Sunday, April 16, 2023

 वेलकम होम 


काही चित्रपट स्वतःशी संवाद साधायला लावतात, हा त्याच पठडीतला. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या जोडीची एक खास कलाकृती. चित्रपटाची कथा, संवाद सुमित्रा भावे यांचे. ज्याने त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे अर्थ काढावा, बोध घ्यावा असा हा चित्रपट. लग्न, कुटुंबसंस्था, नातेसंबंध आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं स्वतःच घर या संकल्पनेबद्दल केलेलं भाष्य आहे यांत. इवल्याशा कॅनव्हास वर केवढं तरी मोठ्ठं लोभस चित्र रेखाटणारा हा चित्रपट, नात्यांमधली उब हळुवार उलगडून दाखवत शेवटी नात्यांबद्दल आश्वस्त करतो. 

विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉक्टर सौदामिनीची गोष्ट आहे यात. नवऱ्याकडून 'स्पष्ट संवाद' आणि 'पारदर्शी विश्वास' इतकीच अपेक्षा असणारी ती. दिवस इथे संपला आणि रात्र इथे सुरु झाली तो क्षण जसा सापडत नाही तसंच ते नातं कुठवर होतं आणि कुठून पुढे ते अस्पष्ट व्हायला लागलं हे तिलाही समजत नाही. शेवटी तुटत तुटत आलेला तो घागा ती एका क्षणी कापून टाकते, त्याला तसं हवं होतं म्हणून .. मग आयुष्याच्या याच वळणावर तिला प्रश्न पडतो आपलं नेमकं घर कोणतं? लग्नानंतर माहेर आपलं घर असतं की नवऱ्याचं घर हेच आपले घर? की यापैकी कोणतंच घर आपलं नाही .. मग अशा परिस्थितीत जिद्दीने स्वतःचा शोध घेऊ पाहणारं तिचं मन, सोबत येणारी आव्हानं व ती पेलू शकू हा हळूहळू निर्माण होणारा विश्वास व तिचा तिच्या घराचा शोध.. या सर्व प्रवासाची गोष्ट म्हणजे वेलकम होम !

यात 'घर' एक सारखं भेटत राहतं, कधी 'अतिक्रमणाची माणसं आलीत घर पाडायला म्हणून आई नाही येणार कामाला', या कामवाल्या मावशींच्या मुलीच्या निरोपात, तर कधी रेडिओवरच्या 'मै तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे'.. या ओळींमधून. सौदामिनीच्या आईला एका प्रसंगी तिच्या आईचे शब्द आठवतात,'सणासुदीला माहेरी येणं वेगळं आणि भांडून माघारी येणं वेगळं' इथेही तिला तिच्या घराची ओळख करून दिली जाते. सौदामिनीच्या आजीचा तिच्या स्वतःच्या खोलीसाठीचा संघर्ष व तिच्या नावावर कधीच कुठलं घर नसल्याची खंत मधूनच डोकावते. वडिलोपार्जित घराचे तुकडे विकण्याच्या तयारीत असलेली मावशी दिसते.चाळीशी आली पण अजून सगळा गोंधळच आहे हे मान्य करणारी एकटेपणा, कंटाळा, भांडण यांत अडकलेली, तो कमावतो मी माझं आयुष्य जगते, त्याला सोडून जाऊ कुठे म्हणून न पटूनही त्याच घरात राहणारी अमेरिकेतली तिची मैत्रीण सुद्धा आयुष्यातील घराचं महत्व ठळकपणे अधोरेखित करते. 'एकटं अदृश्य होऊन गप्प बसावसं वाटतंय एखाद्या तळ्याशी जिथे शांतताच स्वतः निवारा शोधत आलेली असेल' .. यासारखे संवाद सुद्धा घर या संकल्पनेपाशीच येऊन थांबतात. प्रत्येकाचा स्वतःच्या घराचा आणि स्वतःला हव्या असणाऱ्या जागेचा शोध अखंड सुरू आहे असं वाटत. 

