Tuesday, November 19, 2019

शाळा

आनंदाच्या अनेक क्षणांनी
सजले आहे इथले अंगण
ओंजळ वाहे आठवणींनी
पुरेल शिदोरी आयुष्यभर

क्षणकाळाची इथली नाती
कि अवघ्या जन्माची गुंफण
वळून पाहता मागे अजूनी
खुणावते मज रम्य बालपण !!!














Wednesday, November 13, 2019

गोष्ट

गोष्ट तशी छोटीच होती
तुझी आणि माझीच होती
मी तुला सांगितली नाही
तुलाही ती कळली नाही

चोरून तुला बघतांना
तेव्हा ओठांवरती हसू होतं
तू हि वळून जरा मला
बघावं असं मनांत होतं

ते वय जरा नाजूक होतं
मन फार भावूक होतं
'ए मेरे हमसफर' म्हणतांना
थोडं वाट पाहणं होतं

अचानक इतक्या वर्षांनी
आज सारं का आठवलं ?
'तो सध्या काय करतो'
जेव्हा हळूच मनानं विचारलं

असतो अगं तो इथेच
अधून मधून भेटत असतो
फेसबुकच्या भिंतीवरती
खूप काही लिहीत असतो

त्याची गझल त्याची कविता
खूप काही बोलत असते
फार फार वर्षांपूर्वीची
झलक थोडी त्यांत दिसते

इतकी वर्ष गेल्यावर
आतां ओळख पटू लागते
त्याची आणि माझी जूनी
गोष्ट मात्र एकच असते  !!!

 

Wednesday, August 14, 2019

गुरुपौर्णिमा

शाळेत असतांना काय मस्त साजरा करायचो हा दिवस ! आपल्या लाडक्या शिक्षकांसाठी गजरा, गुलाबाची फुलं , चाफ्याची फुलं, निशिगंध आठवणीने न्यायचो. कार्यक्रमांत छोटंस भाषण करायचो , एखादी कविता वाचून दाखवायचो. या सर्वामागे एक भावना असायची. त्यांनी जे भरभरून दिलं त्या ऋणांत राहण्याची, आपलं प्रेम आपला आदर व्यक्त करण्याची.

ती शाळा आतां खूप मागे राहिली. प्रथम आई वडिलांनी शिकवलं नंतर शिक्षकांनी. कधी मोठ्या भावंडानी शिकवलं तर कधी घरातील मोठ्यांकडून शिकलो. बाहेर पडलो तर जगाकडून शिकलो आणि कधी निसर्गाकडून. प्रत्येक ठेच काहीतरी शिकवून गेली. आपण आपली ओंजळ कायम उघडीच ठेवली म्हणून आयुष्याच्या प्रत्येक  वळणावर जे कोणी भेटलं त्या प्रत्येकाकडून काही ना काही आपण वेचत आलो आणि स्वतःला समृद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिलो. असं म्हणतात आपण कायम शिकत राहिलं पाहिजे कारण तीच जगण्याची खरी ओळख आहे.

आजकाल आपली मुलं सुद्धा आपले गुरु आहेत. काहीही अडलं कि विचार त्यांना. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप कशातही अडलं कि आपल्या मुलांकडून शिकतो आपण. मुख्य म्हणजे आपलं अज्ञान त्यांना दाखवायला लाजही वाटत नाही आपल्याला. लेटेस्ट फॅशन , एखादा गेम, मोबाईल मधलं एखादं ऍप, एखाद्या शब्दाचा उच्चार, एखादा हटके नवीन पदार्थ किंवा एखादं प्रसिद्ध इंग्लिश song शिकवतो हा गुरु आपल्याला, छोटा असला तरी आपल्यासाठी महागुरु असतो हा आपला हक्काचा ! अजूनही आपण त्याचे गुरु आहोत हे विसरून जातॊ तो आणि मनापासून शिकवत असतो आपल्याला, या आभासी व Technical जगात काय चाललंय ते   :)

दुसरी असते आई. अहो आई आणि अगं आई साठी तर आपण कायम लहान असतो त्यामुळे त्यांच्या असंख्य प्रेमळ सूचना, रागावणं ऐकत ऐकत आपणही आपल्याला तयार करत असतो. खरे पैलू कसे पाडायचे हे त्यांनाच माहित असतं, हिऱ्याची खरी ओळख तर त्यांनाच असते. त्यांच्या अंगावरील प्रत्येक सुरकुती जणू एक अनुभव सांगून शिकवत असते. आपल्याला मोठी बहीण, मावशी असली कि त्यांनाही यांचीच गादी चालवायची असते.

