Monday, December 15, 2014

' क्षण '

क्षण आठवती सारे, क्षण थांबवले काही 
क्षण ओसरले तरीही, क्षण मनात रुतले काही

क्षण मैत्रीचे सारे , क्षण प्रीतीचे काही 
क्षण मायेचे हसले, क्षण भाग्याचे काही 

क्षण जगण्याचे सारे, क्षण हसण्याचे काही  
क्षण थांबले तरीही,  क्षण हरवले ते काही 

क्षण विसरले सारे, क्षण रुसले ते काही  
क्षण अश्रूंचे तरीही, क्षण दाटून आले काही 

क्षण यशाचे सारे, क्षण अपयशाचे काही
क्षण रंगांचे तरीही, क्षण स्वप्नांचे काही 

क्षण दोघांचे सारे, क्षण प्रेमाचे काही 
क्षण विरहाचे तरीही, क्षण सौख्याचे काही 

क्षण निसटले सारे, क्षण बरसले काही,
क्षणांत जगतां कळले क्षणांत संपले काही !!!

Friday, December 12, 2014

' एकटी '

का पुन्हा पून्हा खिडकीशी, 
मी उगा अशी घुटमळते 
हि सांज नभी सजतांना,
का आठवण तुझी हि येते … 

रंगांचा क्षितिजावरती, 
मग खेळ असा रंगतो 
पापण्यांत राहता राहता, 
एक अश्रू ढळून जातो … 

ती कोर नभी पाहतांना,
का मन हे वेडे झुरते 
आठवणीत हरवूनी तेव्हा,
मी अजून एकटी होते …. 

Thursday, December 11, 2014

'बोलायचे ते राहून गेले'

शब्दात मांडता मांडता का, 
शब्द माझे हरवून गेले 
तू असतां समोर तरीही,
बोलायचे ते राहून गेले … 

नाही उमजले तूला परी ते,  
डोळ्यात वेडे जे प्रेम होते 
मन मोकळे आज जरी हे, 
तेव्हा गुंतले तुझ्यात होते …. 

आठवणीत सजले सारे तरीही, 
तुझ्याविना ते 'अपूर्ण' होते 
ओठांवर होते मनातले तरी, 
बोलायचे ते राहून गेले , बोलायचे ते राहून गेले ……. 

Friday, November 7, 2014

'ती' एक आठवण …. 

आजही अवचित 'ती' येतें अन् घेऊन जाते मला, दूर…

जिथे असतात, शुभ्र निळसर लाटां, सळसळणारां तो वारां,

क्षितिजावर असतो सूर्यास्ताचां केशरी गहिरा रंग,

ती निळी शांतता, मनाची साद आणि तुझी चाहूल …. 


तुला पाहताचं मग शब्दही सोडतात साथ आणि सुरु होतो शब्दांशिवाय संवाद,

मनात खूप काही दाटून येतं अन् न बोलताच, तुला सर्व कळूनही जातं …. 

त्या नीरवं शांततेत मोकळे होतात हे श्वास,

अन् जितके जपले तितकेचं मोहरतात ते क्षणं … 


तेव्हा तू तसाच भासतोस … अगदी तसा, पूर्वीसारखाच,

चेहऱ्यावरून मनातील आणि रेंगाळण्य़ावरून हृदयातील अचूक वाचणारा,

मग तुझ्यासोबत ती शांतताही ओळखीची होते,

आणि परतीची वाट मात्र नकोशी होते …


काही क्षणांची का होईना पण आठवणींची हि सोबत, खूप हवीशी वाटते, 

या बंधनांच्या परिघाबाहेर फुलतां फुलतां,

ओळखीची वाटच मग अनोळखी होत जाते आणि तेव्हाच, 

ती ' आठवण  मला परत घेऊन येते,  कालच्या पानावरून आजच्या पानावर … 



'तुझ्याशिवाय जगणं ' 

