खरं तर प्रेमाच्या कित्येक गोष्टी, किस्से आपण ऐकले आहेत, ऐकतो. प्रत्येक गोष्ट वेगळी, त्याच्यातील पात्रं वेगवेगळी पण धागा मात्र एकचं , प्रेमाचा ! याच धाग्यामध्ये गुरफटलेली प्रत्येकाची एक खास अशी प्रेमाची गोष्ट असते आणि प्रत्येकाला आपली गोष्ट खूप जवळची असते. 'प्रेमाची गोष्ट' हा शब्द ऐकतांच मला माझ्या आयुष्यात घडलेल्या 'त्या' गोष्टीची आठवण झाली. मी प्रेमात पडतांना अनुभवलेल्या त्या सुरेख क्षणांची गोष्ट, माझी 'प्रेमाची गोष्ट' !!
मोरपंखी दिवस होते ते, १९९७ साल. नुकतंच शिक्षण संपवून एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर मला नोकरी मिळाली होती. बाविसावं संपून तेविसावं लागलं होतं.सर्वसामान्य घरांत जे होतं त्याहून वेगळं आमच्या घरांतही झालं नाही, अहो म्हणजे आमच्या घरांत माझ्या लग्नाची कुजबुज सुरु झाली. शिक्षण नोकरी नंतर लग्न; साधारण असंच असतं नाही का ? 'ओळखीचं माहितीचं चांगलं स्थळ हवं 'या जुजबी अपेक्षेने आई बाबांकडून विषयाचा नारळ फुटला. माझा जन्म पुण्यातला. शिक्षण सुद्धा इथंच झालेलं त्यामुळे २२ वर्ष पुण्यात राहिल्यावर पुणे सोडायची माझी अजिबात तयारी नव्हती. अर्थात, त्यांत मला काही चूक वाटतं नव्हतं पण उगाच आगाऊ पणा नको म्हणून मी हा विचार आई बाबांकडे कधी बोलून नाही दाखवला. तसंही लगेच थोडं लग्न ठरणार होतं, म्हटलं बघू पुढचं पुढे. मी निर्धास्त होते, माझ्याच विश्वात होते !
'दिलवाले दुल्हनिया ......' ची जादूई पकड माझ्या पिढीवर अजून तशीच होती " मेरे ख्वाबों में जो आए, आके मुझे छेड जाए" गाणं गुणगुणत भटकायचं. आरशासमोर उभं राहून " ऐसा पेहेली बार हुआ हैं सतरा अठरा सालों में, अनदेखा अनजाना कोई आने लगा खयालों में" म्हणत लाजायचं. प्रेमांत पडणार याची इतकी पक्की खात्री होती कि आमिर माधुरी सारखं "छत प्यार कि दिलकी जमीन सपनोंकी ऊँची दिवारे, कलियां मोहोब्बत कि खिलने लगी आई मिलन कि बहारें", म्हणतं स्वप्नांमध्ये हरवायचं. असे ते जादुई मोरपंखी दिवस होते !
एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे माझं हे छोटंसं विश्व ! लग्नाचा विषय निघाला आणि महिन्याभरातच एक स्थळ आलं तेही अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या ओळखीने. मग काय, स्टुडिओ मध्ये साडी नेसून जाणं, फोटो काढणं हे पारंपारिक सोपस्कार झाले कारण पत्रिका आणि फोटो पाठवायचा होता त्यांच्याकडे. 'रीतीप्रमाणे आपण मुलाचा फोटो मागायचा नसतो', हे ऐकून ज्ञानांत भर पडली आणि आश्चर्य वाटलं. माझा फोटो बघणार मग मी का नाही पाहायचा, मागायचा मुलाचा फोटो? पण या माझ्या प्रश्नांना उत्तरंच नव्हती. मुलाची जी माहिती मिळाली त्यावरून मुलाचं नाव 'केयूर' आहे हे समजलं. मला नाव आवडलं. तो पुण्यात व्यवसाय करतो, शिक्षण छान होतं, नोकरीचा अनुभव पण होता आणि एकूणच समजलेली त्याच्या घरची, घरच्यांची माहिती सुद्धा उत्तम होती त्यामुळे आपसूकच गोष्टी जुळत गेल्या. पत्रिका फोटो पाठवून काही दिवस झाले होते. तिकडून काय उत्तर येतंय हि उत्सुकता होतीच.अशातच एक दिवस 'पत्रिका जुळते आहे आणि फोटो आवडला त्यामुळे आता मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवू ', असा निरोप आला. आता मात्र मला खरंच धस्स झालं.
