११६ चाँद कि राते...
'एक सौ सोला चाँद कि राते'.. गुलज़ार साहेबांच्या एक से एक कमाल गाण्यांनी आपल्याला बांधून ठेवणारा हा कार्यक्रम .. या सहा शब्दांमध्येच कार्यक्रमाला आकर्षित करायचं जबरदस्त सामर्थ्य आहे, 'बस नाम हि काफी है'.. आज दोन दिवस झाले तरी या कार्यक्रमाची रंगत मनात अजूनही ताजी आहे, मोगऱ्याच्या नुकत्याच उमललेल्या नाजूक कळ्यांसारखी. मला आठवतंय शाळेत असतांना मराठी विषय शिकवायला आम्हाला कानडे बाई होत्या. मराठी भाषेतलं सौन्दर्य,तिची नजाकत, तिची ताकत बाईंनी दाखवली. त्यांचं भाषेवरचे प्रभुत्व इतकं मोहित करणारं होतं कि त्या शिकवत असतांना फक्त ऐकत राहावं, त्यांचे शब्द कानात साठवून ठेवावेत असं वाटायचं. शाळेनंतर असा अनुभव फार कमी वेळा आला. परवा या कार्यक्रमाने नेमका तोच अनुभव दिला !
कधी कधी प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी काही नाती आपण मनातल्या मनांत जपत असतो. असंच एक नातं आहे आपल्या सर्वांचं.. शब्दांच्या जादूगाराशी, गुलजार साहेबांशी ! कवी, गीतकार, दिग्दर्शक, पटकथा लेखक या सर्वांमध्ये 'गीतकार' म्हणून तसूभर जास्त प्रेम करतो आपण त्यांच्यावर. आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर त्यांनी लिहिलेली गाणी नेहमीच आपल्याला जवळची वाटली. आपण आपल्या अनेक भावनांचं प्रतिबिंब कायम त्यांच्या गाण्यांमध्ये पाहिलं. कधी त्यांच्या गाण्यांनी प्रेमात पाडलं तर कधी एकटं असतांना सोबत केली. 'कभी जिंदगी का एक पल नहीं गुजरता , कभी जिंदगी एक पल में गुजर जाती है', हे त्यांनीच त्यांच्या शब्दांमधून सांगितलं. त्यांच्या गाण्यांतून आपण मुसाफिर म्हणून जगलो, प्रेम करायला शिकलो.. 'आनेवाला पल जाने वाला है , हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है', म्हणत जगणं शिकलो !
संवेदनशीलता,तरल भाव, आपल्या भावभावनांना वेगवेगळ्या रुपकांच्या कोंदणात सजवून त्यातील अर्थ अधिक गहिरा करण्याची त्यांची आगळी वेगळी शैली हे त्यांच्या गीतांचे खास वैशिष्ट्य. 'इन रेशमी राहोंमें, इक राह तो वो होगी, तुम तक जो पहुंचती है' यातला हळुवारपणा मनाला स्पर्श करतो. माचिस मधलं ‘पानी पानी रे’ किंवा ‘राझी’मधलं ‘मुडके ना देखो दिलबरो’ ऐकताना डोळ्यात टचकन् पाणी येतं. 'रुके रुके से कदम, रुक के बार-बार चले, क़रार लेके तेरे दर से बेक़रार चले', सारखी गाणी मन कासावीस करतात. 'मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने', सारखा आशावाद , 'थोडा है थोडे की जरुरत है', मधलं समाधान, 'वो शाम कुछ अजीब थी', मधलं गहिरेपण, 'भुले हुए नामों से कोई तो बुलाए' मधील आर्तता, 'आँखो में हमने आपके सपने सजाये है' मधलं प्रेम,'हजार राहे मुडके देखी', मधली बेवफाई, 'जाने क्या सोचकर नही गुजरा, एक पल रात भर नही गुजरा', मधलं एकटेपण, 'जीना तो सिखा है मरके, मरना सिखा दो तुम', या गाण्यांमध्ये मनाची नेमकी अवस्था गुलजार साहेबांनी सहज टिपून शब्दांमध्ये बांधली आहे.
एखादी देखणी कलाकृती बाह्यांगाने पाहून तिचं मोठेपण लक्षात येतं पण त्या कलाकृतीच्या मुळाशी जाण्याकरता, तिचा अभ्यास करण्याकरिता, त्यामागचा इतिहास उमजून घेण्याकरता, तिचं आंतरिक सौन्दर्य, गाभा समजून घेण्याकरता सोबत गाढा अभ्यासक लागतो. तसंच गुलजार साहेबांच्या शब्दांच्या जादूई दुनियेची अनोखी सफर घडवून आणायला, आपलं बोट धरून सोबत घेऊन जाणारा आश्वस्थ हात हवा. मला वाटतं ते काम वैभव जोशी बखुबी करतात.
तुम्हारे होंठ बहुत ख़ुश्क ख़ुश्क रहते हैं
इन्हीं लबों पे कभी ताज़ा शे’र मिलते थे
ये तुमने होंठों पे अफ़साने रख लिए कब से?
या त्रिवेणी मधलं सौन्दर्य असो किंवा,
दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन.. बैठे रहें, तसव्वुर-ए-जाना किये हुए..
दिल ढूंढता है, फिर वही फुर्सत के रात दिन..
या ओळींमधील 'तसव्वुर-इ-जाना' चा अर्थ असो तो ऐकावा खास वैभव जोशींकडून !