मनानं अखेर स्वीकारलं, ते तुझ्याशिवाय जगणं,

अन् अलगत जमायला लागलं, हे एकट एकट राहणं … 


तरीही, अजून कधीतरी मन रेंगाळतेच, जुन्या श्वासात हरवते ,

स्वप्नामधील गोष्ट आपली, स्वप्नामधेच रंगवते  … 


प्रेमाची आर्जवे सारी, या डोळ्यामधेच साठवते,

निखळता तारा काळ्या नभी, आजही तो पाहते … 


हातावरच्या रेषांमध्ये, अजूनी तूलाच शोधते,

मन वेडे आजही, का तुझ्याविना हे व्याकुळते …  

Wednesday, October 15, 2014

' रुसलेला पाऊस '

तूझ बरसण ओसरलं
पण या आठवणींचं काय,
माझा आसमंत,
अजूनही झाकोळलाय,
डोळ्यातील हा पाऊस
आज मुक्यानेच बरसलाय ….

ओंजळीत धरायला आज  
टपोरे ते थेंब नाहीत,
क्षितिजावर खुणावणारं
सतरंगी इंद्रधनू हि नाही,
ऋतूंच कुंपण तुझ्यासारखं,
खरच माझ्या पावसाला नाही …

कोसळणाऱ्या तुझ्यापेक्षा
हा जरा वेगळा आहे,
मोकळ तुझं आभाळ जरी
पण इथे सारं दाटलं आहे,
अजूनही माझा पाऊस
माझ्यावरती रुसला आहे …

Monday, October 13, 2014


'डॉ. प्रकाश बाबा आमटे, द रियल  हिरो' 

एक उत्कट हळवां अनुभव…

ज्यांच्या नावातच ' प्रकाश ' आहे , त्यांना पाहतानां ' आपण कोठे आहोत ', याची होणारी जाणीव बहुदा आपल्या प्रत्येकालाच परत शून्यावर नेवून ठेवते.

'आपल्याला नक्की काय हवयं ' किंवा ' आपण आयुष्यात नक्की काय करतोय ', अशा एक ना अनेक प्रश्नांनी अंतर्मुख करायला लावणारी हि एक वास्तव कलाकृती.

' माणुसकी ', 'त्याग ', 'समर्पण ', 'नि :स्वार्थता ', 'व्रत '  यासारख्या आपल्या ओळखीच्याच शब्दांचे इथे सापडलेले नवीन अर्थ, जे कदाचित आजवर आपण अनुभवलेच नाहीत …

' इतक्या विरक्तीने राहूनही एवढं श्रीमंत बनता येतं ', या विचाराने उध्वस्थ करणारी जाणीव …

प्रत्येक नातं  इतकं सुंदर जगता येतं …  एक मुलगा म्हणून, मित्र म्हणून, डॉक्टर म्हणून, नवरा म्हणून, वडील म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 'एक माणूस ' म्हणून …

हा ' प्रकाश ' इतका तेजस्वी आहे कि त्याची सावलीसुधा तितक्याचं खंबीरपणे, विश्वासाने, त्याला साथ देऊ शकली. चेहर् यावर नेहमीच ' मंद ' स्मित ठेवून काट्यातून चालतं , त्या रानांत रामाबरोबर सीतेसारखी राहू शकली आणि म्हणूनच आनंद कशात आहे , खरं तर 'आनंदच काय आहे ' याचं उत्तर फक्त तिलाच मिळालं …

४० वर्षांची हि इतकी निरागस सोबतं , कदाचित या नितळ प्रेमानेच हेमलकसा भरून पावलय …

हि स्वप्नवतं वाटणारी गोष्ट पाहत असतानां वाटतं , हि गोष्ट संपूच नये आणि ती संपते, अशा वळणावर जिथे आपण जागे होतो,
आतून …. या आतल्या अंधारातून त्याच्या प्रकाशात  !!!



