Saturday, March 18, 2023

 Women's day .. 

Womanhood साजरा करायचा दिवस 
आजवर कितीतरी विशेषणं 
तिच्या मागे लागली 
स्वावलंबी, करारी, खंबीर, धाडसी 
प्रत्येक वेळी येणारं संकट 
वेगळं होतं 
अडचणी वेगळ्या होत्या 
तरी 'ती' आणि तिची जिद्द मात्र
तेवढीच ठाम होती !
प्रवास सोपा नव्हता,
उंबरा ओलांडून शाळेत जाणारा
रस्ता मुळीच माहित नव्हता 
तरी 'त्याने' कवाडं उघडली 
हाती पाटी देऊन 
'आनंदी' हि घडवली 
आलवणात जखडलेला तिचा 
श्वास मोकळा केला 
स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार
तिला परत मिळवून दिला .. 
म्हणून तर ती आता,
नदीसारखी अवखळपणे वाहते
कधी प्राजक्ताचं 
इवलं फुल सुद्धा होते  
तिच्यातील राधा समर्पण शिकवते 
तर कधी कभिन्न पहाडासारखी 
ठाम सोबतही करते 
'त्याचे' ऋण मनात ठेवून 
अनाथांची 'सिंधू' बनते,
कधी 'प्रकाश' वाटेवर
त्याला देखणी साथ देते
आजकाल विमानात ती
'पायलट' म्हणून भेटते
मोकळ्या स्वच्छ आकाशात, 
स्वप्नांची झेप घेते... 
तिच्या अस्तित्वाचा परीघ 
ती नजाकतीनं घडवते
'तू आहेस ना ...' हे ऐकताच  
समाधानानं भरून पावते!

No comments:

Post a Comment