काही सामान आणायला परत घरी गेल्यावर नवऱ्याने कुलूप बदललं म्हणून तुटणारी सौदामिनी, नवीन किल्ली करून घर उघडल्यावर पसरलेलं घर नीट आवरणारी, सर्व गोष्टी जिथल्या तिथे लाऊन परत निघतांना उंबऱ्यात अडखळून मागे वळून स्वतःच्या हातानी सजवलेल्या आपल्या घराला डोळ्यात साठवणारी सौदामिनी अस्वस्थ करते. आपल्या वडिलांना, 'आप्पा मला माझं स्वतःच असं घरच नाही का',असा प्रश्न विचारते तेव्हा 'हे घर आपलं वाटल्याशिवाय तू आलीस का इथं' हा प्रतिप्रश्न विचारून आप्पा तिला आश्वस्त करतात. कुकी (मुलगी) आणि माई (सासूबाई) या दोघीना आपल्यशिवाय आयुष्य पेलण्याची ताकत नाही हे जाणून ती त्यांची जबाबदारी घेते. कारण 'ज्याला जबाबदारीची जाणीव असते, त्याला ती सांगावी लागत नाही, ती तो आपसूक घेतच असतो' हे ती जाणते. 'स्वतःच्या लाचारीची, शरीराची, मनाची, बुद्धीची किळस येते, सगळ्याला स्वच्छ आंघोळ घालावीशी वाटते'.. सारखे संवाद तिची हतबलता दाखवतात. 

'पोरं आपली मग त्यांचे भार आपले' हे जाणून 'ज्याची माणुसकी जागी आहे तो संन्यासी अडकलेलाच राहणार' हे ओळखणारे आप्पा, 'उगीच कशाला वाढवायचं, पटलं नाही तर घर लगेच मोडून थोडंच टाकायचं असतं', ही समजूत घालणारी आई, नातं हि गोष्ट जबाबदारीनं निभावण्याची आहे हे भान असणारा भाऊ, प्रत्येकाची सुख दुःख वेगवेगळी असतात पण सारखीही असतात हे जो जाणेल तो आपला हा विश्वास असणारी मावशी तर तुझ्या आईचं घर तुझं नाही मग माझ्या आईच घर माझं कसं' हा प्रश्न विचारणारी मुलगी आणि आपल्या पद्धतीने साथ देणारी बहीण अशी सौदामीनीच्या आयुष्यातील तिची माणसं आपल्यालाही भेटतात.

या सर्वात लक्षांत राहतो, तिचा मित्र सुरेश.त्या दोघांमधील संवाद व न बोलता झालेलं संभाषण सहज सुंदर ! नेमकं त्याच वेळी 'राधे राधे गोविंद बोले रे' हे गीत ती फ्रेम अजूनच गडद करतं..'किर्रर्र रान, पाचोळ्यावर पडते पाऊल, स्वतःला स्वतःची लागे चाहूल'..सारख्या गीतातून तिला चाहूल लागते, स्वतःची स्वतःशी नव्यानं ओळख होते.जसं रामाच्या देवळातल्या बकुळीच्या झाडाचं एखादं हलकं बकुळीचं फुल अचानक गरगरत आपल्या पुढ्यात यावं तसं तिला तिचं घर गवसतं..


©कविता सहस्रबुद्धे

Saturday, April 15, 2023

 फिर वही रात है..


किशोरदांचा आवाज, पंचमदांचं संगीत व गुलझारसाहेबांचे शब्द .. या त्रिकुटाने कितीतरी सुरेख चिरतरुण गाणी दिली आहेत आपल्याला आणि हे त्यातलंच एक कमाल गाणं. ज्या situation वर चित्रपटांत ते येतं तेव्हाचे भाव, अगदी नेमकेपणानं आपल्यापर्यंत पोहोचतात या गाण्यातून. घर या चित्रपटातील हे गीत पडद्यावर साकारलंय विनोद मेहेरा व रेखा यांनी. हे गाणं ऐकतांना पाणवणारे डोळे, पडद्यावर ते बघतांना कधी झरझर वाहू लागतात कळतंच नाही. 

एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे, आपल्याच विश्वात हरवलेले, रमलेले विकास आणि आरती. एक दिवस रात्री चित्रपट पाहून परत येत असतांना त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडते आणि त्या आघाताने आरती मुळापासून कोसळते. शरीरावर आणि मनावर झालेल्या जखमा तिचं जगणं अवघड करतात. आरतीची भूमिका प्रचंड ताकतीने साकारणारी रेखा आपल्याला ही अस्वस्थ करते. मनोमन उध्वस्त झालेलं, खचलेलं तिचं रूप विकास पाहू शकत नाही आणि मग सुरू होते त्याची केविलवाणी धडपड, तिला परत आपल्या जगात आणण्याची. जिच्यावर प्रेम केलं ती आरती त्याला परत हवी आहे. आपण तिला वाचवू शकलो नाही हि अपराधीपणाची भावना त्यालाही पोखरते आहे पण आरतीला सावरणं जास्त महत्वाचं आहे. विकासची भूमिका समर्थपणे साकारली आहे विनोद मेहरा यांनी. आजवर पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सर्व गाण्यांमधलं हे सर्वोत्तम गाणं आहे माझ्यामते. 

हजारो छटा घेऊन येतात गाण्यातील हे शब्द. आरतीला समजावत, थोपटून झोपवणारा, तिला पांघरूण घालणारा 'तो' अजूनच देखणा वाटतो. त्याच्या डोळ्यांत, त्याच्या स्पर्शात ती काळजी दिसते. अजूनही मी तुझ्या सोबतच आहे असं आश्वस्त करणारा भाव आणि शब्द .. गुलजार आणि ख्वाब एक कमाल chemistry दिसते गाण्यात. इथे प्रसंगानुरूप स्वप्नांना त्यांनी 'काच के ख्वाब' म्हटलं आहे. गुलझारचं हेच वैशिष्ठ्य आहे, कमी शब्दांत प्रचंड काही तरी सांगून जातात. किशोरदांचा आवाज कमालीचा उत्कट होतो.. एका विलक्षण प्रेमाची हळुवार गोष्ट आहे या गाण्यात... 

फिर वही रात है .. फिर वही रात है​, ख्वाब की ..
रातभर ख्वाब में देखा करेंगे तुम्हे, फिर वही रात है  ​

Wednesday, April 5, 2023

देवबाभळी

उत्कृष्ट कलाकृती बघण्याचं नशिबात असावं लागतं आणि तो योग यावा लागतो हेच खरं.मागच्या आठवड्यात'देवबाभळी' नाटक बघितल्यावर विश्वास बसला. नाटकाच्या परतवारीच्या प्रवासात उशिरा का होईना हा योग आला. २०१७ साली रंगमंचावर आलेलं, साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित, अनेक पुरस्कारांचं मानकरी असलेलं, इतकंच नाही तर मुंबई विद्यापीठानं बी ए अभ्यासक्रमात समाविष्ट केलेलं हे नाटक तसं बराच काळ खुणावत होतं. तुकोबांची पत्नी आवली आणि लखुबाई म्हणजेच रखुमाई हि या नाटकांतील दोन पात्र. या शिवाय दोघींच्या संवादातून भेटणारे तुकोबा आणि पांडुरंग... या चार जणांभोवती गुंफलेल्या कथेचा आपण सुद्धा मग एक भाग होऊन जातो, नकळत .. कसं ते उमजत नाही. 
 
तुकोबांसाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर न्याहारी घेऊन गेलेल्या आवलीच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो व तिची शुद्ध हरपते. तेव्हा साक्षात पांडुरंग येऊन तिच्या पायातील काटा काढतात व बेशुद्ध अवस्थेतील तिला घरी पोहोचवतात. इतकंच नाही तर गरोदर आवलीच्या मदतीकरता खुद्द रखुमाईला आवलीच्या घरी धाडतात. संसार वाऱ्यावर सोडून, घराकडे लक्ष न देता आपला नवरा विठ्ठलाच्या नादी लागलाय हि खंत असणारी व त्यामुळे विठ्ठलावर चिडलेली त्याला सतत बोल लावणारी आवली एकीकडे तर पांडुरंगावर रुसून अठ्ठावीस युगं त्याच्यापासून दूर असलेली रखुमाई दुसरीकडे.सुरवातीचे त्यांच्यातील खुसखुशीत संवाद पुढे खोल होत जातात, व्याकुळ करतात. दोघींच्या विलक्षण अभिनयातून स्त्री मनाचे कंगोरे, स्त्री मनाच्या वेदनेचे पदर अलगत उलगडत जातात. आवलीची ओढाताण,सतत कानोसा घेत तुकोबांना शोधतांना होणारी तिची घुसमट व त्यामुळे विठ्ठलाप्रती असलेला तिचा राग..तर कायम देहरूपाने सोबत असूनही आपल्या भक्तांमध्ये हरवलेल्या पांडुरंगावर रुसलेली, रागावलेली रखुमाई ... बहुदा या दोघींचं दुःख आपल्याला कधी दिसलंच नाही. दोन उत्तुंग मूर्तींच्या सावलीत मागे काय काय आहे ते कधी आपण पाहिलंच नाही. जे इथे समर्पक संवाद व तितक्याच सशक्त अभिनयातून आतवर पोहोचतं, भिडतं, सुन्न करतं.  

