Wednesday, August 19, 2020

दो नैना .. एक कहानी
थोडा सा बादल , थोडा सा पानी और एक कहानी ...

शब्द गुलज़ारजी,आवाज आरती मुखर्जी आणि पडद्यावर साकारलं आहे शबाना, नसीरुद्दिन शाह आणि छोटा जुगल हंसराज यांनी ! या गाण्याची खासियत म्हणजे या तिघांची गोष्ट एका धाग्यांत बांधली आहे या संपूर्ण गाण्याने ! प्रत्येक वेळी ऐकतांना डोळ्यांच्या कडा भिजवून जातं हे गाणं ...

आपल्या दोन लहान मुलींना झोपवताना शबानाजींच्या तोंडी असलेलं हे गीत .. मनांत विचारांच, भावनांच वादळ असतांना रात्रीच्या अंधारात गहिवरुन आलेलं मन आणि डोळ्यांमधून डोकावणारं तिचं दुःख...

छोटी सी दो झिलों में वो बेहेती रेहेती है
कोई सुने या ना सुने केहेती रेहेती है ..
कुछ लिखके और कुछ जुबानी ,
थोडा सा बदल थोडासा पानी और एक कहानी ...

आयुष्यातल्या ता विचित्र वळणांवर येऊन ठेपल्यावर पुढचा धूसर अंधुक झालेला रस्ता, आपल्या सुखी संसारात आलेलं हे वादळं आपल्याला कोठे घेऊन जाणार या विचाराने हादरलेली ती .. एका क्षणांत सर्व काही बदलून गेलं हे स्वीकारणं अवघड आहे हे जाणून स्वतःला सावरणारी ती ...

दुसरीकडे छोट्या जुगलला कर्तव्य जपण्यासाठी घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ आपल्यामुळेच आलंय हे जाणणारा तो .. एकीकडे स्वतःच सुखी चौकोनी कुटुंब तर दुसरीकडे एक निरागस भाबडं सत्य .. त्याची अबोल व्यथा !  त्या लहान जीवाची काहीच चूक नसतांना होणारी फरफट त्याला सहन न होणारी पण हात बांधलेले .. चूक मान्य करणं तर दूर पण ती चूक शक्य तेवढी दुरुस्त करणं सुद्धा जमेल कि नाही याची शाश्वती नसलेला .. सभोवताल दाट काळोख असतांना त्यांत धडपडणारा,वाट शोधणारा एक पिता , एक नवरा .. 

थोडीसी है जानी हुई थोडीसी नई
जहाँ रुके आंसू वही पुरी हो गयी
है तो नयी फिर भी हैं पुरानी ... थोडा सा बादल, थोडासा पानी और एक कहानी ..

'तिला' मायेनं मुलींना जवळ घेतांना, जोजवतांना पाहून त्याला आठवणारी त्याची आई .. कितीही आठवली, भेटावंस वाटलं तरी आतां कधीही न भेटणारी आपली आई .. तिच्या आठवणीने कासावीस झालेला तो इवला जीव .... त्याच्या जगातून ती दूर गेली असली तरीही तिचा स्पर्श , तिची माया, तिचं त्याच्या सभोवताल असणं त्याला अजूनही आठवतंय आणि म्हणूनच तो नकळत त्याच्या आठवणीत ओढला जातो .. त्याच जागी जिथे त्याच्या सुंदर आठवणी मागे सोडून आलाय तो ! पण त्याच आठवणीत एक वेदना सुद्धा आहे, तिला गमावल्याची !

एक ख़त्म हो तो दूसरी रात आ जाती है, होठों पे फिर भुली हुई बात याद आ जाती है 
दो नैनों कि हैं यह कहानी .. थोडा सा बादल , थोडा सा पानी और एक कहानी .. 

वेदनेचं , अश्रूंच हे लेणं .. तिघांचं दुःख एकाच वेळी मांडणारं , आपल्याला सांगणारं हे गाणं विलक्षण आर्त स्वरांत काळजाला भिडतं .. अपराधीपणाची सल मनांत घेऊन आयुष्यात त्या क्षणी, त्या जागी थबकलेला तो .. आईच्या आठवणींत हरवलेला ; आभाळाएवढं मनांत न मावणारं दुःख पेलणारा जुगल आणि आपले अश्रू सर्वांपासून लपवणारी, मनांतच कुढणारी कोलमडून पडलेली ती... प्रत्येकाची वेगळी गोष्ट .. भावनांचे इतके कंगोरे हाच या गाण्याचा आत्मा आहे , एक धागा आहे ज्याने या तिघांना एकत्र बांधलं आहे !!

गाणं शेवटाकडे जातं तेव्हा दिसते वर खिडकीत उभी असलेली डबडबलेले डोळे लपवणारी शबाना , आपल्या आईच्या आठवणीत घराबाहेरील लॉन मध्ये जातांना मधेच मागे वळून बघणारा जुगल आणि त्याच्या पाठीमागे चालत येणारा पण दारातच एक क्षण थबकलेला नसीर ... तीन वेगवेगळ्या जागी उभं राहून नियतीने आपल्या समोर मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे हे तिघे .... प्रत्येकाची एक वेगळी 'कहानी' ...

एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात गुलज़ार साहेब !!

No comments:

Post a Comment