Monday, July 15, 2019

मोठ्ठं बक्षीस


आज दहावीचा निकाल म्हणून उठल्यापासून कामांत लक्ष नव्हतं. शाळेमुळे आम्हा पालकांचा पण एक ग्रुप झाला होता. टेन्शन कमी करायच्या कारणाने या ग्रुप मधले आम्ही सगळे आई बाबा कॉफी आणि नाश्ता एकत्र करु या निमित्ताने सकाळी सकाळीच आमच्या नेहमीच्या जागी भेटलो. आम्हां सर्व आयांच्या डोक्यांत फक्त निकालाची चिंता होती. मुलांनी खरंच नीट केला होता ना अभ्यास परीक्षेच्या वेळी, आपण कुठे कमी तर नाही ना पडलो तयारी करून घेण्यांत कि ऑफिस मुळे पुरेसा वेळ नाही देऊ शकलो आपण ? या शंका मनांत घोळत होत्या ,जणू आमचा आत्मविश्वास त्या वेळी कुठेतरी दूर पळून गेला होता. गंमत म्हणजे दुसरीकडे बाबा हि कायम आनंदी राहणारी जमात अगदी 'कुल' गप्पा मारत होती. आम्हा आयांची डोकी एकीकडे टेन्शननी ' हॉट ' आणि सगळा बाबा ग्रुप मात्र  ' कुल '.. असं आमचं 'कूल अँड हॉट कॉम्बिनेशन' गप्पांमध्ये चांगलच रंगलं होतं ..

सर्वांबरोबर चहा नाश्ता गप्पा उरकून आम्ही दोघं घरी परतलो तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. निकाल एक वाजता लागणार होता. आतां अजून दोन तास कसे काढणार ? या विचारांमध्ये आम्ही होतो. इतक्यात खेळून आलेल्या माझ्या मुलाने त्याचे सगळे मित्र मैत्रिणी निकालाच्या भीतीने कसे टेन्शन मध्ये आहेत, कोण काय काय म्हणालं याचा सविस्तर वृत्तांत दिला. त्यावर 'तुला काय वाटतं, किती मिळतील रे मार्क तुला', हा प्रश्न मी त्याला विचारला ज्यावर त्याने ' बाबा बघ रे, हि कालपासून मला हाच प्रश्न विचारून बोअर करते आहे', अशी हसून प्रतिक्रिया दिली व तो अंघोळीला निघून गेला.

खरं तर , या वर्षी बदललेला दहावीचा अभ्यासक्रम, सतत बदलत असलेला पेपर पॅटर्न, 'इंटरनल' वीस गुण धरले जाणार नाहीत हा नवीन नियम व मराठी विषयाचे लिहून पूर्ण न होणारे लांबलचक पेपर या सर्व चढ उतारांमधून फक्त  तोच नाही तर सगळेच गेले होते. सर्व शिक्षकांनी मुलांना उत्कृष्ट प्रोत्साहन दिलं होतच आणि मुलांनी सुद्धा मनापासून प्रयत्न केले होते. अभ्यासाबरोबर इतर गोष्टी सांभाळताना काय काय करायचं काय नाही , किती वेळ कोठे घालवायचा हि आई बाबांनी दिलेली मोकळीक मुलांनी खूप छान सांभाळली होती त्यामुळे ओरडायला, रागवायला कोठे जागाच नव्हती. अधूनमधून थोडी जाणीव करून द्यावी लागायची इतकंच. नववीतून दहावीत जातांना एप्रिल पासून सुरु झालेली शाळा, त्या आधी पुस्तकं वेळेत मिळणार कि नाही याची धाकधूक, क्लासची प्रवेश प्रक्रिया , 'नववीतून दहावीत जातांना' या मार्गदर्शनपर कार्यशाळेला दिलेली भेट, या साऱ्या गोष्टी एकदम आठवल्या, तो संपूर्ण प्रवास आठवला. पालक म्हणून असलेली हि धास्ती, विद्यार्थी दशेत मात्र इतकी नव्हती हे खरं.