रंगमंचावर दिसणारं आवलीचं छोटंस झोपडी वजा घर, कोपऱ्यातील चूल,भांडी कुंडी, अंगण व जवळचा इंद्रायणीचा विस्तीर्ण काठ ... हेच तिचं जग. नवऱ्यावर तिचा राग आहे तरी, 'ह्यांनी लिवलेलं घरीदारी तर होतंच पण आता बाजारात पन पिच्छा सोडंना झालंय. म्हंजे आमचं येडं काही तरी शहानंच लिवत आसंल ना'.. असं कौतुक सुद्धा आहे. संसार करायला, घर चालवायला नवऱ्याने घरात फक्त शब्दांचं धन ठेवलंय याचा दोष ती त्याला देतंच नाही, देते त्याच्या देवाला. विठूच्या नावाने खडे फोडते. नवऱ्याची आपल्या शिवाय कोण काळजी घेणार म्हणून रोज न चुकता न्याहारी घेऊन त्याला डोंगर दरीत शोधत फिरते.. आज ना उद्या तुकोबा परत येतील अशी भाबडी आशा आहे तिला, जी तिच्या ओवीमधून झिरपत राहते ..  

अंधाराला अंधाराला दिशा नाही मेली,
ठेचकळ्या आभाळाला दवापट्टी केली, 
हात रंगल्याले शेणाच्या रंगात,
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात
दारावर लोक येई, "कसे माखले ग हात?" 
सांगते मी "शेन न्हाई, नवी मेंदीची ही जात"... 

दुसरीकडे आहे रखुमाई, अठ्ठावीस युगांचं एकटेपण सहन करणारी. देवत्व असूनही तिचं दुःख हुरहूर लावणारं आहे. तिचं रुसणं रास्त आहे ती म्हणते, 'कितीतरी वेळा जिवाचा पोहरा सोडलाय पांडुरंगाच्या डोहात, पण तो पांडुरंग मात्र राधेच्या, जनीच्या, गोरोबाच्या नाहीतर तुकोबांच्या मधे रमलाय'..

अरुण कोलटकर यांच्या ‘चिरीमिरी’ या कवितासंग्रहात एक अप्रतिम कविता आहे, ‘वामांगी’.. देवळात गेल्यावर एकट्या रखुमाईला पाहून तो विचारतो 'विठू कुठ गेला, दिसत नाही बाजूला', त्यावर रखुमाई म्हणते, 

कधी येतो कधी जातो
कुठ जातो काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितल नाही ?

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं 
अठ्ठावीस युगांचं एकटेपण.. 

वाटलं, या कवितेतील 'ती' रखुमाई आज दिसली, साक्षांत समोर..

या रुसलेल्या रखुमाईला आवली म्हणते, 'असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये ? घरावर रुसून निघून गेले आनी परत यायची इच्छा झाली तेव्हा घर जागेवर नसलं तर ? मानूस विसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई..पाऊस येवो न येवो; आपण आपल्या वाट्याची नांगरट करत रहावी'.. रखुमाईच्या मनावरीच्या जखमेची खपली निघते. त्यावर आवलीच फुंकर घालते. एकमेकींच्या सहवासात वावरताना दोघींना एकमेकींची आणि सोबत स्वतःचीही नव्यानं ओळख होते. 

नाटक पाहताना एकेक प्रसंग, एकेक फ्रेम मनात घर करत राहते. तुकोबांनी लिहिलेली अभंगाची पाने वाऱ्याने उडतात आणि ती उडालेली पाने रखुमाई एक एक करत वेचते .. आवलीचा जखमी झालेला पाय आपल्या मांडीवर घेऊन रखुमाई त्यावर लेप लावते तेव्हा आपल्याही डोळयांत इंद्रायणी दाटते .. नदीचा तो विस्तीर्ण काठ, पाण्याचा आवाज, पाण्यावरचे तरंग, त्या दगडी पायऱ्या आपल्यालाही नदी काठी घेऊन जातात. 

