Tuesday, September 6, 2022

 गाण्यामागची गोष्ट 

'मुघल-ए-आझम' कृष्णधवल चित्रपट असूनही डोळे दिपवणारा चित्रपट असं म्हटलं जातं कारण त्या काळी या भव्य चित्रपटाच्या निर्मितीसाठी दीड कोटी रुपये लागले व निर्मितीसाठी लागलेला वेळ होता चक्क सोळा वर्ष. दिग्दर्शक के असिफ यांची दूरदृष्टी, मेहेनत, चिकाटी व चित्रपटावरील त्यांचं वेडं प्रेम यामुळेच खरं तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं. 

आपल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे डोळे दिपून जावेत या स्वप्नासाठी के. असिफनी शीशमहलचा सेट उभारायचं ठरवलं. सर्वोत्तम कलाकृती घडवण्याचा ध्यास घेतलेल्या त्याच्या या स्वप्नासाठी अंधेरीच्या मोहन स्टुडिओमध्ये शेकडो कारागीर दोन वर्ष अहोरात्र राबले. कलादिग्दर्शक एम.के. सईद यांनी मुंबईतल्या नावाजलेल्या आर्किटेक्ट व इंटिरिअर डिझायनरची यासाठी मदत घेतली. इटालिअन टाईल्सचं फ्लोअरींग, इराणी गालीचे, संस्थानिकांकडून आणलेली झुंबरं हंड्या, काळानुरूप नक्षीदार खिडक्या व भिंतींच्या कमानी, संगमरवरी भासणार्‍या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती यांनी ती स्टुडिओ भरून गेला. काचेचं नक्षीकाम करणारे तज्ज्ञ आगा सिराझी यांना शीशमहल सजवण्याचं काम देण्यात आलं. विशिष्ट रंगाच्या काचा आणि आरसे बेल्जियमवरुन मागवण्यात आले. अशा तर्‍हेने जवळपास पंधरा लाख रुपये खर्च करून उभा  राहिला शीशमहलचा सेट..  ३५ फूट उंच, ८० फूट रुंद आणि १५० फूट लांब !

या सेटवर अनारकलीचं सप्तरंगांतलं नृत्य चित्रीत करायचं ठरलं होतं. कृष्णधवल छायाचित्रणातील कसबी सिनेमॅटोग्राफर आर.डी. माथूर यांनी काम सुरू केलं. ट्रायलसाठी जेव्हा मोठमोठे दिवे प्रकाशित केले गेले तेव्हा असंख्य आरशांमुळे परावर्तीत झालेल्या प्रकाशामुळे एक्सपोझ झालेली फिल्म जळून पांढरीफटक पडली. तमाम कसबी तंत्रज्ञांनी इतक्या प्रखर प्रकाशात कॅमेर्‍याच्या लेन्सेस काम करूच शकणार नाहीत, असं छातीठोकपणे सांगितलं. 

तेव्हा प्रचंड मानसिक तणावाखाली असलेले शापूरजी ( त्या काळातील एक मोठे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व या चित्रपटाचे फायनान्सर )तडक त्याकाळच्या ज्येष्ठ दिग्दर्शक सोहराब मोदींकडे गेले. मोदींनी प्रत्यक्ष सेट पाहिल्यावर प्रेक्षकांचे डोळे दिपवण्याच्या नादात असीफ स्वत:सकट सगळ्यांसाठी खड्डा खणतो आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. यामुळे शापूरजींनी झालं तेवढं बास झालं आता इथून पुढे सोहराब मोदी दिग्दर्शनाचं काम पाहतील,असं के आसिफला सुनावले. त्यावर त्यांचा बांध तुटला आणि ते म्हणाले, ‘तुमचे पैसेच खर्च झालेत, पण माझ्यासकट शेकडो लोकांनी या चित्रपटासाठी रक्ताचं पाणी केलंय. या सेटवर अकबर, जोधाबाई, सलीमसमोर अनारकली नाचणार आहे. माझ्या स्वप्नपूर्तीच्या या परमोच्चक्षणी मी कुणाचीही लुडबुड खपवून घेणार नाही..’ असीफचा हा आवेश पाहता शापूरजींनी थोडं नमतं घेतलं. पण या दृश्यानंतरच काम मोदी पाहतील असे त्यांनी स्पष्ट केले. इतका वेळ हे सगळं ऐकत उभी असलेली मधुबाला आपल्या शांत पण दृढनिश्चयी स्वरात म्हणाली की, 'माझा करार असिफसोबत झाला आहे. त्यामुळे असिफने दिग्दर्शन केलं नाही तर मी या चित्रपटातच काम करणार नाही'. पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या चित्रपटातून मधुबाला बाहेर पडली तर आपण कुठे जाऊन पोहचू हे ओळखता येण्याइतपत चाणाक्ष व व्यावसायिक असलेले शापूरजी पालनजी हे सोहराब मोदींसोबत एकही शब्द न बोलता सेटवरून निघून गेले. पाणावलेल्या डोळ्यांनी मधुबालाकडं पाहात के असीफने जणू तो हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नसल्याचं तिला सांगितल असावं. 

