Thursday, August 27, 2020

थोडा है थोडे कि जरुरत है ...

वाढदिवसानिमित्त सकाळी सकाळी मी माझ्या सासऱ्यांना शुभेच्छा द्यायला फोन केला. काही वर्षांपूर्वी पडलेल्या प्रथेप्रमाणे सिनेमाची ऑनलाईन तिकीट बुक करून त्यांना नागपूरला पाठवणं यावर्षी काही जमलं नाही या लॉक डाउन मुळे.नाहीतर सकाळचा वेळ फोनवर शुभेच्छा घेण्यांत, दुपारी थोडा आराम, मग सिनेमा आणि परत घरी येतांना आवडत्या रेस्टॉरंट मध्ये इडली डोसा व रात्री गप्पा मारत मस्त कॉफी असा भरगच्च कार्यक्रम असतो त्या दोघांचा ! पण या वर्षी सर्वकाही घरातंच..

'कसा गेला आजचा दिवस', हे विचारायला मी रात्री फोन केला. सहज बोलता बोलता सासरे बोलून गेले कि 'उद्या साजरा करणार आहे वाढदिवस, गिरीपेठेत' ! मी म्हटलं 'उद्या , ते कसं ?' तर म्हणाले, 'काकाजी काकीजीचा लग्नाचा वाढदिवस आहे ना उद्या, मग सगळे तिकडेच भेटणार आहोत आम्ही, माझा वाढदिवस आणि Anniversary साजरी करायला , चहा नाश्ता असा छोटासा प्लॅन आहे '!  यावर बेबी आत्या आमच्याबरोबर, मोहन काकाच्या गाडीत कोण, मग नलू आत्या कोणाच्या गाडीत, कोण कोण काय काय आणणार आहे हे पण सांगून झालं. थोडक्यात काय एकदम जबरदस्त planning झालं होतं ! तब्बल डझन भर मंडळी सहस्रबुद्धे लेआऊट मधून गिरीपेठेत जाणार होती तर ! आमच्या पिढीच्या WA ग्रुप वर तर कोणालाच याची भनक सुद्धा नव्हती आणि आम्ही म्हणायचो आमचं नेटवर्क स्ट्रॉंग !

सहस्रबुद्धे ले-आउट म्हणजे जवळपास एक दिड डझनभर टुमदार बंगल्यांची सोसायटी, माझे सासरे आणि त्यांच्या भावंडांची ! जवळच असलेल्या गिरीपेठेत मोठ्या घरी काकाजी राहतात बाकी सारी भावंडं सहस्रबुद्धे ले आउट मध्ये,एकमेकांच्या शेजारी ! त्यामुळे एकदम HAPPENING जागा आहे आमचं सहस्रबुद्धे ले आउट ! इथल्या जवळपास सर्वच घरातील मुलं पुणे, मुंबई आणि अमेरिकेत स्थायिक झालेली त्यामुळे हे सर्वजण इथे एकत्र राहून एकमेकांचे खऱ्या अर्थाने सवंगडी झाले होते, एकमेकांचं जगच जणू ! हो, आणि त्यांचा उत्साह आपल्याला सुद्धा लाजवेल असा. 'कारण मिळालं कि मनसोक्त साजरं करायचं, आणि नाही मिळालं कि शोधायचं',हाच इथला नियम ! संपूर्ण लॉकडाऊन मध्ये आम्ही सर्व भावंडं या सर्वांवर फोन वरून लक्ष ठेवून होतो. म्हणजे हे सगळे घरीच थांबतायेत ना , उगीच बाहेर कोठे जात तर नाहीयेत ना असं ! Landline नाही उचलला कि मोबाईल वर फोन करून 'कुठे आहात' हा प्रश्न ठरलेला, तेव्हा 'अंगणात बसलोय' असं उत्तर मिळायचं !