गुरु शिष्याचा नात्याचा हा धागा असाच मोठा होत जातो.

मग येतो नवरा. मोठा असतो वयानं,अनुभवानं पण गुरुचा दर्जा फार कमी वेळा दिला जातो.  एक तर त्याला शिकवायला चान्स मिळत नाही आणि मिळालाच तर आपण शिकत नाही !

पुढचा लाडका गुरु म्हणजे आपल्या मैत्रिणी. आपला खूप वेळ आपण त्यांच्या सोबत घालवतो. आपले स्ट्रॉंग आणि वीक दोन्ही पॉईंट्स त्यांना माहित असतात. आपल्या प्रत्येक मैत्रिणी कडून आपण काही न काही नक्की शिकत असतो. कोणाचा लाघवी स्वभाव, स्फटिकासारखं निर्मळ स्वच्छ मन आपल्यालाही अंतरंगात डोकवायला सांगत. मदतीला सदैव तयार कसं असावं हे कोणी आपल्या वागण्यातून दाखवत तर कोणी साक्षात अन्नपूर्णेचा आभास वाटावा इतकं रुचकर नातं पोटातून मनापर्यंत नेतं ! कौतुक कसं करावं हे प्रात्यक्षिक पाहून आपलंही मन हेलावतं. अडचणीत सुद्धा ठामपणे उभं राहणारं कोणी वादळांत उभं राहणं शिकवतं तर कोणी नात्यांना हळुवार जपायला. मनांत साठलेलं मोकळेपणाने व्यक्त होऊन कोणी नात्यातील ओलावा जपायचा प्रयत्न करणं शिकवतं तर कोणी जिद्दीने एखादी गोष्ट साध्य कशी करावी हे आपल्या प्रयत्नांमधून दाखवून देतं .. जबाबदारीचं ओझं न मानता त्याला आनंदाने कसं पेलावं हे अगदी सहज पणे इथे बघायला मिळतं . इथे प्रत्येकीचा एक खास गुण एकमेकींवर अवलंबून राहणं शिकवतो. मोत्यांच्या सरीतला प्रत्येक मोती महत्वाचा कारण सर्व मोती एकत्र आल्यावरच त्याचा सुंदर सर बनतो आणि मैत्री हेच तर शिकवते.
 

Monday, August 12, 2019


पुरणपोळी

आज आईची खूप आठवण आली.. पाच वर्ष झाली तिला जाऊन. तिची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आई अतिशय उत्तम स्वयंपाक करायची त्यामुळे अजूनही रोजच्या भाजी आमटीच्या चवीत पण मी शोधतं असते तिला. कधी कधी ऑफिस मधून खूप दमून कंटाळून घरी आले कि वाटतं गादीवर मस्त लोळावं आणि तिला सांगावं, 'आई, खूप भूक लागली आहे, खायला कर ना पटकन काहीतरी'.. आणि मग लक्षांत येतं कि हे ऐकायला आणि करायला ती नाहीये आता आजुबाजुला..

आता तिचा आवाज ऐकू येत नाही, तिला पाहता येत नाही, तिच्याशी बोलता येत नाही, कधी अचानक ती कुठे भेटतही नाही.तिच्या हाताची चव मात्र आठवतं राहते. तिच्या नसण्याची सल सतत बोचत असते आत कुठेतरी.

श्रावण महिना आला कि तिची आठवण अजूनच दाट होते, पावसाच्या प्रत्येक सरीबरोबर मग ती येतच राहते.
दर शुक्रवारी तिच्या हातच्या मऊसूत पुरणपोळ्या आठवू लागतात. सकाळचा पुरण शिजतानाचा तो घमघमाट अन वेलचीचा दरवळकणारा वास. काठोकाठ पुरण भरून केलेला कणकेचा उंडा आणि मग प्रेमाने लाटलेली ती पहिली पुरणाची पोळी. तव्यावर मस्त खरपूस भाजून तयार झाली कि ताटांत घेऊन त्यावर सढळ हाताने सोडलेली तुपाची धार.  त्या साजूक तुपात भिजून मग अजूनच देखणं रूप ल्यालेली ती पुरणाची पोळी !!