इतक्या झटपट हि सगळी चक्र इतक्या वेगाने फिरतील असं वाटलं नव्हतं. आता काय करायचं ? हा प्रश्न समोर होताच. तडक उठले आणि हे सगळं सांगायला दीपाकडे गेले. दीपा म्हणजे माझी अगदी जवळची मैत्रीण. बी.कॉम नंतर तिचं लग्न झालं होत शैलेशशी. त्याचा प्रिंटिंगचा व्यवसाय आणि शनिवारपेठेजवळ त्याचं ऑफिस होतं. दीपाला हि बातमी सांगताना आमच्या दोघींच्या एक गोष्ट लक्षांत आली ; म्हणजे जवळजवळ उशिरा का होईना ट्यूबच पेटली म्हणा हवं तर कि केयूर पण तर शनिवार पेठेतच राहतो आणि त्याचं ऑफिस पण तिथेच आहे. 'हम्म ssss म्हणजे आता शैलेशला सांगायला पाहिजे,'असं एकदम डिटेक्टिव्ह टोन मध्ये म्हणत आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून मनसोक्त हसलो. आलेलं दडपण कुठल्या कुठे पळून गेलं. मग काय, लावलं आम्ही शैलेशला कामाला.
दुसऱ्या दिवशी ऑफिस मधून आल्यावर मी तडक दीपा शैलेशचं घर गाठलं कारण शैलेश कामगिरी फत्ते करून आला होता त्यामुळे त्याच्याकडून सविस्तर बातमी काढायची होती. तो चक्क क्लायंट बनून गेला होता केयूरकडे. त्याच्याशी बोलून काही वेळ त्याच्या ऑफिस मध्ये काढून त्याचं फोटो व्हिजीटींग कार्ड घेऊन आला होता पठ्ठा. म्हणजे छोटा का होईना कार्ड वरचा फोटो मिळाला होता केयूरचा. शैलेशकडून समजलेली माहिती उत्तम होती आणि तिथेच शैलेशनी ग्रीन सिग्नल दिला मला, ' मस्त आहे मुलगा , गो अहेड !' ... मग अजून काय हवं !
अखेर तो रविवार आला. संध्याकाळी मुलाकडची मंडळी येणार म्हणून घरी जोरदार तयारी सुरु होती. मी मात्र आईला, 'मी संध्याकाळी साडी नेसणार नाही, एखादा छानसा ड्रेस घालीन आणि तू पोहे सोडून काहीही दुसरं कर', हे आधीच सांगितलं होतं. इतक्यात फोन आला आणि समजलं कि केयूर एकटाच येणार आहे संध्याकाळी कारण त्याच्या आई बाबांचा नागपूरला छोटासा अपघात झाला होता व ते पुण्यात येऊ शकले नव्हते पण 'ठरलेला कार्यक्रम रद्द न करता तुम्ही भेटून घ्या आम्ही लवकरच येऊ तेव्हा भेटू', असा त्यांचा निरोप होता. केयूर एकटा येणार म्हटल्यावर माझं टेन्शन थोडं कमी झालं. आधी त्याला भेटता येईल आणि मग त्याच्या घरच्यांना त्यामुळे पुरेसा वेळ मिळेल असा एक विचार मनांत डोकावला.
"अरे रे अरे ये क्या हुआ मैने नहीं जाना, अरे रे अरे बन जाये ना कहीं कोई अफसाना ".. सकाळपासून हेच गाणं गुणगुणत होते मी. महिन्याभरापूर्वी 'लग्न' या शब्दाने आठ्या आल्या होत्या कपाळावर माझ्या आणि आज मात्र मी वाट बघत होते संध्याकाळ होण्याची, त्याला भेटण्याची. काय कमाल आहे नाही.. मी मलाच हसत होते.