Thursday, October 9, 2014

' रेशमी धुके धुके '

निळ्या नभी कोर हि आज का हासली, 

  हात तू हातात घेता रातराणी लाजली 

स्पर्श हा बावरा अन् हरवले भान हे,

  सभोवती दाटले रेशमी धुके धुके…

Monday, September 29, 2014

' घर '

सकाळची कोवळी किरण, खिडकीतून हळूच आत येतातं 
अन् लगबगीनं दिवसाची, नवी सुरवात करून देतात

प्रत्येक कोपरा अगदी ताजा, सजून एकदम तयार असतो
घरामध्ये शांततेचाच, फक्त एक आवाज असतो

लगबगीनं तयार होताच, ऑफीस मग खूणावत असतं 
जाता जाता वळून पाहिलं, तर घर मागे एकट असतं 

घरासोबत ठेवते तरी, मी जग माझं सोबतीला 
पण गंमत नाही आपल्याशिवाय, आपल्याच या घरट्याला 

जाई, जुई, मोगऱ्याने, संध्याकाळ मग दरवळून जाते 
दिवसभराची थकावट सारी, चहामध्ये विरघळून जाते 

डोळे मिटून क्षणभर थोडं, कधी मी स्वतःशीच बोलते 
याच चार भिंतींमध्ये, अगदी मनापासून रमते 

या घरालाही असतात ना, लहान सहान भावना 
त्यानेही पाहिलेलं असतं आपल्याला, यशापयशात भिजतांना 

प्रेमाचा संवाद आपला, घरच फक्त ऐकत असतं 
लुटूपुटूच्या भांडणातही, आपल्या सोबत तेच असतं 

पिलालाही आपल्या, घराची या ओढ असते 
याच उबेत जग त्याचे, इथे तिथे घुटमळत असते 

आकाशातील चंद्र तारे, इथे सुधा चमकत असतात 
आजी आजोबांचे सुरकुतले हात, मायेची सावली देत असतातं  

रफी, किशोर ऐकता ऐकता, मग आरामखुर्ची डोलत रहाते, 
तसाच डोळा लागतो अन् रात्र अलगत सरत जाते ……  





Friday, September 19, 2014



परत प्रेमात पडायचय

मनातल बोलता आलं नाही ,
म्हणून लिहिली कविता
कधी डोळ्यातील वाचल नाहीस,
म्हणून लिहिली कविता ...

माझ्या या कवितेत ,
तू कधी होतोस वारा
तर कधी पौर्णिमेचा चांदवा
मोरपंखी स्वप्नातला तू
कधी त्या बेधुंद पावसासारखा ...
मनाच्या गाभाऱ्यातला
एक अलवार तरंग,
तर कधी उमलत्या बहरामधलं
पहाटेच गुलाबी स्वप्नं ..

पण canvas ब्रश कॅमेऱ्यात
शब्दांची हि भाषा
तुला कधी कळलीच नाही,
आणि तुझ्या रंगांची जादू
मला तशी समजलीच नाही ...
घालमेल, हुरहूर, तगमग, ओढ
या शब्दांचे अर्थ जसे उमलत गेले
तसे अलवार मोरपंखी नाते
अजूनच खुलत गेले ....

आभाळभर पसरलेला काळोख
अन तो निळा समुद्र किनारा
मूठभर चांदणं घेऊन ,
त्या चित्रात रंग भरणारा तू ...
कदाचित तू ही, तेच सांगत होतास
शब्दांनी नाही तर रंगानी ...

उन्हं कलती झाल्यावर ,
त्या पिवळ्या जर्द रानफुलांत
थव्याथव्याने परतणाऱ्या
पाखरांच्या किलबिलाटात ,
त्या हिरव्याकंच रानांत
जणू तू मलाच शोधत होतास ...
कारण रंगांची भाषा ,
आता मलाही येऊ लागलीए...

असं वाटतंय ,
नव्यानं काही लिहावं ,
अन् त्या नव्या कवितेसाठी
परत प्रेमात पडाव .... तुझ्याच !!!
 