थोड्या वेळांत भूक लागली हे टुमणं सुरु होईल या अंदाजाने मी स्वयंपाकघरात गेले. आंब्याचा रस आणि गरम गरम पुरी असा आजचा मेनू होता. आंब्याचा रस तयार होता. मी पुऱ्या तळायला घेतल्या. 'कांतेय, चल ये जेवायला,तयार आहे सगळं'.  टम्म फुगलेल्या पुऱ्या , वाटीत काठोकाठ भरलेला आंब्याचा रस, त्यावर तूप असं ताट तयार होतं. 'देवापुढे ठेव ताट , नैवेद्य दाखव आणि कर सुरु जेवण ', असं मी म्हणताच, तो म्हणाला,'आज काय आहे ?'  मी हसून म्हटलं, 'तुझा निकाल ' तर म्हणाला ' मग त्याच्या आधीच गोड नैवेद्य ?' मी म्हटलं , 'अरे हो, निकाल काय छानच येणार आहे तुझा ' तर म्हणतो कसा , ' मग सारखं का विचारतेस किती मार्क पडतील म्हणून ? मला अगदी मनापासून हसू आलं.

जेवणं झाली, सगळं आवरलं आणि मग एक वाजण्याची वाट पाहत बसलो. बरोबर एक  वाजता निकाल लागला. online निकाल बघण्यात वेगळीच मजा असते नाही. आपला परीक्षा क्रमांक टाकून enter हे बटन दाबायचं आणि उत्सुकतेने स्क्रीन वर पाहायचं, नव्वद टक्के ! हुश्श .. अगदी मनासारखा निकाल लागला होता.  घरातील सर्व जण एकदम खुश होते. फोन , मेसेज यावरून शुभेच्छा येऊ लागल्या. त्याच्या सगळ्याच मित्र मैत्रिणींना खूप छान मार्क मिळाले होते. अभ्यास, दंगा मस्ती, खेळ सगळं काही सांभाळून त्यांनी बाजी मारली होती. खूप खूप कौतुक वाटलं सर्वांच !!

माझे बाबा माझ्या फोनची वाट पाहात असतील म्हणून मी आत गेले, त्यांना फोन लावायला तर आत कांतेय फोन वर त्यांच्याशीच बोलत होता. मी तिथेच थांबून तो काय बोलतोय हे ऐकू लागले. " अहो आबा, तुम्ही म्हणालात ना कि पंच्याऐंशीं टक्के मिळतील असं वाटतं होतं तुम्हाला पहा जास्त पडले मार्क, मामासारखेच. एक सांगू का आबा, हे मार्क आईमुळेच पडले आहेत. हो आबा.... अभ्यास जरी मी केला तरी तो कसा करायचा ते आईनेच सांगितलं, तिने मला वेळापत्रक बनवून दिलं आणि मुख्य म्हणजे मी सांगितलं तेव्हा तेव्हा तिने सुट्टी घेतली. मला आठवतंय , ऑफिस मध्ये सगळे तिला नेहमी चिडवायचे, मी पाचवीत होतो ना तेव्हापासून कि परीक्षेला कसली सुट्टी घेतेस, अजून पाचवीत तर आहे कांतेय पण आबा तेव्हापासून मला आठवतंय आई प्रत्येक परीक्षेला माझ्यासाठी सुट्टी घेत होती. तिला आपोआप समजतं माझा अभ्यास तयार आहे कि नाही ते. मग ती त्याप्रमाणे उजळणी करून घेते. मी आईला सांगितलं नाहीये हे कि तिच्यामुळे मिळालेत हे मार्क पण तुम्हांला सांगतोय, हे आपलं दोघांच सिक्रेट आहे " .... हे ऐकतांच फोन वर बोलणारी त्याची पाठमोरी छबी मला पुसट दिसू लागली. त्याच्या निरागस शब्दांमधून मला माझं सर्वात मोठ्ठं बक्षिस मिळालं होतं  !!


-कविता सहस्रबुद्धे










 

No comments:

Post a Comment