शीशमहलच्या शेकडो आरशांवरून प्रकाश किरण परावर्तीत होऊन फिल्म कोरीच राहू लागली. शेवटी आर.डी. माथूरनं डायरेक्ट लाईट ऐवजी सर्व दिव्यांवर उलटे रिफ्लेक्टर्स बसवले व इनडायरेक्ट लाईटमध्ये शूटिंग करून पाहिलं. ज्यामुळे आरशांत हजारो प्रतिमा स्पष्ट दिसल्या आणि ही कल्पना यशस्वी झाली . आजकाल जे स्टिल व लाईव्ह फोटोग्राफीचं तंत्र वापरतात, त्याचा उगम इथूनच झाला.

'प्यार किया तो डरना क्या', अशा भव्य गाण्याचं स्वप्न बघणारा दिग्दर्शक के. असीफ, या एका गाण्यासाठी त्याने बनवलेला शीशमहल, दिग्दर्शकासाठी चित्रपट सोडण्याची तयारी दाखवणारी मधुबाला, आलेल्या अडचणींवर मात करत, अत्यंत कल्पकतेने शीशमहालातील शूटिंग शक्य करून दाखवलेला आर.डी. माथूरसारखा कॅमेरामन आणि या सगळ्याच दडपण मनावर असणारे या चित्रपटाचे गीतकार शकील बदायुनी .. त्यांनी आपली सारी प्रतिभा पणाला लावून या शीशमहलमधील गाण्यासाठी पंचवीस मुखडे तयार केले. पण नौशादजींच्या पसंतीस ते उतरेनात. बरंच विचारमंथन झालं, चर्चा झाली. मध्यरात्रीच्या सुमारास नौशाद जींना ओळी सुचल्या. गीत सुरु होण्यापूर्वीची दोन ओळीतील आर्त तत्वज्ञान ज्या धाडसाने दरबारांत अनारकली अकबर बादशहाला ऐकवते, त्याच तोलामोलाचे बोल शकीलजींनी  लिहिले, नौशादजींनी संगीताचं कोंदण चढवलं आणि लताजींनी ते अमर केलं (या गाण्यातील आवाज घुमण्यामागे echo रेकॉर्डिंग तेव्हा प्रगत नसल्याने स्टुडिओ च्या बाथरूम मध्ये रेकॉर्ड केलं गेलं होतं) ‘इन्सान किसीसे दुनियामें इकबार मुहोब्बत करता है इस दर्दको लेकर जीता है , इस दर्द को लेकर मरता है…जब प्यार किया तो डरना क्या' ...  