रखुमाईने मायेनं केलेल्या औषधपाण्याने अखेरीस आवलीची जखम बरी होते, भरून येते. शांत झोपलेल्या आवलीला सोडून निघताना रखुमाई अडखळते. विठ्ठलाची मूर्ती न घेता आवलीने जखमेला बांधलेलं पांडुरंगाचं वस्त्र तेवढं सोबत घेऊन ती बाहेर पडते, मूर्ती तिथंच ठेवून. चेहऱ्यावर विलक्षण समाधान असलेली शांत पहुडलेली आवली व मागे उजळून जाणारी विठ्ठलाची सावळी मूर्ती व आसमंत भरून टाकणारा विठू नामाचा गजर ... इथे तुकोबा ऐकू येतात दिसत नाहीत, पांडुरंग दिसतो पण ऐकू येत नाही .. यातल्या प्रत्येकाचं समर्पण वेगळं. देवत्व लाभलेल्या रखुमाईला आवलीच्या माध्यमातून आलेले लौकिक भान तर संसारी आवलीच्या साध्या सोप्या सरळ प्रश्नांनी गाठलेली अलौकिक पातळी.. दोघींचा हा प्रवास अत्यंत तरल व बांधून ठेवणारा आहे .. 

या नाटकाचे लेखक प्राजक्त देशमुख यांच्या शब्दांत सांगायचं तर, 

दोन सख्या होत्या माझ्या 
रोज यायच्या नदीला
एक दुडूकी पोटुशी 
एक ठेंगणी उंचीला
दोघी रमायच्या काठी
तेव्हा रेंगाळत वेळ 
धुणी धुतल्या आठोनी
जसं खांद्यावर पीळ
दोघी कोण काय होत्या
कधी कळले ना नाते
भासायाच्या वैरिणी त्या
कधी माय लेकी वाटे
पोटूशीच्या कपाळाला
होतं चिरी गोल कुकू
ठेंगणीच्या नाकी तोरा
जरा धारधार रुसू
मिठीभर नांदायाच्या
काही कळायचे नाही
हसता का रडताहे
काही कळायचे नाही
थबकायच्या मधेच
हसतांना का उगीच
काही येत होते काठी
आत लोटायच्या आधीच
एक पाण्याला पाहून
अशी मोडायची बोटं
एक आभाळाला पाही
अन कटीवर हात 
पाणी नदीचं, धुण्याचं,
डोळ्यातलं खरं खार
काठी बसायाचो मी नि
टिपायचो सारं सारं
स्थळ काळ तो तो येई
त्या त्या पल्याड नदीला
मी हि ठरलेल्या वेळी
येई अल्याड नदीला
भेटी जाऊ जाऊ झालं
थेट जाणं नाही झालं
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं 
एक दिस असा आला
कोणी कोणी नाही आलं ... 
@प्राजक्त देशमुख

नाटक संपतं.. पण आपण मात्र दोघींच्या मनाच्या सावळ्या गाभाऱ्यात हरवून जातो..

@कविता सहस्रबुद्धे

 निरोप 


वर्ष अखेर परीक्षा संपली कि घरी जातांना मुलं आवर्जून भेटायला येतांत. वर्गात प्राध्यापकांशी आणि वर्गाबाहेर माझ्याशी गाठ असते त्यांची, मग काय. बरेचदा प्रत्यक्ष तर अधूनमधून ईमेल वर झाप खाणारी माझी हि मुलं माझ्या भीतीने वर्षभर 'ड्रेस कोड' फॉलो करतात, आखून दिलेलं नियम पाळतात, सगळं काही ऐकतात. मधेच 'मॅडम हम क्या स्कुल मे है क्या', असे उगीच प्रश्न पण विचारतात. आमच्या हिरव्यागार कॅम्पस मध्ये झाडांची काही कमी आहे का घरटं बांधायला, नाही ना, तरीही आमची मुलं अधूनमधून आपल्या डोक्यावर पक्षांसाठी घरटी बांधतात आणि मी विचारलं, 'केस का वाढवलेत एवढे' तर 'पॉकेट मनी संपला' हे नेहमीचं कारण देऊन, वर माझ्याकडूनच पैसे घेऊन नाईलाज म्हणून कटिंग करून येतात. अहो, दुसऱ्या दिवशी मी पण ओळखू शकत नाही इतकी शहाणी, गुणी दिसतात. नाईट आऊट फॉर्म वर सही घ्यायला आले कि 'आई बाबांना सांगितलंय का' ? 'फोन नंबर द्या आईचा, फोन करून विचारते मी' असं म्हणताच गुमान नंतर देतात. 'आज परत late आऊट permission, सारखं कुठे जायचं असतं रे तुम्हाला', हे विचारून ना मी थकत, ना त्यावर उत्तर देऊन ते. 
 