  

Wednesday, September 17, 2014

' मनात राहता राहता
   जणू शब्दच विसरलेत भाषा
     तरी अश्रूंनी नाही मोडली
       ती पापण्यांची अलगत मर्यादा …'

Sunday, September 14, 2014

               ' तू …एक सोबत '

कधी नि:शब्द , कधी हळवी
डोळ्यातून बोलणारी , सहवासात खुलणारी
मनाला सांधणारी ,
बरोबर चालणारी.. दूर क्षितिजापर्यंत
तू …एक सोबत


कधी चांदण्यात हरवणारी,
तर कधी पावसात बरसणारी,
कधी सावलीसारखी भासणारी,
अन् कधी नात्यांच्या पलीकडची
तू …एक सोबत


आयुष्याच्या अनेक रंगात रंगणारी,
कधी समजावणारी,
अन् कधी सावरणारी,
'नि:स्वार्थ' शब्दात सामावणारी
तू …एक सोबत


तिन्ही सांजा ओढ लावणारी,
रितेपण संपवणारी,
अगदी हवीहवीशी वाटणारी,
आयुष्यभराची तू … एक सोबत
अथ पासून इति पर्यंतची …तू एक सोबत !!!




Tuesday, August 19, 2014

' माहित नव्हतं स्वत:लाही 
     कधी स्वत:शीच बोलायचं असतं 
  मनात रुतलेलं  मनामधून 
     अगदी हळूवार काढायच असतं …… '

Saturday, August 16, 2014


        ' पाऊस '

पाऊस,
कधी श्रावणातील उन्हांत,
सर्व पानांत अन् फुलांत
कधी त्या बेधुंद सरींत,
जणू तूझाच आभास

पाऊस,
कधी तुझ्याच सोबतीत,
फक्त आपलाच …
कधी प्रेमाचा तर कधी हळवां,
रोमरोमांत, डोंगरवनांत

पाऊस,
कधी तुझ्याच आठवणीत,
दूर स्वप्नांच्या गावांत
कधी व्याकूळ विरहांत,
बरसे मनसोक्त डोळ्यांत

पाऊस,
कधी तुझ्या अंगणात,
त्या नि:शब्द सरत्या रात्रींत
दिसे अगदी शांत नितांत, 
भासे जणू  मौनातील साद  !!!

Friday, August 8, 2014

' विरह '

सावळया मेघास बिलगे
     आज फिरुनी रात नवी
आठवांची सोडवू  दे
     अलगत वेडी हि मीठी 

बरसती या चिंब धारा 
     विरहात जागे स्वप्न हें 
अवखळ अल्लड मन वेडे हे 
     फिरुनी धावे तुझ्याकडे 

काहूर दाटे अंतरी परी 
     शांत सारी अशांतता 
मनात राही मनातले अन्
     अश्रूंत भिजती पापण्या …… 
' पानगळ '

मळभ आले दाटूनी 
  अन् मन झाले बावरे 
    फुललेच क्षण ते सारखे  
      पानगळ ना पाहिली …
' रात्र '

सरत आलेली रात्र फक्त एक माझी असते 
बाकी उरल्या वेळेवर तूझीच वेडी आठवण असते 

Sunday, August 3, 2014

     ' निशिगंध '

सांजवेळी आठवांचा 
     निशिगंध सारा बहरून जातो 
अन् क्षण क्षण नव्याने
     मी परत तुझ्या प्रेमात पडतो ….   

Monday, July 28, 2014

' आठवण '

आभाळ बरसताना तूला पाहणं 
जूनीचं एक सवय आहें 
तू नसलास तरीही 
सोबत तूझी आठवण आहें …… 
            
            ' साक्ष '

आसवांना नसे किनारा,
          वादळी आवेग हां 
निरोप देतां त्या क्षणांना,
          सुकून गेली आर्तता 

वाट आपली वेगळी हि,

          डोळ्यांत गहिरी ओढं का 
अलगत सूटती सर्व धागे,
         नि:शब्द साऱ्या भावना 

चांदण्या या साथ देती,

         आठवणींच्या रातीला
पौर्णिमा आलीच नाही,
         आकाश आहे साक्षीला …. 

