माहेरवाशीण ..
गणपती गौरी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, मांगल्याचा, सर्वांनी एकत्र येवून साजरा करावयाचा सण ! आमच्याकडे दरवर्षी केयुर घरीच गणपतीची मूर्ती साकारतो आणि ती आम्ही माझ्या भावाकडे बसवतो. सासर आणि माहेर यांना जोडणारा हा एक रेशमी धागा आहे माझ्याकरता..
काही वर्षांपूर्वीची आई आजारी पडली व मनाने खूप खचली. 'Why me' या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी खूप धडपडली. देवाचं खूप करायची ती. आमच्या जुन्या घराजवळचं म्हातोबा मंदिर, कोथरूडचं मृत्युंजयेश्वर, तुळजाभवानी मंदिर,दशभुजा मंदिर, तुळशीबागेतलं श्रीगजानन महाराजांचे देऊळ, श्रीदगडूशेठ गणपती मंदिर या सर्व देवळांत नियमित जायची आई .. नवरात्रांत सुद्धा देवीचं रोज एक देऊळ हे ठरलेलं. पुण्यांत असं एकही देऊळ नसावं जिथे आई तिच्या मैत्रिणींसोबत गेली नाही. तिच्या या नियमांत ती असेपर्यंत कधीच खंड नाही पडला. आमच्या सर्वांच्या वतीनं देवाकडे तीच सारं काही मागायची.पण ती आजारी पडल्यावर चित्र बदललं. तिने अबोला धरला.. तिच्याच या देवाशी ! मग काय हा अबोला सोडवण्यातं यश आलं तिच्या लाडक्या जावयाला आणि मदतीला आले गणपती बाप्पा !
"आई, या वर्षी मी घरीच गणपती करतो, मग कराल ना तुम्ही सर्व तयारी, पूजा".. असं त्याने म्हणताच डोळ्यांतून आलेल्या तिच्या अश्रुंनी मूक संमती च दिली जणू. तेव्हापासून दरवर्षी केयूर घरीच मूर्ती साकारतो आणि आम्ही सगळे एकत्र गणेशोत्सव साजरा करतो. आता आई जाऊन पाच वर्ष झाली पण हि परंपरा आम्ही अजूनही जपली आहे. जणू या परंपरेच्या धाग्यात जोडून गेली जातांना ..
तेव्हा पासून दर वर्षी शाडूची माती घरी आली कि वेध लागतात गणरायाच्या आगमनाचे ! एकदा का त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रसन्न, गोड भाव दिसले की उत्साह अजूनच वाढतो. आदल्या दिवशी तयार मूर्तीकडे पाहिलं ना की नकळत मनातून संवाद सुरू होतो त्या बाप्पाशी. घरांत त्याच्या असण्याचा आभास खूप काही देऊन जातो. वर्षभराची शिदोरीच म्हणा हवं तर.. ते राजस रूपं डोळ्यांत साठवून डोळे मिटेपर्यंत सकाळ होते.
मग तिकडे दारांत रांगोळी काढून, तोरण लावून सजलेलं माझं ते घर, देव्हाऱ्यांंत फुलं हार निरांजन धूप समई अक्षता हळद कुंकू यांनी सजलेलं पूजेचं तबक, स्वयंपाक घरांत लगबगीनं प्रसादाचा स्वयंपाक करणारी वहिनी, आमची वाट बघत हॉल मध्ये येरझाऱ्या घालणारे बाबा आणि माझ्या पिटुकल्या भाचरांना पारंपारिक कपडे घालून तयार करणारा माझा भाऊ दिसू लागतो. गणपती बाप्पाच्या पायाला कुंकवाच बोट लावून ते भाळी लावतांना डोळे भरून येतांत. तबकात मूर्ती घेऊन मग आम्ही त्या घरी जाण्याकरता निघतो..
या वर्षी सुद्धा रिमझिम पावसांतून आमच्या गणरायाला घेऊन आम्ही घरी पोहोचलो. गाडी पार्क करून झाली आणि 'मूर्तीचं तबक तू घे' असं मी केयुरला म्हटलं पण त्यानी ते मला माझ्याच हातांत ठेवायला सांगितलं. लिफ्टनी वर पोहचलो. दारांत गणपतीबाप्पाला घेऊन आम्हाला पाहताच 'थांब, बोलावतो उषाला औक्षणासाठी' असं म्हणत केदार आत गेला. इकडे मी केयुरला व कांतेयला म्हटलं 'अरे कोणीतरी या पुढे आणि घ्या बाप्पाला' पण त्यांनी मलाच उभं केलं... इतक्यात केदार स्वतःच औक्षणाचं ताम्हन घेऊन पुढे आला आणि मागे उषा. "अरे तू नको ...." इतकेच शब्द तोंडातून बाहेर पडले तोवर खाली वाकून त्यानी माझ्या पावलांवर दूध आणि पाणी घातलं सुद्धा.. भाकर तुकडा ओवाळून टाकला, औक्षण केलं, सगळं एकदम सागरसंगीत ! बाबा आणि उषा सारं काही कौतुकाने पाहत होते. मी काहीच बोलू शकले नाही, फक्त डोळे भरून आले... पुढे दोन दिवसांनी येणाऱ्या गौरींच्या दिवशी असलेला माहेरवाशीणीचा मान मला मात्र आजचं मिळाला होता, बाप्पाच्या साक्षीनं !