दहावी बारावीच्या परीक्षा सुरु असल्याचं पाहून आपण आणि आपली मुलं यातून सुटल्याचा आनंद फार म्हणजे फारच अवर्णनीय असल्याचा फील येतोय सध्या.आता घरातली चिमणी पाखरं मोठी झाली आणि घरट्यातून उडून गेली आपलं जग शोधायला..सतत आपल्या आजूबाजूला लुडबुड करणारी,मध्ये मध्ये घुटमळणारी त्यांची आपल्याला झालेली सवय आता आठवत राहते. तरी आठवण आली की फोन मुळे ही अंतरं काही प्रमाणात का होईना लहान होतात. 'जेवलास का? काय जेवलास आज ? लवकर झोपावं रे रात्री, वेळेवर पोचतोस ना कॉलेजला', अशा सूचना, चौकशांनी सुरू झालेला फोन मग रंगत जातो. 'you need to work on this mom, किती टोकत असतेस', असं appraisal चं फील देणारं वाक्य सुद्धा ऐकावं लागतं कधी कधी. त्यावर माझं ठरलेलं वाक्य, 'अरे आईच आहे जिला हा जन्मसिद्ध अधिकार आहे टोकण्याचा, कारण त्या मागे तिचं प्रेम, माया, काळजी, ममता, वात्सल्य'.. पण या पुढचं वाक्य पूर्ण होऊच शकत नाही इतकी हास्याची कारंजी मग समोरून उडू लागतात..
Saturday, March 18, 2023
आता कालचीच मजा सांगते. चक्क चक्क एक पत्र आलं,फोटो पोस्ट कार्ड आणि ते सुद्धा कोची वरून.पाहिलं कोणाचं आहे आणि कोणासाठी लिहिलंय तर ते missing होतं. एवढंच काय पत्यावर फक्त प्लॅट नंबर होता, सोसायटीच्या नावासहित. आमच्या पोस्टमन काकांचंच कौतुक कि आडनाव नसूनही फक्त फ्लॅट नंबर वरून त्यांनी ते आणून दिलं आम्हाला. अक्षरावरून ओळखलं हे तर आई बाबांसाठी कोची वरून study tour वर असलेल्या आमच्या राजपुत्रानं लिहिलेलं .. क्या बात है !
हावरटासारखं वाचायला सुरुवात केली तर, 'हे बघा एक फोटो पोस्ट कार्ड. मागचा image एक fishing net चा आहे, मागे जहाज आहे. कोचीवरून hello म्हणायचं होतं आणि काहीतरी पाठवायचं होतं मग पत्र पाठवलं bye bye' आणि शेवटी 'मराठी मध्ये चुका अस्तील माफ करा', असं लिहिलं होतं तेही मुद्दाम चूक लिहून..
मग काय पत्र मिळताच त्याची पोच देण्यासाठी फोन केला 'अरे असं पत्र कोण लिहितं.. आणि मराठी मध्ये पत्र लेखन होतं ना शाळेत, विसरलास का'.. तर माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी म्हणाला, 'अरे उशिराच मिळालं पत्र तुम्हाला. शिवजयंती तर होऊन गेली, त्या दिवशी मिळायला हवं होतं'.... कारण काय तर कोचीमध्ये दहा रुपयांचा पोस्टल स्टॅम्प छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला मिळाला होता जो त्या पत्रावर होता. हे ऐकून मी निःशब्द झाले..
एक मात्र नक्की या वयाची मुलं पाहून वाटतं, आपल्या बोलण्यातून, वागण्यातून किती समजदार झाली आहेत, mature झाली आहेत तर दुसरीकडे त्यांचा खोडसाळपणा, मस्ती पाहून वाटतं, मोठं होताना आपल्यातील लहान मूल किती छान जपलं आहे त्यांनी ... आपल्यालाही हे लहान मूल जपता आलं पाहिजे !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment