एकदम मस्त आहे , पण माझ्या बडीसाठी प्रार्थना करा", असं म्हणतो तेव्हा समजतं कि हा  सैनिक आपल्याला कळलेलाच नाही. मिशन वर जायच्या आधी, "जर मी धारातीर्थी पडलो तर माझी मेडल्स माझ्या छातीवर लावून मग मला घरी पाठवा आणि मी सर्वोत्तम कामगिरी बजावली हे माझ्या आईला सांगा "असं लिहून ठेवणारा सैनिक मन अस्वस्थ करतो. "एकतर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून" असं म्हणणारा कॅप्टन विक्रम बात्रा , "माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होण्याआधी जर मृत्यूनं मला कवटाळल तर मी आधी मृत्यूचा खात्मा करेन", असं म्हणणारा कॅप्टन मनोज पांडे तर, "आई , आताच मी ट्रैनिंग वरून आलो. खूप अवघड आणि कष्टप्रद ट्रैनिंग आहे. इथे पेपर नाही, पुस्तक नाही, बरंच काही नाही..  प्रचंड बोचरी थंडी आहे सोबतीला. पण आई, तरीही अत्यंत अवघड परिस्थितीत सियाचीन सैनिक म्हणवून घेण्यात मला खूप अभिमान आहे", असं -३० तापमानात लिहिणारा मेजर कुणाल....  कारगिलच्या युद्धातील अजूनही बऱ्याच जणांना माहित नसलेला पहिला योद्धा, कॅप्टन सौरभ कालिया .... "जिंदगी ना मिलेगी दोबारा ", याचा अर्थ बहुदा यांनाच समजला होता.

आपल्या भारतीय संरक्षण दलातील या वीरांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई.या प्रत्येकाची गोष्ट उलगडून सांगत होत्या.

जावेद अख्तर यांनी लिहिलंय,

" दिलोंमें तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
नजर में ख्वाबो कि बिजलीया लेके चल रहे हो , तो जिंदा हो तुम "...


मिशन वर जायच्या आधी हाच सैनिक पत्र लिहून आपल्या पेटिमध्ये ठेवतो, जर परत आलोच नाही तर तेच पत्र त्याच्या घरच्यांकरता शेवटच पत्र, निरोप असतो. खरंच, किती अवघड आहे हे पचवणं. असं म्हणतात एका सैनिकाच पार्थिव ठेवलेलं कफेन खूप जड असतं... हळू हळू याचा अर्थ समजत होता....

कर्नल धरमदत्त गोयल ... एलओसी पासून १०० मीटर अंतर,  दर २८ सेकंदांनी होत असलेला गोळीबार तरीही मिशन फत्ते करून डोळयांदेखत बुटासकट उडालेला डावा पाय , त्यानंतर बर्फाची बरसात, दगडधोंडे, दरी, शत्रूने  पेरलेले भूसुरुंग यातून सोबतच्या दोन बडींनी खांद्यावर टाकून , पाठीवर घेऊन, हाताला धरून तब्बल १२ तास चालून कॅम्पवर आणलं आणि प्रतिकूल परिथितीमुळे तब्बल २३ तासांनी मिळालेल्या वैद्यकीय मदतीनंतर कापावा लागलेला पाय..  अशा वेळी बुद्धी 'एक पाय नाही तर काय' ? असा प्रश्न विचारात होती तर मन मात्र 'सो व्हॉट , दुसरा पाय आहे', हे ठणकावून सांगत होतं." When people doubted my ability to walk , I decided to fly... हे वाक्य आणि त्यांचा आत्मविश्वास , पराकोटीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप काही शिकवून गेला.

मेजर गौरव आणि त्याचे तीन जवान ... सियाचीन ग्लेशियर , १५००० फूट उंचीवर, बर्फात गाडल्या गेलेल्या चार जणांना शोधून  त्या चार डेड बॉडीज हेलिकॉप्टर मध्ये ठेवायला हवामान आणि जागेमुळे हातात असलेले फक्त चार सेकंद.. "आपले बडी त्यांच्या घरी पोहोचले पाहिजेत", या एकाच उद्देशाने जिथे स्वतःच वजन सांभाळणं अवघड असत , श्वास घ्यायला त्रास होतो, वजन उचलायला त्रास होतो  त्या ठिकाणी या चौघांनी मात्र हे मिशन फत्ते केलं. त्या पांढऱ्याशुभ्र बर्फावर उभं राहून त्या पायलटच्या धाडसाला दाद देत आपल्या बडींना सॅल्यूट ठोकला ... " व्हेन गोइंग गेट्स टफ , द टफ गेट्स गोइंग "....

सैनिकाची ओळख करून देणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी अनुराधा प्रभुदेसाई यांनी त्यांच्या " तुमच्या उद्या साठी आपला आज देणारा सैनिक ", या पुस्तकात आपल्यासाठी लिहिल्या आहेत. आपल्यासारखाच तो हि कोणाचा तरी मुलगा, भाऊ , नवरा , बाबा असतो पण त्याआधी तो एक सैनिक असतो. आपल्यातील प्रत्येक जण सैनिक होऊ शकत नाही पण किमान एका शहीद वीराच्या आईवर " जिस देश पर मैने अपना बच्चा कुर्बान किया हें , ऊस देश से थोडा तो प्यार  करो ," म्हणण्याची वेळ आपण आणू नये .

"I only regret that I have but one life to lay down for my country ", या भावनेने काम करणाऱ्या या सैनिकांचं आपण काही देणं लागतो कि नाही ? याच उत्तर आपल्यालाच शोधायला हवं.






 

Saturday, August 19, 2017

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं, वोह शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब हें , बोले रे पपीहरा, मैने तेरे लिये हि सात रंग के सपने चुने, आपकी आँखो में कुछ मेहेके हुए से राज हें , छोटीसी कहानी से बारिशों के पानी से , ए जिंदगी गले लगा ले , दिल ढुंढता हे फिर वही फुरसत के रात दिन .... एका मागून एक आवडती गाणी लागत होती . 'थांब , हे  गाणं संपल्यावर जावू झोपायला' , 'अरे हे पण मस्त आहे' , 'आहा .. माझ फेवरेट गाण आहे हे' .. असं म्हणत प्रत्येक गाणं ऐकत गेले आणि रात्रीचे १० ते १२ असे दोन तास कसे गेले ते काही समजलं नाही. निमित्त होतं गुलजार यांच्या वाढदिवसाचं. काल ऑफिसला जाताना गाडीत रेडिओ वर, ऑफिस मध्ये काम करतांना कॉम्पुटरवर, घरी आल्यावर मोबाइल वर तर रात्री टी. व्ही.वर त्यांचीच गाणी सोबत होती; तरी अजून समाधान मात्र झालं नव्हतं.

गाणी ऐकायची माझी आवड तशी जुनीच. कॉलेज मध्ये असतांना हि आवड वेडेपणात परिवर्तित झाली होती. किशोरजी,लताजी, आशाजी, रफी साहेब , हेमंतकुमार , भूपेंद्र अशा गायकांच खूप छान collection होतं माझ्याकडे. तसंच आरडींच्या गाण्याची खुप ओढ असायची, अजूनही आहे. का ते माहित नाही पण संगीतकार म्हणून त्यांची गाणी मुद्दाम जेवढी ऐकली तेवढी कदाचित दुसऱ्या कोणत्याही संगीतकाराची आवर्जून जमा करून नाही ऐकली. पण जेंव्हा खऱ्या अर्थाने शब्द समजायला लागले, अर्थ आतवर पोचू लागले, बोचू लागले तेव्हा मात्र 'कोणी लिहिलंय हे गाणं' असे प्रश्न हि पडू लागले. 

मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचं कि कसं काय बरं त्या नायक आणि नायिकेच्या मनातलं जसंच्या तसं  गीतकारांना शब्दांत मांडता येतं ? नायिकेचे भाव शब्दात उतरवणं किती अवघड ? अनुभव घेऊन ती आर्तता शब्दात उतरवणं हे एक वेळ समजू शकतो पण एका स्त्रीच मन , भावना समजून  त्याच ताकतीने कागदावर उतरवणं किती अवघड असेल एका गीतकारासाठी ? आपण तर या बाबतीत किती श्रीमंत आणि नशीबवान आहोत कि साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, इंदिवर, आनंद बक्षी , हसरत जयपुरी, अंजान , शैलेंद्र , शकील बदायुनी, जावेद अख्तर आणि गुलजार असे कितीतरी गीतकार आपल्या सिनेसृष्टीला लाभले.

मध्यंतरी कौशल इनामदार यांनी 'कलागुज' हि कार्यशाळा घेतली होती पुण्यात, 'गाणं कसं ऐकायचं' यावर ..  श्रोते ते रसिक श्रोते हा एक प्रवास घडवला त्यांनी. सलग आठ तास कौशलजींना ऐकतांना त्यांनी शिकवलेल्या अनेक बारकाव्यांमुळे गाणी ऐकण्याची एक नवी दृष्टी / कान मिळाले. अमरप्रेम पासून अलीकडच्या बालगंधर्व पर्यंतचा तो सांगीतिक प्रवास खरंच संपूच नये असा होता.

त्या नंतर परत एकदा आवडणारी हि सर्व गाणी ऐकतांना खूप मजा आली, त्याच जुन्या गाण्यांशी नव्याने ओळख झाली जणू...

कोणता गीतकार आवडतो , असं जर कोणी विचारलं तर एक नाव सांगणं किती अवघड आहे पण तरीही ज्याच्या शब्दांची जादू नेहमीच भावली ते गीतकार म्हणजे गुलजारजी.

आपण नेहमी जी गाणी ऐकतो ती आपल्या favourite playlist मध्ये नेहमी तयार असतात. आर डी आणि गुलजार हे संपूर्ण कॉम्बिनेशनच माझ्या या लिस्ट मध्ये आहे . इजाजत, घर, मासूम, आंधी, खुशबू, गोलमाल, परिचय, किनारा यातील गाणी कितीही वेळा ऐकली तरी परत परत ऐकावीशी वाटतात, हृदयाला स्पर्शून जातात यांतच त्याची जादू आहे.

प्रियकराला भेटण्यासाठी निघालेली त्यांची नायिका 'मोरा गोरा रंग लैले , मोहें शाम रंग दैदे ', म्हणते तर कधी  'बाहो में चले आओ ', म्हणत त्याची वाट अडवते. प्रेमात पडल्यावर "तुम आ गए हो , नूर आ गया हें" म्हणते तर कधी त्याची वाट पाहतांना ' ना, जिया लागे ना , तेरे बिना मेरा कहीं जिया sss लागेना ' म्हणते. तो समोर असला कि "आपकी बातों में फिर कोई शरारत तों नही,बेवजह तारीफ करना आपकी आदत तो नहीं", म्हणत त्याच्या डोळ्यातील भाव वाचते. " तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं" म्हणत " काश ऐसा हो.. असं स्वप्न सुद्धा पाहते. "कतरा कतरा मिलती हें.. जिंदगी हें..  बेहेने दो".. म्हणते तेंव्हा ते शब्द अगदी आरपार जातात. ११६ चांद कि राते आठवून "मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हें, सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हें "म्हणते तेव्हा ती पतझड , ते 'मेरा वो सामान लौटा दो' असं आर्जव खूप लागतं , खोलवर.  त्याच्या विरहात ,' दो नैनो में आसूं भरे हेंsss  निंदिया कैसे समाए," असं म्हणून "जिंदगी तो काटी ये रात कट जाए " या शब्दांत तिची तगमग व्यक्त करते. प्रत्येक वेळी एका वेगळ्या रूपात ती भेटतच राहते.