Monday, July 21, 2014

      ' शाळेतील वयं '

बालपणीच्या आठवणी,
   काही केल्या जात नाहींत
चाळीशीत येऊन पोचलो,
   हें अजूनही पटत नाहीं 

त्या रस्त्यावरून जातांना, 
   अजूनही शाळा दिसते 
तेव्हा मात्र मन नकळत,
   परत मागे जाऊन पोहचते 

इतक्या वर्षांनंतरही आठवणी, 
   साथ मात्र सोडत नाहीत 
शाळा सुटली तरीहि का,  
   मोठ होता येत नाही ?

ऑफिसची ए. सी. गाडी, 
   खिडकीत बसून मजा नाही 
शाळेच्या आपल्या रिक्षाची, 
   तसूभरही सर नाही 

वर्गातील आपल्या बेंच ची,
   खूर्चीला या मजा नाही 
ऑफिस मधल्या केबिनला,
   वर्गाची ती ऊब नाही ……. 

आयुष्य इतकं छान 
   इथवर चालत पूढे आलं 
झाल गेलं ते सर्व काही 
   मनामध्ये दाटून आलं 

पंचवीशी चाळीशी पेक्षा 
   शाळेतलचं वय छान होतं 
'निरागस' शब्दामधेच  
   जग सारं संपत होतं ……. 

Thursday, July 17, 2014

                   ' अल्लड पाऊस '

आसमंत चिंब ओले, अल्लड वाहे वारा 
              मुक्तपणे बरसतो, गर्द मेघांचा हा थवा 

अशावेळी आज वाटे, दोघे पावसात जाऊ 
             आनंदाचे चार थेंब, हळूवार झेलू 

ओली हिरवी पायवाट, बरोबर चालू 
            कोसळणाऱ्या त्याच्यासवे, आपणही गाऊ 

निथळणारी झाडंवेली, चिंब पक्षी पाहू 
            आडोशाला उभे राहून, हात हाती घेऊ 

झाडावरच्या घरट्यात, ऊब नवी पाहू 
            पिलासाठी आपणंही, असे वेडे होवू 

क्षण सारे ओंजळीत, साठवून घेऊ 
             पावसात दोघे जण,परतून येऊ …… 

Wednesday, July 16, 2014


     ' दोन थेंब '

गालावर रेंगाळले  
        दोन थेंब जरी 
अश्रुंचे हे बरसणे 
        जणू हळूवार सरी 

मनामध्ये आठवांची 
        आज होई दाटी 
गर्द काळ्या ढगांची का
         उगा वाटे भीती … 

Monday, June 30, 2014


       " सांजवेळ "

रेंगाळती आठवणी या,
     सांजवेळ सोबती
बरसतो मल्हार वेडा,
     ओढ लागे आतूनी

बावरेसे चांदणे अन्
      निशिगंध दारी हासला
हळूवार होता भास वेडा,  
      लाजती या पापण्या  !!!

Monday, May 5, 2014

   

    ' काहीतरी हरवलंय '

     खरचं काय हरवलंय 
          माझं  मलाच कळत नाही 
     खूप शोधलं तरी 
          काहीसूद्धा मिळत नाही 

     मनातील हुरहूर आता
          मनामध्ये मावत नाही 
     आठवणीतला तू मात्रं 
          समोर काही येत नाहीं 
     पौर्णिमेचा चंद्र खरा, की 
          मनात दाटलेला काळोख 
     काही केल्या प्रश्नाचे या 
          उत्तर अजून मिळत नाही 
     खरचं काय हरवलंय 
          माझं  मलाच कळत नाही 

     पाऊसं ऐकता ऐकता 
          काळीज वेड भरून येत 
     कुण्याकाळचं पाणी 
          अलगत आज डोळ्यात येतं 
     पहिल्या पावसाची पहिली आठवण 
          मनामधून जात नाही 
     खूप शोधलं तरी 
          काहीसूद्धा मिळत नाही 
     मी मलाच हरवलय 
           हे माझ मलाच कळत नाही …. 
     