 

 गाण्यामागची गोष्ट 

नवकेतन बॅनरच्या 'काला बाजार' या चित्रपटासाठी देव आनंद , विजय आनंद, वहिदाजी, एस डी बर्मन, शैलेंद्र अशी तगडी टीम एकत्र आली होती. याच सुमारास शैलेंद्रजी इतर काही प्रोजेक्ट वरती सुद्धा काम करत असल्याने गाणं लिहायचे काम वेळेत पूर्ण करू शकत नव्हते. त्यामुळे साहजिकच निर्माता देव आनंद व विजय आनंद एस. डी. बर्मन यांच्या मागे गाण्याच्या चाली करता तर शैलेंद्र यांच्याकडे गाण्याचे बोल लवकर हवेत म्हणून घाई करायचे. एके दिवशी या सततच्या घाईला कंटाळून, त्रस्त होऊन एस डी बर्मन साहेबांनी पंचमना दिवसभर शैलेंद्रजीं सोबत राहायला सांगितलं.  शिवाय जोवर शैलेंद्र जी गाणं लिहून देत नाहीत तोवर घरी येऊ नकोस असं सुद्धा सांगितलं. 

मग काय संध्याकाळ होताच दोघे शैलेंद्रजींच्या घरी गेले. थोडया वेळाने कारमधून फिरायला गेले. वाटेत शैलेंद्र यांना शंकर जयकिशन साहेबांकडे काम होतं ते सुद्धा केलं, मग दोघे नॅशनल पार्क मध्ये गेले तरी शैलेंद्रजींना काहीही सुचत नव्हतं. शेवटी त्यांनी जुहू बीच वर जायचं ठरवलं. रात्र झाली, अकरा वाजले. त्या वेळी पंचम आपल्या वडिलांसोबत काम करत होते, वय वर्ष वीस. ते शांत पणे बसले होते कारण वडिलांचं ऐकणं भाग होतं.जुहू बीचवरची दूरवर पसरलेली ती शांतता,समुद्राचा तो आवाज,आकाशातील चांदणं ... 
सिगारेट पेटवून शैलेंद्रजींनी ती काडेपेटी पंचमना दिली आणि गाण्याची ट्यून वाजवायला सांगितली. पंचमदांनी त्या काडेपेटी वर ठेका धरत धून ऐकवली. सिगारेटचा हवेत विरणारा धूर व आकाशातील चंद्र पाहून शैलेंद्रजींना शब्द सुचले व लगेचच सिगारेटच्या पाकिटावर त्यांनी ओळी लिहिल्या ... 'खोया खोया चाँद खुला आसमान , आँखों में सारी रात जाएगी'..  

 गाण्यामागची गोष्ट 


आजही प्रेमात पाडणारा चित्रपट म्हणजे गाईड. व्यावसायिक असूनही कलात्मक ढंगाचा.. त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्तम संवाद, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार असे तब्बल सात फिल्मफेअर पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संगीतकार एस.डी. बर्मन यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी साधं नामांकन सुद्धा मिळालं नव्हतं ज्याचं दुःख दिग्दर्शक विजय आनंद यांना कायमच राहिलं. खरं तर कोणत्याही पुरस्काराच्या पलीकडचं संगीत होतं ते, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ! 2012 मध्ये, टाइम मासिकाने 'सर्वोत्कृष्ट बॉलिवूड क्लासिक्स' च्या यादीत नंबर चार वर या चित्रपटाला स्थान दिलं होते. 

त्या काळी मेहबूब खान, बिमल रॉय, राजकपूर सारख्या काही दिग्दर्शकांनी गाण्यांना ग्लॅमर दिलं परंतु गाण्याच्या चित्रीकरणाला एका वेगळ्या उंचीवर खऱ्या अर्थानं नेलं ते 'गोल्डी' म्हणजेच दिग्दर्शक 'विजय आनंद' यांनी. त्यांच्या ज्वेलथीफ, तेरे घर के सामने, तिसरी मंझिल आणि गाईड चित्रपटांतील प्रत्येक गाणं म्हणजे absolutely एक व्हिजुअल ट्रीट आहे ! 

गाईड चित्रपटाचं संगीताचं काम सुरु होण्यापूर्वीच सचिनदांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढचे काही दिवस ते हॉस्पिटल मधेच होते. तेव्हा देवसाहेब आणि गोल्डी यांनी 'कितीही थांबावं लागलं तरी आम्ही थांबू पण गाईड चे संगीतकार तुम्हीच असाल', असं सचिनदांना सांगितलं. गाईड च्या यशामध्ये त्यांच्या संगीताचा आणि शैलेंद्र यांच्या गीतलेखनाचा खूप मोठा वाटा आहे. 