आता नियम थोडे शिथिल होत नाहीत तर लगेच हा प्लॅन ऐकून मी दचकले ! "अहो दादा .." अशी वाक्याची सुरवात करेपर्यंत मला थांबवत दादा म्हणाले,"अग सकाळी सकाळी जाणार आहे आम्ही,सहा वाजता".. "कायsss दादा, अहो अजून संचारबंदी चालू आहे सात ते सात. मग कसं जाणार सहा वाजता "? यावर ते म्हणाले " पोलीस यायच्या आधी जाणार आहोत आणि तसंही अंधार असतो सहा वाजता"...मला निःशब्द केलं दादांनी ! दिलीप प्रभावळकर हे वाक्य डोळे मिचकावून कसं म्हणतील तसं म्हणतांना साक्षांत दादा दिसले मला , आता काय बोलू पुढे. बरं सिनियर सहस्रबुद्धे सरांचं हे वाक्य ऐकून माझ्याच बाजूला बसलेले जुनिअर सहस्रबुद्धे सर यावर काही बोलायचं सोडून फक्त हसत होते. तरी शब्दांची जुळवाजुळव करून मी म्हटलं, "दादा, पोलिसांनी तुम्हाला सगळयांना पकडलं तर आम्ही पण नाहीये बरं का तुम्हाला सोडवायला तिथे".असं म्हणताच दादा हसतं म्हणाले,"अगं,नाही पकडणार.." तरीही माझ्या डोळयांपुढे चित्र उभं राहीलं..पोलिसांनी शिटी मारली थांबवलं तर एका मागोमाग एक गाड्या थांबतील. बरं आत मध्ये सगळे सिनियर सिटीझन. सगळे एकदम तयार होऊन, जॅकेट टोपी, जरी काठाची साडी, हातात फुलं, गजरे, केक,थर्मास, खाऊ आणि घड्याळांत सकाळचे सहा .. ओह माय गॉड ! आजचं झोपेतलं स्वप्न समोर दिसू लागलं मला !

दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट त्यांच्या Celebration च्या फोटोंनी सकाळ झाली आमची ! झोपेतून उठतं, डोळे चोळून जागं होईपर्यंत सहस्रबुद्धे लेआऊट टीम नऊ वाजेपर्यंत आपल्या साम्राज्यात परतली देखील होती, पार्टी करून ती सुद्धा भल्या पहाटे ... ग्रुप वर लिक झालेले हे फोटो पाहांत आमची जनरेशन हे नक्की आज गेले होते कि हे जुने फोटो आहेत यावर चर्चा करत होती इतकं सिक्रेट ठेवलं होतं हे मिशन सेलीब्रेशन आमच्या मोठ्या पिढीनी !!

मला खूप गंमत वाटली सर्वांची ! वयानुसार जास्त वेळ झोप लागत नाही म्हणून सकाळी सकाळी लवकर भेटायचं काय ठरवलं, कोणा एकाला भार नको म्हणून प्रत्येकानं जमेल ते काहीतरी करून नेलं अगदी केक सकट, कोणी बागेतली फुलं नेली, कोणी गजरा करून घेतला आणि anniversary couple ला फक्त चहा कॉफीची जबाबदारी सोपवली..भल्या मोठ्या अंगणात हिरवळीवर लांब लांब खुर्च्या टाकून ( social distancing follow करत ) किती दिवसांची साठलेली गप्पांची पोतडी उघडून मस्त धमाल केली  !

त्यांनी पाठवलेले फोटो पाहून वाटलं,भावंडांच हे प्रेम,भेटण्यातली हि ओढ, प्रेमाने एकमेकांसाठी करून नेलेला खाऊ, छोट्या छोट्या गोष्टींमधून गोळा केलेलं हे समाधान, एकमेकांसोबत घालवलेले हे अमूल्य क्षण, एकमेकांच्या चेहऱ्यावर पसरवलेलं हसू, सहवासातील सुख , पोटभर गप्पा, डोळे पाणावून जातील इतकं हसू आणि या क्षणांना कॅमेऱ्यात बंद करण्यातली मजा हेच तर आयुष्य आहे ना.. आणि हा आनंद सतत टिपत राहण्यात एक वेगळचं सुख आहे, समाधान आहे !

या विचारांच्या तंद्रीत मी हरवले होते इतक्यात landline वर रिंग वाजली. फोटोंमधून जे पोहचलं नव्हतं ते  सांगायला आणि 'पोलिसांनी आम्हाला पकडलं नाही' हे सांगायला दादांचाच आवर्जून फोन आला असणार हे मी ओळखलं व फोन घ्यायला उठले. मागे गाणं चालू होतं, 'थोडा है थोडे की जरूरत है , जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है '....



No comments:

Post a Comment