आई असतांना मी कधीच पुरणपोळी केली नाही पण तिच्या हातच्या पोळ्या मात्र मनसोक्त खाल्या.लग्नाला पंधरा वर्ष झाली तरी आईच्या पुरणपोळी या प्रांतात मी कधीच लुडबुड केली नाही. तो कायम तिचाच मान समजून तिलाच  करू दिल्या.

पण ती गेल्यावर मात्र श्रावणातला प्रत्येक शुक्रवार तिची आठवण घेऊन येतो आणि तिने केलेली पुरणपोळी सुद्धा तितकीच आठवते. आता स्वतःच पुरणपोळी करून खाण्यात ती मजा नाही....

आपण व्यक्त होतं असतो कोणत्या ना कोणत्या माध्यमातून. कधी मनमोकळा संवाद असतो, कधी चित्रांमधून व्यक्त होण्यासाठी कॅनव्हास असतो. संगीत , गाणं , वाद्य यामधून व्यक्त होता होता कधी मनातलं कागदावर उतरवता येतं तर कधी मनातलं मनातच राहतं. एक दिवस अचानक I  am fine असं अगदी सहज म्हणतांना उगाचच मनाला प्रश्न पडतो , खरंच सगळं fine आहे ?

तसं पाहिलं तर सगळं काही छान चालू असतं पण तरी सुद्धा काहीतरी चुकतंय असं आत कुठेतरी सलत असत पण नक्की काय ते सापडत नाही.. ते चाचपडायचा प्रयत्न केला तर दिसतो संवाद , असूनही हरवलेला संवाद. एकमेकांच्या जवळ असूनही कोणी कोणाला नीट पाहू शकत नाही इथे. थोडा वेळ थांबून 'कशी आहेस' हा प्रश्न विचारायला कोणाकडेच कोणासाठी वेळ नसतो. 'सहज आठवण आली म्हणून फोन केला', असे दुर्मिळ झालेले फोन मग हवेसे वाटू लागतात आणि कामापुरते आलेले फोन त्रासाचे वाटतात.

अशा परिस्थितीत मग आपला हळूहळू सुरु झालेला अलिप्तपणाकडचा  प्रवास सुद्धा लक्षांत येत नाही मग अनेकांच्या. आतमध्ये चाललेली हि खदखद खूप प्रयत्नाने मग कोणाला सांगितली तर 'कसली sad आहेस तू ?' असं कोणी म्हणतं तर कोणी 'अपेक्षा करणं सोडून दे' हा सल्ला देतं. तू फार अपेक्षा करतेस हा शिक्का पण आपलेच जवळचे मारतात. मग प्रश्न पडतो, अपेक्षा करणं चूक आहे कि बरोबर ? काही केल्या ठामपणे उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही.

वाटतं, आपणच चुकतोय, आत्मविश्वास कमी होतो आणि ओळखीच्या चेहऱ्यांना सुद्धा टाळावं असं वाटू लागतं. समोरच्याला चांगलं वाटेल असं वागावं, कधी टचकन डोळ्यांत कारण नसतांना पाणी आलं तर ते पटकन लपवावं. छोट्या छोट्या गोष्टीचं वाईट वाटलं तरी कोणाला सांगू नाही आणि I  am absolutely fine फक्त असं उत्तर द्यावं ...

आपल्याला तीन तीन भाषा येत असून सुद्धा अशा वेळी नक्की काय होतंय हे शब्दांत मांडता येत नाही. वाटतं , न बोलता समोरच्याला कळावं यार प्रॉब्लेम काय आहे तो .. खूप प्रश्न समोर नाचतात , त्रास देतात. आपला छोटासा प्रश्न ' कसा आहेस ' किंवा 'कशी आहेस' कोणाला मदत करू शकतो , बोलतं करू शकतो हेच विसरतो आपण. 

