पुरणपोळी
आज आईची खूप आठवण आली.. पाच वर्ष झाली तिला जाऊन. तिची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आई अतिशय उत्तम स्वयंपाक करायची त्यामुळे अजूनही रोजच्या भाजी आमटीच्या चवीत पण मी शोधतं असते तिला. कधी कधी ऑफिस मधून खूप दमून कंटाळून घरी आले कि वाटतं गादीवर मस्त लोळावं आणि तिला सांगावं, 'आई, खूप भूक लागली आहे, खायला कर ना पटकन काहीतरी'.. आणि मग लक्षांत येतं कि हे ऐकायला आणि करायला ती नाहीये आता आजुबाजुला..
आता तिचा आवाज ऐकू येत नाही, तिला पाहता येत नाही, तिच्याशी बोलता येत नाही, कधी अचानक ती कुठे भेटतही नाही.तिच्या हाताची चव मात्र आठवतं राहते. तिच्या नसण्याची सल सतत बोचत असते आत कुठेतरी.
श्रावण महिना आला कि तिची आठवण अजूनच दाट होते, पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर मग ती येतच राहते.
दर शुक्रवारी तिच्या हातच्या मऊसूत पुरणपोळ्या आठवू लागतात. सकाळचा पुरण शिजतानाचा तो घमघमाट अन वेलचीचा दरवळकणारा वास. काठोकाठ पुरण भरून केलेला कणकेचा उंडा आणि मग प्रेमाने लाटलेली ती पहिली पुरणाची पोळी. तव्यावर मस्त खरपूस भाजून तयार झाली कि ताटांत घेऊन त्यावर सढळ हाताने सोडलेली तुपाची धार. त्या साजूक तुपात भिजून मग अजूनच देखणं रूप ल्यालेली ती पुरणाची पोळी !!
आई असतांना मी कधीच पुरणपोळी केली नाही पण तिच्या हातच्या पोळ्या मात्र मनसोक्त खाल्या.लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी आईच्या पुरणपोळी या प्रांतात मी कधीच लुडबुड केली नाही. तो कायम तिचाच मान समजून तिलाच करू दिल्या.
पण ती गेल्यावर मात्र श्रावणातला प्रत्येक शुक्रवार तिची आठवण घेऊन येतो आणि तिने केलेली पुरणपोळी सुद्धा तितकीच आठवते. आता स्वतःच पुरणपोळी करून खाण्यात ती मजा नाही....
No comments:
Post a Comment