त्यांच्या या सर्वच गाण्यांमधील नायिका खूप जवळच्या वाटतात. त्यांचे भाव जणू कागदावर उतरावेत अशा ओळी गुलजार साहेबांनी लिहिल्या आहेत. मी एकदा वाचलं होतं ,गुलजार जी म्हणायचे कि "चाल लावून गीत तयार होत नाही तर स्वतःच्या शब्दांत त्याला भिजवावं लागत, त्यातील आर्तता समजून घ्यावी लागते , जगावी लागते."

त्यांनी गाणी लिहिली, कविता लिहिल्या, चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिले पण तरीही या सर्वांत एक गीतकार म्हणून ते जास्त भावले हे नक्की. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा गुलजारजी !!

Saturday, August 5, 2017


शाळेत असताना गणित विषय
फारसा कधीच आवडला नाही
भीतीच होती ती बहुदा
पण काही केल्या झेपला नाही
तरीसुद्धा, आयुष्यातील अवघड गणितं
क्लिष्ट असूनही सोडवता येतात
गुणाकार भागाकार वजाबाकी करता करता
माणसं हळूहळू जोडता येतांत

मैत्रीला चॉईस असतो पण नातलगांचं काय ?
लग्नाआधी आणि लग्नानंतर
नशिब असेल तसे मिळतात
कधी किचकट गणितासारखे
आपल्यालाच दमवतात
प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळतच असं नाही
अनुत्तरित म्ह्णून काही
तसेच सोडावे लागतात

मैत्रीच गणित बाकी सगळ्यात सोपं असतं
मानपानाचं नाटकss उगा इथे नसतं
हवं तेव्हा चिडावं हवं तस रागवावं
परत फिरून थोडं कट्टी बट्टीत रमावं
जन्मसिद्ध हक्क असल्यासारखं
हक्क गाजवत वागावं
जीभेला हाड नसतच, वाटेल ते बोलावं
चाळीशी आली म्हणून काय झालं 
तरी वेडयासारखं वागावं
'ए .. तुला उशीर का झाला ' म्हणत
उगीच तिला पिडावं आणि
लाजताना पाहून तिला फिदीफिदी हसावं

मैत्रीच्या या गणितात कौतुक असतं मनापासून
दाद असते अगदी दिलखुलास
जे काही आहे ते फक्त ओठांवर असतं
आत एक बाहेर एक, असं काहीच नसतं
वजाबाकी आयुष्यातील इथेच share होते 
मनांतल बोलायला जागा तशी हि एकच असते
कधी आईचे लाडू आठवले कि हळूच एक डबा येतो
"अग कालच केले म्हणून पाठवले"
असा गोड निरोप येतो... 
आवाजातून मनातलं आणि चेहऱ्यावरून हृदयातल
ओळखायचं  calculation
इथे स्ट्रॉंग असतं
गणित कितीही कच्च असू द्या ,
इथे मात्र पक्क असतं , इथे मात्र पक्क असतं .....



 

पूर्व पुण्याई

माझ्या भावाला, केदारला चौथी आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली होती. कालच माझ्या मुलानी, कांतेयनी त्याच्या मामाला दोन्ही परीक्षांच्या गुण पत्रिका दाखवायला लावल्या कारण मामा पेक्षा आपल्याला मार्क जास्त मिळाले कि कमी हे त्याला पाहायचं होत. १९८८ आणि १९९१ सालातील त्या गुणपत्रिका पाहून खरंच खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

केदारचे कोणते मित्र परीक्षेला बसले होते, कोणाकोणाला स्कॉलरशिप मिळाली यावर गप्पा झाल्या. शाळा सुटल्यावर शाळेत होणारा स्कॉलरशिपचा तास, सौ. देशपांडे आणि सौ.वैद्य बाईंनी घेतलेली मेहनत, क्लास सुटेपर्यंत बाहेर सर्व आयांची जमलेली मैफिल आणि याच मैफिलीने आईला दिलेली तीची जिवलग मैत्रीण, सारं काही आठवलं.