कालच दोन मुलं आणि एक मुलगी फॉर्म वर सही घ्यायला आले होते. तिघांची कारणं same, 'Going to Goa'... इथे आमच्या शाळेच्या ग्रुपची ट्रिप ठरत नाहीये महिना झाला, आणि हे पोट्टे पहा काल परीक्षा संपली आणि आज चालले GOA ला. मी विचारलं 'you all are going together' तर म्हणाले,'Yes ma'am'. त्यांना काय माहित मॅमना काही जमना सही करायला. 'you just wait outside' असं म्हणून मी त्यांना बाहेर पाठवलं आणि फोन लावला माझ्या collegue ला,बाजूच्याच केबिनमध्ये. 'अरे first year ची दोन मुलं आणि एक मुलगी गोव्याला चाललेत' .. तर तो म्हणाला 'जावू दे कि'.. इतकं छोटंसं उत्तर... so cool .... मला माझ्या मैत्रिणीचे बाबा आठवले, कॉलेजच्या ट्रिपला जाऊ का विचारलं तर तिला 'तंगड तोडुन हातात देईन', म्हणणारे... वेगळेच दिवस होते ते. बराच काळ लोटलाय ..खूप काही बदललंय आता, तरी तो बदल accept करतांना अजूनही जरा वेळ लागतो.कुठेतरी या मुलांची जबाबदारी आहे आपल्यावर असं वाटतं. शेवटी मुलंच ती आपल्याच विश्वात रमलेली आणि हरवलेली. मग काय थोडं 'आंजारून गोंजारून', दिली permission. 

बरं सुट्टी लागली तरी लगेच घरी जायचं नसतं. आठवडाभर मनसोक्त भटकून, मजा मस्ती करून घरी जातात. आणि जायच्या आधी आवर्जून येतात भेटायला. छोटसं का होईना पण काहीतरी आणतात माझ्यासाठी. मग चॉकलेट्स,पेन, पुस्तकं,ओरिगामीची फुलं पक्षी यांनी टेबल अगदी भरून जातं. काही जण तर स्वतःच्या शेतातली फळं सुद्धा आवर्जून आणून देतात. माझं रागावणं, शिस्त लावणं माझ्या कामाचा भाग आहे. पण त्या पलीकडे आई बाबांपासून लांब हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या या मुलांचं कौतूक करतांना, त्यांचे वाढदिवस साजरे करताना, त्यांचे हट्ट पुरवतांना, वेळेला मदत करून, गरजेला त्यांची काळजी घेताना मिळणारा आनंद निराळाच आहे. सतरा अठरा वर्षांपासून इथून शिकून बाहेर पडणारी मुलं जेव्हा आजही फोन करतात, भेटायला येतात, पत्र पाठवतात तेव्हा त्यातून वेगळीच ऊर्जा मिळते .. 

मार्च महिना संपत आला की कॅम्पस मधलं वर्षभर किलबिलणारं आमचं घरटं दोन महिने रिकामं होणार म्हणून चुटपुट लागते. मुलांशिवाय घराला घरपण नाही असं म्हणतो आपण तसंच आहे, या मुलांशिवाय कॅम्पस अगदी भकास वाटतं .. त्यामुळे जून महिना व त्या सोबत येणाऱ्या मस्त पावसात कॅम्पस मध्ये मुलं जेव्हा परत येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरवात होईल !