Monday, April 7, 2014

                    "  शताब्दीपदार्पण  "

काकूआजीचं शताब्दीपदार्पण हा क्षण आगळा वेगळां
    हळव्या क्षणांनी सजला कौतुकाचा हा सोहळां 

म्हणतात, प्रत्येक क्षणातं काहीतरी आपल असतं
    तिचं निखळ हसू जणू हेच दाखवत असतं

मळभ आल्यावरचा एकटेपणा पावसात अगदी वाहून जातो
    उत्साह तिचा अगदी या पावसासारखा भासतों 

दारातला प्राजक्त दिमाखात फूलतो, नित्य नियमित हसतों 
    जणू तिचाच आत्मविश्वास दररोज तो पाहत असतो

सूकलेल्या झाडाला पालवीसाठी चैत्राची वाट पहावी लागतें 
    ठेंच लागल्यावर तिच्या हाताची ऊब जणू हेच सांगत असतें 

आकाशातल्या चांदण्यांनी रात्र नेहमी छान सजतें
    अमावस्या पौर्णिमा याची तिला भीती नसतें 

दोन दिवसांमधला दूवां म्हणजे हि रात्र असतें 
    नात्यांना एकत्र बांधणाऱ्या तूलाच जणू पहात असतें 

शिंपल्यालाच मोत्याची खरी पारख असतें 
    कारण त्यांची तशीही जूनीच ओळख असतें 

तुझ्या आठवणींची गोष्ट काहीशी अशीच भासते
    त्यांची सोबत तूला नेहमीच हवीशी वाटतें 

शिशिरातली शांतता वसंतातले रंग
    ग्रीष्मातला दाहं अनं श्रावणातील हिरवळं

ऋतूंप्रमाणे निसर्ग नेहमीच स्वत:ला बदलत असतो
    वाटतं, खरचं तूला पाहून आजही तों शिकत असतों  !!!


Saturday, April 5, 2014

सौ. आई व श्री. दादा,
यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसाप्रित्यर्थ मी लिहिलेले चार शब्द … 

" सुवर्ण "  सोबतीचा हा सोहळा आहे अगदी खास 
     अन् प्रेमाची हि गोष्ट अधिकच खुलली आज 

कधी चांदण्यांची साक्ष तर कधी प्रीतीची पहाट 
     कधी वादळाची सोबत तर कधी रिमझिम निनाद 

चढ, उतार, डोंगरघाट अन कधी पाऊलवाट 
     सांर सारं होत इथवर चालतांना यांत 

यश, अपयश, आनंद, दु:ख , कधी त्याग तर कधी तडजोड 
    अन् कधी अबोला …. 

संसारात हे इंद्रधनुष्य नेहमीच सजल
     अन् सप्तरंगात समाधान कायमच हसलं 

आयुंष्यातील प्रत्येक नातं किती छांन जपलत 
     प्रत्येक मनांत आठवणींचं एक छानसं कोंदण केलत 

मुलांचा आनंद तुम्ही नेहमीच आपला मानलात 
    अन् अपयशात पाठीवर मायेचा हात ठेवलात 

पंचप्राण तुमचे नेहमीच नातवंडात राहतात 
    दूर आहेत मुले म्हणून डोळेही पाणावतात 

उत्साह तुमचा असाच ओसंडत राहू दे 
     साथ तुमची अशीच एकमेका राहू दे 

म्हणतात सात पाऊले चालून सात जन्मांची सोबत मिळते 
     अन् या सोबतीत आयुष्य असे छांन फूलते ………. 




                          ' रिती ओंजळ '

एका आयुष्यातून मुक्त झालों कि नवा एक जन्म मिळतो,
      अन् परत तोच जूना प्रवास अगदी पून्हा नव्याने घडतो

मूठीत वाटत अगदी पकडून ठेवू ते बालपण परत हरवून जातं,
      आणि आयुष्य पून्हा आपल्याला त्याच वळणावर आणून सोडतं

प्रेमाचा अर्थ समजेपर्यंत गुलाबी धुकं विरून जातं,
      पहाटेच स्वप्न पून्हा डोळ्यामधून वाहून जातं

एकट पडल्यावर परत जणू जूनाच एक धडा मिळतो,
      मुखवट्यांनमागे लपलेला चेहरा हळूच समोर येतो

कित्येक रात्री नशिबाला दोष देण्यात निघून जातात,
      डोळे मात्र अजूनही स्वप्न तिचं पहात असतात

कुठे काय चुकलं हे मनं अजूनही शोधत रहातं,
      दोन टिप पूसायांला वाटतं कोणी हवं असतं

चालतांना त्याच वाटेवर साथ परत नवी मिळते,
      बेधूंद होवून क्षण सारे परत नवी उमेद मिळते

सुखं दू :खाचा लपंडाव असाच खेळ मांडत रहातो,
      अलगत मागच्या पानावरून प्रवास पूढे चालत रहातो

आई वडिलांची स्वप्नं आता आपल्या डोळ्यात हसत असतात,
      त्याच जागेवर त्याच वाटेवर पावले आपली उभी असतात

इवली इवली सोबतं आतां आभाळाएवढी मोठी होते,
      तृप्त होवून जातां जातां ओंजळ मात्र रीती होते …….

Friday, April 4, 2014

'  मैत्री  '

मैत्री  म्हणजे काय …

मनातील ओढ कि अव्यक्त भावना 
  नजरेतला ओलावा अन डोळ्यातला विश्वास 
    कि , नात्यांच्या पलीकडचा अबोल किनारा 

पडल्यावर सावरणारा अंधारातला सोबती ,
  मनातील नि:शब्द आवाज कि आठवणींचा पाऊस 
    मैत्री म्हणजे काय खरंच सांगता येत नाही …… 

चालता चालता थकतो जीव तेव्हा निरागस आठवणी जागवते 
  आयुष्याच्या वळणावरती कुठे तरी हरवते 
    अंन मनातील पाऊलखुणा शेवटपर्यंत जागवते 
         कदाचित हीच मैत्री असते….  कदाचित हीच मैत्री असते… !!!

Friday, March 7, 2014

' आधार '

सुरात मी बद्ध  केले
   गीत ते समजून घे 
डोळ्यात माझ्या थांबले ते 
   भाव तू उमजून घे 

मी कळ्यांचे स्वप्न न्याले 
   भास ते सारे खरे 
उमलत्या स्वप्नास माझ्या 
    एक तू आधार दे  !
' मी '

शब्दांना माझ्या अर्थ तुझा आहे 
श्वास माझे अन गीत तुझे आहे 

स्पंदने हृदह्याची तुझ्या नावे रुजू आहेत 
ओठावरील हसणे अन आठवणी भेटींच्या आहेत 

जीवनाच्या कित्येक वाटा दिशा फक्त तुझी आहे 
तुझ्याशिवाय "मी" पणाला अर्थ बाकी शून्य आहे  !!

' बंध '

ना जाणिले कधी तू ,
मनात काय होते 
हे श्वास गुंतलेले,
प्रेमात तुझ्या होते 


हे नाते तुझे नि माझे, 
विरुनी धुक्यात गेले 
हे बंध रेशमाचे,
अबोल सांग का झाले  !!