जून महिन्यात शाळा सुरु झाली कि स्कॉलरशिपचा निकाल यायचा. शाळेतील मुख्य प्रवेश द्वाराजवळील काळ्या फळ्यावर अतिशय सुरेख अक्षरांत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं जायचं, ' स्कॉलरशिप मिळालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  हार्दिक  अभिनंदन !!' आणि त्याखाली लिहिलेली असायची यशस्वी मुलांची नावं. त्यामधे केदारच नाव वाचायला खूप मजा यायची, भारी वाटायचं.

आजही शाळेत त्या वेळी स्कॉलरशिप मिळालेल्या मुलांची नावं त्या काळच्या पद्धतीप्रमाणे लाकडी नोटीस बोर्डवर अजूनही रंगवलेली आहेत. आजही मी जेंव्हा जेंव्हा शाळेत जाते तेव्हा आवर्जून तो बोर्ड आणि त्यावरील नावं नक्की पहाते.

स्कॉलरशिपच्या दोन्ही परीक्षेला मी बसले नव्हते. पण कांतेयमुळे मला चौथी आणि आठवी दोन्ही वर्षी हा अनुभव खूप जवळून घेता आला. तो चौथीत गेल्यावर माझी आई नेहमी त्याला सांगायची स्कॉलरशिपला बस , खूप उपयोग होतो त्या परीक्षेचा, नाही मिळाली स्कॉलरशिप तरी चालेल पण परीक्षा दे .. माझ्यापेक्षा आजीचं प्रोत्साहन तसूभर जास्त होतं त्याला.

परीक्षा द्यायची ठरलं तेव्हा क्लास कोणता लावायचा हा प्रश्न होता. मी शाळेत असतांना ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने शिकायला मिळालं त्या सौ. देव बाई व सौ. कानडे बाई यांची बरेचदा आठवण यायची. त्याच वेळी माझी ओळख सौ दामले बाईंशी झाली. अतिशय प्रभावी, शिस्तप्रिय, कडक आणि आदरयुक्त भीती वाटेल असं व्यक्तिमत्व. त्या घरीच स्कॉलरशिप चे क्लास घेतं असत. 'हॉलमध्ये पंचवीस मुलं बसतात, शेवटचा बसला कि प्रवेश संपला', इतकी सोपी क्लास मधे प्रवेश घेण्याची त्यांची व्याख्या होती. स्कॉलरशिप च्या अभ्यासाची गोडी खऱ्या अर्थाने त्यांनीच लावली त्यामुळे सातवीत असतांना स्कॉलरशिप परीक्षा रद्द होऊनही वर्षभर कांतेय त्यांच्याकडे क्लासला जात होता.

पुढे स्कॉलरशिपची परीक्षा सातवीत न घेता आठवीत घेतली जाईल हा बदल झाला. तेव्हा दामले बाईंची तब्येत ठीक नसल्याने परत क्लासची शोधा शोध ..  माझी मैत्रीण कल्पनाने सौ. दांडेकर बाईंचा नंबर दिला. ती म्हणाली, "तू एकदा भेटून ये मग बोलू". मी खरं तर माझ्या देव बाई आणि कानडे बाई शोधायचे प्रत्येक शिक्षकामध्ये आणि दामले बाईंना भेटून मला माझ्याच बाई परत मिळाल्याचा आनंद झाला.

आई म्हणून आपण आपल्या मुलाला खूप छान ओळखतो, त्याची कुवत जाणतो. तो कुठे कमी पडतो हे सुद्धा आपल्याला ठाऊक असतं. ते मोकळेपणाने बाईंना सांगता यायला हवं. आई म्हणून वाटणारी काळजी, आपण आपल्या मुलाच्या अभ्यासात त्याला काय मदत करू शकतो याबद्दल उघडपणे बोलता यायला हवं."हि मुलं अशीच वागतात का हो ?", हा प्रश्न सुद्धा सहजपणे विचारता यायला हवा, असं मला नेहमी वाटायचं. हाच मोकळा  संवाद आमच्यात अतिशय छान जुळून आला.