पण मग जाणवतं , या आभासी जगांत सुद्धा काही जण आहेत ज्यांच्या कडे आपल्या साठी वेळ आहे हे समाधान मग मनावरचा ताण हळूहळू कमी करतं. तुमच्या मनांतील घालमेल तुम्ही व्यक्त न करताही कोणी समजून घेतय, तुम्हाला मदत करतंय या समाधानातच मग सूर बदलू लागतो.

सगळ्यांच प्रश्नांची उत्तर डॉक्टरकडे नसतात ..  मग ती घरातील जवळच्या व्यक्तीकडे आणि जिवलग मित्र मैत्रिणींकडेच सापडतात.....

 

Monday, July 15, 2019

मोठ्ठं बक्षीस


आज दहावीचा निकाल म्हणून उठल्यापासून कामांत लक्ष नव्हतं. शाळेमुळे आम्हा पालकांचा पण एक ग्रुप झाला होता. टेन्शन कमी करायच्या कारणाने या ग्रुप मधले आम्ही सगळे आई बाबा कॉफी आणि नाश्ता एकत्र करु या निमित्ताने सकाळी सकाळीच आमच्या नेहमीच्या जागी भेटलो. आम्हां सर्व आयांच्या डोक्यांत फक्त निकालाची चिंता होती. मुलांनी खरंच नीट केला होता ना अभ्यास परीक्षेच्या वेळी, आपण कुठे कमी तर नाही ना पडलो तयारी करून घेण्यांत कि ऑफिस मुळे पुरेसा वेळ नाही देऊ शकलो आपण ? या शंका मनांत घोळत होत्या ,जणू आमचा आत्मविश्वास त्या वेळी कुठेतरी दूर पळून गेला होता. गंमत म्हणजे दुसरीकडे बाबा हि कायम आनंदी राहणारी जमात अगदी 'कुल' गप्पा मारत होती. आम्हा आयांची डोकी एकीकडे टेन्शननी ' हॉट ' आणि सगळा बाबा ग्रुप मात्र  ' कुल '.. असं आमचं 'कूल अँड हॉट कॉम्बिनेशन' गप्पांमध्ये चांगलच रंगलं होतं ..

सर्वांबरोबर चहा नाश्ता गप्पा उरकून आम्ही दोघं घरी परतलो तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. निकाल एक वाजता लागणार होता. आतां अजून दोन तास कसे काढणार ? या विचारांमध्ये आम्ही होतो. इतक्यात खेळून आलेल्या माझ्या मुलाने त्याचे सगळे मित्र मैत्रिणी निकालाच्या भीतीने कसे टेन्शन मध्ये आहेत, कोण काय काय म्हणालं याचा सविस्तर वृत्तांत दिला. त्यावर 'तुला काय वाटतं, किती मिळतील रे मार्क तुला', हा प्रश्न मी त्याला विचारला ज्यावर त्याने ' बाबा बघ रे, हि कालपासून मला हाच प्रश्न विचारून बोअर करते आहे', अशी हसून प्रतिक्रिया दिली व तो अंघोळीला निघून गेला.

खरं तर , या वर्षी बदललेला दहावीचा अभ्यासक्रम, सतत बदलत असलेला पेपर पॅटर्न, 'इंटरनल' वीस गुण धरले जाणार नाहीत हा नवीन नियम व मराठी विषयाचे लिहून पूर्ण न होणारे लांबलचक पेपर या सर्व चढ उतारांमधून फक्त  तोच नाही तर सगळेच गेले होते. सर्व शिक्षकांनी मुलांना उत्कृष्ट प्रोत्साहन दिलं होतच आणि मुलांनी सुद्धा मनापासून प्रयत्न केले होते. अभ्यासाबरोबर इतर गोष्टी सांभाळताना काय काय करायचं काय नाही , किती वेळ कोठे घालवायचा हि आई बाबांनी दिलेली मोकळीक मुलांनी खूप छान सांभाळली होती त्यामुळे ओरडायला, रागवायला कोठे जागाच नव्हती. अधूनमधून थोडी जाणीव करून द्यावी लागायची इतकंच. नववीतून दहावीत जातांना एप्रिल पासून सुरु झालेली शाळा, त्या आधी पुस्तकं वेळेत मिळणार कि नाही याची धाकधूक, क्लासची प्रवेश प्रक्रिया , 'नववीतून दहावीत जातांना' या मार्गदर्शनपर कार्यशाळेला दिलेली भेट, या साऱ्या गोष्टी एकदम आठवल्या, तो संपूर्ण प्रवास आठवला. पालक म्हणून असलेली हि धास्ती, विद्यार्थी दशेत मात्र इतकी नव्हती हे खरं.

