आपण व्यक्त होतं असतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. कधी मनमोकळा संवाद असतो, कधी चित्रांमधून व्यक्त होण्यासाठी कॅनव्हास असतो. संगीत , गाणं , वाद्य यामधून व्यक्त होता होता कधी मनातलं कागदावर उतरवता येतं तर कधी मनातलं मनातच राहतं. एक दिवस अचानक I am fine असं अगदी सहज म्हणतांना उगाचच मनाला प्रश्न पडतो , खरंच सगळं fine आहे ?
तसं पाहिलं तर सगळं काही छान चालू असतं पण तरी सुद्धा काहीतरी चुकतंय असं आत कुठेतरी सलत असत पण नक्की काय ते सापडत नाही.. ते चाचपडायचा प्रयत्न केला तर दिसतो संवाद , असूनही हरवलेला संवाद. एकमेकांच्या जवळ असूनही कोणी कोणाला नीट पाहू शकत नाही इथे. थोडा वेळ थांबून 'कशी आहेस' हा प्रश्न विचारायला कोणाकडेच कोणासाठी वेळ नसतो. 'सहज आठवण आली म्हणून फोन केला', असे दुर्मिळ झालेले फोन मग हवेसे वाटू लागतात आणि कामापुरते आलेले फोन त्रासाचे वाटतात.
अशा परिस्थितीत मग आपला हळूहळू सुरु झालेला अलिप्तपणाकडचा प्रवास सुद्धा लक्षांत येत नाही मग अनेकांच्या. आतमध्ये चाललेली हि खदखद खूप प्रयत्नाने मग कोणाला सांगितली तर 'कसली sad आहेस तू ?' असं कोणी म्हणतं तर कोणी 'अपेक्षा करणं सोडून दे' हा सल्ला देतं. तू फार अपेक्षा करतेस हा शिक्का पण आपलेच जवळचे मारतात. मग प्रश्न पडतो, अपेक्षा करणं चूक आहे कि बरोबर ? काही केल्या ठामपणे उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही.
वाटतं, आपणच चुकतोय, आत्मविश्वास कमी होतो आणि ओळखीच्या चेहऱ्यांना सुद्धा टाळावं असं वाटू लागतं. समोरच्याला चांगलं वाटेल असं वागावं, कधी टचकन डोळ्यांत कारण नसतांना पाणी आलं तर ते पटकन लपवावं. छोट्या छोट्या गोष्टीचं वाईट वाटलं तरी कोणाला सांगू नाही आणि I am absolutely fine फक्त असं उत्तर द्यावं ...
आपल्याला तीन तीन भाषा येत असून सुद्धा अशा वेळी नक्की काय होतंय हे शब्दांत मांडता येत नाही. वाटतं , न बोलता समोरच्याला कळावं यार प्रॉब्लेम काय आहे तो .. खूप प्रश्न समोर नाचतात , त्रास देतात. आपला छोटासा प्रश्न ' कसा आहेस ' किंवा 'कशी आहेस' कोणाला मदत करू शकतो , बोलतं करू शकतो हेच विसरतो आपण.
पण मग जाणवतं , या आभासी जगांत सुद्धा काही जण आहेत ज्यांच्या कडे आपल्या साठी वेळ आहे हे समाधान मग मनावरचा ताण हळूहळू कमी करतं. तुमच्या मनांतील घालमेल तुम्ही व्यक्त न करताही कोणी समजून घेतय, तुम्हाला मदत करतंय या समाधानातच मग सूर बदलू लागतो.
सगळ्यांच प्रश्नांची उत्तर डॉक्टरकडे नसतात .. मग ती घरातील जवळच्या व्यक्तीकडे आणि जिवलग मित्र मैत्रिणींकडेच सापडतात.....
No comments:
Post a Comment