प्रत्येक वळणावर स्वतःलाच नवं वळण देत जाणारा किमयागार गुलज़ार यांचं वेगळेपण समजायला 'मै मुडा तो साथ साथ राह मूड गई', हि एक ओळच कशी पुरेशी आहे हे वैभव जोशी अलवारपणे उलगडून सांगतात. अनेकांसारखं लिहिलं तर गुलज़ार कसे हे सांगताना अंगूर मधल्या गाण्याचा दाखला ते देतात.
'बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी' आणि त्यानंतर येणारी सरगम .. 'प म प म ग म ग रे ग नि रे न नि म ग रे प्'... हि जागा पंचमदांनी अचूक हेरली आणि आशा ताईंना तिथे सरगम दिली .. म्हणजेच तो मौसम बिता हुआ आहे तर आठवायला वेळ तर लागणार ना.. ती वेळ म्हणजे हि सरगम .. एखादं गाणं प्राणांत ऐकू येणं, गात्रात वाजत असूनही चटकन ओठांवर न येणं हि खूण अधोरेखित करणारी हि गोष्ट, एक दास्ता ...'दर्द पुराना कोई याद पुरानी होगी, बिते हुए मौसम कि कोई निशानी होगी'..
रात्रीची वेळ.. फक्त दोघांची. बाहेर कोसळणारा पाऊस. खिडकीबाहेर पाहणारा तो, आपल्याच विचारात हरवलेला. त्याच वेळी ती येते, त्याला पाहते आणि अलगत त्याच्या जवळ जाऊन गुणगुणते "मेरी जाँ ..मुझे जाँ न कहो मेरी जाँ "... हे ऐकून आपण प्रेमात पडतो, ते गाणं आपलं होतं. बाहेरचा रिमझिम पाऊस, खिडकीतून दिसणारा पाऊस.. अंगणातील फुलांना भिजवणारा पाऊस, त्या दोघांचा पाऊस आणि न भिजताही आपल्याला चिंब भिजवणारा पाऊस.. श्रुती चितळे यांनी व्हायोलिन वर सादर केलेल्या या चिरतरुण गाण्याने हीच अनुभूती मिळाली.
'आप कि आँखों में कुछ मेहके हुए से राज है' ... हे अजून एक अजरामर गीत. 'आपकी खामोशियाँ भी आप कि आवाज है' .. या गाण्यातील गंमत, ती शरारत, तो खट्याळ अंदाज, ते मेहेके राज, प्रदीप्तो सेनगुप्तां यांच्या मेंडोलिन वर आणि त्यांना साथ देणाऱ्या श्रुती चितळे यांच्या व्हायोलिन मुळे अजून साजिरे वाटतात. 'आप की आँखों में कुछ मेहेके हुए से राज़ हैं ', या ओळीतील 'मेहेके' या शब्दावर श्रुती यांची व्हायोलिन वरची हरकत सिलसिला मधल्या 'ये कहांँ आ गये हम' या गाण्यातील दीदींच्या 'मुलायम' शब्दाच्या जवळ घेऊन जाते. 'तुम आ गये हो नूर आ गया है' .. हे अजून एक विलक्षण गीत. 'तू येताना स्वतःची अशी एक आभा घेऊन आलीस कि मला त्या उजेडात माझं अंधारलेले अस्थित्व, त्याच रूप स्पष्ट दिसू लागतं' हा छुपा अर्थ उलगडून सांगताना वैभव जोशींनी सांगितलेल्या 'नूर' शब्दाची छटा खरंच कमाल होती.
चांदनी चौक मध्ये घडणारं गीत म्हणून 'ऐसी नज़र से देखा उस जालिम ने चौक पर, हमनें कलेजा रख दिया चाकू की नौक पर', या ओळी लिहिणारे गुलजार साहेब या गाण्यात एक वेगळीच छटा दाखवून..'हो तेरी बातों में किमाम की खुशबू हैं, हो तेरा आना भी गर्मियों की लू हैं'.. म्हणत 'आँखें भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती है'...असं लिहून जातात आणि या गाण्यातील हे सगळे रंग हार्मोनियम आणि हार्मोनिकाच्या सुरांमधून सादर करतात निनाद सोलापूरकर ..आणि तिथेच वन्स मोअर ची दाद मिळते ! प्रत्येक माणसात आयुष्यभर निरागस राहण्याची इच्छा असते. म्हणूनच 'दिल तो बच्चा है जी', लिहिणाऱ्या गुलजार साहेबांमधले एक नितळ पारदर्शक लहान मूल गाण्याच्या या एका ओळीतच दिसतं.
'घेता किती घेशील दो कराने' अशी काहीशी अवस्था होऊन जाते जेव्हा कार्यक्रम शेवटाकडे जातो. मग मात्र उत्सुकता असते '११६ चाँद कि राते' या ओळींची... 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है'.. कितीही वेळा ऐकलं तरी मन भरणार नाही असे शब्द, ती कशिश, ते प्रेम, तो विरह... प्रत्येक वेळी ऐकताना तितकंच आतवर पोहोचतं हे गाणं. एकमेकांपासून दूर जाणं सुद्धा इतक्या रोमँटिक शब्दांत सांगता येतं.. कमाल आहे !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभव जोशींच्या नजरेतून गुलजार साहेबांना बघता आलं, शिकता आलं .. तीन तासांच्या या जादुई अनुभवानंतर 'जिंदगी गुलजा़र है' म्हणता म्हणता 'गुलजा़रही जिंदगी है' कधी झालं हे समजलंच नाही ...
© कविता सहस्रबुद्धे