चित्रपटांतील प्रत्येक प्रसंगात एक भाव असतो. कथा, त्यातील प्रसंग, कलाकारांचे संवाद तसंच त्यांच्या अभिनयातून पुढे साकारणाऱ्या गोष्टीमधून हा भाव अजूनच गहिरा होत जातो. जेव्हा हाच भाव संवाद पेलू शकत नाहीत तेव्हा तो भाव गाण्यांतून साकारतो. गाण्यांतून गोष्ट पुढे नेण्याचं कसब गोल्डी कडे होतं. त्यांनी साकारलेली बरीच गाणी 'Director's Song' म्हणून ओळखली जातात. नायक नायिकेचा संवाद सुरु असतांनाच शॉट कट न होता त्या शॉटचं एक्सटेंशन वाटावं असं गाणं सुरु होण्याचं एक झळाळतं उदाहरण म्हणजे,' तेरे मेरे सपने अब एक रंग है'..

उदयपूर जवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरोवराजवळ हे गाणं चित्रित केलं गेलं. सूर्यास्ताच्या वेळी असलेला प्रकाश केवळ दहा ते पंधरा मिनिटं टिकत असल्याने तेवढ्याच वेळेत  हे गाणं हवं तसं चित्रित करणं हि एक परीक्षा होती. शेवटी गोल्डी व या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी हवा तो परिणाम साधता यावा म्हणून एका झाडाच्या आडून ते चित्रीत केलं, फक्त चार शॉट्स मध्ये !  

या गाण्याचं लोकेशन, सूर्यास्ताची वेळ, मागील तळ्यातील संध्याकाळचा हलका प्रकाश, आकाशातील रंग, कातरवेळचा मंद अंधार, लयदार फिरणारा कॅमेरा, शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदांचं संगीत आणि पडद्यावर देवसाहेब आणि वहिदाजी .. सारंच जादुई !!

©कविता सहस्रबुद्धे

 

 गाण्यामागची गोष्ट 

१९७८ साली रेखा आणि विनोद मेहरा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘घर’ हा चित्रपट एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा होता.रेखाच्या अभिनयासोबतच हा चित्रपट लक्षात राहिला तो या चित्रपटांतील गाण्यांमुळे. ‘आजकल पॉंव जमीं पर नही पडते मेरे ’, ‘आपकी ऑंखों में कुछ मेहेके हुए से ख्वाब है’ ‘तेरे बिना जिया जाए ना’ आणि ‘फिर वही रात है’ .. अतिशय गोड शब्द आणि कमालीच्या हळव्या चाली. त्या दोघांमधलं नातं जिवंत करणारे शब्द, त्या दोघांचं जग, ती ओढ, त्यांचं सहजीवन सारंच बखूबी चितारलं आहे या गाण्यांत. प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी वेगळी, त्यातील माहोल वेगळा, त्यातील सौन्दर्य, आवेग वेगळा आणि त्याचा मनाला होणारा स्पर्श सुद्धा वेगळा.गुलजार साहेबांकरता काम करणारे पंचम खरंच वेगळे होते हे ठळकपणे अधोरेखित करणारी हि गाणी गुंतवून ठेवतात आपल्याला ! 

'आपकी आँखों में कुछ मेहेके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है’.. हे अतिशय रोमँटिक गीत. यातील एक ओळ आहे 'आप कि बदमाशियों के, ये नये अंदाज़ है '.. जेव्हा पंचमदांनी हि ओळ पहिल्यांदा ऐकली तेव्हा 'बदमाशीया' हा शब्द त्यांना खटकला आणि दीदी या शब्दाला हरकत घेतील अशी शंका वाटली. ते गुलजार साहेबांना म्हणाले, 'हा शब्द असभ्य वाटतोय , दीदींना संकोच वाटेल तो शब्द उच्चारताना'.. तेव्हा गुलजारजींनी खात्री दिली 'तू काळजी करू नकोस, तसं काही झालं तर मी सांभाळून घेईन आणि प्रसंगी मी तो शब्द बदलीन सुद्धा'.. 