- कविता सहस्रबुद्धे
मार्गारेट, हरिप्रसाद आणि डॉन

आमचं कॉलेज कॅम्पस, आमचा स्टाफ,आमच्या कॉलेजमधली मुलं व त्यांच्या बरोबरीनं मुक्त संचार करणारे साप, मोर कधी बिबट्या यांच्यावर इतकं लेखन झालं कि आमच्या वर्गात हजेरीपटावर नाव नसूनही दररोज हजेरी लावणारी मांजरं आणि कुत्रा या दोन प्राण्यांना वाटलं असावं या मॅडम आपल्या बद्दल कधी लिहिणार ? म्हणून 'आज कूछ तुफानी करते है', असं ठरवून अर्धा डझन मांजरींमधली 'मार्गारेट' आणि डझनभर भू भू न मधला 'डॉन' आज वर्गात आले होते. बरं, हि नावं पण मुलांनीच दिलेली. डॉन म्हणजे तुकतुकीत काळ्या रंगाचा आणि डौलदार चालीचा. त्याच्या जागेत आम्ही भाडयाने राहात असल्याचा फील येतो असा झोपलेला असतो, चार पाय पसरून वर्गात शेवटच्या बाकाजवळ. सकाळी नवाच्या तासाला पेंगुळत येणाऱ्या मुलांची सावली पडून पडून याला पण सवय लागलीये, निवांत पसरायची.

आज अकरा वाजताच्या पेपरला हा कधी पासून येऊन बसला होता माहित नाही. पेपर सुरु होऊन तासभर झाला असेल आणि युनिव्हर्सिटी squad मधले तीन चार जण आले. 'डॉन' ला पाहून मला बोलावणं पाठवलं त्यांनी. 'मॅडम क्लास में कुत्ता क्यो है' ? .. असं नाकांत आवाज काढून बोलणारे शर्मा सर आले होते. 'सर वो हमारा हि है, मतलब हमारे बच्चे संभालते है उसको'.असं  उत्तर देऊन, 'देखो उसके गले में हमारा आयकार्ड भी है', असं तोंडावर आलेले वाक्य अक्षरशः मी गिळलं. पण खोटं नव्हतं हं ते, खरंच आमच्या पोरांनी आयकार्ड पण घातलं होतं त्याच्या गळ्यात. शर्मा सरांना काही पटेना कि वर्गात कुत्रा कसा काय.  'उसको क्लास से बाहर निकालो' .. असं त्यांनी म्हणताच मला आमचे FACULTY आठवले. 'मागच्या जन्मात राहिलं असेल शिकायचं म्हणून येऊन बसतो हा वर्गात ', असं कौतुकानं म्हणतात ते आणि हे आपलं त्याला बाहेर काढायच्या मागे. मी म्हटलं, 'सर रेहेने दिजीए ना, सोया है बेचारा, जगायेंगे तो भोकने लगेगा' .. पण त्यांची गाडी काही पुढे जाईचना. "लेकिन मॅडम अगर उसने किसी बच्चे को काटा तो फिर क्या करेंगे".. अरे देवा काय हि शंका ?  "सर, EXAM RULE BOOK में तो नही लिखा है फिर क्या करना है" असं मी SPONTANIOUSLY बोलून गेले आणि लक्षात आलं, माती खाल्ली आपण. मग काय कसंबसं त्यांची समजूत घालून आमच्या 'डॉनची' झोपमोड होऊ न देता मी त्यांना पुढच्या क्लास मध्ये घेऊन गेले.

दोन मजल्यांवरच्या सर्व वर्गांमधून त्यांची VISIT पूर्ण होते न होते तोच 'मार्गारेटच्या' आवाजाने त्या शांततेचा भंग झाला. खाते पिते घर की वाटावी अशी आमची  मार्गारेट. आज जरा फारच चिडलेली असावी..सुकट बोंबील वाटावा अशा 'हरिप्रसाद' नावाच्या डॉनच्या गॅंगमधील एका सोबत तिची चांगलीच जुंपली होती. त्या दोघांच्या कर्कश्य आवाजाने आमच्या इथलं वातावरण पण चिघळलं. मग काय मी दोन शिपायांना खाली पाठवून वेळ निभावून न्यायचं ठरवलं. त्या दोन शिपायांपैकी एकजण 'मार्गारेट' ला खालच्या म्हणजे HILLBASE कॅम्पस मध्ये नेवून सोडतो म्हणून बरेच दिवस मागे लागला होता. त्याने खाली जाऊन काठीचा आवाज केला तशी वर्गाच्या बाहेर शांतता पसरली. स्टाफ व मुलांसोबत दुसरीकडे कुत्री व मांजरांनी नटलेलं आमचं ऑफिस नजरेत आणि कानांत साठवून थोड्याच वेळातं आलेला तो SQUAD परत गेला.