क्लास सुटल्यावर कांतेयला आणायला गेलं कि इमारतीखाली क्लास मधील सर्व मुलांबरोबर गप्पा  मारणाऱ्या  दामले बाई दिसायच्या. सर्व मुलं जाईपर्यंत त्या स्वतः खाली थांबायच्या. एकटी जाणारी मुलं समोरचा रस्ता नीट ओलांडतायेत कि नाही यावर त्यांच लक्ष असायचं. कधी आई किंवा बाबाला यायला उशीर झाला तर त्या मुलाला एकट थांबायला लागू नये म्हणून त्याच्या सोबत त्याही थांबायच्या. मग अधून मधून त्यांच्याशी बोलणं व्हायचं. अभ्यासात कोठे कमी पडतोय, कशाची प्रॅक्टिस अजून करायला हवी अशी चर्चा व्हायची.आईच्या भूमिकेत असतांना मुलांची निरागसता एन्जॉय करता आली पाहिजे याबतीत त्या खूप आग्रही असायच्या. "अगं त्याचा धांदरटपणा , त्याच्या चेहऱ्यावरचे मिस्कील हसू एन्जॉय कर', असं हक्कानं फक्त त्यांनींच मला सांगितल आणि शिकवलं. मुलांच्या कलान घेतं, जिथे गरज आहे तिथे कान ओढून, समजावून, कौतुक करून, त्यांनी मुलांमध्ये अभ्यासाबरोबर अनेक चांगल्या गोष्टी रुजवल्या.

परीक्षेच्या आधी एक/ दोन आठवडे पेपर सोडवण्यावर भर द्यायचा कारण जितका सराव करू तितक चांगलं हा कानमंत्र त्यांनी मुलांना दिला. पण अडलेल्या प्रश्नांचं काय ? यावर मुलं आणि दामले बाईंनी एक युक्ती काढली. जाण्या येण्याचा वेळ वाचावा आणि प्रश्नांचं समाधान सुद्धा व्हावं म्हणून व्हाट्सअँप चा एक ग्रुप काढला. रोज संध्याकाळी अडलेले प्रश्न ग्रुप वर टाकायचे , बाकी मुलांनी ते सोडवायचा प्रयत्न करायचा आणि जमलं नाही तर बाईंनी सांगायचं इतकं सोपं होतं सारं. रोज संध्याकाळी काही ठराविक वेळ अभ्यासाचा क्लास हा असा भरायचा. आई बाबा ऑफिस मधून घरी आले कि त्यांच्या मोबाईलचा मुलांनी केलेला हा वापर अतिशय सुखावह होता !

दामले बाईंनी मुलांना फक्त अभ्यासच शिकवला नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन चांगले संस्कार सुद्धा केले.  संध्याकाळच्या दोन तासाच्या क्लासच्या वेळांत पाच मिनिटांची सुटी असतांना तिन्हीसांजेला घरी म्हणतो तशी  शुभंकरोती म्हणणारी मुलं, मी फक्त याच क्लास मध्ये पाहिली. शिकवतांना शिक्षक म्हणून, संस्कार करतांना कधी आजी तर कधी आईच रूप घेऊन दामले बाईंनी मुलांना घडवलं म्हणण्यापेक्षा तयार केलं. मोबाईल हे माध्यम कशाप्रकारे वापरता येऊ शकतं हे अनुभवातून दाखवलं.

आजकाल दुर्मिळ होत चाललेले सौ दामले बाईंसारखे शिक्षक गवसले कि पूर्वपुण्याई वरचा विश्वास अजूनच ठाम होत जातो, हे मात्र नक्की !