संध्याकाळ झाली, तो आला. गच्चीतून पाहिलं, पाठमोरा दिसला. चेक्सचा शर्ट, निळी जीन्स हा पेहेराव, छान उंचापुरा. मग खिडकीतून घरांत येतांना पाहिलं, दिसायला गोरा, एकदम हँडसम लुक. म्हणतात ना ते 'Love at first sight' तो विलक्षण अनुभव मिळालाच. त्याला पाहता क्षणी चक्क प्रेमात पडले होते मी त्याच्या. 'बासsss , याच्याशीच लग्न करायचं', हे मी ठरवून सुद्धा टाकलं. आई, बाबा,काका, काकू माझी भावंडं सगळे त्याच्याशी गप्पा मारत होते आणि मी त्याला पाहात होते.त्याची बोलायची पद्धत, भाषेचा लहेजा, बोलतांना थोडे हिंदी शब्द जास्त वापरत होता पण प्रत्येकाशी अदबीने बोलत होता. त्याचा मनमोकळा लाघवी स्वभाव,समजूतदारपणा,साधं सरळ व्यक्तिमत्व सगळ्यांनाच भावलं. वयातील दरी मिटवून तो मोठ्यांशी ज्या पद्धतीने बोलत होता ते पाहून खूप छान वाटलं. सगळे खुश होते त्याला भेटून, पहिल्याच भेटीत आवडला सगळयांना तो. त्याच्या "बढिया " शब्दावर तर आई भलतीच खुश होती. तिच्या हातच्या रवा नारळाच्या लाडूंची तारीफ त्याच्या त्या एका शब्दांत काठोकाठ भरली होती. सर्वांबरोबर एकत्र छान गप्पा झाल्या. एकमेकांची माहिती समजली, आवडी निवडी कळल्या, मैत्रीची छान सुरवात झाली. एकूण काय तर मस्त झाला कार्यक्रम. मी तर "आज मैं उपर आसमान नीचे"... अशी आकाशांत उडत होते.
आठवडा झाला आणि मग हळूहळू उतरले मी जमिनीवर. समोरून काहीच उत्तर नव्हतं, निरोप नव्हता. तो मला नकार तर देणार नाही ना अशी भीती वाटू लागली. काय करायचं ? कसं समजेल त्याच्या मनांत काय आहे ते ? का अजून काही नाही कळवलं त्यानी ? हे प्रश्न फेर धरून नाचत होते आजूबाजूला. त्याला फोन करण्याची हिम्मत तर नव्हतीच आणि आपण कसा फोन करायचा हा पण एक प्रश्न होताच. माझे आई बाबा मात्र निवांत होते. "अग , त्याचे आई बाबा येतील आपल्याकडे तेव्हा समजेल, आता कसं सांगेल तो. त्याच्या आई बाबांनी अजून तुला पाहिलं नाहीए ते भेटले नाहीयेत'.. माझी अशी समजूत ते घालत होते पण मला काहीच पटत नव्हतं. मला त्याच्या मनांत काय आहे ते हवं होतं. म्हणतात ना , 'नशा ये प्यार का नशा है '...तसं झालं होतं काहीसं.
शेवटी मी मधुराला म्हणजे माझ्या लहान चुलत बहिणीला बोलावलं. आता काय करायचं ? या विषयावर आम्ही खोल चर्चा केली आणि उपाय शोधला. मी केयूर ला डायरेक्ट फोन करणं बरोबर नाही म्हणून आवाज बदलून 'मी काकू बोलते आहे', असं सांगून केयूरशी फोन वर बोलायचा आम्ही प्लॅन केला. मग घरून फोन नको करायला, टेलिफोन बूथ मधून करू असं ठरवलं. तेव्हा बूथच्या बाहेर फोन करणाऱ्यांची रांग लागायची म्हणून आरपार दिसणार नाही म्हणजेच दारावर फिल्म लावलेली असेल असं दार असलेला बूथ शोधला कारण आवाज बदलून बोलायचं म्हणजे फोन वर रुमाल टाकून बोलायला हवं हे ज्ञान आम्हाला सिनेमांमधून मिळालं होतंच. मग काय, गणपतीबाप्पाचं नाव घेऊन लावला एकदाचा फोन. 'नमस्कार, काकू बोलते आहे', असं सांगून विचारपूस केली. तुम्ही येऊन गेल्यावर परत काही बोलणं नाही झालं म्हणून फोन केला असंही सांगितलं. पण तरीही त्याच्या मनाचा थांग काही लागत नव्हता.आता अजून किती स्पष्ट विचारणार शेवटी आई बाबा नागपुर वरून पुढच्या आठवड्यात आले कि भेटू या निरोपावर फोन ठेवला.