गाण्याची तालीम झाली. गाणं रेकॉर्ड झालं. तेव्हा गुलज़ारजींनी लता बाईंना विचारलं 'गाणं कसं वाटलं' ? त्यावर त्यांनी मनापासून गाणं आवडलं असं सांगितलं. हे ऐकून गुलजारजींनी बदमाशिया शब्दाविषयी पंचमदांना वाटलेल्या भीतीबद्दल सांगितलं. तेव्हा मनापासून हसत त्या म्हणाल्या, 'एवढी वर्ष मी गात आहे पण हा नवा शब्द आता पर्यंत मला कधी गायला मिळाला नव्हता' .. 'आपकी बदमाशियों के ये नये अंदाज़ हैं' , म्हणतांना लताबाईंचं ते खट्याळ हसणं, ते टायमिंग इतकं जबरदस्त आहे कि ते शब्दांत सांगताच येणार नाही, ते अनुभवायलाच हवं. 

  गाण्यामागची गोष्ट 


पंचमदा असं म्हणायचे कि 'गाणी काही आपोआप घडत नाहीत. त्यासाठी खूप झटावं लागतं. एखादं लहान मूल कसं आपण वाढवतो तशी त्या गाण्याची निगा राखावी लागते. मूळ चाल तयार झाली कि ती शंभरदा गुणगुणली, हळूहळू मग त्या गाण्यात प्राण फुंकले कि मग ते गाणं उभं राहतं, चालू लागतं मग धावतं' ! म्हणून तर कित्येक गीतांना पुरेसा वेळ देऊन, संवेदनशीलता आणि मात्यापित्याचं प्रेमळ वात्सल्य मनांत भरून त्यांनी गीते हाताळली. गुलज़ार जी म्हणतात 'लहान मुलं बागडावीत तशी माझी गीतं पंचमकडे बागडली'. या दोघांनी एकेका गाण्यावर प्रचंड मेहनत घेतली, निर्मितीचा प्रत्येक क्षण अनुभवला त्यामुळे कायम त्यातून निर्माण झालेली सर्वोत्तम कलाकृतीच आपल्यापुढे आली !

खुशबू चित्रपटातील एक गीत आहे, 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये '.. लताजींच्या आवाजात हे गीत रेकॉर्ड झालं तेव्हा खूप जास्त वाद्यमेळ वापरला गेला. गाणं तर छान झालं होतं पण ते अंगाईगीत वाटेना. त्यामुळे गुलज़ार जी थोडे अस्वस्थ होते. या गाण्यातील वाद्यांचा इतका जास्त उपयोग व उच्च स्वरातील ध्वनी पातळी बरोबर नाही हि शंका त्यांनी पंचमदांना बोलून दाखवली. ते गाणं परत रेकॉर्ड करू यांत का, हेही सुचवलं पण हे सर्व ऐकून घेऊन पंचमदांनी त्यावर कृती मात्र काहीच केली नाही. त्यामुळे गुलज़ार साहेब अजूनच अस्वस्थ झाले. 

त्याच सुमारास दुसऱ्या एका चित्रपटातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लताजी आणि गुलज़ार साहेब भेटले. गुलज़ारजींनी आपल्या मनातील शंका दीदींना बोलावून दाखवली व परत एकदा गाणं रेकॉर्ड करूया अशी विनंती केली. दीदी ताबडतोब तयार झाल्या. मग काय एक व्हायब्रोफोन पार्श्व संगीतासाठी घेऊन 'दो नैनो में आसू भरे है निंदिया कैसे समाये ' हे गाणं परत रेकॉर्ड केलं गेलं. जसं हवं होतं अगदी तसं गाणं finally गुलज़ारजींना मिळालं व तेच गाणं चित्रपटांत घेतलं गेलं. आधी रेकॉर्ड केलेलं गाणं सिडीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. दोन्ही गाणी ऐकल्यावर आपल्यालाही चित्रपटातीलच गाणं जास्त भावतं !