मी हुश्श करत कॉन्फरन्स रूम मध्ये गेले. काही प्रोफेसर, EXAM टीम यांच्याबरोबर बोलत असतांना अचानक खूप मोठ्ठा आवाज झाला. तो आवाज इतका जबरदस्त होता कि काहीतरी कुठेतरी जोरदार धडकलं किंवा आपटलं होतं. मग काय आम्ही आवाजाच्या दिशेने पळत बाहेर गेलो. तर जवळच्या हेलिपॅडच्या रस्त्यावर एक लहान टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीला आपटून बाजूच्या उतरावरून थोडा खाली जाऊन उलटला होता. त्या आवाजाने आजूबाजूचे बरेच जण गोळा झाले. गाडीत कोण होतं, कोणाला किती लागलं याची काळजी वाटतं होती. नशिबाने ड्राइवर सुखरूप बाहेर आला, त्याच्या हाताला थोडं खरचटलं होतं, अजून काही मुकामार लागला नव्हता पण त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. इतक्यात आमचा शिपाई चौधरी सुद्धा गाडीतील दुसऱ्या बाजूने उतरला. मार्गारेटला हाकलायला गेलेला हा आमचा प्राणी या गाडीत कसा हा प्रश्न मला पडला..  जो बहुदा माझ्या चेहऱ्यावर पण स्पष्ट दिसत असावा त्यामुळेच मी काहीही न बोलता, न विचारता चौधरीनेच बोलायला सुरवात केली.

'मॅडम मला वाटलं आज या मार्गारेटला सोडून यावं खाली म्हणून हा टेम्पो जात होताच तर मी पण चढलो मार्गारेटला घेऊन गाडीत. पण या वळणावर काय झालं माहित नाही तिने जोरात उडी मारली अंकुश ड्राइव्हरच्या अंगावर आणि त्याच्या चेहऱ्यावर इतका जोरात पंजा मारला कि अंकुशचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि आम्ही गाडीसकट जाऊन पडलो खाली'  ... बापरे एका दमात त्याने सांगितलेला हा प्रसंग ऐकून मी आता काय करावं, काय बोलावं या विवंचनेत पडले. बरं एवढंच नाही तर तो पुढे म्हणाला 'मॅडम आणि इतक्या गोंधळात ती मार्गारेट कुठं गेली पळून काय माहित' .... चौधरीला सुद्धा फारसं लागलं नव्हतं हे पाहून मला जरा बरं वाटलं. मी आणि माझी टीम सोडून बाकी कोणालाही चौधरी काय बोलतोय ते कळत नव्हतं. त्याचं 'मार्गारेट मार्गारेट' ऐकून, त्याच्या डोक्याला मार लागलाय म्हणून तो असं बरळतोय अशी इतर लोकांची समजूत झाली असावी. 'बरं ते जाऊ दे तुम्ही दोघे आधी डॉक्टर कडे जा', असं म्हणतं मी त्यांना आमच्या डॉक्टरांकडे पाठवलं. सिक्युरिटीला प्रसंगाच गांभीर्य ओळखून बाकीच्या गोष्टी बघायला सांगितल्या.

एवढं करून मी परत कॉलेज मध्ये आले. ग्लासभर थंड पाणी प्यायले. जे झालं ते भास होता कि खरं होतं हे त्या क्षणी मला काही समजत नव्हतं. थोडक्यात निभावलं असा विचार आला मनात आणि गणपती बाप्पाचे मनोमन आभार मानले. इतक्यात घड्याळाकडे लक्ष गेलं, पेपर संपायची वेळ झाली होती म्हणून वर्गात जाण्यासाठी निघाले तर पायरीवर ऐटीत बसलेल्या मार्गारेटला पाहून तिथेच थबकले...एकूण काय हजेरीपटावर नाव असो कि नसो मार्गारेट, हरिप्रसाद, डॉन यांच्याशिवाय आमचं कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही याची खात्री पटली !

@कविता सहस्रबुद्धे