असं प्रेमात पडणं, कोणाचीतरी इतकी वाट बघणं, त्याच काय उत्तर आहे हे माहित नसूनही त्याची इतकी ओढ असणं, त्याला भेटण्यासाठी इतकं आतुर होणं, 'ए मेरे हमसफर एक जरा इंतजार' या गाण्याची पारायणं करणं, अचानक कुठेतरी तो भेटेल म्हणून आजूबाजूला त्याला शोधणं, त्याच्यासाठी रोज एक कविता करणं हे खूपss आवडायला लागलं होतं मला. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत होते. प्रेमात पडणं इतकं सुंदर असतं हे मला तेव्हा समजलं आणि प्रेमात पडल्यावर किती हिम्मत वाढते आणि काय काय करायला लागतं ते सुद्धा !
पुढच्याच महिन्यांत त्याचे आई बाबा, दादा वहिनी घरी येऊन गेले. लग्न ठरलं, साखरपुड्याची तारीख ठरली. इथवर सगळं छान सुरळीत पार पडलं होतं. मुख्य म्हणजे माझं 'त्या' फोन चं भांड फुटलं नव्हतं आणि क्लायंट बनून गेलेल्या शैलेशला आता तो विसरून गेला असेल इतक्या दिवसांत या विचाराने मी निर्धास्त होते. तेव्हा आमची दोन्ही भांडी लवकरचं कशी फुटणार आहेत याची मला पुसटशी कल्पना पण नव्हती.
साखरपुड्याकरता हॉल बुक झाला, अंगठ्यांची,कपड्यांची खरेदी झाली. नातेवाईकांना आमंत्रण गेली. मी तर 'आपण स्वप्नांत तर नाही ना' याची अधूनमधून खात्री करत होते स्वतःशी कारण इतकं सगळं मनासारखं जुळून आलंय यावर माझा विश्वासच बसत नव्हता.ऑफिस मध्ये दोन दिवस सुट्टी मागितली होती मी साखरपुड्याकरता तर बॉस नि चार दिवस सुट्टी दिली. एकूण काय तर त्या वेळचा प्रत्येक क्षण मी साजरा करत होते. या एका नात्याने मी अनेक नवीन नाती जोडणार होते म्हणून थोडं दडपण आलं होतं खरं पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंद मला मी प्रेमात पडण्याचा होता. इतरांकरता आमचं लग्न 'अरेंज मॅरेज' होतं पण माझ्याकरता मात्र माझं 'लव्ह मॅरेज' होतं !
साखरपुड्याचा समारंभ अतिशय सुरेख झाला. दीपा शैलेश जेव्हा स्टेजवर आम्हाला शुभेच्छा द्यायला आले तेव्हा शैलेश ला पाहताच केयूर हसला आणि मला म्हणाला 'अरे हा क्लायंट म्हणून आला होता पण नंतर परत आलाच नाही ' तेव्हा केयुरला सगळं समजलं आहे याची खात्री पटली. 'काय काय पापड बेलले आहेत अरे तुझ्यासाठी ', असं मी म्हणताच केयूर मला म्हणाला, "आता अगदी खरं सांग, त्या दिवशी फोन कोणी केला होता "? बापरे याला हे पण समजलंssss कि तो फोन मी केला होता,माय गॉड मला इतकं लाजल्यासारखं झालं कि बस. 'कोणाला प्लीज सांगू नकोस ना', एवढंच कसंबसं बोलू शकले मी !
आतां बावीस वर्ष झाली लग्नाला पण आजही ते सगळं काही लख्ख आठवतंय. आपण किती वेडेपणा केला याचं नवल वाटतं कधीकधी कारण मुळांत असं काही करणं माझ्या स्वभावात नाहीए पण प्रेमात पडल्यावर दुसरं काहीच सूचत नाही, दिसत नाही हेच खरं ! खूप गोड आठवणीं आहेत या सगळ्या. आजही प्रेमाचा, लग्नाचा विषय निघाला कि मला माझी हि ' प्रेमाची गोष्ट ' नक्कीच आठवते आणि मग ओठांवर आपसूकच या ओळी येतांत,
"दोहराये जायेंगे ना ये लम्हात अब कभी, सपनोंमे भी ना छुटेगा ये साथ अब कभी
मिलती है जिंदगी जब आप मुस्कुराये हैं, आखों में हमने आपके सपने सजाये हैं ".....
No comments:
Post a Comment