©कविता सहस्रबुद्धे

Monday, September 5, 2022

 

G-pay वरच्या गप्पा 


'आई अग थोडी गडबड झाली, या महिन्यात पैसे जरा जास्त खर्च झाले'.. फोनवरचं पहिलं वाक्य ! मी आपलं ' no problem बेटा, it's ok' म्हणेपर्यंत पैसे जास्त का खर्च झाले याचा हिशोब समोरून चालत आला. 'अग काय झालं सांगू का ग्रोसरी जरा जास्त आणली या वेळी (अंडी, बटर, चीज, sauce, कॉफी, फळं, फार फार तर भांड्याचा liquid soap ही ग्रोसरी ) आणि ICICI बँकेनी 800 Rs कापले yearly charges माझ्या Demat account चे मग गडबड झाली सगळी'.. 'अरे ठीक आहे, होतात कधीतरी पैसे खर्च' असं मी म्हणेपर्यंत,' पण तू आत्ता पैसे नको ट्रान्सफर करुस पण एक तारखेला म्हणजे एक तारखेला नक्की कर, चल बाय मी जातोय कॉलेजला, जेवण झालंय माझं'.. असं म्हणत त्याने फोन ठेवला सुद्धा !

चार दिवसांपूर्वी ऑफिसच्या लंच टाइम मधला हा आमचा संवाद ... वाटतं घरापासून लांब राहून मुलं शिकतात हळूहळू! पण पुढच्याच क्षणी आईचं मन काही ऐकत नाही आणि लगेच Gpay वरून थोडे पैसे transfer होतात आणि ऑफिसचं पुढचं काम सुरू होतं !

संध्याकाळी घरी गेल्यावर notification दिसलं.. 'धन्यवाद अम्मीजान' ते वाचेपर्यंत दुसरं notification ' मुझे लगा ही था आप ऐसें ही कुछ करेंगी'.. ' क्यू आप ने मेरी बात नही सूनी ' .. हे वाचून मी फोनच लावला. 'काय रे , अम्मीजान वगैरे'.. माझं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच 'आई, कशाला पैसे ट्रान्सफर केले ? मी सांगितलं होतं ना नको करूस'.. मी म्हटलं 'अरे ठीक आहे, असू दे'.. तरी पुन्हा तेच. मला समजेना असं का म्हणतोय की पैसे का ट्रान्सफर केले; तर वाईट याचं वाटत होतं कि आता 1 तारखेला मी कमी पैसे ट्रान्सफर करणार.. असं दोन तुकड्यातला पॉकेट मनी पचनी पडत नव्हता हे लक्षात आलं...  ओह्ह असं आहे तर. मग म्हटलं चला विषयच बदलू.  

मी म्हटलं 'अरे मगाचचे मेसेज तर Gpay वर आले होते. तू तिथे का मेसेज पाठवतोय' ?..  'का ? काय झालं, चालतं तिथे मेसेज पाठवला तरी'.. 'अरे, बँकेतले लोकं वाचतील ना आपले मेसेज '.. 'अग आई ते कसे वाचतील' ? .. 'कसे म्हणजे, इथे जे काही लिहितो ते समजतं त्यांना'.... 'आई sssss , असं नसतं ग sss , त्यांना नाही समजत. त्यांना काय तेवढाच वेळ आहे का आपले मेसेज वाचत बसायला ?आणि ते का वाचतील आपले मेसेज' ... 'नशीब तिथे नाही लिहिलंस आई पैसे संपले'.... 'आई, असं असतं ना तर मग आपले मेसेज वाचणाऱ्या बँकेतल्या बाईनेच ट्रान्सफर केले असते तुझा अकाउंट मधून माझ्या अकाउंट मध्ये पैसे. तसं नाही ना झालं म्हणजे नाही वाचत ते आपले मेसेज'... 'तरी मला वाटतंय रे ते वाचतात आपले मेसेज'... 

