Friday, January 10, 2020

सोविनिअर

आपल्या सगळ्यांच्या घरांत एक फ्रिज असतो आणि त्यावर सगळ्या देशांमधील आठवणी, सोविनिअर जणू 'सारा जहाँ हमारा' सांगत एकवटलेली असतांत.जगाच्या नकाशानंतर बहुदा फ्रीज वरच इतके सारे देश गुण्यागोविंदाने एकत्र मिरवत असावेत. आपण भेट दिलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून, विविध देशांमधून आपण तसेच आपले भाऊ बहिण आई बाबा मित्र मैत्रिणी यांनी आठवणीने आपल्यासाठी आणलेला हा ठेवा खरंच खूप अमूल्य असतो. अगदी ताडोबा, बांधवगडच्या जंगलापासून दिल्ली आग्रा लेह लडाख भूतान तसेच सिंगापूर जपान अमेरिका फ्रान्स इटली दुबई नॉर्वे लंडन अशा सर्व जागांवरून हे 'पाहुणे'आपल्या घरी येतात, घरातल्या एका महत्वाच्या जागी स्थानापन्न होतात आणि आपल्या घराचाच एक भाग होऊन जातात.आपणही कामाच्या गडबडीत धक्का लागून ते पडणार नाहीत याची काळजी घेत, मधेच कधीतरी कौतुकाची एक नजर टाकून 'किती छान दिसतातं नाही' असं मनोमन म्हणत असतो. एकूण काय तर असा फ्रिज वरचा नजारा प्रत्येकाकडेच असतो, तसा  माझ्याकडे पण आहे.

काल माझा भाचा आला होता, ऋषित वय वर्ष चार. या वयातील मुलं मुळातच खूप चौकस असतात, वेगवेगळ्या गोष्टी माहित करून घ्यायचं आकर्षण त्यांना असतंच. मग काय, जे दिसेल त्यावर प्रश्न आणि त्याची उत्तरं असं सुरु होतं. नुकतंच माझ्या भावाने, केदारने त्याला 'कणा' हि कुसुमाग्रजांची कविता गोष्टीरूपाने सांगून म्हणायला शिकवली. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा कानडे बाईंनी आम्हाला शिकवलेली हि कविता आज शाळा सोडून इतकी वर्ष झाली तरी अगदी तोंडपाठ आहे आणि थोडी जवळची आहे. त्याच्या बोबड्या बोलांमध्ये कवितेचे ते शब्द ऐकतांना खूप छान वाटत होतं, मजा येत होती. एकदा म्हणून झाली कविता पण 'परत एकदा म्हण ना पिलू', असा मी आग्रह केल्यावर त्याने परत एकदा ती संपूर्ण कविता त्याच उत्साहाने आपल्या बोबड्या बोलांत आम्हाला ऐकवली आणि मी रेकॉर्ड पण केली. इतक्या लहान वयांत त्याला हि कविता पाठ आहे हे पाहून मला कौतुक तर वाटलंच आणि कवितेची बाबांकडून आम्हा भावंडांकडे आलेली आवड त्याच्या पर्यंत रुजलेली पाहून समाधान सुद्धा ! दोन वेळा ऐकली कविता पण तरी समाधान मात्र झालं नव्हतं म्हणजे आपण म्हणतो ना 'पोट भरलं पण मन नाही भरलं' तसं काहीसं. म्हणून मी परत त्याच्या मागे 'पिलू एकदा म्हण ना कविता', असा जवळ जवळ हट्ट धरला. तो मात्र मिस्कील हसत होता पण पठ्ठा म्हणत काही नव्हता. मी जेव्हा परत म्हटलं 'एकदाच म्हण ना कविता, प्लीज '.. तेव्हा मात्र त्याच मिश्किल हसण्याने मान थोडी वाकडी करून "कविता" असं म्हणून खुद्कन हसला. मला म्हणजे त्याच्या कविता आत्याला जवळजवळ निरुत्तर केलं त्यानी. माझे बाबा हे सगळं पाहून हसत होते. मग म्हणाले मला, '"बघ, तू कविता म्हण म्हणून मागे लागलीस ना त्याच्या ".... लहान मुलं काय भन्नाट, विलक्षण विचार करू शकतात याचा अनुभव घेऊन मी थक्क झाले होते इतक्यात दुसरा किस्सा घडला.

मी आधी सांगितलेल्या त्या फ्रीज वरच्या सगळ्या सोविनिअर कडे पाहत पाहत त्याचे प्रश्न सुरु होते. त्या सर्व रंगिबेरंगी गोष्टींमध्ये आयफेल टॉवर त्याला थोडा ओळखीचा वाटला कारण केदारकडे सुद्धा फ्रिज वर असाच एक आयफेल टॉवर आहे. केदारने फ्रिज वरच्या याच सोविनिअरच्या मदतीने त्याला ताजमहाल, पिसाचा मनोरा, ऑपेरा हाऊस, ग्रेट वॉल ऑफ चायना या गोष्टींची नावं आणि त्या कोठे आहेत हे नुकतंच शिकवलं होतं. त्यामुळे त्याने अगदी सहज विचारलं त्याला," ऋषित, हे काय आहे ?" त्याने पण अगदी लगेच उत्तर दिलं "आयफेल टॉवर". "अरे वाह , मस्तच. काय काय शिकतंय ग माझं बाळ " असं म्हणतं मी त्याच कौतुक केलं. आपण शिकवलेलं समजावलेलं मुलांना कळलंय त्यांनी लक्षांत ठेवलंय हे पाहून किती छान वाटतं. बाबा म्हणून हि परीक्षा पास झाला होता केदार. त्याच उत्साहात त्याने दुसरा प्रश्न विचारला, " कुठे आहे सांग आयफेल टॉवर" ? मी पण तो काय उत्तर देतोय हे थोडं थांबून उत्सुकतेने पाहू लागले. तो काहीतरी विचार करत होता. केदारने परत एकदा विचारलं " कुठे आहे सांग हा टॉवर " त्यावर त्याच उत्साहाने त्याने "आपल्या घरी " हे उत्तर देऊन ज्या निरागस चेहऱ्याने आमच्याकडे पाहिलं त्यानंतर त्या क्षणी आम्ही एकमेकांकडे पाहून फक्त हसलो आणि त्याला मिठीत घेतलं ! कदाचित फ्रिजवरच्या आयफेल टॉवरला सुद्धा हे निरागस उत्तर ऐकून हसू आलं असावं !




No comments:

Post a Comment