ऋणानुबंध
कित्येक सरली वर्षे आता, आज अचानक जाणवले
थांबून मागे बघतांना हे, क्षणांत सारे आठवले
न्यारी दुनिया इथली अवघी, रंग वेगळे स्वप्नांचे
अनुभवाच्या शिदोरीतले, आले मदतीला सारे
हळूहळू ती रूळू लागली, नाती जुळली स्नेहाची
खटके काही उडले तरीही, खासियत आपुली प्रेमाची
रुजता इथल्या मातीमध्ये, थाप मिळाली मोठ्यांची
अलवार स्पर्शून गेली काही, नाती गहिऱ्या प्रेमाची
जडले काही बंध आगळे, या ऋणानुबंधाच्या गाठी
वडीलकीच्या भावनेतली, उब मिळाली सौख्याची
आनंदाने ओवीत गेलो, क्षण आठवणींत मोत्यांचे
ओंजळ अवघी भरून जाता, गंध पसरला चहूकडे
इवले घरटे इतुके अंगण, पल्याड होते घर वसले
आता बघता सभोवताली, इथेच जग दुसरे दिसते ...
No comments:
Post a Comment