त्याला वाटत असेल, 'अशी कशी आहे आई आपली ? काय काय imagine करत बसते'.... पण बरं आहे, असा समज असणं चांगलंच आहे. कधी कधी थोडं बुद्धू असल्याचं नाटक केलं ना तर भलती मजा येते हे मात्र नक्की. 

©कविता सहस्रबुद्धे

 

ऑफिस to घर via चांदणी चौक 

आज स्वतः पुलंनी जरी येऊन विचारलं कि तुम्हाला कोण व्हायचं आहे; मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर तर 'आम्हाला पुणेकरच व्हायचं आहे' असंच म्हणतील पुणेकर. अहो याच नाही तर पुढच्या जन्मात सुद्धा पुण्याला सोडायचं नाहीए आम्हाला.. आता पुणेकर म्हटलं कि 'जाज्वल्य अभिमान असणं' रक्तांत आलंच. मग काय दिल्लीच्या 'चांँदनी चौक'(उच्चारात फरक आहे ) एवढं ग्लॅमर आणि इतिहास नसला म्हणून काय झालं इथला 'चांदणी चौक' सुद्धा आमच्यासाठी तेवढाच महत्वाचा. पुण्याच्या पश्चिमेकडील कोथरूड या उपनगराने पूर्वी सर्वाधिक वेगाने वाढणारे उपनगर म्हणून ख्याती काय मिळवली त्याच वेगाने अजूनही त्याचा विस्तार सुरूच आहे. याच उपनगराच्या सीमेवर असणारा हा 'चांदणी चौक' सध्या फारच चर्चेत आहे. मग तो तिथल्या वाहतुकीच्या गोंधळामुळे असो किंवा WA वर फिरणाऱ्या या चांदणी चौकावरील विनोदामुळे, जसं आजवर चांगलं काम केल्यामुळे प्रसन्न झालेला बाप्पा कोथरूड / वारजे मध्ये घर देतो आणि दुसरीकडे चुकीच्या कामांची शिक्षा म्हणून हिंजवडीत नोकरी देतो जेणेकरून या चांदणी चौकातूनच रोज ये जा करायला लागावी. खरं तर आत्ता आत्ता पर्यंत चांदणी चौकातून ये जा करणं म्हणजे शिक्षा असं कधी वाटलंच नाही. उलट एकीकडे डोंगराच्या पायथ्याशी दिसणारं वेदभवन गणपती मंदिर, बाजूचा NDA कडे जाणारा शांत निसर्गरम्य हिरवा रस्ता, मुळशीकडे जातांना बंगलोर आणि मुंबईला जोडणाऱ्या महामार्गाचं होणारं दर्शन तर उजवीकडे दिसणारा शहराचा विस्तीर्ण परिसर. जवळच्या गार्डन कोर्ट हॉटेल मधून रात्रीच्या वेळी चमचमणारं आपलं शहर बघितलं आहे, कित्येक वेळा.. याच चांदणी चौकातून !

पण सध्या मात्र इथली परिस्थिती एकदम बिकट आहे. त्याचं ट्रेलर जssरा आधीच सुरु होतं, अलीकडच्या पाषाण सुस रोडच्या नव्यानं बांधण्यात येत असणाऱ्या पुलाच्या जवळ. नव्यानं बांधला जाणारा हा पूल आणि पुढे चांदणी चौकातला पडण्याच्या प्रतिक्षेत असणारा पूल व या दोन पुलांमध्ये ऑफिस मधून घरी येतांना रोज न चुकता अडकणारे आमच्या सारखे असंख्य प्रवासी असं चित्र आजकाल न चुकता रोजच रंगतं.. बरं त्यावर उपाय काय ? ते पण समजत नाही. 

तरी मी प्रयत्न केला माझ्या परीनं. वारजे बावधन क्षेत्रीय कार्यालय, PMC ऑफीस, कमिशनर ऑफिस, वाहतुक नियंत्रण शाखा सर्वकडे फोन झाला, विनंती झाली, वर्तमानपत्रातुन बोलून झालं, पण काही उपयोग झाला नाही. पालकमंत्र्यांना भेटेपर्यंत अहो त्यांची वर्णी थेट मंत्रिमंडळात लागली. इकडे प्रश्न तर दिवसेंदिवस गंभीर बनत होता आणि तो नक्की कोण सोडवणार हे कोडं काही सुटत नव्हतं. या ट्रॅफिक मुळे रोजच उशीर होत होता. ऑफिस मधून निघाल्यावर घरी पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो पण  एके दिवशी तर या अर्ध्या तासाच्या अंतराला चक्क तीन तास लागले; 18 किलोमीटर साठी चक्क तीन तास.. मग ठरवलं शेवटचा उपाय म्हणून २४ तास कार्यरत असणाऱ्या BJP ऑफिस मध्ये जाऊन माजी महापौरांना निवेदन द्यायचं. मग काय 'माझ्याबरोबर चल जरा' म्हणून नवऱ्याच्या मागे दोन तीन दिवस भुणभुण केली. पण गावाच्या सीमेवर ट्रॅफिकशी रोज लढणाऱ्या आमच्या सारख्यांची हालत 'तुम क्या जानो रमेस बाबू' असं झालं. आज उद्या करता करता जाणं बारगळत राहिलं.  

जणू त्या परमेश्वरालाच सगळी काळजी म्हणून तर काय कमाल योग जुळून आला... त्या रात्री दस्तुरखुद्द मुख्यमंत्रांचा ताफा पुण्याच्या दिशेने येतो काय, त्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकतो काय आणि नंतर सगळी सूत्र फटाफट हलतात काय सगळं स्वप्नवत... दुसऱ्या दिवशी सकाळी नवऱ्याने पेपर पाहिला आणि हुश्श केलं. त्याला माझ्याबरोबर कोठेही जावं लागणार नसल्याचा झालेला आनंद तसूभर जास्त होता. त्या दिवशी ऑफिसच्या बस मध्ये एकदम उत्साही वातावरण होतं, 'चला, finally आपला प्रश्न मिटणार आहे', या आनंदात सगळे हुरळून गेले होते. पूल पाडणार त्या दिवशी ऑफिसला सुट्टी मिळणार का ?  पूल पाडला तर रस्ता मोठा कसा होणार ? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यातून तोंडावर येत होते. रात्री काही सेकंदात पूल पाडणार त्यामुळे बहुतेक सुट्टी  काही मिळणार नाही असा निष्कर्ष पण काढला गेला... बरं, पूल पाडून लेन कशा वाढणार ? यावर बस चांदणी चौकात आल्यावर खिडकीतून बाहेर डोकावत काही जणांनी पाहणी केली. म्हणजे पुलाच्या खालचा रस्ता मोठा केला तर आपोआप पूलच पडेल म्हणून आधी पूल पाडून मग रस्ता मोठा करणार वगैरे वगैरे चर्चा रंगू लागल्या. 

चांदणी चौकातील त्या 'पुलाखालून' ऑफिसकरता रोज दोन वेळा जाण येणं होतं पण आज आवर्जून चांदणी चौकातील त्या 'पुलावरून' चक्कर मारून आलो तेही भल्या पहाटे, अहो म्हणजे गर्दी नसते तेव्हा म्हणून. काही वर्षांआधी इथून दिसणारं चित्र आज पुरतं बदललं आहे हे तर नक्की आणि त्या बदललेल्या चित्रांत खूप काही हरवलंय.. सध्या तरी इथला मोकळा रस्ता, आणि हरवलेली शांतता प्रत्येकालाच जाणवते आहे. येत्या काही दिवसांत पूल पाडल्यावर बदललेलं सुखद चित्र आता प्रत्येकालाच खुणावतं आहे सोबत कालच गडकरी साहेबांनी दाखवलेली स्वप्नही आहेत त्यामुळे 'चांदणी चौका' सोबत आपल्यालाही मोकळा श्वास घेता येणार कि नाही याचं उत्तर लवकरच मिळणार आहे !

©कविता सहस्रबुद्धे