' शब्दात आज सारे सांगायला हवे का '


शब्दात आज सारे  सांगायला हवे का,
    जपले मनात गाणे छेडायला हवे का…

भेटीतल्या क्षणांची झाली फुले सुगंधी,
   आज त्या कळ्यांनी उमलायला हवे का,
      शब्दात आज सारे सांगायला हवे का

सहवास अमृताचा भिजवी क्षणाक्षणाला,
   आषाढ मेघ आता बरसायला हवे का,
      शब्दात आज सारे सांगायला हवे का  !!
      
' फितूर झाली आर्जवे '


गुणगुणावे गीत नव्याने,
  थांब तू रे थांब ना
श्वास होती आज वेडे,
  स्पर्श तू हा ऐक ना…

सावरू दे जाणीवा अन,
  पुन्हा नव्याने गुंतणे
स्पंदने बेभान होता,
  फितूर झाली आर्जवे…

खेळ हा कालचा तरी,
  आज वाटे का नवा
हात माझा सोडूनी तू,
   आजही का एकटा  !!
' आठवण '

आठवण झाली कधी तर डोळे मिटून घ्यावेत,
    खूप मागे हरवले ते क्षण टिपून घ्यावेत…

आठवण झाली कधी तर पहाटवारा व्हावं,
    बेधुंद क्षणात गुंतून फक्त गात रहावं…

आठवण झाली कधी तर स्वप्नामधे यावं,
    हात हाती घेऊन फक्त चालत रहावं…

आठवण झाली कधी तर वाटे एक अश्रू व्हावं,
    अन डोळ्यातून वाहतांना थोड तुझ्यासोबत रहावं  … 

' आस '

आतूर आहे आज हि,
  गुंतण्यास जीव हा
    चांदणे टिपूर होतां,
      लाजल्या या जाणीवा !

चालणे हे एकटे अन्
  आस वेडी सोबती
     आज वाटे का नव्याने,
       परतून येशी तू कधी … 
' नशा '

धुंद वारा साद घाली
   अंतरी पडसाद हा,
सावळे हे मेघ येता
   आवेग वाटे का नवा… 

वादळाचा वेग घेई,
   अंतरीची भावना
पावसाचे गुज सांगे,
   थांब तू रे थांब ना… 

हा दुरावा संपला अन्
   स्पर्श होई बोलका,
आज वाटे का मनाला
   भास आहे हि नशा !!
' एकटी वाट ' 

पहाटवारा आजही,
तसाच आहे बेधुंद
पाकळीवरच्या दवामधे,
पाहतोय तुझ प्रतिबिंब 

आजही हि संध्याकाळ,
आहे अशीच सजलेली 
रातराणीच्या स्पर्शात,
चांदण्यांनी बहरलेली 

आजही ही वाट,
आहे एकटीच थकलेली 
तुला शोधता शोधता,
स्वतः च हरवलेली  !!


' तू '

आभास होता चांदण्यांचा,
भास तुझे सारे खरे
तू नसता आजही,
भास अगतिक बोलके …

हातात आहे आज हि,
सोडलेला हात तू
स्वप्नांच्या गावामध्ये,
भेटलेला एक तू   !!

वेडी सांज 

बेहोष वारा थांब सांगे सांज हि वेडावली,
   आर्जवी तो मेघ आता आस वेडी जागली…

चांदण्यांनी रात सजली रातराणी साक्षीला,
   त्या क्षणांना वेचताना स्पंदने का लाजली …

डोळ्यात वेड्या थांबले अन शब्द सांरे गोठले
   भावनांचा स्पर्श होता अश्रूंत सांरे सांडले !!
रात्र अजूनी एकटी 

तीच रात तोच चंद्र
       तेच चांदणे नभी 
तेच गीत तेच शब्द
       सूर तेच आजही

तोच स्पर्श तोच भास
       रातराणी बहरली 
तीच प्रीत तीच वाट
       रात्र अजूनी एकटी   !!

चुकलेली वाट  


गर्द राई
  स्पर्श खुले
    सांज निळी
      वाट चुके

साथ हि
  आज हि
    पावलांनी
      चालते

शांत या
  स्वप्नात वेड्या
     गुज फक्त
        आपले …