- कविता सहस्रबुद्धे
श्रावण महिना पावसाचा .. श्रावण म्हणजे सणवार , व्रत वैकल्य.. या महिन्यात येणाऱ्या सोमवार, मंगळवार, शुक्रवार व शनिवार अशा प्रत्येक दिवसाच आपल अस एक खास वैशिष्ट्य आहेत. श्रावणात ऊन पावसाचा जसा खेळ चालतो तास काही आठवणींचा खेळ मनांत रंगतो.

लहानपणापासून प्रत्येक श्रावणात आईला काही ठरविक गोष्टी करतांना वर्षानुवर्षं पाहिलं होतं. श्रावण महिना सुरु झाला कि हिरव्या बांगड्या भरायच्या, घरी आलेल्या सुवासिनीची ओटी भरायची, रोज देवळांत जायचं, दुर्वा आघाडा यांचा हार जिवतीच्या फोटोला घालायचा, असे काही नेम तिने स्वतःसाठी बनवले होते.

श्रावणातील एका सोमवारी कुलाचार म्हणून होणारा नैवेद्याचा खास स्वयंपाक हे आमच्यासाठी नेहमी एक आकर्षण असायचं. तसं श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आई आवर्जून काही पदार्थ नक्कीच करायची. कधी गव्हाची खीर तरी कधी बिरड्याची उसळ. चुरम्याचे लाडू, घारगे असं प्रत्येक सोमवारी काही न काही  ठरलेलं असायचं. बेल , आघाडा , तुळस, फुलं, दुर्वा  यांनी देवघर भरून जायचं. कित्येक वर्ष श्रावणी सोमवारी मंदिरात जाणं आणि संध्याकाळी उपवास सोडताना काहीतरी गोड पदार्थ करणं हा नियम तिने कधी मोडला नाही. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी पुरण केलं जायचं, मग नैवैद्य, आरती आणि शुक्रवारच औक्षण.

आईच्या मैत्रिणींचा एक बेत असायचा. प्रत्येक शुक्रवारी एकीकडे बाकी सगळ्या मैत्रिणींनी जेवायला जायचं. सौवाष्ण जेवण,हळदीकुंकू या निमित्ताने त्यांच छानस गेट टूगेदर व्हायच. आम्ही अगदी शाळेत असल्यापासून हा नेम कधीच चुकला नाही. श्रावण महिन्यात न चुकता कित्येक वर्ष अगदी असच घडत होत ....... जणू त्या महिन्याचं time table अगदी फिक्स होत.

पण आता हा श्रावण महिना तितकासा जवळचा वाटत नाही. मला माहीत असलेला, मी पाहिलेला  श्रावण कुठेतरी हरवलाय.

आई गेली आणि श्रावण महिन्यातील सारी मजाच संपली. तो जिवतीचा फोटो नाही, ते फुटाणे आणि दुधाचा नैवैद्य नाही, तिच्या हातची पुरणाची पोळी नाही, श्रावण महिन्यात आवर्जून ती भरायची ती ओटीही नाही, आणि शुक्रवारच ते औक्षण सुद्धा नाही... काय गमावलय याची जाणीव हा श्रावण मात्र दररोज करून देत राहतो.. 
मोहम्मद रफी

माझी पहिली ओळख या व्यक्तीमत्वाशी झाली जेव्हा मला ते कोण हे हि माहित नव्हतं इतकी लहान होते मी. माझ्या आत्याच्या घरी एका भिंतीवर त्यांचा एक खूप छान फोटो होता. तो फोटो पाहून ते कुणीतरी खूप मोठे आहेत एवढच काय ते समजल होत त्या वेळी. पण ते नक्की किती मोठे आहेत हे कळायला खूप वेळ जावा लागला, ते वय यावं लागलं. आधी गाण समजणं, त्यातला दर्द काळजाला भिडणं आणि आवाजातील आर्तता हृदयापर्यंत पोहोचण्याची समज एका वयानंतरच आली.

