Tuesday, January 17, 2017

तशीच आहे राधा

कालिंदीच्या तटावरी ती,
भेट जाहली पहिली
झुळझुळणाऱ्या एक लयीची,
साथ सावळी वेडी

मध्याकाशातील चंद्राचे,
टिपूर चांदणे सजले
आठवणींच्या शिंपल्यातले,
सर मोत्यांचे तुटले

काजळकाळ्या कणाकणांतून,
सूर वेणूचे घुमले
गोकुळातले क्षण अवघे ते,
निळसर होऊन गेले

नेत्रांतून बरसल्या राधेच्या,
मग हळव्या श्रावणधारा
अंतरात त्या भरून उरला,
सूर वेणूचा निळा

त्या क्षणांचा सुगंध अजूनी,
तिथेच आहे मागे
अनिमिष त्या नेत्रांमध्ये,
फक्त  उरला 'कान्हा'..

ओठांवरती साद जूनी ती,
'परतून ये रे सखया'
अजूनही मी तिथेच आहे,
तशीच आहे राधा ....

अजूनही मी तिथेच आहे , तशीच आहे राधा !!!

 

Tuesday, January 10, 2017

ओझ ....

डोंगरमाथा चढून आल्यावर,
डोक्यावरची पाटी उतरवली
अन् सावलीत थोडी विसावताच
ती अगदी ताजीतवानी झाली

तिचं ओझं उतरलं...

तिचं ओझं उतरलं,
ते पाहून मला जाणीव ,
माझ्याही ओझ्याची झाली
पण दाखवायला माझ्या डोक्यावर
तिच्यासारखी पाटी नव्हती,

तिची वेगळी पाटी ,
माझीही वेगळी पाटी
ओझी दोन्हीकडेही होती
वागवण्याची जागा मात्र
तिची डोईवर अन् माझी मनांत होती ...






 

Friday, January 6, 2017

'जंगल जंगल बात चली हैं पता चला हेंsssss 
चड्डी पेहेन के फुल खिला हें , फुल खिला हें '

हे गाणं म्हणायला सुरवात करताच माझा सव्वावर्षाचा भाचा चालू असलेली दंगा मस्ती , खेळ सारं काही  थांबवून, एकदम जणू काही तो क्षण पॉझ व्हावा असं माझ्याकडे एकटक पाहू लागला. ती चाल , आवाज आणि काही प्रमाणात शब्दही आतां त्याच्या थोडे ओळखीचे झाले होते बहुदा ... कधी त्याचे कपडे बदलतांना, त्याच  आवरताना तर कधी त्याच्याशी खेळतांना, कधी त्याला अंघोळ घालतांना मी कोणतही गाणं म्हणायला सुरवात करायचे आणि प्रत्येक वेळी तो असाच माझ्याकडे एकटक पाहात राहायचा. अगदी सा, रे, ग, म, प, ध, नी , सां आणि सां, नी, ध , प , म , ग, रे, सा हे जरी म्हटलं तरी त्याची प्रतिक्रिया तीच असायची, खूप मजा वाटायची.

आपलं वय वाढतं तसं जुन्या आठवणी खूप प्रकर्षाने समोर येत राहतात. त्यातले काही क्षण परत एकदा जगावं असं वाटू लागतं. प्रत्येकीच्या आयुष्यातील काही खास क्षणांमधला एक खास क्षण असतो 'आई' होण्याचा.... त्या इवल्या जीवाला जपतांना, आई होताना खूप सुंदर आठवणी आपण गोळा करतो. त्याला शब्द समजत नसले तरी त्याच्याशी बोलतो, स्पर्शातून;त्याला झोपवताना अंगाई म्हणतो. आपलं ते नातं प्रेम,लळा,वात्सल्य, स्पर्श आणि आवाजाच्या कोंदणात हळूहळू रुजतं, बहरतं.

आज, आयुष्याच्या या वळणावर परत एकदा मी हेच क्षण अनुभवत होते. एकदा आई झालं कि कोणत्याही नात्यांत आई ची भूमिका सहज निभावू शकतो आपण, तसंच काहीसं. तेच इवलस रूप आणि तीच मोठ्ठी ओढ ... बाळ एक दिवसाचं असो अथवा एक वर्षाच , त्याला झोपवताना ओठातून आपसूकच अंगाई गीत येतं , 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई ' हे गाणं तसं खास आवडीचं.मनाजवळच. 'मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई ', 'जगावेगळी हि ममता, जगावेगळी अंगाई ' हे म्हणताना काय वाटत ते शब्दांत बांधण केवळ अशक्य.'निज  रे लडिवाळा, बाळ गुणी झोप नेली रे कोणी , गाई अंगाई'.... अशी अंगाई गाऊन बाळाला झोपवण्यात काय मजा आहे हे अनुभव घेऊनच समजतं. आईच्या मनातील भावना यापेक्षा अजून काय वेगळी असेल; इतके हे नेमके शब्द आणि भाव.

' दो नैना और एक कहानी ; थोडासा बदल थोडासा पानी, और एक कहानी ', गुलज़ारजींचे शब्द. काय मिठास आहे त्यात.. 'धीरे रे आजा रे अखियन में , निंदिया आजा री आजा' हे गाणं असो किंवा  ' सुरमई अखियों में , नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे '...  हळूहळू आपल्या अंगाई गीताच्या लिस्ट मध्ये गाणी वाढत जातात आणि आपण बाळ व अंगाई या समीकरणात अगदी रमून जातो.

आज मुलं कितीही मोठी झाली असली तरीहि रात्री झोपताना त्याला थोपटावं , जवळ घ्यावं, काहीतरी गुणगुणाव असं प्रत्येक आईला वाटतच कारण ती अंगाई आजही तिच्या मनात कुठंतरी घोळत असतेच.

Tuesday, January 3, 2017

'मावळतीला तो असतांना, आज वेगळ्या वाटा झाल्या
संपले क्षणांत सारे तेव्हां, डोळ्यांत मोकळा पाऊस झाला '....


दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला तिचा शेवटचा प्रवास. सुरु झाला 'याच वेळी' आणि संपलाही 'याच वेळी'.. सूर्यास्ताला.  त्या मधल्या तीन आठवड्यात मनात होती फक्त भीती अन् हातातून काहीतरी निसटतंय त्याची चुटपुट.


त्या प्रसंगापासून सूर्यास्त जरा जास्तच जवळचा वाटू लागला. काहीतरी ओढ लावणार नक्कीच आहे त्यात , क्षितिजावर अस्ताला जाताना त्याला पाहण्यात...


असण्या नसण्यातील एक पुसटशी रेष दाखवणारं क्षितिज, अस्थित्व नसूनही असल्याचा भास निर्माण करणारं, जाता जाता अवकाशात अनेक रंगांची उधळण करणारं आणि अवघ्या काही क्षणात हा सावळा काळोख पसरवणारं ...


काहीतरी साम्य आहे त्याच्या अशा असण्या आणि नसण्याचं, माझ्या आयुष्यातील त्या क्षणाशी ...