थोड्या वेळांत भूक लागली हे टुमणं सुरु होईल या अंदाजाने मी स्वयंपाकघरात गेले. आंब्याचा रस आणि गरम गरम पुरी असा आजचा मेनू होता. आंब्याचा रस तयार होता. मी पुऱ्या तळायला घेतल्या. 'कांतेय, चल ये जेवायला,तयार आहे सगळं'.  टम्म फुगलेल्या पुऱ्या , वाटीत काठोकाठ भरलेला आंब्याचा रस, त्यावर तूप असं ताट तयार होतं. 'देवापुढे ठेव ताट , नैवेद्य दाखव आणि कर सुरु जेवण ', असं मी म्हणताच, तो म्हणाला,'आज काय आहे ?'  मी हसून म्हटलं, 'तुझा निकाल ' तर म्हणाला ' मग त्याच्या आधीच गोड नैवेद्य ?' मी म्हटलं , 'अरे हो, निकाल काय छानच येणार आहे तुझा ' तर म्हणतो कसा , ' मग सारखं का विचारतेस किती मार्क पडतील म्हणून ? मला अगदी मनापासून हसू आलं.

जेवणं झाली, सगळं आवरलं आणि मग एक वाजण्याची वाट पाहत बसलो. बरोबर एक  वाजता निकाल लागला. online निकाल बघण्यात वेगळीच मजा असते नाही. आपला परीक्षा क्रमांक टाकून enter हे बटन दाबायचं आणि उत्सुकतेने स्क्रीन वर पाहायचं, नव्वद टक्के ! हुश्श .. अगदी मनासारखा निकाल लागला होता.  घरातील सर्व जण एकदम खुश होते. फोन , मेसेज यावरून शुभेच्छा येऊ लागल्या. त्याच्या सगळ्याच मित्र मैत्रिणींना खूप छान मार्क मिळाले होते. अभ्यास, दंगा मस्ती, खेळ सगळं काही सांभाळून त्यांनी बाजी मारली होती. खूप खूप कौतुक वाटलं सर्वांच !!

माझे बाबा माझ्या फोनची वाट पाहात असतील म्हणून मी आत गेले, त्यांना फोन लावायला तर आत कांतेय फोन वर त्यांच्याशीच बोलत होता. मी तिथेच थांबून तो काय बोलतोय हे ऐकू लागले. " अहो आबा, तुम्ही म्हणालात ना कि पंच्याऐंशीं टक्के मिळतील असं वाटतं होतं तुम्हाला पहा जास्त पडले मार्क, मामासारखेच. एक सांगू का आबा, हे मार्क आईमुळेच पडले आहेत. हो आबा.... अभ्यास जरी मी केला तरी तो कसा करायचा ते आईनेच सांगितलं, तिने मला वेळापत्रक बनवून दिलं आणि मुख्य म्हणजे मी सांगितलं तेव्हा तेव्हा तिने सुट्टी घेतली. मला आठवतंय , ऑफिस मध्ये सगळे तिला नेहमी चिडवायचे, मी पाचवीत होतो ना तेव्हापासून कि परीक्षेला कसली सुट्टी घेतेस, अजून पाचवीत तर आहे कांतेय पण आबा तेव्हापासून मला आठवतंय आई प्रत्येक परीक्षेला माझ्यासाठी सुट्टी घेत होती. तिला आपोआप समजतं माझा अभ्यास तयार आहे कि नाही ते. मग ती त्याप्रमाणे उजळणी करून घेते. मी आईला सांगितलं नाहीये हे कि तिच्यामुळे मिळालेत हे मार्क पण तुम्हांला सांगतोय, हे आपलं दोघांच सिक्रेट आहे " .... हे ऐकतांच फोन वर बोलणारी त्याची पाठमोरी छबी मला पुसट दिसू लागली. त्याच्या निरागस शब्दांमधून मला माझं सर्वात मोठ्ठं बक्षिस मिळालं होतं  !!


-कविता सहस्रबुद्धे