देवानंद आवडायचा त्यामुळे गाईड, हम दोनो या सिनेमांची पारायण केली होती अक्षरशः आणि या सिनेमातील गाण्यांनी तर वेड लावलं होत. वहिदाजी आणि देव साहेबांवरच 'तेरे मेरे सपने अब एक रंग हें , हो जहाँ भी ले जाए राहें हम संग हें'.. हे ऐकुन तर प्रेमात पडल्यावर भावना इतक्याच बोलक्या होतात असं वाटायचं.

'लाख मनाले दुनिया साथ न अब छुटेगा आके मेरे हातों में , अब साथ ना ये छुटेगा'..  हे ऐकून तर त्या आवाजाच्या प्रेमात पडावं इतका आश्वासक आणि रोमँटिक भाव त्या सीन मधेच नाही तर त्या आवाजातही होता.

"दिन ढल जाए हाए रात ना जाए, तू तो न आए तेरी याद सताये " या गाण्यात शैलेंद्रचे शब्द जणू जीव ओतून गायलेत रफी साहेब. कित्येक वेळा हे गाणं आजवर ऐकलंय आणि प्रत्येक वेळी डोळ्यांचे काठ मनसोक्त वाहीलेत...आंत कुठेतरी खोलवर पोहोचलेला तो दर्द आणि ती आर्तता.

'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया' हे गाणं लक्षात राहीलं ते त्यातील लायटरची धून व रफी साहेबांकरताच.
'अभी ना जावो छोडकर के दिलsss  अभी भरा नहीं ' हे ऐकतांना तर आपल्यासाठी कोणीतरी असंच गाणं म्हणावं असं वाटायचं. 'बागों में बहार हें, कलियों पे निखारे हें ', ' गुन गुना रहे हें भवरे खिल रहीं हें कली कली'  अशी गाणी ऐकतांना, आपणही प्रेमात पडाव एवढाच काय तो विचार यायचा.

"चौदहवी का चाँद हो या आफताब हो , जो भी हो तुम खुदा कि कसम लाजवाब हो ", असो किंवा ' मैने पुछा चाँद से के देखा हें कही, मेरे यार सा हसीन ?चाँद ने कहां , चांदनी कि कसम, नही..नही.. नही '... तसंच, 'तेरी बिंदिया
रे, आए हाए' किंवा 'झिलमिल सितारों का आंगन होगा ', " सौ साल पेहेले मुझे तुमसे प्यार था " .. या इतक्या गोड गाण्यांना आवाजाच्या जादूने सजवलय ते फक्त रफींनी.

"ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हें "या प्यासा मधील साहिरच्या शब्दांना रफीजींनी आपल्या अफाट जादूई आवाजाने चार चाँद लावलेत.

'मांग के साथ तुम्हारा मैने मांग लिया संसार ' म्हणताना दिलीपकुमार काय आवडलाय. 'अगर तुम भूला न दोगे सपने ये सच हि होंगे, हम तुम ...' हे गाणं असो किंवा 'तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल हें ', असो, एकदा ऐकून समाधान होतच नाही या गाण्यांचं. परत परत ऐकत राहावं ...

मध्यंतरी माझ्या वाचनात आल कि एकदा ओ. पी . नय्यर म्हणाले होते ,' मोहम्मद रफी ना होता तो ओ. पी. नय्यर ना होता.. काय भारी ना !! दोघांच्या दोस्तीला सलाम !!!

आयुष्यातील कित्येक क्षणांत, कितीतरी प्रसंगात या आवाजाची सोबत होती.. कित्येकदा डोळे मिटून बसले असतांना मागे त्याचा आवाज रेडिओवर होता....

हि गाणी सोबत असतांना प्रेमात पडलेल्या त्या जुन्या पिढीबरोबर आपल्याला सुद्धा हि गाणी ऐकायला मिळाली , enjoy करता आली म्हणून खरं तर आपणही नशिबवान आहोत.

रफी साहेबांची हि आवाजाची जादू अशीच सोबत राहो ....